अजमते-ए-काश्मीर’ महोत्सवाचे मंगळवारी आयोजन
पुणे : जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी पुणेकरांना ‘अजमते-ए-काश्मीर’ या 13व्या काश्मीर महोत्सवातून मिळणार आहे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे मंगळवारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मिरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमिमा अख्तर या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण असणार आहेत.
काश्मीर महोत्सव मंगळवार, दि. 21 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळात नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार शर्मा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे मुख्य अभियंता अनिल कोळप आणि सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे कळविली आहे.
पारंपरिक काश्मिरी गीते, नृत्य, रौफ, संतूर, रबाब, ठुमर नारी आदी वाद्यांचे सादरीकरण काश्मिरी कलाकार करणार आहेत. काश्मीरमधील 20 कलाकारांचा यात समावेश आहे. काश्मीरच्या लोकसंस्कृतीशी जोडलेला हा महोत्सव पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आला असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे.