Home Blog Page 686

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले शाळा भेटीचे निर्देश

पुणे, दि.१८: राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते.

शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दिनांक 18/01/2025 रोजी पानशेत व परिसरातील शाळांना अचानक भेटी दिल्या त्यांच्या समवेत प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे व अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. पानशेत समूह शाळा भेटीदरम्यान विद्यार्थी- शिक्षक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे आनंददायी शनिवार अंतर्गत नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. स्वतः शिक्षण आयुक्त तब्बल 40 मिनिटे विद्यार्थ्यांमध्ये उभे राहून विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधत होते. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना त्यांनी आयएस या परीक्षेत उत्तीर्ण कसे झाले याचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

तसेच राज्यस्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांनी देखील राज्यातील विविध भागातील आज अचानक शाळांना भेटी दिल्या. या अधिकाऱ्यांनी शाळांच्या भेटीदरम्यान शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत दिल्या जाणाऱ्या आहाराची स्थिती पाहिली. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यालयास सुट्टी असल्याने शनिवारी राज्यातील वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये रममान झाल्याचे चित्र दिसून आले.

लाडकी बहीण अपात्र असेल तर … आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : लाडकी बहिण योजनेतील फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे
निकषात न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला तरी त्यांना आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही, असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.
सरकारकडून रक्कम वसूल करण्याच्या भीतीने राज्यातील ४ हजार महिलांनी या योजनेतून आपलं नाव कमी केलं जावं, यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. परंतु सरकार ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे देणं आपण बंद करणार आहे. असं असलं तरी त्यांच्याकडून आधी दिलेली रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचा खुलासा आदिती तटकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना मिळाला नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे.

सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ या वयोगटातील २ कोटी ४६ लाख महिलांना आतापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले.

पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे.मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्याचे दिसून येत आहे. तर मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. त्यामुळेच बीडचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे

  • देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
  • एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
  • अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
  • चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
  • हसन मुश्रिफ – वाशिम
  • चंद्रकांत पाटील – सांगली
  • गिरीश महाजन – नाशिक
  • गणेश नाईक – पालघर
  • गुलाबराव पाटील – जळगाव
  • संजय राठोड – यवतमाळ
  • आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
  • उदय सामंत – रत्नागिरी
  • जयकुमार रावल – धुळे
  • पंकजा मुंडे – जालना
  • अतुल सावे – नांदेड
  • अशोक उईके – चंद्रपूर
  • शंभुराज देसाई – सातारा
  • अदिती तटकरे – रायगड
  • शिवेंद्रराजे भोसले – लातूर
  • माणिकराव कोकाटे – नंदूरबार
  • जयकुमार गोरे – सोलापूर
  • नरहरी झिरवळ – हिंगोली
  • संजय सावकारे – भंडारा
  • संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
  • प्रताप सरनाईक – धाराशिव
  • मकरंद जाधव – बुलढाणा
  • नितेश राणे – सिंधुदुर्ग
  • आकाश फुंडकर – अकोला
  • बाबासाहेब पाटील – गोंदिया
  • प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
  • आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
  • पंकज भोयर – वर्धा
  • मेघना बोर्डीकर – परभणी

योगिता भोसले पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदी…

पुणे:महापालिकेच्या नगरसचिवपदी राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांची अखेर पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. एका बाजूला महापालिका अमृतमहोत्सव ( ७५ वर्षे) पूर्ण करत असतानाच पालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला नगरसचिव बनल्या आहेत. सर्वात कमी सेवावधित झालेल्या त्या नगरसचिव मानल्या जाऊ शकतील आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांची नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे

३१ ऑगस्ट २०२० रोजी सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १ सप्टेंबर २०२० ते ३१ मे २०२३ पर्यंत शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार होता. शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त झाल्यानंतर १ जून २०२३ पासून राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे.

माजी महापौरांनी केले निवडीचे स्वागत –
पुणे महापालिकेच्या नगरसचिव पदी योगिता भोसले यांची झालेली निवड ही अतिशय योग्य असल्याचे सांगत माजी महापौर संघटनेने भोसले यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्ष त्या काम करीत आहे. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करीत आहेत, हे आम्ही अनेक जणांनी पाहिले आहे. या पुढील काळात त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे. संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे व निमंत्रक अंकुश काकडे यांनी एका पत्रकाद्वारे या निवडीचे स्वागत केले आहे.

सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये निक्की आणि गौरवमध्ये खडाजंगी:

27 जानेवारी पासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा सीझन दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. फराह खान या सीझनची होस्ट आहे, तर रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे सेलिब्रिटी शेफ परीक्षक आहेत. मनोरंजनाचा डोस घेण्यासाठी तयार रहा कारण उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, दीपिका कक्कड, तेजस्वी प्रकाश, चंदन प्रभाकर, अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अदातिया, अभिजीत सावंत, फैजल शेख आणि कविता सिंह आपले ग्लॅमरस जीवन सोडून अॅप्रन आणि शेफची हॅट घालून सेलिब्रिटी मास्टर शेफ हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
केवळ शेगडीच नाही, तर वातावरणच तापले आहे, कारण सगळे स्पर्धक सर्वोच्च स्थान पटकावण्यासाठी एकमेकांशी चढाओढ करत आहेत आणि प्रत्येकाला सुरक्षित राहायचे आहे. त्यातील आव्हानांच्या दबावामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. एका चॅलेंजमध्ये निक्की आणि गौरव यांची जोडी जुळवण्यात आली आणि एकच डिश फराह आणि परीक्षकांना सादर करायची होती. दोन्ही पैकी कोणता पदार्थ टेस्टिंगसाठी सादर करावा यावर त्यांचे एकमत झाले नाही त्यामुळे तणाव वाढला.
या नाट्यात भर घालत निक्की म्हणाली, “मला वाटते की मीच गेले पाहिजे” तर गौरवचा आग्रह होता की, त्याच्याच पदार्थाची चव परीक्षकांनी घ्यावी. त्यावर आक्षेप घेत निक्की म्हणाली, “मला जोखीम घ्यायची नाहीये.” फराहने त्यांना सल्ला दिला की, हार मानू नका, त्यावर निक्की आणि गौरव क्षणाचाही विलंब न करता एकदमच म्हणाले, “तेच तर!” गौरवला टोमणा मारत निक्की म्हणाली, “तू माझी कॉपीच कर फक्त, बास! मला याच्यासोबत का टाकले?”

प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/reel/DE2l7BNP0Mw/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आता निक्की आणि गौरव यांच्यात आग लागली आहे, तर मग कोणाची वाजणार शिट्टी? सेलिब्रिटी मास्टरशेफ सुरू होत आहे 27 जानेवारी रोजी आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता हा शो प्रसारित करण्यात येणार आहे, . !

सैफवर हल्ला:मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं

मुंबई:बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला झाला. घरात शिरलेल्या दरोडेखोराने चाकूने वार केले, यात सैफ गंभीर जखमी झाला.या घटनेला दोन दिवस उलटले सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (शनिवारी) मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं. सध्या अधिकारी त्याची चौकशी करत आहेत, असे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते, त्यानंतरचे त्याचे वांद्रे व दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये होता. घरातील मदतनीसने त्याला पाहिलं. त्याच्या हातात काठी व चाकू होते. तो जेहच्या पलंगाकडे धावत गेला, पण मदतनीसने त्याला अडवलं. हा गोंधळ ऐकून सैफ व करीना तिथे पोहोचले. तिथे सैफची त्याच्याबरोबर झटापट झाली. त्याचदरम्यान त्याने चाकूने सैफवर वार केले. सैफला मानेला, हाताला, पाठिला गंभीर जखमा झाल्या. तसेच मानेमध्ये चाकूचे टोक घुसले होते. घरातील मदतनीस व तैमूरने सैफला रिक्षातून रुग्णालयात नेलं. नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचे टोक काढले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?: नाना पटोले

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शकतेची गरज आताच का भासली? मते घेताना भाजपा युती झोपली होती का?

दावोसला जाऊन गुंतवणुकीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करु नका.

मुंबई, दि. १८ जानेवारी २०२४
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री दागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे, त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला, याच बहिणींच्या मतांवर सत्तेत आले आणि आता भाजपा युती सरकारला लाडकी बहिण योजनेतील त्रुटी दिसत आहेत का? बहिणींची मते घेताना या त्रुटी व पारदर्शकता आठवली नाही का? सरकार आल्यानंतर पडताळणी करण्याची गरज का पडावी? बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत, यातून भाजपा युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. परंतु भाजपा युती सरकारने जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक लाडक्या बहिणीला सरसकट २१०० रुपये दिले पाहिजेत, असेही नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील उद्योगपतींना दावोसला घेऊन दौरा केला होता, त्याची नक्कल देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे हा दावा भाजपा सरकार करत आहे पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची घसरण झालेली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली दावोसला जाऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका, असेही पटोले म्हणाले.

