पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत या लांबीत ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा
पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या अंमलबजावणीचा तसेच २०२५- २६ च्या प्रारुप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. 2025- 26 च्या प्रारुप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.श्री. डूडी यांनी छोटे पाटबंधारे विभागाचा आढावा घेताना संबंधितांनी सिंचनासाठी नदी, कालवे आदी सुविधा उपलब्ध नसलेल्या गावातील लघु तलाव दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करुन किती तलावांच्या भिंतींची दुरुस्ती व गाळ काढल्यास किती पाणीसाठा निर्माण होईल आणि त्यासाठी खर्चाची आवश्यकता याचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले.जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पनेअंतर्गत ३०५ प्राथमिक शाळा आणि सर्व १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. इमारती जुन्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. महाऊर्जाने या सर्व स्मार्ट प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता सौर पॅनेलची योजना राबवून नेट मीटरींग करावे, जेणेकरुन त्यांचे वीजेचा खर्च वाचण्यासह आर्थिक लाभही होऊ शकेल.पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिझम) विकासाला वन्यजीव वनक्षेत्रात चांगला वाव असून त्याचा प्रस्ताव वनविभागाने सादर करावा. रेशीम विकास विभागाने समूह विकासअंतर्गत मलबेरीच्या लागवडीच्या अनुषंगाने प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघांना रेशीम धागे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे तसेच किमान ५ हजार शेतकऱ्यांना मलबेरी लागवडीसाठी अर्थसहाय्याचा आराखडा सादर करावा.यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. विभागांनी वेळेत सर्व प्रशासकीय मान्यता घ्याव्यात. तसेच काही योजनात खर्च होत नसल्यास पुनर्विनियोजनाचे किंवा निधी परत करण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.यावेळी श्री. इंदलकर यांनी सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या प्रस्तावांना दिलेली प्रशासकीय मान्यता, वितरीत केलेला निधी या अनुषंगाने सादरीकरण केले. त्याबाबत यंत्रणांच्या प्रमुखांनी खर्चाच्या अनुषंगाने माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिलेबी भरवत,फुगडी खेळत, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला”
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. पुणे शहरातील पक्ष कार्यालय, नारायण पेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत, फटाके फोडून, महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ “एकच वादा,अजित दादा” “अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” “ दादाचा वादा आणि बळ” अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार आहे. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने व प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेलं आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कमिटी यांवर काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल व पक्ष वाढीसाठी मदत होईल. महानगरपालिका निवडणूक महायुती मध्ये लढवायची हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा घेतील. मात्र आपणही महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. पक्ष वाढीसाठी आपणही रस्त्यावर उतरून पक्ष संघटनेची कामे केली पाहिजेत.
यावेळी प्रदीप देशमुख म्हणाले मागील दीड वर्षात 7 ते 8 वेळा जल्लोष करण्याची संधी मिळाली भविष्यात ही संधी आणखी वाढणार आहे. दादा मुख्यमंत्री हवेत अशा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.पद मिळत जातील पण त्यांची तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची परवा न अजितदादा कार्यकर्ते पदाधिकारी यांची काळजी घेतात.आपण त्यांचा कमी वेळ घेऊन त्यांना महाराष्ट्र व देशात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पाचवेळा पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत. अनेक वर्षांपासून ते जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा आहे. शहरासह ग्रामीण भागातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न, नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने विविध विकासकामांना आणखी गती मिळणार आहे. सदरप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, मा.महापौर दत्ता धनकवडे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेविका सुषमा निम्हण, शशिकला कुंभार, शुक्राचार्य वांजळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, माहिती अधिकार अध्यक्ष दिनेश खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष चंद्रहास शेट्टी, विधानसभा मतदारसंघाचे वडगावशेरी अध्यक्ष सतीश म्हस्के, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, कसबा अध्यक्ष अजय दराडे, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, पुणे कँन्टोनमेंट अध्यक्ष नरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई – एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.
माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न,राजेवाडी (आर.सी.सी) संघाला विजेतेपद
पुणे – माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ पुणे अहिल्या आश्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अविनाश बागवे व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 16 संघांनी सहभागी झाले होते, या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले, या क्रिकेट स्पर्धेमध्ये राजेवाडी (आर सी सी) क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक कसबा वॉरियर संघाने पटकाविला, तृतीय क्रमांक एकता क्रिकेट संघाने पटकाविला, या विजेता संघांना स्मृतिचिन्ह व विजय चषक देऊन त्यांना गौरवण्यात आला, या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस व मातंग एकता आंदोलन राजेवाडी शाखेचे अध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले होते, यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, किरण लोंढे, सुरेश अवचिते, विकी भिसे, राजू शेखमेजर, साहिल खान, कौस्तुभ वाघमारे, विशाल पवार, अक्षय पवार, चंद्रकांत वाघमारे, किरण चकाले, आदि यावेळी उपस्थित होते
महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले
पुणे:- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून महाआवास अभियानांतील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करून लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात यावी, असे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले. महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत पुणे विभागस्तरीय कार्यशाळा शुभारंभप्रसंगी आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉ. राजाराम दिघे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, उपायुक्त (विकास) विजय मुळीक यावेळी उपस्थित होते. तर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दायानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना १०० दिवसाच्या कालावधीत अधिक गतिमान करण्यासाठी महाअवास अभियान राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची आणि विहित मुदतीत घरकुले उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता करून आणि मानवीय दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना घरकुले हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. अकारण त्रुटी काढून कामे रेंगाळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विविध कायद्यांचा आणि नियमांचा उपयोग हा अडचणी निर्माण करण्यासाठी न करता लोकांसाठी निवारा निर्माण व्हावा यासाठी करावा. यावेळी त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून योजनेच्यासंबंधी अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, घरकुलासंबंधी लाभार्थ्यांची नोंदणी करताना त्यांच्या वैयक्तिक नोंदी तसेच आधार क्रमांकाची नोंद यंत्रणांनी अचूकपणे करण्याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी यासाठी प्रत्यक्ष संवाद साधावा. जिल्हाधिकाऱ्यांनी घरकुल योजनांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग घेण्यात यावा. घरकुलांची उभारणी झालेल्या ठिकाणी संवदेनशिलतेचा, कल्पकतेचा वापर करुन परिसर विकासावर भर द्यावा. वृक्षारोपण, रस्ते, स्ट्रीट लाईटस्, सोलार प्रकल्प उभारावेत. त्यासाठी जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली. शंभर दिवसात पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत महा आवास अभियान प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याने सर्व संबंधितांनी योजनेची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.संचालक श्री. दिघे यांनी लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरकुले मिळावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करून अडचणी सोडवाव्या असे सांगितले. उपायुक्त विकास श्री.मुळीक यांनी बैठकीत विविध घरकुल योजनांचे उद्दिष्ट व त्याची पूर्तता याची माहिती दिली. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना, पीएम जनमन योजना आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनांच्या अंमलबजावणीचा विभागस्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी महा आवास अभियान २०२४-२५ च्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
देशाला पहिलं खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
- पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक
मुंबई- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे.

योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता आठवी युवा संसद पुण्यातजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे आयोजन
- संसद कट्टा अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची मुलाखत
पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता तसेच सशक्त युवा, सशक्त राजकारण व सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, याकरिता पुण्यामध्ये आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे गुरुवार, दिनांक ३० व शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी संसद कट्टा अंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुलाखतीचे सत्र होणार आहे. संसदेत मागील वर्षी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत झाली होती. माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत.
संसदेत देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे १५०० हजार विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुण्यासह सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता येणार आहेत.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, ग्रामसभा ते लोकसभा, राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग, माध्यमे राजकारण घडवतात?, व्हिजन भारत २०२९, सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत या विषयांवर संसदेत सत्र होणार आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. वयवर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वित्झर्लंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.याप्रसंगी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.
खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला
- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन
- राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडूंनी मानले आभार
मुंबई : खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केले.खो-खो साठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणाले, निधी देणं ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
पर्पल जल्लोष 2025 चा समारोप उत्साहात
पुणे दि. 19:- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने 17 ते 19 जानेवारी या कालावधीत ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, संगीता काळभोर, राजेंद्र वागचौरे उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांनी दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. आजचा हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यामागे असणारा उद्देश खूप मोठा आहे. याठिकाणी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी एखाद्या उद्योगाला मानवी भावनांची जोड मिळाली तर प्रगती करणे सहज शक्य होते याचा प्रत्यय आला, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
पर्पल जल्लोष म्हणजे समाजाच्या संघटीत प्रगतीचे उत्तम उदाहरण
‘दिव्यांग व्यक्तीचे समाजाचा भाग होण्यासाठी जे प्रयत्न सुरू असतात, त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. पण अशा प्रयत्नांना पर्पल जल्लोषच्या माध्यमातून बळ मिळते. पर्पल जल्लोष सोहळा म्हणजे समाजाची संघटीत प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. जन्मजात दिव्यांगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे काही कलागुण आहेत, त्याचा योग्य वापर करून त्यांनी पुढे जात रहावे. सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल ती करावी,’ असे आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले दिव्यांग भवन उभारण्याचे काम केले आहे. त्याबद्दल मी महापालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमातून राज्यातील दिव्यांग संघटनांना मार्गदर्शन ठरावे असा जल्लोष झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना या दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासोबतच त्यांना न्याय देण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनबाबत माहिती दिली. शेखर सिंह म्हणाले, ‘दिव्यांग बांधवांचे उत्कर्ष आणि विकासाला केंद्रबिंदू मानत ‘पर्पल जल्लोष’ हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन सुरू केले. याठिकाणी 21 प्रकारच्या दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन, विविध प्रकारच्या थेरपी, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी साहित्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम या पर्पल जल्लोषमध्ये घेण्यात आले.
पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार
पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सॉल्वथॉन स्पर्धेमध्ये इंजिनीअरिंग थीम मध्ये जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. या महाविद्यालयाच्या टीममध्ये पियुष जोशी आणि राज तिलक जोशी यांचा समावेश होता. तर, आर्किटेक्चर थीम मध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या टीमला प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही संघांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. राज्यपालांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांशी संवाद साधला.
याप्रसंगी दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन महापालिका विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण जिल्हा संघ विजयी
बारामती, दि.१९: महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुरुष विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पश्चिम यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व संघ तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघ विजयी झाले.रेल्वे मैदानावर आयोजित कार्यक्रमात
विजेत्या संघास उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, कबड्डी हा पारंपरिक खेळ असून त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करण्यात येईल.
कोणत्याही स्पर्धेत जय पराजय निश्चित असतो त्यामुळे
जिंकण्यासाठी सर्व खेळाडूकडे खेळाडूवृत्ती असली पाहिजे, पराभव हा आदरपूर्वक, सन्मानजनक असला पाहिजे. विजयी संघांनीदेखील विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, पराभूत संघांनी पराभवाचे शल्य मनात न ठेवता नव्या उमेदेनी पुढील तयारी केली पाहिजे. पराभूत संघाची सुध्दा लोकांनी स्तुती केली पाहिजे अशा प्रकारची कामगिरी संघाकडून झाली पाहिजे. खेळाडूंनी
खेळ पूर्ण क्षमतेने खेळ खेळून उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट खेळ दाखविला पाहिजे.
राज्य सरकारच्यावतीने क्रीडा क्षेत्राकरीता विविध निर्णय घेण्यात आले असून हे निर्णय खेळाडूसह क्रीडा रसिकांना उपयुक्त ठरणार आहेत. पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, राज्य शासनाच्यावतीने क्रीडा विभागासाठी निर्णय घेण्यात आले असून त्याचा खेळाडूंना निश्चित लाभ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन बारामतीकरांना लाभ मिळाला पाहिजे, त्याचा आनंद घेता यावा याकरीता अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आपणही या स्पर्धा, कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे, याचा मला अभिमान आहे. कबड्डी स्पर्धेत खेळाडूंच्यावतीने क्रीडा रसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ खेळण्यात आले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढे अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असेही श्री. पवार म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्यावतीने कबड्डी खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेस ९५ लाख रुपयांचा धनादेश श्री. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, अर्जून पुरस्कारार्थी शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, मायाजी आकरे, महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह राज्य कबड्डी संघटना व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.
श्री. चांदोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री. कसगावडे यांनी केले.
काश्मिरी सांस्कृतिक वारसा पुणेकरांना अभुवण्याची संधी
अजमते-ए-काश्मीर’ महोत्सवाचे मंगळवारी आयोजन
पुणे : जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी पुणेकरांना ‘अजमते-ए-काश्मीर’ या 13व्या काश्मीर महोत्सवातून मिळणार आहे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे मंगळवारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मिरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमिमा अख्तर या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण असणार आहेत.
