पुणे -प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी हे भिडे वाड्याच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आश्चर्य व्यक्त करत ज्या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे त्या कामाचे पुन्हा भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधानांनी येणे हा मोठा विनोद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.भिडे वाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे. ज्यात आपलं कर्तुत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध व्यक्त केला.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सत्यशोधक विचारांचे होते, कर्मकांड त्यांना मंजूर नव्हते. हे सत्य संपूर्ण जगाला माहिती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाच्या निमित्ताने भिडे वाड्यात कर्मकांड करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अनुसरून पंतप्रधान मोदी हे महात्मा फुलेंच्या विचारांचा अपमान करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे.नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात यापूर्वीच मेट्रोच्या विविध मार्गीकांचे लोकार्पण झाले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात यायचं व मेट्रोच्या छोट्याशा टप्प्याचा उद्घाटन करायचं ही नरेंद्र मोदींची शैली पुणे शहरात विनोदाचा विषय झाली आहे. किंवा निवडणुका जिंकण्यासाठी सुरू असलेल्या या माकडचेष्टा आम्ही पुणेकरांसमोर उघड करू असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.