चाळकवाडी येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलन:ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ संमेलनाध्यक्ष

परिसंवाद, कथाकथन, कथावाचनासह शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी हे संमेलन होत आहे.
मुलांना बालसाहित्याची ओळख व्हावी, त्यांची वाचनाची भूक वाढावी, त्यांच्या चौकस वृत्तीला विहारायला आणखी नवे आकाश लाभावे, नामवंत बालसाहित्यिकांना पाहता यावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन नगरीस ग. ह. पाटील बालसाहित्य नगरी असे नाव देण्यात आले असून कै. सौ. मातोश्री अलकामाई भिमाजी सोनवणे सभामंडपात संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, वसंतराव काकडे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, संस्थाध्यक्ष राजेंद्र पायमोडे, संस्था सचिव गजानन चाळक, शाला समिती सदस्य तुळशीराम नरवडे, सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष रमण काकडे, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, चाळकवाडीच्या सरपंच मेघा काकडे, संस्था कोषाध्यक्ष कोंडीभाऊ वामन, प्रा. शा. समिती अध्यक्ष प्रदीप वायकर, संमेलनाचे निमंत्रक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. या प्रसंगी नारायणगाव ग्रामविकास संस्थचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके उपस्थित असणार आहेत.
संमेलनाच्या ध्वजारोहणानंतर पहिल्या सत्रात सकाळी 10:30 वाजता ‌‘बालसाहित्याची सद्य:स्थिती‌’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात श्रीकांत पाटील (कोल्हापूर), अनिल कुलकर्णी (पुणे), जालिंदर डोंगरे (जुन्नर) यांचा सहभाग असणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. कैलास दौंड (पाथर्डी) असतील. दुसऱ्या सत्रात सकाळी 11:30 वाजता ‌‘मनोरंजनातून बालसाहित्य‌’ अंतर्गत सूर्यकांत सराफ (छत्रपती संभाजीनगर) आणि एकनाथ आव्हाड (मुंबई) मुलांशी संवाद साधणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी 1:30 वाजता ज्येष्ठ बालसाहित्यिक भास्कर बडे (बिड) यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘शालेय विद्यार्थी कविसंमेलन‌’ होणार असून यात बालसाहित्यिक अलका सपकाळ (धाराशिव) यांच्यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
चौथ्या सत्रात दुपारी 2:30 वाजता ‌‘कथा पंचक‌’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे कथावाचन होणार असून बालसाहित्यिक डॉ. विनोद सिनकर (छत्रपती संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असणार आहेत. दुपारी 3:30 वाजता आयोजित पाचव्या सत्रात संजय ऐलवाड (पुणे), बालकृष्ण बाचल (पुणे) आणि उत्तम सदाकाळ (जुन्नर) ‌‘कथाकथन‌’ सादर करणार असून रमेश तांबे (मुंबई) अध्यक्षस्थानी असणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता प्रसिद्ध बालसाहित्य समीक्षक डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, श्रीपाद अपराजित, समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रमुख वल्लभ शेळके, विशाल जुन्नर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जनमंगल परिवाराचे संस्थापक अनंत चौगुले, कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाचे प्रमुख विजय गुंजाळ, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे, जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे सुनील ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुलांना साने गुरुजींच्या कथासंग्रहाची भेट
संमेलनात सहभागी होणाऱ्या मुलांना साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी यांच्या कथांचा संग्रह भेट देण्यात येणार आहे.
अस्सल जुन्नरी मेजवानी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींना जुन्नर येथील अस्सल पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मासवडी, बाजरीची भाकरी, आमटी असा खास बेत असणार आहे.

