Home Blog Page 3

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत

पुणे | पुण्याचा प्रमुख गुटखा किंग कोण ? पोलीस छोटे मोठे छापे टाकून करोडोचा गुटखा पकडत असले तरीही गुटख्याची आणि गांजाची आयात कशी थांबत नाही? अंबरनाथचे गांजा कनेक्शन नेमके कसे कोणते आहे असे सवाल उपस्थित होत असताना आज पुन्हा असे सवाल उपस्थित होत असताना पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरात येथून पुण्यात विक्रीसाठी आणण्यात आलेला तब्बल २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नऱ्हे पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नवले ब्रिज परिसरात ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमधून प्रतिबंधित विमल पान मसाला, डी-1 तंबाखू, आरएमडी पान मसाला, तुलसी तंबाखू व गोवा गुटखा असा सुमारे ५.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान या मालाचा संबंध पुण्यातील गोदामाशी असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आणखी १७ लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. अशाप्रकारे एकूण २२.९१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी हयात मुबारक खान (रा. राजस्थान) आणि सोहेल अस्लम मुलाणी (रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नऱ्हे पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.


न-हे पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीत तपास पथक गस्त करीत असतांना पोलीस अमंलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बस मधुन प्रतिबंधीत गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खबर प्राप्त झाली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), ईश्वर चव्हाण पोउपनिरी विजयसिंह घाडगे आणि तपास पथकाने सापळा रचुन नवले ब्रिज खाली ट्रॅव्हल्स बस थांबवुन तपासणी दरम्यान चालक हबास मुबारक खान वय ३४ वर्षे रा. जिल्हा बाडमेर, राज्य राजस्थान याचे ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रतिबंधीत विमल पान मसाला, व्हि १ तंबाखु, आर एम डी पानमसाला, तुळसी तंबाखु, गोवा गुटखा असा एकुण ५,९०,८००/- रुपयेचा मुद्देमाल व माल घेणारा आरोपी सोहेल अस्लम मुलाणी वय २२ वर्षे रा.६६७, गंजपेठ पुणे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक तपास करता केदारीनगर पुणे. येथे गोडाऊन मध्ये त्याने त्याचे स्वताःचे आर्थिक फायदाकरीता प्रतिबंधीत विमल पान मसाला, व्हि १ तंबाखु, आर एम डी पानमसाला, तुळसी तंबाखु, गोवा गुटखा असा १७,००,७३४ / मुद्देमाल ताब्यात मिळाला असुन सदचा प्रतिबंधीत माल हा अहमदाबाद येथुन खरेदी केल्याचे समक्ष सांगितले असल्याने त्यांचेवर नन्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ११४/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण याच विनियमन) अधिनियम सन २००३ चे कलम ७ (२),२० (२), अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६ चेकलम २६ (२) (i) (iv) प्रमाणे गुन्हा दाखल करुन वरील दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे नऱ्हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर सागर कवडे, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस उप-निरीक्षक, किरण लिटे, पोलीस अमंलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजुतोरे, नितीन वाघमारे, निलेश भोरडे, यांचे पथकाने केली आहे.

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं.

द्विधा या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत द्विधा चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. 

नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून द्विधा बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

द्विधा हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला.

द्विधा चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. प्राथमिक तपासात यामागे लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याची माहिती मिळाली असून, फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका व्यावसायिकाने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिकाचे फुरसुंगी भागात पाईप आणि पोलाद विक्रीचे गोदाम व कार्यालय आहे. २२ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास व्यावसायिकाच्या मोबाईलवर अर्जुन बिष्णोई नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने स्वतःला लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केली.

या धमकीनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने सायंकाळी सातच्या सुमारास वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांचे कार्यालय फुरसुंगी भागात असल्याने, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण फुरसुंगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. रात्री सव्वाआठच्या सुमारास, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी व्यावसायिकाच्या फुरसुंगीतील कार्यालयाच्या दरवाजावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरून फुरसुंगीतून सासवड रस्त्याने पसार झाले. पोलिसांनी व्यावसायिकाच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागातही एका फर्निचर व्यावसायिकाच्या दालनासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्यांनी खंडणीसाठी फर्निचर व्यावसायिकाला धमकावले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करून त्या प्रकरणात आरोपींना अटक केली होती.
तपासादरम्यान शुभम लोणकर या नावाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड आणि सलमान खान धमकी प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. यापूर्वी अकोला पोलिसांनी त्याच्याकडून पाच पिस्तुले जप्त केली होती. प्राथमिक माहितीनुसार तो राजस्थानमध्ये सैन्य भरतीसाठी गेला असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता.

इतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज : प्र. के. घाणेकर

  • वनराई आणि इतिहास प्रबोधन समितीच्या संयुक्त उपक्रमात ‘इतिहासातील पर्यावरण’ विषयावर व्याख्यान

पुणे, : पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा आणि अनुभवांमधून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वनस्पतीशास्त्रज्ज्ञ, दुर्ग व इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वनराई आणि इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहासातील पर्यावरण’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त सागर धारिया होते. नगरसेविका पल्लवी जावळे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पियुष शहा, डॉ. दिलीप शेठ, यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. गुरुदास नूलकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार सौरभ कर्डे यांनी मानले.

प्र. के. घाणेकर यांनी इतिहास आणि पर्यावरण या संकल्पनांचा उलगडा करताना पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले सजीव-निर्जीव जग असल्याचे सांगितले. शहर, ग्रामीण भाग, जंगल आणि किल्ल्यांचे पर्यावरण वेगवेगळे असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आढळणारी जैवविविधता, भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आणि स्थानिक परिसंस्थांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. राजगड परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ ‘डे गेको’ प्रजातीचा उल्लेख करत त्यांनी ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वारसा यांचे अतूट नाते अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात सागर धारिया यांनी पर्यावरणीय बदलांची चिंताजनक आकडेवारी मांडली. १९५० च्या दशकात १० ते १२ मीटर खोलीवर उपलब्ध असलेले भूजल अनेक ठिकाणी ५० ते ३५० मीटरपर्यंत खाली गेल्याचे त्यांनी सांगितले. वनक्षेत्र वाढल्याचे दिसत असले तरी नैसर्गिक जैवविविधतेच्या परिसंस्था कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच देशातील ४० टक्क्यांहून अधिक पाणथळ क्षेत्रे नष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पावसाचे प्रमाण जवळपास समान असले तरी पावसाचे दिवस मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने कमी कालावधीत अतिवृष्टी होत असून त्याचा पर्यावरण आणि शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे धारिया यांनी सांगितले. वाढते शहरीकरण, प्लास्टिक कचरा आणि बदलती जीवनशैली ही भविष्यातील मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात पर्यावरणपूरक तीन सकारात्मक सवयी अंगीकारून बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात अमित वाडेकर यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेत आणि ऐतिहासिक वारशात पर्यावरण संवर्धनाची समृद्ध परंपरा असल्याचे सांगितले. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी यांच्या विचारांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांपर्यंत तसेच अहिल्याबाई होळकर आणि पेशवेकालीन जलव्यवस्थापनापर्यंत अनेक उदाहरणांतून पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास पर्यावरणप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. इतिहास आणि पर्यावरण यांचा परस्परसंबंध उलगडून सांगणाऱ्या या व्याख्यानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे, विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड

पुणे दि. २३: प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल (PSP) वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांद्वारे कळविले आहे.

