Home Blog Page 685

महाकुंभात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक, आगीवर नियंत्रण

प्र्यागराज :


प्रयागराजमधील महाकुंभाच्या 7 व्या दिवशी रविवारी मेळा परिसरात भीषण आग लागली. तंबूत स्वयंपाक करत असताना ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीने अधिक तंबूंना वेढले, ज्यामुळे त्यामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमध्ये सतत स्फोट होत राहिले. आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळाले आहेत
आखाड्याच्या समोरील रस्त्यावर असलेल्या लोखंडी पुलाखाली ही आग लागली आहे. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले आहे. परिसर सील करण्यात आला आहे.जोरदार वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका आहे. सध्या कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. आज मुख्यमंत्री योगी देखील प्रयागराजला पोहोचले आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरमधून महाकुंभमेळा परिसराची पाहणी केली होती.
महाकुंभमेळ्यातील सेक्टर-19 मध्ये लागलेली आग सेक्टर-20 पर्यंत पोहोचली. आकाशात धूर पाहून संपूर्ण गोंधळ उडाला. हे धार्मिक संघटनेचे छावणी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 50 हून अधिक छावण्यांवर परिणाम झाला आहे. गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पवरही परिणाम झाला आहे.

कविता अंतर्मुख करायला लावणारी असावी : जयंत भिडे

रंगत-संगत प्रतिष्ठान, काव्यशिल्पतर्फे कवी जयंत भिडे यांचा कृतज्ञता सन्मान

पुणे : कविता सहजपणे येते, वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे मनाच्या अंगणात उतरते मग शब्दरूप घेते. कविता कधी-कधी वाट पहायला देखील लावते. ज्याची थांबायची तयारी नाही त्याने कवी होऊ नये, कणसूर आणि दोष असणारी कविताही लिहू नये, अशा शब्दांत कवी, गीतकार जयंत भिडे यांनी मत व्यक्त केले. साहित्यिकांनी दिशाहिन होत असलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम करावे. नुसत्या टाळ्या मिळणाऱ्या कवितांचे आज वारेमाप पीक आले आहे; परंतु कविता ही नेहमी अंतर्मुख करायला लावणारी असावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांच्या काव्य लेखन प्रवासाची 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग आणि काव्यशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा आज (दि. 19) कृतज्ञता सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भिडे बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, काव्यशिल्पच्या अध्यक्षा स्वाती यादव, सचिव राजश्री सोले मंचावर होते. सदाशिव पेठेतील भारत स्काऊट ग्राऊंड येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि काव्यशिल्प या संस्थांनी नामांकित कलाकारांपेक्षा नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्याला मोठे झालेले पाहणे यात मनाचा मोठेपणा असावा लगतो, अशा शब्दांत भिडे यांनी आयोजक संस्थांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, कविता शब्दरूपात कागदावर येण्यापूर्वी कवीने ती स्वत: जगली पाहिजे. कविता किंवा गीत हे गवसावे लागते. स्वत:ला कविता आवडल्याशिवाय कवीने आपल्या कवितेला उंबरा ओलांडू देऊ नये. आई मुलाला जपते त्याप्रमाणे कवीने आपल्या कवितेला जपायला हवे.
काव्यशिल्प ही संस्था गेली 52 वर्षे सातत्याने कार्यरत आहे, याचे कौतुक करून प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, जग हे मैत्रीवर चालले आहे कटुतेवर नाही. स्वत: चुकलो तर मोठ्या मनाने क्षमा मागा आणि दुसरा चुकला तर मोठ्या मनाने क्षमा करायला शिका या विचारातून रंगत-संगत प्रतिष्ठान गेली 32 वर्षे कार्यरत आहे.
काव्यशिल्प संस्थेचा परिचय करून देताना स्वाती यादव यांनी संस्थेतर्फे नवोदित कवींना हक्काचे व्यासीपठ मिळवून दिले जाते असे सांगून संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
सुरुवातीस उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. प्रभा सोनवणे यांनी भिडे यांचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका दाते यांनी केले.

सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात अश्विनी पिंगळे, भारती पांडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, प्रतिभा जोशी, सुधीर कुबेर, सीताराम नरके, तनुजा चव्हाण, डॉ. अनिता जठार, स्वप्नील पोरे, कर्नल वसंत बल्लेवार, अजय जोशी, नूतन शेटे, जयश्री श्रोत्रिय, शिरीष सुमंत, मकरंद कुलकर्णी, रवींद्र गाडगीळ, सुरेश शेठ, चंचल काळे, डॉ. नयना कुलकर्णी, अपर्णा आंबेडकर, मनिषा सराफ, आनंद महाजन, साजन पिलानी यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन मनिषा साने यांनी केले.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ

मुंबई- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील, वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ, सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड, मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा, मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार, रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके, सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई, बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील, कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर, गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर, परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर आणि अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित सन्मती बाल निकेतन तर्फे स्वच्छता अभियान

पुणे : पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी,येथील मुलांनी आज एक आगळे – वेगळे असे “ पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ माई स्वच्छता अभियान ” राबवून परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. संस्थेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत, हातात खराटा घेऊन मुलांनी “माझा परिसर स्वच्छ ठेवणे, माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणले.“जानेवारी २०२५ पासून सुरू झालेले हे अभियान दर १५ दिवसांनी नियमितपणे राबवले जाईल.” या अभियानाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संस्थेचा हेतू आहे. अशी माहिती माईंच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांनी दिली.या स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी “माईंच्या लेकरांचा निश्चय आगळा, स्वच्छ ठेवणार परिसर सगळा!”, “माईंची लेकरं एकदम भारी, परिसर सगळा स्वच्छ करी!”, “जिथे स्वच्छता, तिथे आरोग्य!”, “एक पाऊल स्वच्छतेकडे!” अशा घोषवाक्यांद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला: मुलांनी स्वच्छतेचा संदेश देत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. “स्वच्छ परिसर, निरोगी जीवन” या उद्देशाने राबविण्यात आलेले हे अभियान भविष्यातील अनेक उपक्रमांची सुरुवात ठरेल, अशी आशा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १२०० विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित संगीताच्या सूरबद्ध लयीवर विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