जाती-धर्मावर विखुरलेला माणूस साहित्य संमेलनामुळे जोडला जाईल : सुशीलकुमार शिंदे

सरहद, पुणेतर्फे ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून 1954 साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्रासह देशात जाती-धर्मावर माणूस विखुरला गेला आहे, अशा परिस्थितीत दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल अशी आशा वाटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 17) सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, डॉ. शैलेश पगारिया मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.
‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या साहित्यकृतीतून आजच्या लेखकांना नवीन विचारधारा दिली जाईल तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, समाज सुधारावा, समाजाला चांगले देता यावे, या विचाराने संजय नहार सतत कार्यरत असतात. चिंतनातून त्यांचे समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे. साहित्य परिषदेद्वारे नहार यांच्या कार्याला साथ देत असल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचेही त्यांनी कौतुक केले. श्रीराम पवार हे इतिहास, साहित्य, चिंतन आहेत आणि या चिंतनातून त्यांनी नवी भूमिका मांडली आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अग्रस्थानी आहेत. जे लिहितात ते बोलत नाहीत आणि जे बोलतात ते लिहीत नाहीत. दोघे मिळून काहीही करत नाहीत असा प्रवाद महाराष्ट्रात आहे, त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अपवाद होते. ताठ कण्याची मराठी माणसे दिल्लीत गेली की वाकतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी आपला बाणा सोडायचा नाही हा महाराष्ट्र धर्म तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि काकासाहेब गाडगीळ या दोघांच्याही विचारात दिसतो. सांस्कृतिक सहिष्णुतेची पंडित नेहरूंनी अधोरेखित केलेली गरज वर्तमानात खूप महत्त्वाची आहे. शांती हेच धर्माचे उद्दिष्ट आहे. युद्धाची सुरुवात प्रथम मनात होते नंतर शस्त्रे हातात येतात. नव्या युगात विश्वमैत्रीची भावना रुजली नाही तर मानव समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल‌’ या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचाराची आजच्या समाजाला गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात असा विश्वास दृढ करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अध्यक्षीय भाषण आहे.
पुस्तकाविषयी भूमिका मांडताना श्रीराम पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले 1954 सालचे संमेलन मराठी भाषकांचे एकच राज्य व्हावे ही भूमिका घेऊन उभे राहिले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि काकासाहेब गाडगीळ यांच्या भाषणांमधून दिल्लीत मराठी माणसांचे अस्तित्व टिकावे, महाराष्ट्राची वकिली करणारे लोक दिल्लीत असावेत, या हेतूने दिल्लीत संमेलन घेतल्याचे लक्षात येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संवादाने पूल जोडण्याची भूमिका त्या संमेलनाद्वारे मांडली गेली. संस्कृती, साहित्य, कला या विषयी उपस्थित श्रोत्यांना काही सांगावे एवढाचा त्या संमेलनाचा हेतू नव्हता तर मराठी संस्कृती, महाराष्ट्राविषयी माहितीचे दस्तऐवजीकरण या संमेलनातून करण्यात आले. महाराष्ट्राची सर्वसमावेशक भूमिका संपूर्ण देशात पसरविण्याचा हेतू या संमेलनातून साकार करण्याचा प्रयत्न झाल्याचे तर्कतीर्थ आणि गाडगीळ यांच्या भाषणातून जाणवते. भाषेनुसार भेद करू नका, सामाजिक ऐक्य टिकवा अशी भूमिका लेखकांनी घ्यावी असा आग्रह पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता असे जाणवते.
अनंत गाडगीळ म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक राजकारणी हे उत्तम साहित्यिक होते, साहित्यावर चर्चा, वैचारिक देवाण-घेवाण होत होती. परंतु आज वैचारिक वादाला शत्रुत्वाची धार आली आहे. साहित्यिकांनी त्यांच्या कृतीतून साहित्य जसे शास्त्र असते तसेच ते शस्त्रही बनू शकते हे दाखवून द्यावे.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी भूमिका विशद करून मराठी भाषेचा, मराठी माणसांच्या अस्मितेचा गौरव करणारे संमेलन आयोजित करायचे आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. शैलेश पगारिया यांनी मानले.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये खुला

0

वाहनांसाठी सर्व पूल १५ जूनपर्यंत खुला होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, १८ जानेवारी

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून, औंधकडून गणेशखिंडकडे जाणारा पूल वाहनांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खुला होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले. गणेशखिंड रस्त्याने बाणेर आणि पाषाणकडे जाणारा पुल वाहनांसाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर मेट्रोचा पूल आणि स्थानक बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

