Home Blog Page 683

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण

दि. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा

पुणे:
हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ चा आखाडा येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या लोगोच्या अनावर प्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच पुनीत बालन ग्रुप पुढाकार घेतो. हिंदू गर्जना चषक या निमित्ताने मातीतल्या खेळाशी कुस्तीची अधिक जवळून जोडले जाता येईल याचा आनंद आहे. तसेच या स्पर्धेत आम्ही एकूण 42 लाखांची भरघोस बक्षीसे देणार असून प्रथम क्रमांकास थार भेट देण्यात येणार आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे म्हणाले, महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा दि. ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एसपी कॉलेज महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे भरवण्यात येणार आहे.

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला

  • उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील पाणीपुरवठ्यात सप्टेंबरपर्यंत वाढ-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्याचे काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्या नंतर सप्टेंबर महिन्यापासून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व भागांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल आणि पाण्याची समस्या सुटेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की, गेले दोन वर्षे यासंदर्भातील विकास कामांचा पाठपुरावा केल्यानंतर, आता त्याला चांगले स्वरुप येऊ लागले आहे. पाणीपुरवठ्याच्या अकरा झोन पैकी दहा झोनमधील कामे येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. विशेषतः सात ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने, पाणी पुरवठ्याचा दाब वाढणार आहे.

येत्या ऑगस्टपर्यंत टाकी बांधण्याचे, तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा फायदा शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच भागातील नागरिकांना होणार आहे. हा मतदारसंघ पर्वती जलकेंद्रापासून लांब असल्याने, येथे पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावते. आमदार झाल्यापासून ही समस्या सोडविण्यासाठी मी कार्यरत आहे. येत्या ऑगस्टपर्यंत साठवण टाक्या बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यालगतच्या सर्व परिसरात पुरेशा दाबाने व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होईल. असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कला शुद्धरुपात सादर होण्यासाठी नियमित रियाज करा : प्रमोद कांबळे

भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिवन जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
पुणे : काम करताना लाभाचा अथवा सन्मानाचा विचार करू नका, हातात आलेले काम उत्कृष्ट कसे करता येईल, त्यात आपले वेगळेपण कसे दाखविता येईल, याचा विचार करा. यातून आपली कला शुद्ध होईल आणि सर्वांना भावेल. सतत कलेचा विचार करा, रोज रियाज करा असा सल्लाही प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिवन जीवन गौरव पुरस्कार देऊन आज (दि. 21) सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.
समाजात अभावानेच आढळणाऱ्या चित्रकलेची साक्षरता वाढविली पाहिजे. सरकारी खुर्चीवर बसलेले अधिकारी कलाविषयात विशेषत: चित्र-शिल्पकलेत साक्षर नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने तयार होणारी कलाकृती अपूर्ण अथवा अयोग्य होते आणि त्याचे समाजात हसे होते, अशी टिप्पणीही कांबळे यांनी या प्रसंगी केली.
प्रास्ताविकात पुष्कराज पाठक म्हणाले, चांगल्या व्यक्ती संस्थेची जोडल्या जाणे हे संस्थेचे भाग्य असते. उत्तम आणि गुणी माणसांमुळेच संस्थेच्या कार्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. विनम्रता ठेवल्यास सर्व गोष्टी मिळत जातात. विद्यार्थ्यांनी वाढत्या वयानुसार प्रगल्भ होत जाणे आवश्यक आहे. प्रमोद कांबळे नम्रपणे करत असलेल्या कलासाधनेचा विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवावा असे सांगून समाजातील चांगल्या व्यक्तींचा आदर्श ठेवा, त्यांचे नुसते अनुकरण करू नका असे आग्रहपूर्वक सांगितले. बी. एम. पाठक यांच्या नावे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी त्यांनी अवगत केले.
प्राचार्य प्रा. राहुल बळवंत (अभिनव कला महविद्यालय, टिळकरोड), प्राचार्य डॉ. संजय भारती (अभिनव कला महविद्यालय, पाषाण), प्राचार्य अभिजित नातू (वास्तु विद्या महाविद्यालय, टिळकरोड), सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तानाजी भंडारे आदी मान्यवर मंचावार होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्कराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सुरुवातीस कांबळे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.
या निमित्ताने भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे अभिनव रंगभाषा या 85व्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात भरविण्यात आले असून प्रदर्शन दि. 23 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
चित्रप्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनव कला महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना बी. एम. पाठक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाविद्यालयात 36 वर्षे अविरत सेवा देणारे ग्रंथपाल कांतिलाल ठाणगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्वागत सचिव पुष्काराज पाठक, प्राचार्य राहुल बळवंत यांनी केले. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले. आभार प्राचर्य राहुल बळवंत यांनी मानले आणि संस्थेचे भक्कम पाठबळ हिच यशस्वीतेची खात्री आहे, असे सांगितले.