पुणे : पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२०० विद्यार्थ्यांनी सुमधूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि इंडिया वर्ल्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली उच्च कोटीची कलाकौशल्ये सादर करीत अवघ्या १५० मिनिटांमध्ये प्राचीन ते आधुनिक प्रकारच्या ३० योगाची प्रत्यक्षिके सादर करीत उपस्थितांची अक्षरशः मने जिंकून घेतली. या कार्यक्रमात पालकांच्या लयबद्ध ढोलताशा वादनाने आणखी उत्साह भरण्याचे काम केले, तसेच हजारो उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत जोरदार जल्लोष केला.कार्यक्रमाला डी. ई. एस. च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, या विश्वविक्रम उपक्रमाचे सल्लागार डॉ. मिलिंद संपगावकर, खेमराज रणपिसे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे, सिमरन गुजर, ग्रेसी डिसूझा यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करवून घेत विश्वविक्रमात आपला मोठा हातभार लावला.शनिवारी सायंकाळी दीपप्रज्वलन आणि कर्णमधूर अशा शंखनादाने या योगा विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि आधुनिक पोषाखांमध्ये येऊन विविध प्रकारे योगासने उपस्थितांसमोर प्रस्तुत केली. भक्तगीत, भावगीत, चित्रपट गीत-संगीताच्या लयबद्ध चालीवर विद्यार्थ्यांनी आपली गुणकौशल्ये सादर केली. योगा विश्वविक्रमात विद्यार्थ्यांनी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड  योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगाची प्रात्यक्षिके सादर केली.विद्यार्थ्यांनी शिक्षक व तज्ज्ञांच्या कुशल मार्गदर्शनात अंडरवाॅटर योगा तसेच स्केटिंग योगा केले होते, त्याची व्हिडिओ क्लिप या वेळी दाखवण्यात आली.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये खुला वाहनांसाठी सर्व पूल १५ जूनपर्यंत खुला होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून, औंधकडून गणेशखिंडकडे जाणारा पूल वाहनांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खुला होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले. गणेशखिंड रस्त्याने बाणेर आणि पाषाणकडे जाणारा पुल वाहनांसाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर मेट्रोचा पूल आणि स्थानक बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.विद्यापीठ चौकातील पुलाच्या बांधकामामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड लागत आहे. वाहतूक पोलिसांनी तेथे विविध उपाय योजत वाहतूक जास्तीत जास्त सुरळित ठेवण्याचा प्रयत्न केला. येथील पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी शिरोळे गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. शिरोळे यांनी अधिकाऱ्यानं समवेत आज विद्यापीठ चौकातील कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.शिरोळे म्हणाले, वाहनांची संख्या अधिक असल्याने, येथील काम करताना अनेक अडचणी येत होत्या. जागेचा ताबा मिळण्यात अडचण आली. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागले. मेट्रोच्या पुलाचे आणि स्थानकाचे कामही सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी येथे चांगले नियोजन केले. त्यामुळे सध्या वाहतुकीची गती थोडी कमी असली, तरी वाहतुकीची कोंडी होत नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी वाहनांसाठी हा पूल खुला होईल, या दृष्टीने काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनसह पाहणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. येत्या महिनाभरात त्या अडचणी दूर केल्या जातील.गणेशखिंड रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तेथील आणि औंध बाजूकडील पुलाचा रॅम्प एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बांधून पूर्ण होईल. त्यामुळे वाहनांना औंध कडून गणेशखिंड रस्त्याकडे पुलावरून जाता येईल. बाणेर रस्त्यावर रॅम्प बांधण्यासाठी जागेचा ताबा नुकताच मिळाला आहे. लवकरच रॅम्प बांधण्यास सुरवात होईल. पाच महिन्यांत ते काम पूर्ण होईल. बाणेर बाजूला वाहनांना दोन्ही बाजूंनी ये – जा करता येईल. मेट्रो ही त्याच दिशेने जाणार आहे. पाषाण बाजूला पुलाच्या रॅम्प बांधण्यासाठी जागा मिळण्याबाबत थोड्या अडचणी आहेत. येत्या पंधरववड्यात महापालिकेशी व संबंधितांशी बोलून जागा ताब्यात घेतली जाईल. तेथील रॅम्प चे काम पूर्ण झाल्यानंतर, वाहनचालकांना गणेशखिंड रस्त्याने पाषाणकडे जाता येईल. जूनमध्ये हे दोन्ही रॅम्प चे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पुलांवरून वाहनांची ये-जा सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौक आणि या परिसरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल.शिरोळे यांच्यासोबत पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, मेट्रोची उभारणी करणाऱया टाटा कंपनीचे अधिकारी, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदा वग्याणी, पोलिस निरीक्षक मीनल पाटील, सुनील गवळी, पीएमआय नरेंद्र मुंढे यावेळी उपस्थित होते……..

पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार मुरलीधर मोहोळ

  • पुनीत बालन यांच्यातर्फे सर्व विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर

पुणे – महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यूदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्तीमध्ये वापरले जातात त्यामुळे ज्यूदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊ-भाऊच आहेत.स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली, यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास 11,000 रुपये, रोप्य पदक विजेत्यास 7000 रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये 29 राज्यातील 235 मुले आणि 230 मुली खेळाडू सहभागी झाले आहेत.फोटो ओळी: फोटो १: स्पर्धेचे उद्घाटन द्वीप प्रज्वलन करून करताना फोटोमध्ये (डावीकडून) राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे, राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ.