विद्यापीठ चौकातील पुलाच्या बांधकामामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड लागत आहे. वाहतूक पोलिसांनी तेथे विविध उपाय योजत वाहतूक जास्तीत जास्त सुरळित ठेवण्याचा प्रयत्न केला. येथील पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी शिरोळे गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. शिरोळे यांनी अधिकाऱयांसमवेत आज विद्यापीठ चौकातील कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
शिरोळे म्हणाले, वाहनांची संख्या अधिक असल्याने, येथील काम करताना अनेक अडचणी येत होत्या. जागेचा ताबा मिळण्यात अडचण आली. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागले. मेट्रोच्या पुलाचे आणि स्थानकाचे कामही सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी येथे चांगले नियोजन केले. त्यामुळे सध्या वाहतुकीची गती थोडी कमी असली, तरी वाहतुकीची कोंडी होत नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी वाहनांसाठी हा पूल खुला होईल, या दृष्टीने काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱयांसह पाहणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. येत्या महिनाभरात त्या अडचणी दूर केल्या जातील.

गणेशखिंड रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तेथील आणि औंध बाजूकडील पुलाचा रॅम्प एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बांधून पूर्ण होईल. त्यामुळे वाहनांना औंधकडून गणेशखिंड रस्त्याकडे पुलावरून जाता येईल. बाणेर रस्त्यावर रॅम्प बांधण्यासाठी जागेचा ताबा नुकताच मिळाला आहे. लवकरच रॅम्प बांधण्यास सुरवात होईल. पाच महिन्यांत ते काम पूर्ण होईल. बाणेर बाजूला वाहनांना दोन्ही बाजूंनी ये – जा करता येईल. मेट्रोही त्याच दिशेने जाणार आहे. पाषाण बाजूला पुलाच्या रॅम्प बांधण्यासाठी जागा मिळण्याबाबत थोड्या अडचणी आहेत. येत्या पंधरववड्यात महापालिकेशी व संबंधितांशी बोलून जागा ताब्यात घेतली जाईल. तेथील रॅम्पचे काम पूर्ण झाल्यानंतर, वाहनचालकांना गणेशखिंड रस्त्याने पाषाणकडे जाता येईल. जूनमध्ये हे दोन्ही रॅम्पचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पुलांवरून वाहनांची ये-जा सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौक आणि या परिसरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल.
शिरोळे यांच्यासोबत पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, मेट्रोची उभारणी करणाऱया टाटा कंपनीचे अधिकारी, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदा वग्याणी, पोलिस निरीक्षक मीनल पाटील, सुनील गवळी, पीएमआय नरेंद्र मुंढे यावेळी उपस्थित होते.
…….

दंडाच्या भीतीने 4000 महिलांनी ‘लाडकी बहिण’ योजनेतून नावे मागे घेतली

मुंबई :लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिल्या जाणाऱ्या पैशामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यातच लाडक्या बहिणी योजनेमुळेच राज्यातील मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेचे निकष बदलले जाणार असल्याचा आरोप केला जातोय. मात्र, असे कोणतेच निकष बदलणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निकषामध्ये बसत नसणाऱ्या महिला आता स्वतःहून पुढे येत आहेत. या योजनेतील सुमारे चार हजार महिलांनी योजनेतून नाव काढण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेण्याची कोणतीच योजना किंवा तसा कोणताच विचार नसल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याआधीच राज्यभरातील सुमारे 4000 पेक्षा अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज दाखल केला आहे

राज्य सरकारच्या वतीने निवडणुकीच्या आधी घोषित करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येने महिलांनी यात अर्ज केले होते. मात्र निकषात बसत नसलेल्या अपात्र महिलांच्या वतीने देखील अर्ज करण्यात आले होते. राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट अर्ज भरणाऱ्या महिलांना लाभ दिले होते. मात्र आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात होता. तत्पूर्वीच सुमारे 4000 महिलांनी योजनेतून आपली नावे मागे घेतली आहेत.काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातही काही अर्ज आले होते. या महिन्यातही हे अर्ज येत आहेत. आपण या योजनेसाठी पात्र नाही, असं लक्षात आल्यानंतर काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिकसुद्धा आहेत, हे यातून सिद्ध होत असल्याचे आिदती तटकरे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत चार हजार अर्ज आले आहेत, ही आकडेवारी अंदाजे आहे. डिसेंबरमध्ये देखील अर्ज आले होते. जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारी तिजोरी देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग:राज्य सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता असणाऱ्या महिलांनी आतापर्यंत मिळालेले पैसे देखील आपल्याला परत करावे लागतील, या भीतीपोटी लेखी अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. पडताळणी मध्ये अपात्र ठरल्यास मिळालेल्या लाभाची रक्कम दंड सहित वसूल करण्यात येण्याची भीती या महिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आता अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.