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४ (१) (व) व १४ (३) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आलो असल्याचे प्रेस रजिस्टार जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाइन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन
पुणे/लोणी काळभोर २३ जून ः रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर, भूल किंवा छाती न उघडता रुग्णाच्या ह्दयाच्या झडपेचे कार्य ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) प्रक्रियाने पूर्ववत करून ७५ वर्षीय रुग्णाला नव जीवनदान देण्याचे कार्य लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. विशेष म्हणजे सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि वैद्यकीय टीमशी संवाद ही साधत होता. अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलचे ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुजीथ कुमार आणि ऑपरेशन्स एचओडी डॉ. संतोष साहू उपस्थित होते.
डॉ. सूरज इंगोले यांनी सांगितले की, संबंधित रुग्ण ७५ वर्षीय पुरूष असून त्यांचा ह्दयविकाराचा वैद्यकीय इतिहास गुंतागुंतीचा होता. १५ वर्षापूर्वी त्यांची कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ वर्षापूर्वी ह्दयविकाराचा झटका आल्यावर एन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस ह्दयाची मुख्य झडप अरुंद होत असल्याचे निदान झाले. त्यांना अधूनधून चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होता. वाढते वय आणि यापूर्वी झालेल्या दोन ह्दयविकराच्या प्रक्रिया पाहता पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियाद्वारे झडप बदलणे अत्यंत जोखमीचे होते. यामुळे विश्वराज हॉस्प्टिलच्या ह्दयरोग तज्ज्ञांच्या टीमने रुग्णासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून (टीएव्हीआर) जी एक (मिनिमली इनव्हेसिव्ह) कमीतकमी छेद घेणारी आणि शस्त्रक्रिया विरहित पद्धतीचा उपयोग करण्याचे ठरविले.
या प्रक्रियेमध्ये मांडीतील रक्तवाहिनीत सुईद्वारे एक छोटे छिद्र करुन ह्दयापर्यंत पोहोचले जाते. एका वायरच्या साहाय्याने कॅथेटरद्वारे नवीन झडप व्हॉल्व्ह नेली जाते आणि ती थेट खराब झालेल्या झडपेच्या जागी अचूकपणे बसवितात. या प्रक्रियेमध्ये छातीवर कोणताही चीरा किंवा छाती उघडण्याची गरज भासत नाही. ही एक कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियाविरहित प्रक्रिया आहे. रूग्णाची छाती न उघडता ह्दयातील व्हॉल्व्ह बदलला जातो.
टीएव्हीआर हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील एक मोठे यश आहे. ज्यांना पारंपरिक शस्त्रक्रियेचा जास्त धोका असतो त्यांच्या साठी ही प्रक्रिया वापरली जाते. यामध्ये एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असलेल्या रुग्णांसाठी नवीन शक्यता निर्माण केल्या आहेत. ही कमी जोखमीची प्रक्रिया असून रुग्ण त्यांच्या बरे होण्याच्या गतीनुसार ४८ तासांत किंवा तीन ते पाच दिवसांत घरी परत येऊ शकतात.
डॉ. सुजीथ कुमार यांनी सांगितले की, रुग्णाला प्रक्रियेच्या आदल्या दिवशी दाखल करण्यात आले होते. प्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी त्यांना चालण्यास सांगण्यात आले आणि चौथ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पारंपारिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या जलद बरे होण्याच्या कालावधीची कल्पनाही करता येत नाही. यात कोणतीही शस्त्रक्रियेची जखम राहत नाही. तसेच बरे होण्यासाठी दीर्घकाळ लागणारी प्रक्रियाही करावी लागली नाही. एका महिन्यानंतरच्या तपासणीत रुग्ण उत्तम स्थितीत असून त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
रुग्णाने सांगितले की, आम्ही घाबरुन शोध सुरू केला आणि त्यानंतर विश्वराज हॉस्पिटल मधील डॉ. इंगोले यांना भेटलो. ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले की टीएव्हीआर माझ्यासाठी सुरक्षित असेल. ते पुढे म्हणाले,  रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर सौहार्दपूर्ण होते.
विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात हे हॉस्पिटल सातत्याने रुग्ण सेवा करीत आहेत. हे हॉस्पिटल ३००हून अधिक बेड चे सुपर स्पेशालिटी टर्शियरी केअर रुग्णालय आहे. हे आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करुन ह्दयरोगशास्त्र, ह्दय शस्त्रक्रियासाठी आणि इतर वैद्यकीय शाखांमध्ये प्रगत सेवा प्रदान करते.
ही प्रक्रिया ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पाडली. भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड आणि डॉ. दीपक कवडे, सहाय्यक डॉ. विष्णू आणि डॉ. अनघा, तंत्रज्ञ मनोज आणि कल्याण तसेच स्टाफ नर्स अमित आणि मीना यांनी सहकार्य केले.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २३ : केंद्र शासनामार्फत स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येत असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी सहाय्य योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या लाभासाठी प्रकल्प खर्चाच्या १० टक्के स्वहिस्स्याचा भरणा केल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर, उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एंड सबसिडी (मार्जिन मनी) स्वरुपात राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

एकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्न

पुणे दि. २३:विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करत असून, त्याअनुषंगाने “एकल महिला दिवस” निमित्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक), जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अंकिताताई पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) आनंद खंडागळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी दत्तात्रय कुटे तसेच एकल महिला, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी रोजगाराच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा, नवीन योजनांची गरज, कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा तसेच महिलांची सुरक्षा व सहभाग वाढविण्याबाबत सूचना व अभिप्राय नोंदविण्यात आले. प्राप्त सूचना व अभिप्रायांचा समावेश करून एकल महिला धोरणाचा मसुदा शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा-भगवत प्रसाद मकवाना

पुणे, दि. २३ : सफाई कामगारांच्या समाजाच्या कल्याणाकरिता जिल्हा प्रशासनाने सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, सफाई कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, सफाई कामगार क्षेत्रात कार्यरत अधिकृत संघटनांना सोबत घेवून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय निगरानी समिती सदस्य तथा उत्तराखंड राज्याच्या सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री) भगवत प्रसाद मकवाना यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे हाताने मैला उचलाणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे याबाबतचे अधिनियम २०१३ ची अमंलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्याचे निराकरण करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. मकवाना म्हणाले, सफाई कामगारांचे कामकाज, वेतन, सेवा अटी आणि कल्याणाकरिता ‘लाड-पागे’ समिती स्थापन करण्यात आलेली असून सफाई कामगारांच्या जीवनमान सुधारण्यासाठी या समितीने महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. समितीच्या शिफारशीची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन वारसा हक्काने भरावयाच्या पदांबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. सफाई कामगाराच्या कल्याणाकरिता घरकूल, आरोग्य, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, पदोन्नती आदी विषयांशी निगडित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावाणी करावी. पुणे महानगरपालिकेने ‘वाल्मिकी भवन’ उभारण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी.

ते पुढे म्हणाले, नगर विकास विभागाचे २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना लागू करण्यात आली असल्याने या आदेशाच्या दिनांकानंतर सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे असे सफाई कामगार आणि २२ ऑक्टोबर २००८ नंतर सेवेत असलेले जे सफाई कामगार मृत्यू झाले आहेत अशा मृत सफाई कामगारांच्या पात्र वारसांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावी.

