कोंढवा पोलिसांची तातडीची कारवाई; खंडणी मागणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, दि. २१ जून : कोंढवा परिसरातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत मुलीला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेतले. याचवेळी मुलीच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराची १७ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
तपास सुरू असतानाच तक्रारदाराला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून “तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे” असा दावा करत पैशांची मागणी केली. त्यासाठी यूपीआय स्कॅनरही पाठविण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास अधिक वेगाने सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि रेल्वे प्रवासाची माहिती तपासताना संबंधित मुलगी आजाद हिंद एक्सप्रेसने हावडा दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ रेल्वे प्रशासन व झारखंडमधील टाटानगर (जमशेदपूर) रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या समन्वयातून मुलीचा शोध घेण्यात यश आले आणि तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक आणि मुलीचे नातेवाईक झारखंडला रवाना झाले. मुलीला सुरक्षितपणे पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बनावट अपहरणाचा बनाव करून व्हिडीओ कॉलद्वारे खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