पुण्यात बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित

गोरगरीब व गरजू उपवर-वधूंनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे – अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. 15 मार्च २०२५ रोजी बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपति रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित हा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रितीरिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. गरीब व गरजू उपवर-वधूंनी लवकरात लवकर आपली निःशुल्क नावनोंदणी करावी, असे आवाहन रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यासंदर्भात माहिती देताना रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, अग्रवाल समाजाचे कुलदेवता अग्रसेन भगवान यांनीच गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना दिला होता. अग्रसेन भगवान यांच्या याच संदेशाचा सम्मान करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून, आजवर शेकडो गोरगरीब व गरजू जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे. या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसेकि कपाट, पलंग, गादी, चादरी, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी, तसेच घरगुती कामाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणार आहेत. याशिवाय वर-वधूचे कपड़े, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवेदेखील दिले जातात.
अत्यंत थाटामाटात आणि हिंदू धर्मातील सर्व विधि-परंपरांनुसार दि. 15 मार्च 2025 रोजी गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे आयोजित या विवाह सोहळ्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क असणार नाही. या वर्षीच्या विवाह सोहळ्यात 25 हून अधिक जोडप्यांचा विवाह करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या भव्य-दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणारा सर्व खर्च जसे की वेडिंग हाॅल आणि लाॅन, आकर्षक डेकोरेशन, येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी रुचकर भोजन वगैरे सर्व खर्च रतनलाल गोयल व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येतो. या विवाह सोहळ्यात लवकरात लवकर नावनोंदणी करण्यासाठी राजेश अग्रवाल (9049992560) आणि रतनलाल गोयल (9422025049) यांच्याशी संपर्क साधावा.
या सोहळ्यात लग्न करणारी मुले-मुली ही सज्ञान असावी आणि मुला-मुलीची तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही विवाहासाठी संमती असणे गरजेचे आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी अग्रवाल समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी दिली.

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय 89) यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

खो खो विश्वचषकःऑस्ट्रेलियन संघात जगताप बंधुंची यशस्वी कामगिरीमंगेश जगतापला चार मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच

पुणे, दि. २१ जानेवारी : लहानपणापासून खो खो खेळाचे धडे शिकलेला आणि मुळ पुणे आणि सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे मंगेश व तेजस जगताप  यांनी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमध्ये सुरू असलेल्या खो खो विश्वचषक २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करीत आहेत. या संघाने गुणांची चौकार मारत मलेशिया व जर्मनीचा पाडाव केला. ऑस्ट्रेलियन संघाने कमाल कामगिरी केली. त्यामुळे हा संघ भविष्यात यशस्वी संघ म्हणून उदयास येत आहे.
आयोजित विश्वकप खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे एकूण चार सामने झाले. यामध्ये इंग्लंड केनिया यांच्या बरोबर झालेल्या मॅचमध्ये ते हरले. परंतू मलेशिया व जर्मनी बरोबर झालेले सामने जिंकले. यामध्ये जगताप बंधुंनी आपली चपळता दाखवली आहे. यामध्ये मंगेश जगताप याच्या अप्रतिम खेळाबद्दल चार ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच चा सन्मान मिळाला आहे.  या दोघांची मेहनत आणि गुणवत्ता  पाहून ऑस्ट्रेलिया खो खो असोसिएशनने त्यांची निवड केली  होती.  धमाकेदार खेळ करीत गुण मिळविले.
पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कामगिरी बजावण्यास दक्ष झाला असताना त्याला पुण्याची साथ लाभली आहे. यामध्ये विशेष म्हणजे मंगेश व तेजस या जगताप बंधुचा कांगारू संघात समावेश आहे. नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्व चषक स्पर्धेला नुकतीच सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक कारणांनी लक्ष वेधून घेत आहे. एकतर या संघाचे नेतृत्व आणि संघटन महाराष्ट्रातील इचलकरंजीच्या ओजस कुलकर्णी याच्याकडे आहे.
जगताप बंंधुचे खेळातील योगदान खूप लक्षवेधी ठरले आहे. ऑस्ट्रेलिया संघांचे आणखी एका कारणाने आकर्षण वाढले आहे. ते म्हणजे जगताप कुटुंबीयाचे योगदान. तेजस २४ वर्षाचा तरूण तर त्याचा १८ वर्षीय भाऊ मंगेश . दोघेही ऑस्ट्रेलियात खो खो मध्ये भरीव कामगिरी करीत आहेत. त्यांचे वडील संदीप जगताप हे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रायोजक आहेत. ते फिन्सवर्स कंपनीचे चालक आहेत. पदवी मिळवल्यानंतर तेजस हा या कंपनीत संचालक आहे. अशी पुणेरी पलटण विश्वचषक खो खो स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी केली आहे. 