2 कोटी 34 लाख महिलांना दरमहा दीड हजार रुपये:राज्यघरातून 2 कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. तर 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच दरमहा दीड हजार रुपये राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. तर आता राज्य सरकारच्या पडताळणी नंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज दाखल होत आहेत.

आमदार शिरोळे यांचा फर्ग्युसन रस्त्यावर पहाणी दौरा

समाजविघातक कृत्य, अतिक्रमणे
खपवून घेतली जाणार नाहीत:आमदार शिरोळे

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणे आणि समाजविघातक कृत्यांना उत्तेजन देणाऱ्या घडामोडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा आमदार शिरोळे यांनी आज (शनिवारी) दिला आहे.

आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे अतिक्रमण खाते, बांधकाम खाते आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या समवेत पहाणी दौरा केला. यावेळी शिरोळे यांनी व्यापाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. व्यापारी वर्गाने सहकार्याची भूमिका घेतली. फर्ग्युसन रस्ता हा गजबजलेला, रहदारीचा रस्ता आहे. तेथील अतिक्रमणांबद्दल तक्रारी आहेत. त्या संदर्भात महापालिकेने अलीकडे कारवाईही केलेली आहे. येथे अतिक्रमणांना आता थारा दिला जाणार नाही. शिवाय येथे समाजविघातक हालचालींना उत्तेजन दिले जाते, अशाही तक्रारी आहेत. हे प्रकार रोखले जावेत तसेच अतिक्रमणांना थारा देऊ नये, प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी पहाणी दौऱ्यात दिल्या.याबाबत पाठपुरावा केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले- सैफवरील हल्ल्याचे बरेच धागेदोरे पोलिसांकडे:लवकरच तपास पूर्ण होईल

मुंबई: सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्याआधारावर पोलिस काम करत आहेत. या प्रकरणात पोलिस लवकरच कारवाई पूर्ण करतील, असे CM देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर आहेत. या कालावधीत ते वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. दावोसमध्ये मला चांगल्या प्रकरच्या गुंतवणुकीच्या संधी दिसत आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बीड आणि सैफ अली खान प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली.

विचारांचे आदान-प्रदान आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे देखील नेटवर्किंग होते. त्या दृष्टीनेच मी दावोसला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. ही केस घेण्यासंदर्भात उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली असून ते याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बीड प्रकरणातील दोषींना सोडणार नाही

बीड प्रकरणात होणारे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. तपास यंत्रणा सगळ्या गोष्टी रोज बाहेर सांगू शकत नाहीत. अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता, त्यांना काम करू दिले पाहिजे. बीड प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहेत.

…तर उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध करतील

उज्वल निकम यांच्यासारख्या एका वकिलाची नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भात उज्वल निकम यांना विनंती देखील केलेली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे. परंतु, मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात, राजकीय रंग देतात. हे मला योग्य वाटत नाही, असे उज्वल निकम यांनी मला सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशामध्ये अनेक वकील आहेत. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे, याचा अर्थ गुन्हेगारांना कुठेतरी मदत करण्यासारखे आहे. त्यांनी केस घेतली की, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होतेच, असा उज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. कुणाला वाचवाचये असेल, तर उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

सैफ अली वर हल्ला- ज्याला पकडले तो आरोपी नाही

मुंबईचे डीसीपी गेदाम दीक्षित म्हणाले की या अभिनेत्यावर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री 2.30 वाजताच्या सुमारास मुंबईतील खार येथील गुरु शरण अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर ही घटना घडली.या हल्ल्यात अभिनेत्याची मान, पाठ, हात आणि डोके अशा 6 ठिकाणी चाकूने वार करण्यात आले. जखमी सैफला रात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई:

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आणलेल्या संशयिताचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तत्पूर्वी, सकाळी 11 वाजताच्या सुमारास, वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले होते की सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी आणले आहे. त्याचे नाव शाहिद असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे पाच गुन्हे आधीच दाखल असल्याचे सांगण्यात आले.