‘शेवटच्या व्यक्तीचा विकास’ हे केंद्र व राज्यशासनाचे उद्दिष्ट असून यादृष्टीने सफाई कामगाराच्या कल्याणाकरिता विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विविध लोककल्याणकारी योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवांचा लाभ कॅशलेस सुविधांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांशी निगडित प्रलंबित मार्गी लावून तसा अहवाल आयोगाकडे सादर करावा, अशा सूचना श्री. मकवाना यांनी दिल्या.

श्रीमती कदम म्हणाल्या, या बैठकीत समितीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल आयोगाकडे सादर करावा, असेही श्रीमती कदम म्हणाल्या.

या बैठकीत विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने केलेल्या कार्यवाहीबाबत बैठकीत माहिती दिली.

यंदा इंटिरिओ बाय गोदरेजची 4,000 कोटींच्या महसुलाची नोंद

नवीन 100शहरांमध्ये विस्तार आणि ऑनलाइन व्यवसायातील दमदार वाढ यामुळे आर्थिक वर्ष 2026 मधील कामगिरीला चालना ~

~ आउटडोअर फर्निचर श्रेणीत पदार्पण करत ट्युब्युलर रेंज सादर केली; तसेच गेमिंग फर्निचरचा समावेश करत उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार ~

मुंबई, 23 जून 2026: गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा अग्रगण्य फर्निचर ब्रँड असलेल्या इंटिरिओ बाय गोदरेजने आर्थिक वर्ष 2026 मध्ये 4,000 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे; आर्थिक वर्ष 2025च्या तुलनेत ही वाढ 12% इतकी आहे. या वर्षात कंपनीने 100 नवीन शहरांमध्ये आपला विस्तार केला, तर एकूण व्यवसायात नवीन उत्पादनांच्या विक्रीचा (NPI) वाटा 22% एवढा होता.

किरकोळ विक्रीतील वाढ, बाजारपेठेची सखोल जाण, ऑनलाइन विक्रीतील वाढ आणि फर्निचरच्या नवीन श्रेणींची सुरुवात याच्या जोरावर, आर्थिक वर्ष 2027 मध्ये महसुलात 25% वाढ करण्याचे इंटिरिओ बाय गोदरेजचे नियोजन आहे. तसेच, उत्तर आणि पूर्व भारतात आपली उपस्थिती अधिक बळकट करण्यावर भर देत, आर्थिक वर्ष 2027मध्ये कंपनी 102 नवीन स्टोअर्स सुरू करण्याची योजना आखते आहे.

भविष्यातील कामगिरी आणि दृष्टिकोनाबद्दल इंटेरिओ बाय गोदरेजचे बिझनेस हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, स्वप्नील नगरकर म्हणाले, “भारतीय फर्निचर उद्योग उत्क्रांतीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करतो आहे, जिथे ग्राहकांच्या अपेक्षा या केवळ कार्यक्षमतेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या पलीकडे जाऊन डिझाइन, लवचिकता, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि एकूणच सुखद अनुभवाशी संबंधित आहेत. 2031 पर्यंत भारतीय फर्निचर बाजारपेठ 45.52 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.[1] आजची आधुनिक भारतीय घरे अधिक जुळवून घेणारी, बहुकार्यक्षम आणि वैयक्तिक जीवनशैली सांगणारी आहेत. परिणामी, ग्राहक लूक, उपयोगिता, टिकाऊपणा आणि सोय या आधारावर फर्निचरचे मूल्यांकन करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “गुणवत्ता आणि अनुपालन मानकांमधील बदलांमुळे हे क्षेत्र अधिकाधिक वैविध्यपूर्ण आणि औपचारिक होत आहे; यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होत असून संघटित ब्रँड्ससाठी दीर्घकालीन संधी निर्माण होत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, या उद्योगातील वाढीचा पुढील टप्पा अशा ब्रँड्सद्वारे साधला जाईल जे मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता, रचना, उत्पादन क्षमता, तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्तम फिजिकल रिटेल अनुभव यांचा प्रभावी मेळ घालू शकतील. घरांच्या रचनेत होत असलेल्या बदलांमुळे, ग्राहक आता बाल्कनी, टेरेस आणि मोकळ्या जागांकडे आपल्या राहत्या जागेचाच एक विस्तार म्हणून पाहात आहेत. याच दृष्टिकोनातून आम्ही ट्युब्युलर रेंजसह आउटडोअर फर्निचर श्रेणी आणि गेमिंग फर्निचर पोर्टफोलिओ विकसित केले आहेत; हे फर्निचर उपाय अत्यंत उपयुक्त, आधुनिक आणि आजच्या भारतीय जीवनशैलीशी सुसंगत आहेत.”

गेल्या तीन वर्षात इंटिरिओ बाय गोदरेजच्या ई-कॉमर्स व्यवसायात 14 पटीने वाढ झाली असून, आता कंपनीच्या एकूण फर्निचर व्यवसायात त्याचा वाटा 15% एवढा आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये, कंपनीने आपले डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशनचे जाळे देशभरातील 1,200 पिन कोड्सवरून 20,000 हून अधिक पिन कोड्सपर्यंत नेले आणि सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये 24-तास डिलिव्हरी तसेच इन्स्टॉलेशन सेवा सुरू केली.

आपल्या नवीन उत्पादन नवोपक्रम धोरणाचा एक भाग म्हणून, इंटेरिओ बाय गोदरेजने आपल्या नवीन ट्युब्युलर रेंजच्या सादरीकरणासह आउटडोअर फर्निचर श्रेणीत प्रवेश केला आहे, तसेच गेमिंग फर्निचरच्या विशेष श्रेणीसह आपल्या पोर्टफोलिओचा विस्तारही केला आहे. आधुनिक भारतीय घरांचा विस्तार म्हणून बाल्कनी, टेरेस आणि घराबाहेरील जागांना मिळणाऱ्या पसंतीला प्रतिसाद देण्यासाठी ट्युब्युलर रेंजची रचना करण्यात आली आहे. ट्युब्युलर स्टीलच्या अनोख्या रचनांपासून प्रेरित होत, या संग्रहामध्ये हलक्या वजनाचे ॲल्युमिनियम रचना, हवामान-प्रतिरोधक साहित्य आणि एर्गोनॉमिक डिझाइन यांचा मिलाफ साधला आहे, जेणेकरून घराबाहेरील जीवनासाठी टिकाऊ, कार्यक्षम आणि सौंदर्यदृष्ट्या योग्य असे फर्निचर तयार होईल. ही श्रेणी अशा ग्राहकांसाठी आहे जे पाहुणचार, घराबाहेरील जागेचा योग्य वापर, बहुउद्देशीय वापर आणि समकालीन डिझाइनच्या अनुकूल फर्निचर पर्याय शोधत आहेत.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये इंटरिओ बाय गोदरेजने पुरवठा साखळीमध्ये बदल, तंत्रज्ञान अद्ययावतीकरण आणि डिजिटल-फर्स्ट ग्राहक प्रतिबद्धता उपक्रमांद्वारे आपल्या ओम्नीचॅनल क्षमता अधिक मजबूत केल्या. यामध्ये रीब्रँडिंग उपक्रमांतर्गत टेक्नॉलॉजी स्टॅकचा संपूर्ण कायापालट, रिफ्रेश्ड UI आणि UX, तसेच ब्राउझिंगची सवय, ग्राहक संवाद, विक्री पद्धती आणि ऑफर्सच्या आधारावर अनुरूप फर्निचरच्या सूचना देणाऱ्या AI-आधारित उत्पादन शिफारस प्रणाली आदींचा समावेश होता.

