पुणे : वानवडीतील रामटेकडी परिसरात पोलिस पथकावर आरोपींनी दुचाकी अंगावर घालून आणि हत्याराने वार केल्याची थरारक घटना रविवारी (ता. २१) घडली. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर हे जखमी झाले. रायकर यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून आरोपीच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. त्यात आरोपी करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) हा जखमी झाला आहे.
या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक गणेश रायकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर त्याचा साथीदार बिंतूसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०) हा पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रायकर आणि त्यांचे पथक सकाळी सहाच्या सुमारास रामटेकडी येथील आनंदनगर भागात एका गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहताच दुचाकी थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवर मागे बसलेल्या करणसिंग दुधानी याने अटक टाळण्याच्या उद्देशाने रायकर यांच्यावर हत्याराने हल्ला चढवला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रायकर यांनी स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड फायर केला. आरोपीच्या पायाला गोळी लागल्यानंतरही आरोपीने स्वतःच्या गळ्यावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्येची धमकी दिली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले असता, त्याने रायकर यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पाेलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव करत आहेत

