Home Blog Page 4

डॉ. मुखर्जी यांच्या संघर्षामुळे पश्चिम बंगाल वाचला: दिलीप घोष

  • डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन
  • दिलीप घोष यांचा ‘डॉ. मुखर्जी स्मृती सन्मान’ देऊन गौरव
  • डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना (मरणोत्तर) ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी

  • मुंबई, २२ जून. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या तेथील ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री दिलीप घोष यांनी, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) प्रदान करण्याची मागणी केली. डॉ. मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते होते आणि त्यांनी देशाची एकता व अखंडता जपण्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते. राष्ट्रीय हितासाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा विचार करता, ते या सन्मानास नक्कीच पात्र आहेत, असे घोष यांनी नमूद केले.
    रविवारी, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ‘दीप कमल फाउंडेशन’तर्फे आयोजित एका कार्यक्रमात दिलीप घोष बोलत होते. भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या ‘बलिदान दिना’निमित्त विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला मोठ्या संख्येने नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
    आपल्या भाषणात दिलीप घोष यांनी नमूद केले की, फाळणीच्या कठीण काळात बंगालचा पश्चिम भाग भारताकडेच राहावा यासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ऐतिहासिक लढा दिला. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि दृढ निश्चय नसता, तर आज पश्चिम बंगालचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. त्यांनी म्हटले, “आज पश्चिम बंगाल भारताच्या नकाशावर अभिमानाने एक भाग म्हणून उभा आहे, तर ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा लढा आणि त्याग यांचेच फळ आहे.”
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी भूषवले. याप्रसंगी, सार्वजनिक जीवनातील योगदान आणि राष्ट्रसेवेबद्दल दिलीप घोष यांना ‘डॉ. मुखर्जी स्मृती सन्मान’ देऊन गौरवण्यात आले.
    या समारंभास अनेक मान्यवर उपस्थित होते; त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे मंत्री आशिष शेलार, राज्यसभा खासदार व ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आणि पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार राहुल सिन्हा यांचा समावेश होता.
    गेल्या १६ वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आणि भाजप नेते अमरजित मिश्रा यांच्या दूरदृष्टीचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले. श्री. मिश्रा यांनी या कार्यक्रमाचा तपशील मांडला.
    कार्यक्रमातील सर्वात भावूक क्षण तो होता, जेव्हा मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या मुलांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, अशा वीर मातांचा सन्मान करण्यात आला.
    हुतात्मा सैनिक दिनकर नाळे यांच्या मातोश्री यशोदा नाळे आणि मरणोत्तर ‘वीर चक्र’ सन्मान मिळालेले दिवंगत कॅप्टन आर. सुब्रमण्यन यांच्या मातोश्री सुब्बलक्ष्मी रामचंद्रन यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण सभागृह प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
    वक्त्यांनी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या अलीकडील निवडणूक विजयाचे वर्णन राष्ट्रीय विकास आणि जनविश्वासाचे प्रतीक असे केले, तसेच या विजयाला एका ऐतिहासिक राजकीय परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले.
    या कार्यक्रमातून बंगाली संस्कृतीची झलकही पाहायला मिळाली. बंगाली संगीत, लोकसंगीत, पारंपरिक वेशभूषा आणि ‘ढाक’ (बंगाली वाद्य) यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याव्यतिरिक्त, ‘मी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोलतोय’ या नाटकाच्या सादरीकरणालाही प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली.
    मुंबईच्या विविध भागांतील बंगाली संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी आणि बंगाली समाजातील मोठ्या संख्येने नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
    अत्यंत उत्साह, प्रतिष्ठा आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम केवळ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच नव्हे, तर पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठीही आयोजित करण्यात आला होता.