सैफ मुलगा तैमूरसह पायी रुग्णालयात दाखल झाला
मुंबईतील लीलावती रुग्णालयाचे मुख्य न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सीओओ डॉ. नीरज उत्मानी यांनी शुक्रवारी सांगितले की, सैफला आयसीयूमधून रुग्णालयातील एका खास खोलीत हलवण्यात आले आहे. तो धोक्याबाहेर आहे.
बुधवारी रात्री उशिरा सैफ अली खानवर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या मान, पाठ, हात आणि डोके अशा सहा ठिकाणी चाकूने वार करण्यात आले. रात्रीच त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी म्हणाले की, सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता आणि त्यातून द्रवही गळत होता. तो शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की जर चाकू अभिनेत्याच्या मणक्यात 2 मिमी खोल असता तर पाठीच्या कण्याला गंभीर नुकसान झाले असते.
lलीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे म्हणाले, “सैफ त्याचा मुलगा तैमूरसोबत पायी रुग्णालयात आला. त्याच्या हातावर दोन जखमा होत्या. त्याच्या मानेवरही एक जखम होती ज्यावर प्लास्टिक सर्जरी झाली आहे. चाकू पाठीच्या कण्याजवळ अडकला होता.” शस्त्रक्रियेद्वारे तो तुकडा काढून टाकण्यात आला आहे. संसर्गापासून सैफचे संरक्षण करण्यासाठी, डॉक्टरांनी त्याला भेटण्यास बंदी घातली आहे. डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. एका आठवड्यात बरे होण्याची अपेक्षा आहे.”

तथापि,मुंबई वांद्रे झोनल डीसीपी म्हणतात की अद्याप याबद्दल काहीही समोर आलेले नाही. डीसीपींनी लोकांना अफवा पसरवू नयेत असे आवाहनही केले आहे.सैफला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरने सांगितले- सैफचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होतेऑटो चालक भजन सिंग म्हणाला, ‘मी रात्री गाडी चालवत होतो. सतगुरु बिल्डिंगच्या समोरून कोणीतरी हाक मारली. रिक्षा, रिक्षा. मी गेटजवळ ऑटो थांबवला. गेटमधून एक माणूस बाहेर आला. तो रक्ताने माखला होता. शरीराच्या वरच्या भागात जखम होती आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. मी लगेच त्याला माझ्या रिक्षात बसवले.

‘ते आपापसात बोलत होते की त्यांनी होली फॅमिलीत जावे की लीलावतीमध्ये.’ मी विचारले- तुम्हाला कुठे जायचे आहे? तर ते म्हणाले, चला लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्यांच्यासोबत एक लहान मूल आणि एक तरुणही होता. एकूण 3 लोक होते. मी त्यांना ओळखत नव्हतो. त्या माणसाच्या पाठीवर खोल जखम होती आणि त्याच्या मानेवरही जखमा होत्या. संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते. मला तिथे करीना कपूर दिसली नाही. पोलिसांनीही अजून माझी चौकशी केलेली नाही.

पिफ’ स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पीफ)तील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली.

या स्पर्धेसाठी एकूण ४० मराठी चित्रपटांनी आपला सहभाग नोंदवला. यातून ७ चित्रपटांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गिराण (दिग्दर्शक – विजय श्रीरंग खुडे), सांगला (दिग्दर्शक – रावबा गजमल), मॅजिक (दिग्दर्शक – रवींद्र विजय करमरकर), सिनेमॅन (दिग्दर्शक – उमेश बागडे), निर्जली (दिग्दर्शक – स्वाती सदाशिव कडू), रावसाहेब (दिग्दर्शक – निखिल महाजन), स्नो फ्लॉवर (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे) या ७ चित्रपटातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाची निवड चित्रपट महोत्सवात परदेशी आंतरराष्ट्रीय ज्युरी चित्रपट बघून करतील.

महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतराष्ट्रीय मराठी चित्रपट या स्पर्धात्मक विभागासाठी ५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार आहे. चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

चित्रपट महोत्सवासाठी डेलीगेट नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली असून, सर्वांसाठी कॅटलॉग फी केवळ रु. ८०० इतकी आहे.