12 महिन्यांपर्यंतच्या झीरो कॉस्ट EMI पर्यायांद्वारे, इंटरिओने जुन्या फर्निचरसाठी एक्सचेंज प्रोग्राम्स, विस्तारित वॉरंटी ऑफर्स, केवळ ऑनलाइन उपलब्ध उत्पादन श्रेणी आणि प्रमुख बँकिंग भागीदारांमार्फत विशेष ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी परवडणाऱ्या योजनांचा विस्तार केला. किमतीबाबत संवेदनशील असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी, इंटरिओ बाय गोदरेज टियर 2 आणि टियर 3 ग्राहकांना लक्ष्य करून आपल्या इको उत्पादनांचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत आहे.

श्रीमंताघरच्या प्रेमकहाणीचा उन्माद ..लग्नापूर्वीच होणाऱ्या पतीचा केला लोहगडावर घात

तरुणीने प्रियकरासोबत मिळून भावी पतीला 400 फूट खोल दरीत ढकलले; नोव्हेंबरमध्ये होते लग्न
पुणे- ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.

केतन अग्रवाल १८ जून रोजी आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत ट्रेकिंगला गेले होते. नंतर त्यांचा मृतदेह दरीतून सापडला होता. पोलिसांनुसार, सिया आणि तिच्या प्रियकराने पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलले होते. नंतर याला अपघात भासवण्याचा प्रयत्न केला.

२६ वर्षीय केतन पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील रहिवासी होते आणि कुटुंबाच्या रिअल इस्टेट कंपनीत संचालक होते. तर सिया पुण्यातील एका मसाला व्यापाऱ्याची मुलगी आहे. या दोघांचे या वर्षी राजस्थानमधील उदयपूर येथील एका पॅलेसमध्ये लग्न होणार होते.

दरम्यान, राजा रघुवंशी यांच्या हत्येचा आरोप त्यांची पत्नी सोनम रघुवंशीवर आहे. सोनमने देखील आपल्या प्रियकरासोबत मिळून पती राजा रघुवंशीला शिलाँगमध्ये एका दरील ढकलून हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी तिला अटक करून तुरुंगात पाठवले होते. सध्या सोनम जामीनावर बाहेर आहे.
पत्नीचा प्री-बर्थडे साजरा करण्यासाठी केतन गेला होता

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन १८ जून रोजी सकाळी आपल्या मंगेतरसोबत तिचा प्री-बर्थडे साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेले होते. सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ते दरीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने शोधमोहीम राबवून त्याच दिवशी केतन यांचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावर जोरदार वाऱ्यामुळे फोटो काढताना केतन यांचा तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, मंगेतर सियानेही पोलिसांना दिलेल्या जबाबात केतन यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळल्याचे म्हटले होते. तिच्या या जबाबाच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली होती.
मात्र, मृत्यूभोवतीच्या परिस्थिती संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला.
शाही लग्नासाठी उदयपूरमध्ये पॅलेस, 2 चार्टर्ड विमाने बुक केली होती

मात्र, मृत्युच्या परिस्थिती संशयास्पद वाटत होत्या. तपासात असे समोर आले की, केतन आणि सियाचे लग्न याच वर्षी नोव्हेंबरमध्ये शाही पद्धतीने होणार होते. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची तयारीही सुरू झाली होती.

दोघांच्या लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर येथे एक पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड खाजगी विमानांची व्यवस्थाही करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नावर सुमारे १७ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज होता.

सियाला लग्न करायचे नव्हते, प्रियकरासोबत आखली योजना

पोलिसांच्या माहितीनुसार, तपासात असे समोर आले की, सिया गोयलचे पुण्यातील कोंढवा येथील रहिवासी चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते आणि तिला वाटत होते की केतन तिच्या आणि चेतनच्या नात्यात अडथळा बनला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार, सिया केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. नंतर चेतनलाही तिथे बोलावण्यात आले. यानंतर दोघांनी केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले.
चेतनच्या चौकशीनंतर सियाला अटक

संशयाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने चेतनला ताब्यात घेतले. चेतनच्या चौकशीनंतर सिया गोयललाही अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मंगळवारी हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत आरोपी चेतन बाबूलाल चौधरी (रा. पार्श्वनगर, कोंढवा बु.) आणि सिया प्रवीण गोयल (रा. लिलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, बिबवेवाडी) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सावंत, मनोज पवार आणि पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली
पोलिस आता घटनेची संपूर्ण साखळी जोडण्यात, न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्यात आणि कटात आणखी कोणी सामील होते का? याचा शोध घेत आहेत.

कुदळवाडी येथील आगीवर अग्निशमन विभागाचे यशस्वी नियंत्रण!

पुणे-चिखली येथील कुदळवाडी परिसरात पहाटे लागलेल्या आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. १० अग्निशमन वाहने आणि ५० ते ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले .विशेष म्हणजे, आग व धुराचा परिणाम निवासी भागावर होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अण्णा हजारेंचा ५ जुलै पासून यादव बाबा मंदिर राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा..माहिती अधिकार कायद्यातील बदल रद्द करा

पुणे- माहितीचा अधिकार या कायद्यातील १२ जून २०२६च्या बेकायदेशीर दुरुस्त्या, तरतुदी त्वरित रद्द करा अन्यथा आपण येत्या ५ जुलै पासून यादव बाबा मंदिर राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरु करू असा स्पष्ट इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे .

नेमके काय म्हटले आहे अण्णा हजारे यांनी CM फडणवीस यांना दिलेल्या पत्रात वाचा पत्र जसेच्या तसे …

मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब

मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य

विषय:- मूळ कायदा माहितीचा अधिकार या कायद्यातील १२ जून २०२६च्या बेकायदेशीर दुरुस्त्या, तरतुदी त्वरित रद्द कराव्यात अन्यथा मी दिनांक ५ जुलै २०२६ पासून यादव बाबा मंदिर राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार असल्याबाबत…….

 महोदय,

               मी माझे संपूर्ण जीवन समाजाच्या राष्ट्राच्या सेवेसाठी अर्पण केलेले आहे. मुळात पारदर्शकता येण्यासाठी मी माहितीचा अधिकार कायद्यासाठी महाराष्ट्रात पूर्वी १९९८, २००१, २००४, २००६ साली वेळोवेळी  जनजागृती दौरे महाराष्ट्रभर केलेले आहेत. तसेच २००३ मध्ये माहितीचा अधिकारासाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केले होते त्यानंतर २००४ मध्ये राळेगणसिद्धी येथे माहितीच्या अधिकारासाठी उपोषण केलेले होते. तसेच २००६ मध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार फाईल नोटीग काढणे तसेच इतर तरतुदींबाबतही मी आळंदी येथे उपोषण केलेले होते. तेव्हा तत्कालीन केंद्रीय पंतप्रधान कार्यालय मंत्री (PMO) श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लेखी आश्वासना नंतर  उपोषण आळंदी येथे सोडले होते. २० वर्षानंतर आता १२ जून २०२६ मध्ये माहिती अधिकारातील ज्या तरतुदी केलेल्या आहेत.     मात्र महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ हे या कायद्याची धार बोथट करणारे, नागरिकांना माहितीपासून दूर ठेवणारे आणि माहितीच्या अधिकाराच्या मूळ तत्त्वांनाच कमकुवत करणारे असल्याचे दिसून येते.