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

  • उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. 22 जून : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 होती. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विविध आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन ही मुदत आता 2 जुलै 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंतिम मुदतीपर्यंत 1 लाख 45 हजार 708 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1 लाख 15 हजार 53 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

सुधारित अंतिम तारीख 02 जुलै 2026 करण्यात आली आहे तरीही इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत
प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळ ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

पुण्यातील पाणी कपातीवर पर्याय; ‘डेड स्टॉक’ वापरण्याची सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांची मागणी

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात बोलताना इनामदार यांनी म्हटले आहे की, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत टँकरच्या पाण्याचे दर वाढू लागल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहरातील बहुतांश मोठ्या इमारतींमध्ये जमिनीखाली अग्निशमनासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या असून, त्यातील पाणी आग लागल्याशिवाय वापरले जात नाही. अशा टाक्यांमधील साठ्याची एकत्रित गणना केल्यास तो जवळपास पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एका धरणाच्या साठ्याइतका असू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अग्निसुरक्षा क्षेत्राचा अभ्यास करताना आणि विविध आगीच्या घटनास्थळी भेटी दिल्यानंतर, प्रत्यक्षात आग विझवण्यासाठी फायर टँक तसेच रस्त्यांवरील फायर हायड्रंटमधील पाणीच वापरले जात असल्याचे निरीक्षण समोर आल्याचे इनामदार यांनी सांगितले.

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आग लागल्याच्या वेळी वेळ वाया जाऊ नये म्हणून फायर टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा टाक्यांमधील ‘डेड स्टॉक’ पाण्याचा नियंत्रित वापर करण्याबाबत प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. पुढील एक महिना हा साठा वापरण्यास सुरुवात केल्यास पाणी कपातीची तीव्रता कमी होऊन टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मागील  15 वर्षात शहर आणि उपनगरात, समाविष्ट गावांत ज्या सोसायट्या, मॉल आणि अन्य वास्तु निर्माण झाल्या आहेत, त्या सर्वांना फायर टँक बंधनकारक आहेत. यामुळे या सर्व पाणी साठयाचा एकत्रित विचार केला तर तो साठा अंदाजे चारशे कोटी लीटर म्हणजे आपल्याकडे असलेल्या धरण साठया एवढा असल्याचे इनामदार यांनी सांगितले.  

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाची दखल घेऊन प्रशासनाने तज्ज्ञांशी चर्चा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड

  • २०२६-३० कार्यकारिणीची घोषणा; देशभरातील २२ पदाधिकाऱ्यांची निवड

पुणे/ रांची ; प्रतिनिधी
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया – एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची निवडणूक रांची (झारखंड) याठिकाणी रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक तथा उद्योगपती पुनीत बालन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विदर्भातील माजी खासदार रामदास तडास यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट एमेरिटस) म्हणून, तर बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक (चीफ पॅट्रन) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांची तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर व कार्यकारिणीत देशातील विविध राज्यांतील प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर दिवाणी न्यायालयाचे सहायक निवडणूक अधिकारी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक झाली.
यावेळी महासंघाचे अरुण सिंह, डॉ. राजेश गुप्ता, विवेक रेड्डी, राहुल सिंह, चेतन गोविंद झा, राजेश सिंह, मनोज शर्मा, कुणाल एम. त्रिपाठी, सम्मी सिंह, सुजल केशरी, प्रदीप तिर्की व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांची विविध क्रीडा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कबड्डीला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल देशभरातील सर्व राज्य संघटना आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कबड्डी हा भारताचा पारंपरिक आणि जनमानसाशी जोडलेला खेळ आहे. या खेळाला जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, आधुनिक प्रशिक्षण सुविधा उभारण्यासाठी आणि महिला तसेच युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राज्य संघटनांना सोबत घेऊन भारतीय कबड्डीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,”
– पुनीत बालन, नवनिर्वाचित अध्यक्ष.

————————————————-

कोथरूडची ३८ गुंठे जागा महापालिकेने टेंडर शिवाय ज्यांना दिली ते ग्रॅव्हिटी फौन्डेशन कुणाचे ?