हडपसर: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा

पुणे- हडपसर येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा झाली आहे.

खून या गुन्ह्याची घटना ही डावरी नगर, लोखंडी पुलाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, हडपसर पुणे येथे दिनांक २७/०६/२०१६ रोजी घडली . यातील आरोपी १) गणेश सुभाष वाबळे, वय २४ वर्षे, रा. डावरीनगर, लोखंडी पुलाजवळ, कॅनॉलजवळ, पुणे याने कुत्रा अंगावर धावून गेल्याचा राग मनात धरुन आरोपी २) गोरक्ष नामदेव लोंढे, वय २० वर्षे, रा. माळवाडी, हडपसर, पुणे ३) उमेश उत्तरेश्वर खंडागळे, वय २० वर्षे, रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे ४) प्रदिप ज्ञानदेव करपे, वय २२ वर्षे, रा. काळेपडळ, पुणे व ५) किशोर बापू लोंढे, वय १८ वर्षे, रा. माळवाडी, हडपसर, पुणे यांच्यासह येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून यातील मयत नामे सागर नामदेव चौगुले यासं लाकडी दंडुका व सिमेंट ब्लॉकच्या साहाय्याने जिवे ठार मारल्याने हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५०२/२०१६ भा.दं.वि.कलम ३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४९,३२३,४२७,५०४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी केला व यातील आरोपी विरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले.वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक २१/०१/२०२५ रोजी सात वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.कामगिरी सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्रीमती. निवेदिका काळे, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, यांनी कामकाज पाहिले.
सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी पो.नि संदिप देशमाने यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

दुचाकीवरुन येवुन महिलांचे दागिने हिसकावणारे दोन गुन्हेगार जेरबंद, ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी जप्त

चोरीचे २ गुन्हे उघड

पुणे- दुचाकीवरुन येवुन महिलांचे दागिने हिसकावणारे दोन गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडून पोलिसांनी ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी जप्त केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि ,
दि.१४/०१/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा. चे सुमारास फिर्यादी त्रिमुर्ती चौकाकडुन गुलाबनगर कडे जाणारे रोडवर गोकुळ बंगल्या समोरील सार्वजनीक रोडवर रस्ता ओलांडत असताना एका मोपेड दुचाकी गाडीवरून दोन अनोळखी इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले. त्या बाबत अज्ञात इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे (जुना कायदा भादवि कलम ३९२,३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता..
दि.१८/०१/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे दोन्ही इसम हे ईवॉन आयटी पार्क खराडी पुणे येथील हनी स्मोकर पानटपरीचे समोर थांबलेले आहेत. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचे दोन इसम सदर ठिकाणी उभे राहुन सिगरेट ओढत थांबलेले दिसले. त्यांना संशय येताच ते तेथुन पळुन जावु लागल्याने त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रितेश अंबादास जाधव वय २६ वर्षे रा.प्रतीक नगर संघर्ष चौक चंदननगर पुणे. मुळ रा. फ्री कॉलनी गल्ली नंबर ६, सोलापुर २) तरूण बलराम झा वय २५ वर्षे रा. पठारे ठुबेनगर बालाजी हॉस्पीटल जवळ खराडी बायपास पुणे मुळ रा. चनोर गाव मणिगची दरभंगा पटणा राज्य बिहार असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मी व माझा साथीदार असे आम्ही मोपेड दुचाकी गाडीवरून धनकवडी भागात फिरत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून आम्ही तेथुन पळुन गेलो. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) हा गुन्हा उघडकीस आला असुन त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांचे कडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४,३ (५) प्रमाणे उघडकीस आणण्यात आला आहे. सदर आरोपी कडुन एकुण २ चैन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असुन एकुण ५,३०,०००/- रूपये किंमतीचे ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी असा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २,स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली आहे.

दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे – डॉ. सदानंद मोरे

 महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग – डॉ. अरुणा ढेरे 

लोकसाहित्य व लोकसंस्कृती महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

पुणे-लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलामहाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून जपून ठेवली आहे. असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळा व महोत्सवात केले. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळा आणि महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील संत नामदेव सभागृह येथे संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव ज्योती भाकरे, फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशनच्या डॉ.सुनीता धर्मराव, शाहीर हेमंत मावळे, प्रवीण भोळे, रमेश वरखडे यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडले.मोरे म्हणाले की लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला काय आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. ही दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सर्व लोककलांना राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे त्या काळात या लोककलांची पाळेमुळे घट्ट झाली होती. या लोप पावत चाललेले लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलांना नवसंजीवनी देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून होत आहे, याचा आनंद आहे. काळकर म्हणाले, की आपल्या या लोककलांना खरा उजाळा देत होते ते म्हणजे शेतकरी, लोक कलावंत हे लोककलेचा शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा वारसा पुढे नेत होते. या लोककलांना, लोकसाहित्याला आमच्या मातीचा वास होता. आमच्या मातीचा स्वाद होता. आमच्या मातीचा नाद होता आणि आमच्या मातीचा आमच्याशी होणारा संवाद होता. तो हरवलेला संवादाला समाजाने साद देणं गरजच आहे. ढेरे म्हणाल्या, की महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग आहे. हे साहित्य निर्माण करणारे साहित्यकारांनी डोंगराएवढं काम करून ठेवले आहे. याचा वारसा जपन गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन,  भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून घेतलेली ही कार्यशाळा महत्वाची आहे.सदरील महोत्सवाचे संयोजक  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन  समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या. सदरील कार्यक्रमाचे आभार विभीषण चवरे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.सुनीता धर्मराव यांनी केले. 

समाज बळकटीकरणासाठी व्यसनाधीनता कमी होणे गरजेचे-ह.भ.प. रोहिणी माने परांजपे

पुणे : मन, मेंदू आणि मनगट बळकट करायचे असेल तर निर्व्यसनी असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण शरीरात व्यसनाने प्रवेश केला की शरीर नामक यंत्र गंजू लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे निर्व्यसनी देहाचे तरुण मला द्या मी देश बदलून दाखवेन. त्यामुळे समाज बळकट होण्यासाठी व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे, असे मत प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. रोहिणी माने परांजपे यांनी व्यक्त केले.

श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेचसंलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे.  महोत्सवात महिलांच्या सामुदायिक हरिपाठचा विशेष कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या.  यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, ह.भ.प पार्वती चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भोला शेठ वांजळे, गणेश चव्हाण, जेजुरी संस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, ॲम्युनिशन फॅक्टरी च्या जनरल मॅनेजर हजारे मॅडम, पेशवाई श्रीमंत च्या संचालिका अश्विनी येमुल, राहुल येमुल, प्रिय येमुल, अमोल येमुल आदी उपस्थित होते.

किर्तन महोत्सवाचे  अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, ह.भ.प प्रमोद महाराज रनवरे यांनी तर महिला कार्यक्रमाचे आयोजन गंगा वांजळे, मनीषा वांजळे यांनी केले. ह.भ.प. डॉ. पुनम महाराज जाचक यांचे प्रवचन देखील झाले.

रोहिनी माने- परांजपे म्हणाल्या, भक्तीच्या प्रांतामध्ये केवळ देव भक्ती हाच विचार नसून देवाचे कार्य म्हणजे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माभिमान या सर्व गोष्टींचा अंश आपल्या जीवनात असावा. त्यासाठी संत पठण, महापुरूषांच्या जीवनाचा अभ्यास करावा.

त्या पुढे म्हणाल्या, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे मी काहीतरी देणे लागतो. ते समाजऋण, देशऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. मानवी जन्म  मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे परंतु मानवीजन्म घेवून त्या देहाचे सार्थक करणे हे भाग्याचे लक्षण आहे. तोच खरा देवभक्त, राष्ट्रभक्त संतांचा प्रिय भक्त ठरतो,  असेही त्यांनी सांगितले. ह भ प जंगले महाराज यांनी सूत्रसंचालन केले.