१. शुल्कवाढ : शुल्कवाढीचे कोणतेही तर्कसंगत कारण दिलेले नाही. माहितीचा अधिकार हा महसूल मिळविण्याचा  कायदा नसून नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्याचा कायदा आहे. नियमांमध्ये माहिती मिळविण्याचे शुल्क वाढविण्यात आले आहे; परंतु ही वाढ का आवश्यक आहे याचा कोणताही अभ्यास, आर्थिक विश्लेषण किंवा कारणमीमांसा शासनाने सार्वजनिक केलेली नाही. जर शासनाला वाटत असेल की २० वर्षांनंतर शुल्क वाढविणे आवश्यक आहे, तर त्याच प्रमाणात माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील दंडाची रक्कमही वाढविणे आवश्यक होते. दंडाची रक्कम न वाढवता केवळ नागरिकांवरील आर्थिक भार वाढविणे हे एकतर्फी व अन्यायकारक आहे.

२. माहिती मागणे खर्चिक बनविण्याचा प्रयत्न : एका अर्जासाठी शुल्क, प्रतींसाठी वाढीव शुल्क, अपील शुल्क आणि इतर आर्थिक अटी यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी माहिती मिळविणे अधिक खर्चिक होणार आहे. विविध शुल्क वाढ करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवणे होय. माहिती लपविणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याऐवजी माहिती मागणाऱ्या नागरिकांवर आर्थिक व प्रशासकीय निर्बंध लादणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.

३. ओळखपत्र जोडण्याची सक्ती  : ओळखपत्र जोडण्याची सक्ती ही कायद्याच्या विरोधात आहे. माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ६(२) नुसार अर्जदाराने माहिती मागण्याचे कारण किंवा इतर वैयक्तिक तपशील देण्याची आवश्यकता नाही. ओळखपत्र जोडण्याची सक्ती केल्यास माहिती मागणाऱ्यांची गोपनीयता धोक्यात येईल.भ्रष्टाचार उघड करणाऱ्या नागरिकांवर दबाव येऊ शकतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. कायद्याने दिलेले अनामिकतेचे संरक्षण कमकुवत होईल.

४. एक विषय – एक अर्ज  : एक विषय – एक अर्ज ही अट अनावश्यक आणि त्रासदायक असून या दुरुस्ती मागचा हेतू शंका निर्माण करणारा आहे.प्रशासकीय निर्णय अनेकदा परस्पर संबंधित असतात.एका विषयासाठी अनेक अर्ज करावे लागणे म्हणजे अधिक शुल्क, अधिक वेळ आणि अधिक त्रास.यामुळे माहिती मिळविण्याचा अधिकार सुलभ न राहता क्लिष्ट होणार आहे.

५. पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद : पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद ही पारदर्शकतेला बाधा आणणारी आहे.  अनेक वेळा अर्जदारांना पूर्ण माहिती मिळत नाही, अपूर्ण माहिती दिली जाते, चुकीची माहिती दिली जाते किंवा माहितीचा काही भाग जाणीवपूर्वक लपविला जातो. अशा परिस्थितीत अर्जदाराला त्याच विषयासंदर्भात पुन्हा माहिती मागविण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. केवळ “पूर्वी माहिती मागितली होती” किंवा “पूर्वी माहिती दिली होती” या कारणावरून नवीन अर्ज निकाली काढणे म्हणजे प्रशासनाने दिलेली माहिती अंतिम आणि अचूक आहे असे गृहीत धरणे होय. ही भूमिका माहितीच्या अधिकाराच्या तत्त्वांशी विसंगत आहे.

याशिवाय अनेक वेळा नवीन घडामोडी, नवीन कागदपत्रे, नवीन आदेश किंवा बदललेली परिस्थिती यामुळे त्याच विषयावर पुन्हा माहिती मागविण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी पुनरावृत्ती अर्ज म्हणून अर्ज फेटाळणे अन्यायकारक ठरेल. विशेष म्हणजे एखाद्या अर्जाला “पुनरावृत्ती” म्हणायचे की नाही याबाबत स्पष्ट निकष नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात स्वविवेकाधिकार मिळेल. त्यामुळे अनेक वैध अर्जही पुनरावृत्ती असल्याचे कारण देऊन नाकारले जाण्याची शक्यता आहे.

ही तरतूद भविष्यात भ्रष्टाचार, गैरव्यवहार किंवा माहिती लपविण्याच्या प्रकरणांमध्ये ढाल म्हणून वापरली जाण्याचा धोका आहे. एखाद्या अधिकाऱ्याने एकदा अपूर्ण माहिती दिली की नंतर त्याच विषयावरील पुढील अर्ज “पुनरावृत्ती” म्हणून नाकारता येऊ शकतील. परिणामी सत्य माहिती मिळविण्याचे नागरिकांचे साधन कमकुवत होईल. एकदा अपूर्ण माहिती देऊन कायमस्वरूपी पडदा टाकण्याचा अधिकार कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाला असू शकत नाही. माहितीची सत्यता, पूर्णता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी नागरिकाला आवश्यकतेनुसार त्याच विषयावर पुन्हा माहिती मागण्याचा अधिकार असलाच पाहिजे

६. माहिती मागविण्याचे प्रयोजन (कारण) विचारणे अथवा त्याची सक्ती : माहिती मागविण्याचे प्रयोजन (कारण) विचारणे अथवा त्याची सक्ती करणे हे माहितीचा अधिकार कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६(२) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की माहिती मागणाऱ्या व्यक्तीने माहिती का मागितली आहे याचे कारण देण्याची आवश्यकता नाही.  माहिती मागविण्याचे प्रयोजन विचारण्यास किंवा अप्रत्यक्षपणे ते उघड करण्यास भाग पाडल्यास अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक वेळा नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा व्हिसलब्लोअर हे स्वतःची ओळख आणि उद्देश उघड न करता माहिती मागवतात. कारण त्यांना प्रतिशोध, धमक्या किंवा छळाची भीती असते.