कोथरूडमधील ३८ गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सभेत खडाजंगी; बहुमताने विषय मंजूर

पुणे : कोथरूड परिसरातील महापालिकेच्या सुमारे ३८ गुंठे जागेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने एका संस्थेला वापरासाठी देण्याच्या प्रस्तावावर सोमवारी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक प्रशांत जगताप आणि चंदूशेठ कदम यांनी या विषयाला तीव्र विरोध करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

सभेत या जागेचे वाटप, निवड प्रक्रिया, निविदा न काढता जागा देण्यामागील कारणे तसेच महापालिकेच्या मालमत्तेचा वापर याबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदविले. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त आशा राऊत यांनी विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट करत महापालिकेच्या नियमांनुसार प्रस्ताव आणण्यात आल्याचे सांगितले.ॲमेनिटी स्पेस नियमावलीचे पालन नाही, वृद्धाश्रम चालविण्याचा अनुभव आहे का? ते माहिती नाही. तरीही एका कागदावर महापालिकेची कोट्यावधी रुपयांची कोथरूड येथील एक एकर जागा ग्रॅव्हिटी वेलफेअर फाऊंडेशनला वृद्धाश्रम उभारण्यासाठी देण्यात आली आहे.
यास महापालिकेतील विरोधकांनी कडाडून विरोध करूनही भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून पुढील ३० वर्षांसाठी ही जागा संस्थेला दिली आहे.

पुणे महापालिकेच्या मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवर ग्रॅव्हिटी वेलफेअर फाउंडेशनला कोथरूड येथील सिटी सर्व्हे क्रमांक ६७०, सर्वे क्रमांक १२/२, १३/५ हा ३६१९.३६ चौरस मिटरचा भूखंड देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. ही संस्था कुठे काम करते, त्यांना वृद्धाश्रम चालविण्याचा अनुभव आहे का?, महापालिकेसोबत संयुक्त प्रकल्प राबविताना महापालिकेसाठी त्याचा मोबदला काय देणार ? असे प्रश्‍न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केले.

उपायुक्त आशा राऊत यांनी त्यावर खुलासा केला. या जागेवर बांधकाम करणे, सर्व आवश्‍यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असणार आहे. एकूण क्षमतेच्या २५ टक्के जागा या महापालिका आयुक्त शिफारस करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत वृद्धाश्रमात प्रवेश द्यावा, उर्वरित ७५ टक्के जागांवर माफक दरात प्रवेश संस्थेने द्यावा. ३० वर्षानंतर ही जागा व इमारत महापालिकेच्या ताब्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रॅव्हिटी वेलफेअर फाऊंडेशन संस्थेने यापूर्वी अशा पद्धतीने कुठे काम केले आहे, त्यांना काय अनुभव आहे, अवघ्या ११ दिवसात बांधकाम विभागाने तर आयुक्तांनी ६ दिवसात हा प्रस्ताव मंजूर केला. एवढ्या घाईत हा निर्णय कसा केला असा प्रश्‍न अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. तर जागा वाटप नियमावलीचे पालन करत निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही, असा प्रश्‍न विरोधीपक्षनेते निलेश निकम यांनी केला. महापालिकेची ५०० कोटीची जागा खासगी संस्थांना देणे चुकीचे आहे अशी टीका काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी केली. ही जागा वृद्धाश्रमाला दिली तर त्यातून आपली फसवणूक होऊ शकते, अशी भीती प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

सभागृहनेते गणेश बिडकर यांनी या आरोपांना उत्तर देत म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षापासून या जागेवर वृद्धाश्रमाचे आरक्षण आहे, संस्था तेथे आता वृद्धाश्रम उभारणार आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल.’विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर प्रशासनाकडून उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांनी यास विरोध केला. त्यामुळे सभागृहात मतदान घेण्यात आले. भाजपने १०५ विरुद्ध ३२ अशा बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला.

