आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ५ हजार नागरिकांचा सामूहिक योगाभ्यास
पुणे, दि. २१ जून : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला.
महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सोनाली गारगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित नागरिकांनी योगाभ्यास करत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, योग हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा असून आज संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला आहे. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही संकल्पना वाढत्या वयानुसार आरोग्य, मानसिक शांतता आणि आत्मनिर्भर जीवनशैली जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
“करा योग – रहा निरोग” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून निरोगी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