प्रथम तर हे लक्षात घेतले पाहिजे की भ्रष्टाचार, गैरव्यवहार, बेकायदेशीर कृत्ये किंवा प्रशासनातील त्रुटी उघड करणाऱ्या नागरिकांवर दबाव आणण्याची शक्यता वाढेल. दुसरे म्हणजे, माहिती मागविण्याचे कारण विचारले जाऊ लागल्यास अधिकारी अर्जदाराच्या हेतूची चौकशी करू लागतील. परिणामी “कारण योग्य आहे का?” हा नवीन वाद निर्माण होईल. त्यामुळे माहिती देण्याची प्रक्रिया अधिक व्यक्तिनिष्ठ, मनमानी आणि विवादग्रस्त होण्याचा धोका निर्माण होईल.तिसरे म्हणजे, नागरिकांना माहिती मागण्यासाठी शासनापुढे स्पष्टीकरण द्यावे लागणे हे लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या तत्त्वालाच विरोधी आहे. लोकशाहीत नागरिक हे मालक आणि शासन हे लोकसेवक असतात. त्यामुळे नागरिकाने शासनाला माहिती का मागितली याचा जाब देण्याऐवजी शासनाने माहिती का दिली नाही याचा जाब द्यायला हवा. शासनाच्या माहितीवर नागरिकाचा हक्क आहे, परवानगी नाही. चौथे म्हणजे, अशा प्रकारची अट माहितीचा अधिकार वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करू शकते. परिणामी अनेक नागरिक माहिती मागविण्यापासून परावृत्त होतील. त्यामुळे पारदर्शकता वाढण्याऐवजी गोपनीयता आणि अपारदर्शकतेला प्रोत्साहन मिळेल.यामुळे माहिती मागविण्याचे प्रयोजन विचारणे, त्याची सक्ती करणे किंवा कोणत्याही प्रकारे अर्जदाराला त्याचा हेतू उघड करण्यास भाग पाडणे हे माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६(२) च्या स्पष्ट शब्दांना, उद्देशाला आणि आत्म्यालाच बाधा आणणारे आहे.

७. सुनावणीला गैरहजर राहिल्यास अपील फेटाळणे:  नियम २१(३) अन्वये जर अर्जदार किंवा तक्रारदार सुनावणीला वारंवार वैयक्तिक किंवा ऑनलाइन उपस्थित राहू शकला नाही, तर आयोग त्याचे अपील किंवा तक्रार थेट फेटाळू शकतो, ही तरतूद योग्य नाही.अनेकदा माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिकांना सुनावणीच्या तारखांची माहिती उशिरा मिळते किंवा कामाच्या व्यापामुळे ते उपस्थित राहू शकत नाहीत. वास्तविक पाहता प्रकरणाच्या उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून त्याचा गुणदोषावर आधारित निकाल सहज देता येऊ शकतो. अशा वेळी केवळ अनुपस्थितीचे कारण पुढे करून जन माहिती अधिकाऱ्याचा दोष बाजूला ठेवून अपील थेट फेटाळणे (Dismissed for non-prosecution) हे दोषी माहिती अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडणारे ठरू शकते.

८. अर्जदाराच्या मृत्यूनंतर केस बंद होणे (नियम २३): तरतूद: नियम २३(२) नुसार, द्वितीय अपीलाची सुनावणी प्रलंबित असताना जर अर्जदाराचा मृत्यू झाला, तर ती कायदेशीर कारवाई अर्जदाराच्या मृत्यूनंतर रद्द (Abate / Close) होईल. या नियमामुळे माहिती मिळण्याची प्रक्रियाच कायमची बंद होईल. कोर्टात सुद्धा वाद चालू असेल व पक्षकारांचे निधन झाले तर त्यांच्या वारसांना केस चालवण्याचा अधिकार सतो तर या प्रकरणांमध्ये तसेच अधिकार असणे आवश्यक आहे.

९) नियम 20(3) नुसार अपीलकर्ता किंवा तक्रारदार आपल्या मदतीसाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकतो परंतु वकिलांची मदत घेवू शकत नाही : माहिती आयोग न्यायालय नसला तरी तो अर्ध-न्यायिक (Quasi-Judicial) संस्था आहे. अनेक नागरिकांना कायद्याची माहिती नसते, आयोगाची प्रक्रिया समजत नाही, आपली बाजू मांडणे जमत नाही. अनेकदा गुंतागुंतीचे कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात अशा वेळी नागरिकाला वकीलाची मदत घेण्याचा पर्याय बंद करणे हे नागरिकांच्या न्यायप्राप्तीच्या अधिकारावर परिणाम करणारे आहे. शासनाकडे कायदा अधिकारी, विभागीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असते, परंतु सामान्य नागरिकाला वकीलाची मदत घेण्यास बंदी घालणे, कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार नाकारणे अन्यायकारक  न्यायप्राप्तीच्या तत्त्वांशी विसंगत आहे. शासनाकडे कायदेशीर व प्रशासकीय साधने उपलब्ध असताना सामान्य नागरिकाच्या कायदेशीर सहाय्याच्या अधिकारावर निर्बंध आणणे हे असमानतेचे वातावरण निर्माण करणारे आहे.”

१०.  माहिती आयोगांची कार्यक्षमता :  महाराष्ट्रात अपीलांचा प्रचंड प्रलंबित भार असताना प्रथम प्राधान्य रिक्त पदे भरणे,सुनावण्यांची गती वाढविणे, कालमर्यादेत निर्णय देणे,अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रभावी करणे,प्रलंबित अपिलांचा निपटारा कालमर्यादेत करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, माहिती आयोगांची कार्यक्षमता वाढविण्याऐवजी अर्जदारांवरच नवीन निर्बंध लादले जात आहेत.

११. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ४: या नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्या कामकाजासंबंधीची महत्त्वाची माहिती नियमितपणे व स्वतःहून सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. या मागे मूळ हेतूच असा आहे की नागरिकांना अर्ज करण्याची वेळ येऊ नये आणि शासनाने स्वतःहून माहिती सार्वजनिक करावी परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आजही कलम ४ अंतर्गत आवश्यक असलेली माहिती त्यांच्या संकेतस्थळांवर पूर्णपणे उपलब्ध करून दिलेली नाही. अनेक संकेतस्थळे अद्ययावत नसतात, अनेक दुवे कार्यरत नसतात आणि आवश्यक माहिती वर्षानुवर्षे अपलोड केलेली नसते.म्हणूनच नागरिकांना नाईलाजास्तव माहितीचा अधिकार कायद्याचा आधार घ्यावा लागतो.

जर शासनाला माहिती अधिकार अर्जांची संख्या कमी करायची असेल तर सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर माहिती नियमित अद्ययावत करून त्या खात्याचे किंवा विभागाचे अर्थसंकल्प, खर्च, निविदा, आदेश, मंजुरी, लाभार्थी यादी, चौकशी अहवाल आणि इतर महत्त्वाची माहिती स्वतःहून प्रकाशित करावीत.

     परंतु या मूलभूत त्रुटी दूर करण्याऐवजी नागरिकांवर अधिक शुल्क, अतिरिक्त कागदपत्रे आणि नवीन निर्बंध लादले जात आहेत. ही भूमिका माहितीचा अधिकार कायद्याच्या उद्देशाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये माहितीचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक आर्थिक व प्रशासकीय अडथळे निर्माण करणे हे घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आहे.

    एकेकाळी 2002 मध्ये महाराष्ट्राने आदर्श माहितीचा अधिकार कायदा केला व देशाला दिशा दिली व आज या प्रकारच्या अन्यायकारक दुरुस्त्या लागू झाल्या रइतर राज्यांमध्येही त्याचे अनुकरण होण्याची भीती आहे.यामुळे देशभरातील माहिती अधिकार चळवळीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.महाराष्ट्र शासनाला नियम बनविण्याचा अधिकार असला तरी नियम हे मूळ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या चौकटीतच असले पाहिजेत. नियमांच्या माध्यमातून मूळ कायद्याने नागरिकांना दिलेले अधिकार कमी करता येत नाहीत. जर नियमांमुळे माहिती मिळविणे अधिक कठीण, खर्चिक किंवा निर्बंधित होत असेल, तर ते माहितीचा अधिकार अधिनियमाच्या उद्देशालाच बाधा आणणारे आहेत.