पीएम सूर्यघर योजनेच्या महावितरण सौर रथाचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याहस्ते उद्घाटन

पुणे : सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या पीएम सूर्यघर वीज योजनेचा जागर करण्यासाठी सौर रथाचे रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. महावितरणच्या या उपक्रमाचे मोहोळ यांनी कौतुक केले. घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणाऱ्या या योजनेत जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

पांडवनगर येथे आयोजित सौर रथाच्या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजीनदार समीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी येत्या गुरुवार पर्यंत हा सौर रथ फिरणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सौर रथाद्वारे डिजिटल स्क्रिनद्वारे वीजग्राहकांशी थेट संवाद  व योजनेची माहिती, फायदे, प्रतिकिलो वॅट मिळणारे अनुदान, ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक तसेच माहिती पत्रकांच्या माध्यमातून योजनेचा जागर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याहस्ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे लाभार्थी सतीश आठवले, आनंद देशपांडे, शुभांगी बाळासाहेब देशमुख, ऋषिकेश सोसायटी, तुषार गायकवाड, हेमंत लोहकरे, सुभाष लाड या वीजग्राहकांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता शेखर मुरकुटे, सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) राहुल पवार आदींसह महावितरणचे अधिकारी व मास्माचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत यांच्यासमवेत बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे

  • महाराष्ट्रातील आकारी पड जमीन बाधितांना शासनाच्या निर्णयाने न्यायाची आशा “, खेड तालुका व जि. पुणें येथील समस्त शेतकरी बांधवांचे प्रतिपादन

मुंबई : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे योगदान लाभले. यासंदर्भात शेतकरी आणि शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनास निर्देश दिले होते. या अनुषंगाने अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून शेतकरी बांधवांना या आकारी पडमधून बाहेर काढण्याचे काम नीलमताईंनी केल्यामुळे आज समस्त आकारी पड बाधित शेतकऱ्यांच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. तसेच, भविष्यात त्यांना न्याय देण्याचे कामात उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सहकार्यातुन व्हावे असे प्रतिपादन समस्त आकारी पड शेतकरी बांधवांच्यावतीने करण्यात आले.

राज्यशासनाने आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी रेडीरेकनरच्या २५% भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. असे असले तरी, आजच्या या अनौपचारिक बैठकीत, आकारी पड बाधित शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीची माहिती दिली. यामुळे यानियमात शासनाने निर्णयात शिथिलता आणली जावे अशी विनंती केली आहे. त्यासंदर्भात नीलमताई यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. “या मागणीबाबत, मी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन मा. मंत्री महोदय, महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर वस्तुस्थिती आणुन सहकार्य करेन’, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहे.

यावेळी बैठकीला, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष गणेश सांडभेर बाधित शेतकरी, बी.के.कदम माजी पंचायत समिती सदस्य, खेड, बाळासाहेब दाते जिल्हाध्यक्ष, इंडस्ट्रीयल असोसिएशन, नितीन दाते सामाजिक कार्यकर्ते, सिताराम कदम (बाधित शेतकरी), बाबासाहेब हजारे (बाधित शेतकरी) उपस्थित होते. तसेच, लवकरच पुन्हा शेतकऱ्यांच्या आकारी पड जमिनीसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीचे आयोजन करणार आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि.19 : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.मंत्री श्री. भरणे म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते. इथं मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहे, याची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना

  • महाराष्ट्राचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभाग

मुंबई दि.१९ : स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले.दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. यापूर्वी श्री. फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबईत दोन वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजन झाले होते. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत पाचव्या स्थानावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता.आताही या दावोस दौर्‍यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल यादृष्टीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको यांचे अधिकारी शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

सातव्या आयोगामुळे राज्यावर साडेतीन लाख कोटींचा बोजा, सरकारी कर्मचारी तुपात..तर कंत्राटी,खाजगी जात्यात..


केंद्र सरकारने वेतन आयोग लागू केला तरीही राज्यांवर वेतन आयोग लागू करण्याचे कायदेशीर वा घटनात्मक बंधन नसते, पण राजकीय स्वार्थ आणि कर्मचाऱ्यांचा दबाव किंवा खुशमशकरी करण्याच्या वृत्तीने राज्ये केंद्राचा वेतन आयोग लागू करतात. खाजगी आणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना असलेला पगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन यातील तफावत ही जमीन आसमांनची आणि प्रचंड विषमता निर्माण करणारी आहे याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.