दरम्यान, सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही या प्रस्तावाचे समर्थन करत ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत मांडले. मात्र विरोधकांनी समाधान न झाल्याने चर्चेदरम्यान वातावरण तापले.अखेर नगरसचिव योगिता भोसले यांनी विषयाला विरोध कायम असल्याने मतदानाची प्रक्रिया राबविली. मतदानात सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रस्तावाला बहुमत मिळाले आणि विषय मंजूर करण्यात आला.या निर्णयानंतर महापालिकेच्या मालमत्तेच्या वाटप प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधी पक्षाने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे संकेत दिले आहेत

पुण्यातील BRT चे दिवस भरले…

.स्वारगेट-कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा निर्णय

पुण्यातील तत्कालीन नेते सुरेश कलमाडी यांनी BRT आणली तेव्हा ९०० कोटीहून अधिक त्यावर खर्च केले गेले, हळू हळू शहरभर BRT राबविण्याचा प्रयत्न झाला . त्याच BRT ला विरोध करून स्व. अजित पवारांनी कलमाडी यांची सत्ता उलथवून लावली आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले . आता हे दोन्ही नेते उरले नाहीत . आणि आता महापालिकेने BRT शहरातून उखडून टाकून तीचा अंत करण्याचे ठरवले आहे. BRT चे दिवस भरले एवढेच त्यावर म्हणता येईल .

पुणे-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजुरीसाठी आलेला असताना तेवढ्यावरच समाधान न मानता सत्ताधारी आणि विरोधकांनी पुण्यातील बीआरटी सेवा पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.स्वारगेट-कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार्यवाही पुढील आठ दिवसात करा असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून बीआरटी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली. सातारा रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर टप्प्याटप्प्याने बीआरटी सेवा सुरु झाली. यातील सोलापूर रस्त्यावरील बहुतांश बीआरटी मार्ग काढून टाकला आहे. त्यानंतर नगर रस्त्यावरील जवळपास निम्मा बीआरटी मार्गही काढला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्याचा बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास महापालिका प्रशासनानेही सकारात्मक अभिप्राय दिला असून, बीआरटी मार्ग काढल्याने आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी होईल आणि दोन अतिरिक्त लेन खासगी वाहनांसाठी उपलब्ध होतील असे अभिप्रयात नमूद केले होते.

महापालिकेच्या मुख्यसभेत आळंदी रस्त्यावरील बीआरटी काढून टाकण्याचा प्रस्ताव आला. त्यावर निर्णय होत असताना हा निर्णय घेण्यापूर्वी पीएमपीच्या संचालक मंडळाचा अभिप्राय घ्यावा अशी सूचना नगरसेवक अजय खेडेकर यांनी केली. पण त्यात आणखी वेळ जाईल. संचालक मंडळ मान्यता देईल या भरवशावर हा बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याच प्रमाणे मेट्रोच्या कामामुळे स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग काढावा लागणार आहे, असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले. त्याच वेळी नगर रस्त्यावरील उर्वरित बीआरटी काढून टाकावी अशी मागणीही आली. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी काढून टाकावी अशी उपसूनचा सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केली.

‘आळंदी रस्त्यासह स्वारगेट ते कात्रज आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय मुख्यसभेत घेण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पूर्वी हे रस्ते मोठे केले जातील.’गणेश बिडकर, सभागृहनेते, पुणे महापालिका

‘आळंदी मार्गावरील बीआरटीमुळे वारीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आषाढी वारीच्या पूर्वी पुढील आठ दिवसात बीआरटी मार्ग प्रशासनाने काढून टाकावा.’मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका

२३ गावांचा PMRDA ने केलेला आराखडा रद्द:महापालिका करणार आता विकास आराखडा

पुणे-महापालिकेत शहराच्या हद्दीलगतची २३ गावे समाविष्ट होऊन पाच वर्ष झाल्यानंतर या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर करणे आणि त्यासाठी नगर नियोजन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या प्रस्तावास काल (ता.२२) मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. पुढील तीन वर्षात विकास आराखडा अंतिम होणे अपेक्षित आहे.