      शुल्क वाढविणे,ओळखपत्र सक्ती, अर्जांवर अतिरिक्त निर्बंध, पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याच्या तरतुदी,यामुळे माहिती मिळविणे अधिक अवघड होणार आहे.माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी ती अधिक तांत्रिक, कडक, कायदेशीर गुंतागुंतीची आणि प्रशासनाभिमुख बनवणाऱ्या आहेत. यामुळे पारदर्शकता कमी होऊन माहिती मिळवण्यात नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे.हा प्रकार माहितीचा अधिकार मजबूत करण्याचा नसून त्याची धार बोथट करण्याचा आहे.

       मूळ माहिती अधिकार कायद्याचा आत्मा असा आहे की, माहिती देणे हा नियम आहे आणि ती नाकारणे हा अपवाद. परंतु, या दुरुस्तीमुळे माहिती देणे अपवाद व नाकारणे हा नियम असे उलटे होईल व कायदाच मोडकळीस निघेल. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या अधिकारांवर परिणाम करणारे नियम तयार करताना व्यापक सार्वजनिक चर्चा, सूचना व हरकती मागविणे अपेक्षित असते.परंतु या नियमांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संस्था, विधिज्ञ किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्याशी कोणतीही व्यापक चर्चा झाल्याचे दिसत नाही.ज्या कायद्याचा लाभ जनतेला मिळतो, त्या कायद्याचे नियम जनतेला विश्वासात न घेता तयार करणे हे लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे.

       माहितीचा अधिकार कायद्याची मूळ भावना, पारदर्शकता आणि नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवावेत.माहितीचा अधिकार हा शासनाने दिलेला उपकार नसून नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार सुलभ करण्याऐवजी कठीण बनविण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल. माहितीचा अधिकार कायद्याचा उद्देश नागरिकांना माहितीपासून दूर ठेवणे नसून माहितीपर्यंत त्यांचा प्रभावी प्रवेश सुनिश्चित करणे हा आहे

       आपण प्रशासनात पारदर्शकतेसाठी खरोखर पारदर्शकता आणण्यासाठी कटिबद्ध असाल तर प्रत्येक विभाग ऑनलाईन करायला हवा होता. माहितीचा अधिकार कलम ४ चे १७ मुद्दे आज कोणत्याही कार्यालयामध्ये पाहायलाही मिळत नाहीत. आपण १२ जून २०२६ च्या तरतुदी बाबत जनतेच्या हरकती घेणे आवश्यक होते परंतु त्या का घेण्यात आल्या नाही हे समजले नाही. १२ जून २०२६ च्या तरतुदी त्वरित रद्द कराव्यात.अन्यथा मी जनतेच्या भल्यासाठी माझा प्राण गेला तरी मागे हटणार नाही. माझे उपोषण ५ जुलै २०२६ पासून यादव बाबा मंदिर राळेगणसिद्धी येथे सुरू करणार आहे याची नोंद घ्यावी. 

आपला

(कि.बा,तथा अण्णा हजारे )

टाटा म्युच्युअल फंडने लाँच केला मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफ

गुंतवणूकदारांना मिळणार बाजारातील वेगवेगळ्या उद्योगांमधील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचे फायदे

मुंबईटाटा एसेट मॅनेजमेंटने आज ‘टाटा मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफ’ सुरु केल्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड ‘फंड ऑफ फंड’ स्कीम आहे, जी वेगवेगळ्या उद्योगांच्या पॅसिव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करते. पॅसिव्ह सेक्टोरल फंड्स आणि ईटीएफमध्ये समजूतदारपणे बदल करून दीर्घकाळात गुंतवणूकदारांचा पैसा वाढवणे हा या स्कीमचा मुख्य उद्देश आहे.

नवीन फंड ऑफर २२ जून २०२६ रोजी खुली होईल आणि ६ जुलै २०२६ रोजी बंद होईल.

शेअर बाजाराने हे दाखवून दिले आहे कि बाजारात नेहमीच एकच उद्योग पहिल्या क्रमांकावर राहत नाही, तर त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि यावर देश-विदेशातील आर्थिक बदलांचा थेट परिणाम होतो. वेगवेगळ्या वेळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल्स, पीएसयू बँका, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्झम्पशन यांसारखे उद्योग मार्केट लीडर म्हणून समोर आले आहेत. बाजारातील हे बदल योग्य वेळी ओळखणे गुंतवणूकदारांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे.

टाटा मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांची हीच अडचण दूर करणे आहे. यासाठी फंड मॅनेजर्स त्यांच्या मूल्यांकनानुसार वेगवेगळे मार्ग अवलंबतात. यामध्ये ‘मोमेंटम-आधारित अलोकेशन फ्रेमवर्क’ सारख्या रणनीतींचा वापर केला जातो. या माध्यमातून ही योजना वेगवेगळ्या सेक्टर इंडेक्स फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. हे धोरण उद्योगांच्या अलीकडील कामगिरीची तपासणी करते. तसेच, ती बाजारातील चढ-उतारांनुसार परतावा ॲडजस्ट देखील करते. ज्या सेक्टर्समध्ये मजबूत आणि स्थिर कल दिसून येत आहे, त्यांना प्राधान्य देणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र, एखाद्या सेक्टरची भूतकाळातील तेजी ही भविष्यातील चांगल्या कामगिरीची हमी असू शकत नाही. पोर्टफोलिओमध्ये कोणत्या उद्योगाला किती वाटा मिळेल, हे काही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये त्या सेक्टरचे भविष्य, त्याच्या तेजीची वैशिष्ट्ये आणि देश-विदेशातील मोठ्या आर्थिक घडामोडी यांचा समावेश होतो. ज्या सेक्टर्समध्ये सर्वाधिक मजबूती आणि तेजी दिसते, त्यांना पोर्टफोलिओमध्ये जास्त वाटा दिला जातो.

या लाँच प्रसंगी टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणालेवेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे हे संपत्ती निर्माण करण्याचे एक अत्यंत शक्तिशाली माध्यम आहेपरंतुयामध्ये योग्य वेळी योग्य सेक्टर निवडणे खूप कठीण असतेभारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे सेक्टर्स काळाबरोबर बदलत राहतातया आर्थिक चक्रांचा पाठलाग करण्याच्या नादात गुंतवणूकदार अनेकदा भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेताततसेचवारंवार गुंतवणूक बदलल्यामुळे कराचा बोजाही वाढतो.टाटा मल्टीसेक्टर पॅसिव्ह एफओएफ गुंतवणूकदारांना एक शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित सिस्टीम प्रदान करतेही सिस्टीम केवळ अंदाजावर काम करण्याची सवय संपवतेहे कमी खर्चाच्या पॅसिव्ह टूल्सच्या माध्यमातून आपोआप सर्वात मजबूत सेक्टर्सकडे वळतेयासोबतचबाजारातील अचानक होणारे मोठे बदल किंवा महत्त्वाच्या घडामोडींचा फायदा घेण्यासाठी यामध्ये फंड मॅनेजरच्या अनुभवाचा आणि सूझबुझचा वापरही समाविष्ट आहे.वेगवेगळ्या सेक्टर्समधील गुंतवणूकवेळेवर पोर्टफोलिओचे संतुलन राखणे आणि आमच्या इन्व्हेस्टमेंट टीमची बारीक नजरया सर्वांच्या मदतीने गुंतवणूकदारांना बाजारातील बदलत्या ट्रेंड्समधून उत्तम नफा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.”