सातव्या वेतन आयोगामुळे पडलेला फरक
●वेतन : २ लाख ९२ हजार कोटी
●निवृत्ती वेतन : ६२ हजार ४०० कोटी

मुंबई : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा होताच राज्यातही नवीन वेतन आयोग स्थापन करण्याच्या मागणीने जोर धरू लागली आहे. त्याचवेळी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे गेल्या १० वर्षांत वेतन आणि निवृत्तिवेतनातील फरकामुळे राज्य सरकारवरील जवळपास साडेतीन लाख कोटींचा बोजा वाढला आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्रावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटींचा बोजा पडला होता. विविध राज्यांमध्येही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ति वेतनावरील बोजा वाढत गेला. महाराष्ट्रात २०१६-१७ ते २०२५-२६ या सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत वेतन व निवृत्ति वेतनावरील फरकाच्या रक्कमेमुळे सुमारे साडेतीन लाख कोटींचा बोजा वाढला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र व राज्य सरकारांच्या आर्थिक परिस्थितीचा वेध १५व्या वित्त आयोगाने घेतला होता. आयोगाच्या तज्ज्ञांनी राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार केला.तज्ज्ञांनी सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगांची तुलना करून १० वर्षांच्या कालावधीत वेतन फरकाचा किती बोजा वाढेल याचा मुख्यत्वे अभ्यास केला. वेतन फरकामध्ये देशात महाराष्ट्र सर्वात आघाडीवरील राज्य ठरले आहे. दहा वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च २ लाख ९२ हजार कोटींनी वाढला. तर, निवृत्तिवेतनाच्या फरकाने खर्चात ६२ हजार ४०० कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली. सातव्या वेतन आयोगाचे पुढील २०२५-२६ हे अखेरचे वर्ष असेल.
पाचवा, सहावा आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रासह सर्वच राज्यांची वित्तीय तूट वाढल्याचे निरीक्षण वित्त आयोगाने नोंदविले आहे. राज्यांमध्ये भांडवली खर्च म्हणजेच विकास कामांवरील खर्च कमी होत गेला. आस्थापना खर्च वाढू लागल्याने बहुकेत सर्वच राज्यांनी नोकरभरतीबाबत कठोर उपाय योजले. सरसकट भरती करण्याचे टाळून खासगीकरणावर भर दिला गेल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत वाढली नाही. यातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च फारसा वाढलेला नाही. पण निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज फेडण्याच्या खर्चात मोठी वाढ झालेली दिसते.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक!

सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद

मुंबई:अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी (Saif Ali Khan Attack Case) मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देतील.

वृत्तसंस्था एएनआयने याबद्दल माहिती दिली आहे.मुंबई पोलिसांचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीचे नाव मोहम्मद अलियान उर्फ ​​BJ आहे. या हल्ल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने आपले खरे नाव उघड केले नाही. त्याने सुरुवातीला पोलिसांना स्वत:चे बनावट नाव विजय दास असल्याचे सांगितले. तसेच, आरोपी ठाण्यातील Ricky’s बारमध्ये हाऊसकीपिंग वर्कर म्हणून काम करत होता.
दरम्यान, गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर दुखापत झाल्यानंतर, सैफ अली खानला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिकेने केली 200 हुन अधिक अतिक्रमणावर कारवाई

पुणे: महापालिका अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत 200 हुन अधिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.पुणे मेट्रो, जिल्हा न्यायालय या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्टेशनच्या डेंगळे पुलालगतच्या जागेत मागील काही महिन्यात अंदाजे ५० अनधिकृत झोपड्या अतिक्रमण करून बांधण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, चार पोलीस निरीक्षक, १५ पीएसआय, ७८ अंमलदार पोलीस, ५० सुरक्षा अधिकारी आणि इतर यांनी ही कारवाई केली.