राज्य सरकारने पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय जून २०२१ मध्ये घेतला होता. मात्र, या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेऐवजी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जबाबदारी दिली. पीएमआरडीएने हा विकास आराखड्याचे काम सुरु केल्यांतर त्यात अनेक गावांमधील शेत जमिनी निवासी करणे, ठराविक ठिकाणी आरक्षणे टाकणे, मोठ्या बिल्डारांना फायदा होईल अशा पद्धतीने विकास आराखडा तयार केला. त्याविरोधात अनेक तक्रारी राज्य सरकारकडे गेल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएने तयार केलेला आराखडा रद्द करण्याचे आदेश दिले होते.

पीएमआरडीएचा आराखडा रद्द झाल्याने २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे महापालिकेला देण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गावांच्या आराखड्याचा इरादा जाहीर करणे आणि त्यासाठी नगर नियोजन अधिकारी म्हणून शहर अभियंता अनिरुध्द पावसकर यांची नेमणूक करण्यासंबंधीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास काही दिवसांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. आज हा प्रस्ताव मुख्यसभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली.

महापालिकेला प्रारुप विकास आराखडा तयार करण्यासाठी २ वर्षांची मुदत असणार आहे. मात्र, २३ गावांचा आराखडा करण्याची प्रक्रिया यापूर्वी पीएमआरडीएच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आता नव्याने आराखडा तयार करताना होणार असल्याने हा अवधी कमी होऊन कमी कालावधीत आराखडा तयार होईल असे सांगण्यात येत आहे.

अशी असणार प्रक्रिया

महापालिकेच्या डीपी सेलकडून विकास आराखड्याचे काम केले जाईल.

गावांमधील विद्यमान जमीन वापराचे सर्वेक्षण होणार

पुढील २० वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील जमीन वापराचे नियोजन होणार

प्रशासनाने तयार केलेला प्रारुप आराखडा हरकती सूचनांसाठी महापालिका जाहीर करणार

त्यावर शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून सुनावणी होणार मुख्यसभेत मंजुरीसाठी जाणार

मुख्यसभेने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी जाणार

शासनाकडून अंतिम विकास आराखडा जाहीर केला जाईल

या प्रक्रिया तीन वर्षाच्या आत पूर्ण होऊ शकते

‘२३ गावांच्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्यास आज मान्यता दिली आहे. यातून विकासाचा समतोल राखला जाईल.”गणेश बिडकर, सभागृहनेते, पुणे महापालिका

ही आहेत २३ गावे–म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रूक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोल्हेवाडी आणि वाघोली.

कसब्यातील कचरा मुख्य सभेत पेटला, बिडकर म्हणाले, स्वच्छ संस्थेच्या कारभाराच्या तक्रारी फार,त्यांच्या बाबत फेरविचार करू…

कुणाल टिळक, स्वरदा बापट, बाप्पू मानकर आक्रमक; कचरा प्रश्नावर प्रशासन घेरले

पुणे दिनांक २२ : स्वच्छ संस्थेकडून कचरा संकलन होत असतानाही रस्त्यावर कचरा का दिसतो, त्यांच्या कामाचे अद्याप मूल्यमापन का झाले नाही, कर्मचारी नागरिकांकडे जादा पैशांची मागणी करतात, असा संतप्त सवाल करत नगरसेवकांनी काल सोमवारी (ता. २२) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
कसबा पेठ मतदारसंघातील कचरा साठण्याची ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) कर्मी करण्यासाठी, तसेच १०० टक्के घरोघर वर्गीकृत कचरा संकलन करण्यासाठी ‘स्वच्छ’ला प्रायोगिक तत्त्वावर काम दिले होते. यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील एक कोटी नऊ लाख रुपये महापालिकेने ‘स्वच्छ’ला दिले आहेत
यासंदर्भात नगरसेवक कुणाल टिळक यांनी प्रशासनास लेखी प्रश्न विचारला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्यासह राघवेंद्र मानकर, नगरसेविका स्वरदा बापट, ऐश्वर्या थोरात यांनीही स्वच्छ’च्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रारंभी ‘प्रकल्पाला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अद्याप मूल्यांकन झालेले नाही. पूर्वी केलेले काम पाहून संस्थेला मुदतवाढ दिली आहे,’ असे उत्तर उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिले. त्यावर नगरसेवकांनी जोरदार
आवाज उठविला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार नागरिकांकडून पैसे घेण्यास ‘स्वच्छ’ला परवानगी आहे. त्यानुसार ते पैसे घेतात. त्यांना मिळणारे पैसे कमी आहेत, त्यातच त्यांच्याकडून रविवारीदेखील काम केले जात असल्याने त्यांना २५ रुपये दिले जात आहेत.”