हा फंड त्याच्या ‘फंड ऑफ फंड’ स्ट्रक्चर आणि कमी खर्चाच्या पॅसिव्ह मॉडेलचा मेळ घालतो. स्वतःहून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक बदलताना गुंतवणूकदारांचा होणारा वेळेचा अपव्यय आणि भीती किंवा घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेण्याची सवय दूर करणे, हा या फंडचा उद्देश आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये 

  • इनबिल्ट डायव्हर्सिफिकेशनहा फंड अनेक वेगवेगळ्या सेक्टर इंडेक्स फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करून तुमचा जोखीम कमी करतो.
  • करामध्ये बचतफंडच्या आत होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदलांवर गुंतवणूकदारांना कोणताही कॅपिटल गेन्स टॅक्स (भांडवली नफा कर) द्यावा लागत नाही.
  • किमान गुंतवणूक रक्कमतुम्ही किमान ₹५,००० पासून गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर ₹१ च्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल.
  • लोड स्ट्रक्चरयामध्ये कोणताही एंट्री लोड लागणार नाही. युनिट्स मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत पैसे काढल्यास ०.५०% एक्झिट लोड लागेल. ३० दिवसांनंतर पैसे काढल्यास हा लोड पूर्णपणे शून्य असेल.
  • बेंचमार्क आणि जोखीमया फंडचा बेंचमार्क ‘Nifty 500 TRI’ हा आहे. या योजनेचा आणि बेंचमार्कचा रिस्कोमीटर ‘व्हेरी हाय’ (अत्यंत उच्च जोखीम) या वर्गात येतो.

द योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ (मुंबई) तर्फे देशव्यापी उपक्रमांसह 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मुंबई-जगातील सर्वात जुने संघटित योग केंद्र आणि गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ सर्वांगीण आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या मुंबईतील सांताक्रूझ येथील द योगा इन्स्टिट्यूट (TYI) ने 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) भव्य प्रमाणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यावर्षीच्या “निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण वार्धक्यासाठी योग” या संकल्पनेशी सुसंगत राहून संस्थेने जागतिक स्तरावर शासकीय संस्था, संरक्षण आस्थापना, कॉर्पोरेट कार्यालये, शैक्षणिक परिसर, विमानतळे तसेच डिजिटल माध्यमांद्वारे शेकडो कार्यक्रमांचे आयोजन करत लाखो लोकांना यात सहभागी करून घेतले.

मुंबईपासून चेन्नईपर्यंत आणि जयपूरपासून भुवनेश्वरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांनी विविध वयोगट आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये निरोगी वार्धक्याचा संदेश पोहोचवला. प्रतिबंधात्मक उपचार असलेली आरोग्यसेवा, लवचिकता आणि सजग जीवनशैली यामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणाल्या, “वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शारीरिक व मानसिक ऱ्हास होणे ही गोष्ट स्वाभाविक नाही. योगाच्या माध्यमातून आपण शरीराची ताकद, मनाची स्पष्टता, भावनांमधील संतुलन आणि अंतःकरणातील आनंद टिकवून ठेवू शकतो. निरोगी वार्धक्य म्हणजे केवळ आयुष्यात वर्षांची भर घालणे नव्हे; तर प्रत्येक वर्ष अधिक उत्साही, स्वावलंबी आणि उद्देशपूर्ण बनवणे आहे.”

10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक सर्टिफाईड योग शिक्षक घडवणारी आणि योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित झालेली द योगा इन्स्टिट्यूट आजही जगभरात अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षणाचा प्रसार करत असून व्यक्तींना अधिक निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत आहे.

योग दिनासाठीच्या कार्यक्रमाची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये

3 दिवसीय ऑनलाइन योग महोत्सव (19–21 जून): जगभरातील सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह आयोजित या महोत्सवामध्ये इस्कॉनचे स्वामी गौरांग दास जी, आहारतज्ज्ञ रायन फर्नांडो, सर्वांगीण आरोग्यतज्ज्ञ मिकी मेहता तसेच द योगा इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शिक्षक यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. ध्यानधारणा, पोषक आहार, तणाव व्यवस्थापन आणि ध्वनी उपचार (साउंड हीलिंग) यांच्या माध्यमातून निरोगी वार्धक्याकडे जाणाऱ्या व्यावहारिक मार्गांचा सहभागींनी अभ्यास केला.

बांद्रा रिक्लेमेशन येथील भव्य योग सत्र: द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी भव्य सामुदायिक योग सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार तसेच आरोग्यस्वास्थ्य जागरूकता प्रसारक टेरेन्स लुईस उपस्थित होते.

योग बाय द बे (मरीन ड्राइव्ह): द टाइम्स ऑफ इंडिया, शायना एनसी आणि मिकी मेहता यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सूर्योदयाच्या सकाळच्या योग सत्रात हजारो लोक सहभागी झाले. श्रीमती अनुप्रिया पटेल, श्री. जितीन प्रसाद आणि श्री. जयंत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्याविषयी देशाची वाढती बांधिलकी या उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आली.

संस्थात्मक, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट स्तरावरील पोहोच

संस्थेने विविध क्षेत्रांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून आपली पोहोच अधिक व्यापक केली:

सार्वजनिक आणि संरक्षण क्षेत्र: मानसिक स्पष्टता आणि शारीरिक आरोग्यस्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मंत्रालय, सीसीआरवायएन, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (T1 आणि T2), सीआयएसएफ, भारतीय सेना आणि भारतीय वायुदल येथे योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शैक्षणिक संस्था: मिठीबाई, एनएमआयएमएस, चेतना आणि ठाकूर कॉलेज यांसह बीएमसीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मविकासासाठी योगाचे महत्त्व समजावून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कॉर्पोरेट आरोग्यस्वास्थ्य उपक्रम: ओएनजीसी, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, माझगाव डॉक आणि टाटा केअर यांच्यासाठी विशेष आरोग्यविषयक योग उपक्रम आयोजित करण्यात आले. तसेच मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ), माहीम, मुंबई सेंट्रल आणि विले पार्ले येथील टपाल कार्यालयांमध्ये आयोजित सत्रांद्वारे तसेच चंडोक ग्रुप यांच्या सहकार्याने बोरिवली, अंधेरी आणि चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत योग पोहोचविण्याचे कार्य अधिक बळकट करण्यात आले.

गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ द योगा इन्स्टिट्यूट अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षण आणि सामुदायिक आरोग्यस्वास्थ्य संवर्धनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहे. 10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करत, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक योग शिक्षकांचे प्रशिक्षण, 1,000 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन आणि जगभरातील 10 दशलक्षांहून अधिक सदस्यांचा डिजिटल समुदाय निर्माण करून संस्थेने योग सर्व स्तरांतील लोकांसाठी सुलभ करण्यामध्ये परिवर्तनकारी भूमिका बजावली आहे. योग क्षेत्रातील संस्थेच्या या असामान्य योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या “योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्कार” या सन्मानाने संस्थेला गौरविण्यात आले आहे.