मुंबई |
अभिनेत्री आकांक्षा रंजन आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करत असून, आता ती आगामी ‘इक्का’ या लीगल थ्रिलरमधून प्रेक्षकांसमोर नव्या अवतारात येत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये आकांक्षाची झलक पाहायला मिळते.
‘ग्राम चिकित्सालय’ सीझन २ मध्ये दयाळू ग्रामीण डॉक्टर डॉ. गर्गी ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी आकांक्षा आता कोर्टरूमच्या पार्श्वभूमीवरील थरारक कथेत एका आधुनिक तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘इक्का’ची कथा एका खुनाच्या आरोपीची बाजू मांडणाऱ्या प्रसिद्ध वकिलाभोवती फिरते. ट्रेलरमध्ये आकांक्षाच्या भूमिकेचा फारसा खुलासा करण्यात आलेला नसला तरी कथानकात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे संकेत मिळतात.
या चित्रपटाबद्दल आकांक्षा म्हणाली, “प्रेक्षकांना ‘इक्का’च्या जगाची पहिली झलक पाहायला मिळत असल्याचा आनंद आहे. थ्रिलर हा माझा आवडता प्रकार असून या प्रकल्पाचा भाग होणे माझ्यासाठी विशेष उत्साहवर्धक आहे. दिग्दर्शकांचा स्पष्ट दृष्टिकोन आणि दमदार पटकथेने मला ही भूमिका स्वीकारण्यास प्रेरित केले.”
यापूर्वी ‘गिल्टी’, ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ आणि ‘ग्राम चिकित्सालय’मधील विविध भूमिकांमुळे आकांक्षाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘इक्का’मधून ती पुन्हा एकदा वेगळ्या शैलीत प्रेक्षकांना भेटणार आहे.