कसबा पेठेतील कचरा प्रश्नावर स्थानिक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला घेरल्याने सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून परिस्थितीत सुधारणा करावी, अशी एकमुखी मागणी सभागृहातून करण्यात आली.

कसबा पेठेतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी सदस्यांकडून करण्यात आली.

रामटेकडीत पोलिस फायरिंगमधील जखमी दुधानीला पकडले पण साथीदार फरार

0

पुणे : वानवडीतील रामटेकडी परिसरात पोलिस पथकावर आरोपींनी दुचाकी अंगावर घालून आणि हत्याराने वार केल्याची थरारक घटना रविवारी (ता. २१) घडली. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर हे जखमी झाले. रायकर यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून आरोपीच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. त्यात आरोपी करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) हा जखमी झाला आहे.

या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक गणेश रायकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर त्याचा साथीदार बिंतूसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०) हा पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रायकर आणि त्यांचे पथक सकाळी सहाच्या सुमारास रामटेकडी येथील आनंदनगर भागात एका गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहताच दुचाकी थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवर मागे बसलेल्या करणसिंग दुधानी याने अटक टाळण्याच्या उद्देशाने रायकर यांच्यावर हत्याराने हल्ला चढवला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रायकर यांनी स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड फायर केला. आरोपीच्या पायाला गोळी लागल्यानंतरही आरोपीने स्वतःच्या गळ्यावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्येची धमकी दिली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले असता, त्याने रायकर यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पाेलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव करत आहेत

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून द्यावे– समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी

0

-जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

पुणे : शारीरिक उणीवांवर मात करून विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचे शिखर गाठणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना केवळ पुरस्कार देणे पुरेसे नाही, तर त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल अशी साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व एनएडब्ल्यूपीजीचे प्रमुख राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

साईनाथ मंडळ ट्रस्ट, एकता मित्र मंडळ , श्री शिवाजी मित्र मंडळ , वीर शिवराज मित्र मंडळ आणि अचानक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पित्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, उदय जगताप, सचिन पवार, विक्रम गोगावले, हर्षद नवले, नरेंद्र व्यास, विनायक इंगवले, गोविंदा वरण दाणी , अमित जाधव, विविध मंडळाचे अध्यक्ष व आयोजक पियुष शाह, किरण सोनिवाल, सुधीर ढमाले, प्रल्हाद थोरात, ऋषिकेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अंध सनदी लेखापाल व शास्त्रीय गायक भूषण तोष्णीवाल यांचे वडील नंदकिशोर तोष्णीवाल, कर्णबधिर भरतनाट्यम नर्तिका प्रेरणा सहाणे यांचे वडील केशव सहाणे, दिव्यांग नर्तिका सायली आगवणे यांचे वडील नंदकिशोर आगवणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू गौरी गाडगीळ यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘यलो’ चित्रपटामुळे प्रसिद्ध असलेल्या गौरीचे वडील शेखर गाडगीळ यांचा राहुल देशमुख आणि साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशमुख म्हणाले, “दिव्यांग असूनही सर्वसामान्य व्यक्तींनाही कठीण वाटतील अशी अनेक कार्ये या मुलांनी करून दाखवली आहेत. त्यांच्या भविष्यासाठी शासनाने विशेष धोरण आखून त्यांना चांगल्या पदांवरील सरकारी नोकऱ्या, आर्थिक सहाय्य आणि मानधन उपलब्ध करून द्यावे. पालकांच्या पश्चातही त्यांच्या जगण्याची आबाळ होणार नाही, याची हमी शासनाने द्यायला हवी.”

