मुंबई-पुणे : अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मान्सूनने दमदार हजेरी लावली. हंगामातील पहिल्या जोरदार पावसामुळे उष्णता आणि दमट वातावरणाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ८ जूनपासून सोलापूर परिसरात स्थिरावलेला नैऋत्य मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून २३ जूनच्या आसपास महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यात दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी हडपसर, सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा आणि कोथरूड परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच जोरदार सरींमुळे स्वारगेटमधील मित्र मंडळ चौक परिसरात पाणी साचून पादचारी मार्ग जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ हलक्या सरी कोसळल्या.
कोकणातही मान्सूनने जोर पकडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दहा ते पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळाला.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पाऊस लांबल्याने सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने विशेष पर्जन्यप्रार्थना करण्यात आली. जांभळेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून चांगल्या पावसासाठी साकडे घालण्यात आले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम घाट परिसरात तयार होणारे ढग आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे यामुळे मान्सूनला चालना मिळत आहे. उपग्रह चित्रांमध्येही ढगांची घनता वाढल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुढील दिवसांच्या हवामानाचा अंदाज


22 जून
आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्णतेची लाट लोकांना त्रास देईल.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडेल.
23 जून
गुजरात, बिहार, बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये हवामान सामान्य राहील.
पूर्व उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात राहील.
इतर राज्यांमध्ये मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस होईल. कोणत्याही राज्यासाठी रेड-ऑरेंज अलर्ट नाही.