पुणे महापालिका आणि पुणे मेट्रो यांनी ही संयुक्त कारवाई केली. यात दोन जेसीबी, सहा टेम्पो, एका हायड्रा, ४० कर्मचारी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोलकुमार मोहोळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. दोनशेहून अधिक अतिक्रमणांवर कारवाई
महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर नगर रस्ता परिसरातही अतिक्रमण कारवाई केली. परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून कारवाईचा धडाका लावला आहे. या सलग सुरू असलेल्या कारवाईत तीन दिवसात २०० हून अधिक अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

नगर रस्ता परिसरातील मंत्री मार्केट, खराडी बायपास येथील १०२ अनाधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या आदींवर कारवाई करण्यात आली. याच कारवाईअंतर्गत बुधवारी (दि. १५) दुपारपर्यंत खराडी आयटी पार्क परिसरातील गेरा बार्कलेजसमोरील ३० अनधिकृत व्यावसायिकांचे स्टॉल जेसीबी लावून तोडण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ताडीवाला रस्ता ढोले, पाटील रस्ता, सौरभ हॉल परिसरातील ७२ अनधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या, पथारी व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कोंढवा, येवलेवाडी येथील फ्रंट मार्जिन तसेच रस्ता व पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत ४० काउंटर, दोन हातगाड्या, सहा सिलिंडर तसेच आदी साहित्य जप्त करून अतिक्रमण गोडाऊन येथे जमा करण्यात आले. तसेच कारवाईमध्ये कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवकांद्वारे अस्वच्छता, प्लास्टिक वापराबाबत एकूण २६ नागरिकांवर कारवाई करून २३,७०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील परवाना व आकाशचिन्ह विभागातील सेवकांद्वारे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, लॉलीपॉप, केऑक्स आदींवर कारवाई करून दोन हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

परिमंडळ क्रमांक चारच्या यांच्या नियंत्रणाखालील कोंढवा येवलेवाडी कार्यालयाअंतर्गत व्हीआयटी कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल या परिसरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक, परिसर स्वच्छता कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त (परिमंडळ क्र.४) जयंत भोसेकर आणि सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली

सन २०२७ किंवा २०२८ ला होणार भारत तिसरी अर्थव्यवस्था:अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर

पुणे : भारतात मोठया प्रमाणात झालेल्या डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक सेवेची आर्थिक नोंद होत आहे. प्रत्यक्ष नोंद होत असल्याने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये देखील याची गणना केली जाईल. आपण प्रत्येकाला रोख व्यवहारापासून दूर नेत डिजिटलाईज झालो, तर सन २०२७ किंवा २०२८ ला भारत तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर (मुंबई) यांनी केले. 
स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संस्कार गुरुकुल येथे करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ सुनील सप्रे, सुनील भिडे, माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, नीता दांगट पाटील, प्रतिष्ठानचे प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठविला. 
दीपक करंजीकर म्हणाले, अर्थव्यवस्थेचे मापन हे सकल राष्ट्रीय उत्पन्नावर केले जाते. जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी असून अमेरिका, चीन, जपान, जर्मनी हे चार देश याबाबत आपल्या पुढे आहेत. आपला देश श्रमिकांचा असल्याने यापूर्वी प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद केली जात नसे. आता बँक ट्रान्सफर सारख्या व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार कमी झाला असून दलाली देखील मोठया प्रमाणात संपुष्टात येत आहे. 
ते पुढे म्हणाले, आपली अर्थव्यवस्था ही जीवनाशी जोडली गेली आहे. तशा म्हणी देखील आपल्या संस्कृतीत आहेत. आर्थिक क्रयशक्ती वाढ, शेतकरी सबलता आणि उत्पन्नावरील कर व्यवस्था पद्धती जर नीट झाली, तर भारताची अर्थावाय्वस्था चांगली होण्यास मदत होईल. शेती आणि शेतकऱ्यांनी कोविड काळात आपल्याला वाचविले. त्यामुळे देशाच्या बजेटमध्ये शेतीला जास्त महत्व असायला हवे. अल्पभूधारक शेतकरी देशात मोठया संख्येने आहे. त्यामुळे यावर सहकारी शेती हा उपाय असला, तरी राजकारण आणि भांडवलदार यांनी शेतीची नासाडी केली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रकाश असलेकर यांनी प्रास्ताविक केले.  प्रशांत पितालीया यांनी सूत्रसंचालन केले.