काश्मीर महोत्सव मंगळवार, दि. 21 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळात नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार शर्मा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे मुख्य अभियंता अनिल कोळप आणि सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे कळविली आहे.
पारंपरिक काश्मिरी गीते, नृत्य, रौफ, संतूर, रबाब, ठुमर नारी आदी वाद्यांचे सादरीकरण काश्मिरी कलाकार करणार आहेत. काश्मीरमधील 20 कलाकारांचा यात समावेश आहे. काश्मीरच्या लोकसंस्कृतीशी जोडलेला हा महोत्सव पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आला असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे.
नळकोंड्यावरील भांडणासारखी आम्हा राजकारण्यांची सभागृहातील भांडणे : आमदार रोहित पवार
विकासाचा मुद्दा राहतो दूर : नेत्यांना खूष करण्याचाच प्रयत्न
युवा संवाद आयोजित आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवास रोहित पवार यांची भेट
पुणे : पत्रकाराच्या लेखणीप्रमाणे व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात ताकद आहे. यामुळेच राजकारणी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट देण्याचे टाळतात, असे वाटते. राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील व्यंगचित्रांचा संदर्भ देऊन मार्मिक टिप्पणी करताना आमदार रोहित पवार म्हणाले, चित्रात दर्शविल्याप्रमाणे पाणी वाया घालवून महिला मात्र नळकोंड्यावर भांडणे करीत आहेत त्याप्रमाणे सभागृहात आम्ही राजकारणी मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला सारून विरोधासाठी विरोध करताना किंवा नेत्याला खूष करण्याकरिता एकमेकांशी भांडत राहतो.
युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास आज (दि. 19) आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन व्यंगचित्रांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. व्यंगचित्र महोत्सवाचे संयोजक, व्यंगचित्रकार धनराज गरड, लहु काळे, घन:श्याम देशमुख मंचावर होते.
पक्ष फोडणे, पक्ष बदलणे, लोकप्रतिनिधी पळविणे, कोण कुणाच्या वाहनात स्वार होणे, खुर्चीच्या लोभापायी मंत्र्यांचे जॅकेट परिधान करून मिरविणे, फिरविणे आणि मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे लेखणीचा उपयोग केवळ जॅकेटच्या खिशाला लावण्यासाठी करणे अशा राजकीय परिस्थिती आणि व्यंगचित्रांवर भाष्य करून आमदार रोहित पवार म्हणाले, राजकारणी स्वत:च्या वागणुकीनेच व्यंगचित्रकारांना खुराक देतात, स्वत:ची छबी निर्माण करतात तीच छबी व्यंगचित्रकार स्वत:च्या चित्रशैलीतून साकारतो आणि ती कामय राहते. असे होऊ नये म्हणून मी वारंवार माझी स्टाईल बदलत राहतो. पूर्वीचे नेते व्यंगचित्रांमधून झालेली टीका खेळीमेळीने स्वीकारायचे, परंतु आजच्या परिस्थितीत असे होताना दिसत नाही. एकाधिकारशाहीचा अंमल वाढल्यामुळे कलाकाराला व्यक्त होण्यास मर्यादा येत आहेत. राजकारणापेक्षा सामाजकारण वाढविले तरी आम्हाला निवडणुकीत यश आले नाही. पुढील काळ आमच्यासाठी संघर्षाचा ठरणार आहे.
प्रास्ताविकात धनराज गरड यांनी आमदार पवार यांना व्यंगचित्र महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे आणि व्यंगचित्रकला-कलाकारांना राजश्रय द्यावा अशी विनंती केली. सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले. लहु काळे, घन:श्याम देशमुख, शरद महाजन, अमित पापळकर, हेमंत कुंवर, ऋषिकेश उपळावीकर या व्यंगचित्रकारांचा सत्कार आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी प्रात्यक्षिक सादर केले.
महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही – अजित पवार
- पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करा – प्रफुल पटेल
- विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या – सुनिल तटकरे
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प शिबीराची उत्साहात सांगता…
शिर्डी – महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशापध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडेतिकडे करणार्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा… हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा असा आदेशही अजित पवार यांनी आजच्या शिबिरात दिला. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहिल. यासाठी तुमची साथ मला हवी आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर २५ कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात ५० कार्यकर्ते तयार करा. त्यातून २० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणूकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे असेही अजित पवार म्हणाले. साईबाबांच्या कर्मभूमीत आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीतून विकासाची दिशा आणि पुरोगामी विचाराची वाटचाल आपण नवसंकल्प शिबीरातून करत आहोत. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा फलक (बोर्ड) आणि झेंडा कसा लागेल असा प्रयत्न सर्वांनी करा अशी ताकीदही अजित पवार यांनी दिली. हा महाराष्ट्र आहे. एकतेचा आणि समतेचा विचार इथे रुजलेला आहे. जातीपातीचे राजकारण जास्त दिवस चालत नाही. पण सध्या तशापध्दतीने सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे याबद्दल नाराजीही अजित पवार यांनी व्यक्त केली. महायुतीला बहुमत प्रचंड मिळाले असून जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभेत जे अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे,पदाधिकाऱ्यांचे असल्याची स्पष्ट कबुली अजित पवार यांनी दिली. ज्यांची जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही असे स्पष्ट करतानाच पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणाऱ्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल असेही अजित पवार यांनी जाहीर केले. दरमंगळवारी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीला महिन्यातील एक दिवस ठरवून सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामाबरोबरच पक्षाचाही कार्यक्रम घेणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. आज अजित पवार यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.आता तुमच्या सगळ्या सहकार्याने राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून हे काम करायचे आहे. त्यासाठी विधानसभेत जसे दौरे केले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात दौरे करणार आहोत असे अजित पवार यांनी जाहीर केले. दोन दिवसाच्या शिबीरात ज्या वक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या किंवा चांगले मार्गदर्शन केले त्यांचे कौतुकही अजित पवार यांनी केले.

पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करा – प्रफुल पटेल
पक्षाची मर्यादा ओळखून कार्यकर्त्यांनी श्रध्दा आणि सबुरीने पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे. पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पाच महिन्यातच दादांच्या नेतृत्वाखाली पराजयाचा विजय करुन दाखवलात त्याबद्दल प्रफुल पटेल यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही असे पंतप्रधानांना महायुतीत जाताना सांगितल्याचे प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची संधी आपल्या जवळ आहे. कॉंग्रेस ज्यापध्दतीने चुकीचे मेसेज फिरवत आहे ते खोडून काढण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपली विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करायचे आहे. तसा निर्धार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येतील असेही प्रफुल पटेल म्हणाले.

विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या – सुनिल तटकरे
पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे.इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम दिले जातील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दादांच्या रुपाने आपल्या पक्षाला चेहरा मिळाला आहे. मुंबईमध्ये दादांचा हाच चेहरा मनपा निवडणुकीत पुढे आणायचा आहे. मुंबई शहरात २५ वर्षात जितके कधी यश मिळाले नाही ते यश दादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के मिळेल आणि आगामी काळात मनपात स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.जशी यशवंतराव चव्हाण यांची आधुनिक शिल्पकार म्हणून ओळख आहे तशी अजितदादांनी केलेल्या विकासामुळे आधुनिक शिल्पकार म्हणून नोंद होईल असेही सुनिल तटकरे म्हणाले.सदस्य नोंदणी अभियान आपण सुरु केले आहे. नोंदणीत जो चांगलं काम करेल त्याचा पक्ष नक्कीच विचार करेल.पक्ष संघटन वाढवत असताना आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.दादा…! गर्दी आणि तुम्ही याचं अतुट नातं आहे. दादा तुमची विचारांची उंची मोठी असल्यानेच हे घडत आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी दादांच्या कामाबाबत स्तुती केली. नवीन पर्व येऊन समोर उभं राहिलं आहे. आता ३१ मार्चपर्यंत सभासद नोंदणी पूर्ण करायची आहे. दिवसाचे २४ तास आपल्याला पक्षासाठी काम करायचे आणि ते चढत्या क्रमाने असले पाहिजे आणि हे काम झोकून देऊन करा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. या शिबीरात आजच्या दुसर्या दिवशी सकाळी संविधानावर आधारीत चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर ‘शिव – शाहू – फुले – आंबेडकर पुरोगामी विचारधारा’ या विषयावर लहूजी कानडे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, नंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आपले विचार मांडले. या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
