Home Blog Page 2

एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे

पुणे, : एकल महिलांना नियमित मार्गदर्शन देण्यात यावे. त्यांच्या बाबत सुरु असलेल्या अमानवी प्रथा मंगळसूत्र काढणे , टिकली न लावणे यासारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा, असे आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी बोलताना केले.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दि.23/06/2026 रोजी दत्त मंदिर, शास्त्रीनगर, कोथरूड येथे एकल महिला दिन सन्मान महिलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा अल्पना वरपे यांनी ‘एकल महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान दिले गेले पाहिजे, तसेच मुख्य प्रवाहात अन्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे’ या विषयी मार्गदर्शन केले.

एकता ग्राम विकास संस्थेचे नंदकिशोर लोंढे यांनी राज्य स्तरावर काम सुरु असलेल्या एकल महिला विकास समिती विषयी महिलांना माहिती दिली.

यावेळी बोलताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी एकल महिलांच्या विकासासाठी महापालिका कायम दक्ष राहणार असल्याचे सांगितले तसेच महिला सन्मान कार्यक्रम संपूर्ण पुणे शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घेण्यात आल्याचे माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी पुणे शहराचे महापौर मंजुषा नागपुरे, अल्पना वरपे अध्यक्षा, महिला बाल कल्याण समिती, वासंती जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, रूपाली पवार नगरसेविका,समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण तसेच समुपदेशिका, अनुराधा जगताप सर्व समूह संघटिका मनिषा वाघ, शीतल ठोसर, स्वाती ढगे, विजया हिंगणे निजाम शेख, सेवा केंद्र मुख्य समन्वयक विजय पाटोळे, संगीता निकम तसेच कोथरूड भागातील सर्व महिला व एकल महिला साधारण 200 ते 350 महिला सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

यावेळी श्रीमती भाग्यश्री साळुंखे ॲड.प्रीती परांजपे यांनी एकल महिलांची सामाजिक स्थिती व कायदे व हक्क या विषयावर महिलांसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी महिलांना शासन योजना, आयुष्मान भारत योजना, आभा कार्ड लाइट हाऊस व योजक संस्था मार्फत विविध कोर्स, विषयक माहिती देण्यात आली.

तसेच उपस्थित एकल महिलांचा सत्कार करून रामदास चव्हाण यांनी आभार मानले व सूत्रसंचालन अनुराधा जगताप यांनी केले.

उपस्थिताना अल्पोपहार देऊन एकल महिला सन्मान दिन साजरा करण्यात आला.

सहकार मंत्रालयाच्या ५ वर्षपूर्ती निमित्त २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकारी सप्ताह

पुणे दि. २४ :भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकारी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे आणि सहकार खाते, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहकारातून समृद्धी, सहकारी चळवळीचे राष्ट्रविकासातील योगदान तसेच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे.

हा सप्ताह २९ जून रोजी सहकारी सप्ताह शुभारंभ व प्रतिज्ञा दिन, ३० जून रोजी प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था परिवर्तन दिन, १ जुलै रोजी शेतकरी गौरव दिन, २ जुलै रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान दिन, ३ जुलै रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहकार चर्चासत्र, ४ जुलै रोजी हरित सहकार दिन, ५ जुलै रोजी नवीन पिढी सहकारी दिन तसेच ६ जुलै रोजी राष्ट्रीय सहकार उत्सव दिन उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

सप्ताहादरम्यान डिजिटलायझेशन, शेतकरी मेळावे, धान्य साठवण योजना, एआय तंत्रज्ञान, वृक्षलागवड मोहीम आणि युवकांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्रकुमार दराडे, अपर निबंधक, सहकारी संस्था तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे यांनी दिली.

मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

पुणे, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए)या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. तथापि अद्यापही विधानसभा मतदारसंघामध्ये काही राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक केलेली नाही, तरी एसआयआर प्रकियेची संपूर्ण माहिती होण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची लवकरात लवकर नेमणूक करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित राजकीय पक्षांसोबतच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे-भामरे, स्वप्नील खोल्लम यांच्यासह राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पिपल्स पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचनेप्रमाणे एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक बुधवारी राजकीय पक्षांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ जूनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण व गणना अर्ज छपाई करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. राजकीय पक्षांनाही या प्रकियेबाबत सुरुवातीपासूनच विस्तृत माहिती देण्याकरिता लवकरच जिल्ह्यात प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले जाणार आहे. या प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना एसआयआर प्रकिेयेबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी लवकरात लवकर बीएलएची नेमणूक करावी जेणेकरुन बीएलओ आणि बीएलए संयुक्तरित्या बैठक घेवून ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहे.