डॉ. संगीता बर्वे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या काळात नैराश्य, मानसिक ताण आणि नकारात्मक विचारांमुळे तरुण पिढी अनेक समस्यांना सामोरी जात आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वावर मात करून यश संपादन करणारी दिव्यांग मुले आणि त्यांना घडवणारे पालक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अशा यशस्वी दिव्यांग तरुणांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात सत्कारमूर्तींच्या पालकांनीही आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन केले. पियुष शाह यांनी प्रास्ताविकात प्रमुख पाहुणे व सत्कारार्थींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर सुधीर ढमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रल्हाद थोरात किरण सोनीवाल पीयूष शाह व सुधीर ढमाले यांनी विशेष परिश्रम घेतले….

मध्यरात्री पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे-पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाकडेवाडी परिसरात एका रिक्षाचालकाने प्रवाशाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, तर पुणे स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली. पहिल्या घटनेत, २० जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. ओदिशा येथील मूळ रहिवासी असलेला एक तरुण अहिल्यानगरहून एसटी बसने वाकडेवाडीतील एसटी स्थानकावर उतरला. तेथून तो रिक्षाने पुणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना, रिक्षाचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला धमकावले. रिक्षा थांबवून त्यांनी तरुणाकडील सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, पुणे स्टेशन परिसरात एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. कात्रज येथे राहणाऱ्या या महिलेने पुणे पोलीस आयुक्त कार्यालय ते ससून रुग्णालय दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. रिक्षात इतर प्रवासी असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे पुढील तपास करत आहेत.

गद्दारांचा ‘खोपकर’ करणारी शिवसेना आज विकलांग झाली..

२१ एप्रिल १९८९. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची तलवारीने हत्या झाली. महापौर निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याचा संशय त्यांच्या नावावर घेतला गेला आणि त्यानंतर घडलेल्या या घटनेने शिवसेनेत एक स्पष्ट संदेश गेला – “गद्दारी करणाऱ्याचा खोपकर केला जाईल.”

त्या काळातील शिवसेना ही संघर्ष, आक्रमकता आणि संघटनशक्ती यासाठी ओळखली जात होती. मराठी अस्मिता, रोजगार, गिरणी कामगारांचे प्रश्न आणि रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी या गोष्टींनी शिवसेना उभी राहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे पक्षातील शिस्त आणि नेतृत्वावरील विश्वास अबाधित राहिला.

मात्र, काळ बदलत गेला आणि शिवसेनेत बंडांची मालिका सुरू झाली. सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि अखेरीस एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या काळात बंड करत शिवसेनेला मोठे धक्के दिले.

भुजबळ यांच्या वाढत्या लोकप्रियतेकडे आणि मंडल आयोगाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, गणेश नाईक यांच्या वाढत्या आर्थिक व राजकीय प्रभावाबाबतची अस्वस्थता, नारायण राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला मिळालेला विरोध आणि राज ठाकरे यांच्याशी वाढलेला संघर्ष – या सर्व घटनांमध्ये नेतृत्व आणि प्रभावी नेत्यांमधील दुरावा दिसून आला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शैली बदलली. आक्रमक रस्त्यावरील राजकारणाऐवजी संघटनात्मक आणि मवाळ राजकारणाला प्राधान्य मिळाले. त्याचवेळी जागतिकीकरणामुळे समाजाची मानसिकता बदलली. राडेबाजी करणारा कार्यकर्ता कमी झाला आणि व्यावसायिक, सुशिक्षित वर्ग राजकारणात वाढू लागला.

२०१४ नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रीय पातळीवर प्रबळ झाला. शिवसेना-भाजप संबंधांमध्ये तणाव वाढला. महाविकास आघाडी स्थापून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर पक्षांतर्गत संवाद, नेतृत्वावरील विश्वास आणि संघटनात्मक एकजूट यांची परीक्षा सुरू झाली.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे बंड घडले. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे विभाजन ठरले. त्यानंतर खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांची गळती सुरूच राहिली.

एकेकाळी बंडखोरांविरुद्ध कठोर भूमिका घेणारी शिवसेना आज स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत अडकलेली दिसते. प्रश्न केवळ बंडखोरीचा नाही, तर बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्यात पक्ष किती यशस्वी ठरला याचाही आहे.

श्रीधर खोपकर हत्येनंतर ‘गद्दारांचा खोपकर’ हा संदेश देणारी शिवसेना आज सहा खासदार फुटल्याच्या चर्चेत अडकलेली दिसते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात आहे – एकेकाळी बंडखोरांना सळो की पळो करून सोडणारी शिवसेना इतकी कमकुवत कशी झाली?

या प्रश्नाचे उत्तर नेतृत्व, संघटन, बदलती सामाजिक मानसिकता, भाजपचा उदय आणि अंतर्गत सत्तासंघर्ष या सर्व घटकांमध्ये दडलेले दिसते.

निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी योग महत्वाचे-डॉ. रामचंद्र हंकारे

पुणे, दि. २१ : योग ही भारत देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे; निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आला. यावेळी  उपायुक्त पशुसंवर्धन राजेश वासनिक, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. शोएब इनामदार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित तसेच  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. हंकारे म्हणाले, शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगा करणे गरजेचे आहे. नियमित योगा केल्याने तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.तसेच आजारांपासून बचाव होण्यास मदत होते, असेही डॉ. हंकारे म्हणाले.

श्रीमती माधवी मागलेकर योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा केली.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करा-मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर

सचिवांकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष पाहणी

पुणे, दि. २१: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविण्याच्यादृष्टीने मृद व जलसंधारण उपचारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; जिल्ह्यातील भूजल पातळी वाढीकरिता महत्त्वपूर्ण असलेली ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिले.

सचिव श्री. पापळकर यांनी पुणे जिल्ह्यातील वाघापूर, गुरोळी, साकुर्डे आदी गावात सुरु असलेल्या पाझर तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, आदी कामांची पाहणी केली. यावेळी जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, कार्यकारी अभियंता दिपक लांडगे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पापळकर म्हणाले, जलसंधारण ही काळाची गरज असून, पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे करावीत. लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याच्या व नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना श्री. पापळकर यांनी आवाहन केले, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पावसाळ्यातील पाण्याचा साठा करुन त्याचे सूक्ष्म नियोजन करुन वापर करावा.

आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या सूचना
श्री. पापळकर यांनी मृद व जलसंधारण योजनांच्या अंमलबजावणीबाबत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे हाती घेण्याबरोबरच नवीन कामांचे प्रस्ताव सादर करावेत. अतिशोषित, टॅंकरग्रस्त गावांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठीची कामे कमी कालावधीमध्ये पूर्ण करावीत, अशा सूचना श्री. पापळकर यांनी दिल्या.

यावेळी विभागाचे उप अभियंता सागर भोर, सुयश महाडीक , ओमकार शेरकर आणि सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ५ हजार नागरिकांचा सामूहिक योगाभ्यास

पुणे, दि. २१ जून : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला.

महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सोनाली गारगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित नागरिकांनी योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, योग हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा असून आज संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला आहे. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही संकल्पना वाढत्या वयानुसार आरोग्य, मानसिक शांतता आणि आत्मनिर्भर जीवनशैली जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

“करा योग – रहा निरोग” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून निरोगी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.