सैफ अली खानला 5 दिवसांनंतर डिस्चार्ज:चालत घरी पोहोचला, पण पूर्ण बरा होण्यासाठी लागेल महिना

मुंबई- अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफ ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पाच दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली. डिस्चार्ज झाल्यानंतर सैफ चालत घरी गेला. आता सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सैफला पूर्णपणे ठीक होण्यासाठी 1 महिना लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीच्या पहाटे त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.दरम्यान, सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळाला असला, तरी तो पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान आता चालू आणि बोलू शकत असला तरी त्याच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी एक महिना लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.दरम्यान, लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या वांद्रे येथील सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये जुन्या घरी परत जाणार नाही. तो आता दुसऱ्या घरी शिफ्ट होणार आहे. तो परिवारासह जवळच्या फॉर्च्यून हाइट्स इमारतीत राहणार असून त्याचे सामान देखील हलवण्यात आले आहे. याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्याचे ऑफीस देखील आहे. सद्गुरू शरण या इमारतीमध्ये घुसून चोराने हल्ला केला होता. त्यामुळे आता त्या घरी सध्या परत न जाण्याचा निर्णय सैफने घेतल्याचे समजते.

स्वारगेट ते कात्रज साडेपाच किलोमीटर अंतरात 5 मेट्रो स्टेशन: माधुरी मिसाळ

पुणे:शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पुणे मेट्रो कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या साडेपाच किलोमीटर अंतराच्या भूमिगत मेट्रो मार्गावर सध्या मार्केटयार्ड, पदमावती आणि कात्रज अशी तीन स्टेशन्स प्रस्तावित आहेत. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार यात बालाजीनगर आणि सहकारनगर-बिबवेवाडी या दोन नवीन स्टेशनचा समावेश करण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या.या मार्गास केंद्र सरकारने आधीच मंजुरी दिली असून टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर लवकरच काढण्याचे नियोजन आहे. राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करून वाहतूक कोंडी दूर करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यांनी ‘ट्रान्सपोर्ट मॅपिंग’चा विषय हाती घेतला असून मेट्रो, बस, रेल्वे आणि रिक्षा स्थानकांची एकत्रित माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नकाशा तयार केला जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार असून त्याला एसटी स्थानक जोडण्याचा प्रस्ताव पुणे मेट्रोकडून एमएसआरटीसीला सादर करण्यात येणार आहे. याशिवाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेही एसटी स्थानकासह एकत्रित विकास केला जाणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या दोन नवीन मेट्रो मार्गांना केंद्राची मंजुरी लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग-वारजे-एसएनडीटी या दोन अतिरिक्त मार्गांचे प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी, घुसखोरांना हाकलणार,फक्त दोनच लिंग , पुरुष आणि महिला..थर्ड जेंडर समाप्त

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात 8 घोषणा केल्या
अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी सैन्य तैनात केले जाईल.
रिमेन इन मेक्सिको पॉलिसीच्या अंमलबजावणीची घोषणा.
पकडा आणि सोडा (Catch and Release) पद्धत संपली आहे.
परदेशी दहशतवादी संघटनांना गुन्हेगारी गट घोषित केले जाईल.
अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना संपवण्यासाठी 1978 चा एलियन एनेमीज अॅक्ट लागू करण्यात आला.
अमेरिकेत थर्ड जेंडर संपले आहे. फक्त दोनच लिंग असतील, पुरुष आणि महिला.
मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात असे केले जाईल.
पनामा कालवा पनामा कडून परत घेतला जाईल.

ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे.” या दिवसापासून, आपला देश पुन्हा समृद्ध होईल आणि जगभरात त्याचा आदर केला जाईल. मी अगदी सोप्या भाषेत सांगेन की, अमेरिकेला प्रथम स्थान देईन. आपले सार्वभौमत्व परत मिळवले जाईल. आमची सुरक्षा पुनर्संचयित केली जाईल. न्यायाचे तराजू पुन्हा समतोल केले जातील. न्याय विभाग आणि आपल्या सरकारचे क्रूर, हिंसक आणि अन्याय्य शस्त्रास्त्रीकरण संपेल. आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान, पत्नी मेलानिया बायबल धरून उभ्या होत्या. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर, कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडामध्ये काही काळ टाळ्यांचा कडकडाट झाला. यापूर्वी, त्यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आधी रिपब्लिकन नेते जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेचे 50 वे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.