कुणाल टिळक, स्वरदा बापट, बाप्पू मानकर आक्रमक; कचरा प्रश्नावर प्रशासन घेरले
पुणे दिनांक २२ : स्वच्छ संस्थेकडून कचरा संकलन होत असतानाही रस्त्यावर कचरा का दिसतो, त्यांच्या कामाचे अद्याप मूल्यमापन का झाले नाही, कर्मचारी नागरिकांकडे जादा पैशांची मागणी करतात, असा संतप्त सवाल करत नगरसेवकांनी काल सोमवारी (ता. २२) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
कसबा पेठ मतदारसंघातील कचरा साठण्याची ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) कर्मी करण्यासाठी, तसेच १०० टक्के घरोघर वर्गीकृत कचरा संकलन करण्यासाठी ‘स्वच्छ’ला प्रायोगिक तत्त्वावर काम दिले होते. यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील एक कोटी नऊ लाख रुपये महापालिकेने ‘स्वच्छ’ला दिले आहेत
यासंदर्भात नगरसेवक कुणाल टिळक यांनी प्रशासनास लेखी प्रश्न विचारला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्यासह राघवेंद्र मानकर, नगरसेविका स्वरदा बापट, ऐश्वर्या थोरात यांनीही स्वच्छ’च्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रारंभी ‘प्रकल्पाला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अद्याप मूल्यांकन झालेले नाही. पूर्वी केलेले काम पाहून संस्थेला मुदतवाढ दिली आहे,’ असे उत्तर उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिले. त्यावर नगरसेवकांनी जोरदार
आवाज उठविला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार नागरिकांकडून पैसे घेण्यास ‘स्वच्छ’ला परवानगी आहे. त्यानुसार ते पैसे घेतात. त्यांना मिळणारे पैसे कमी आहेत, त्यातच त्यांच्याकडून रविवारीदेखील काम केले जात असल्याने त्यांना २५ रुपये दिले जात आहेत.”
कसबा पेठेतील कचरा प्रश्नावर स्थानिक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला घेरल्याने सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून परिस्थितीत सुधारणा करावी, अशी एकमुखी मागणी सभागृहातून करण्यात आली.
कसबा पेठेतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी सदस्यांकडून करण्यात आली.

