पुणे:शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पुणे मेट्रो कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या साडेपाच किलोमीटर अंतराच्या भूमिगत मेट्रो मार्गावर सध्या मार्केटयार्ड, पदमावती आणि कात्रज अशी तीन स्टेशन्स प्रस्तावित आहेत. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार यात बालाजीनगर आणि सहकारनगर-बिबवेवाडी या दोन नवीन स्टेशनचा समावेश करण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या.या मार्गास केंद्र सरकारने आधीच मंजुरी दिली असून टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर लवकरच काढण्याचे नियोजन आहे. राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करून वाहतूक कोंडी दूर करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यांनी ‘ट्रान्सपोर्ट मॅपिंग’चा विषय हाती घेतला असून मेट्रो, बस, रेल्वे आणि रिक्षा स्थानकांची एकत्रित माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नकाशा तयार केला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार असून त्याला एसटी स्थानक जोडण्याचा प्रस्ताव पुणे मेट्रोकडून एमएसआरटीसीला सादर करण्यात येणार आहे. याशिवाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेही एसटी स्थानकासह एकत्रित विकास केला जाणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या दोन नवीन मेट्रो मार्गांना केंद्राची मंजुरी लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग-वारजे-एसएनडीटी या दोन अतिरिक्त मार्गांचे प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.