एसआयआरच्या अनुषंगाने सुनावणी घेण्याकरिता जिल्ह्यात 21 मतदार नोंदणी अधिकारी आणि 544 सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी ‘ईसीआय नेट’ (ECINET) ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. विविध माध्यमांद्वारे एसआयआरबाबत जनजागृती करण्यात येईल, निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, अशी ग्वाही श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विधानसभा मतदारसंघ निहाय अनमॅपिग मतदार यादीची मागणी केली असता ती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.

संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेचे २५ जून राेजी आयोजन

पुणे, दि. २४ जून २०२६ : संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभाग, भारत सरकार यांच्या वतीने “संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेवरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषद” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव भूषविणार असून, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी उद्योग यांच्यात समन्वय साधून देशातील संरक्षण उत्पादन क्षमता अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यशाळेत घटक-स्तरीय उत्पादन , नवसंशोधन आणि स्वदेशीकरण यांना चालना देणाऱ्या धोरणांवर चर्चा होणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा राष्ट्रीय दृष्टिकोन, केंद्र व राज्य शासनातील समन्वय, प्रादेशिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि उद्योग क्षेत्रातील संधी यावरही विचारमंथन करण्यात येणार आहे.

पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग, घटक उत्पादक आणि भागधारकांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक संदीप रोकडे यांनी केले आहे.

‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत सादर

सीडीएसएल आयपीएफकडून महिलांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सई गोडबोले यांच्या आवाजात 

मुंबई, 23 जून 2026: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (आयपीएफ) ने आपल्या सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) उपक्रमांतर्गत लोकप्रिय गायिका, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सई गोडबोले यांच्या आवाजातील ‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे नवीन गुंतवणूकदार जनजागृती गीत सादर केले आहे. हे गीत महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास आणि आत्मविश्वासपूर्ण, माहितीपूर्ण तसेच स्वावलंबी, आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

हे गीत एका आकर्षक दृकश्राव्य चित्रफितीद्वारे साकारण्यात आले असून, त्यामध्ये एका महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे उलगडण्यात आले आहेत. पहिली नोकरी सुरू करण्यापासून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यापर्यंत आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासापर्यंतचा हा प्रवास दाखवताना प्रत्येक महत्त्वपूर्ण यशाची सुरुवात संकोचावर मात करून पहिले पाऊल उचलण्यापासूनच होते हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या प्रवासाशी समांतर चालत ही चित्रफीत महिलांना संशोधन, नियोजन आणि माहितीपूर्ण निर्णयांच्या आधारावर त्याच आत्मविश्वासाने गुंतवणुकीकडे पाहण्यास प्रोत्साहित करते. संपत्ती निर्माण करणारी, भविष्य घडवणारी आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्ती बनण्याचा संदेश देत हे गीत महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्यास आणि आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी प्रेरित करते.

आज भारतातील जवळपास प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. देशातील गुंतवणूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग यातून दिसून येतो. कार्यक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग आणि समाजातील त्यांची विकसित होत असलेली भूमिका लक्षात घेता अधिकाधिक महिला त्यांच्या आर्थिक निर्णयांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतातील गुंतवणूकदारांच्या लोकसंख्याशास्त्रीय स्वरूपातही लक्षणीय बदल घडून येत आहे. सई गोडबोले यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि सहज आपलेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून हे गीत विविध वयोगटांतील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आत्मविश्वास, जागरूकता तसेच माहितीपूर्ण निर्णयक्षमतेसह गुंतवणुकीकडे वळण्यासाठी प्रेरित करते.

अलीकडील वर्षांमध्ये गुंतवणुकीमधील महिलांचा सहभाग सातत्याने वाढला असला तरी या सहभागाला आणखी चालना देण्याची मोठी संधी अद्याप उपलब्ध आहे. जागरूकता, आत्मविश्वास, गुंतवणूक उत्पादनांविषयीची समज आणि विश्वासार्ह माहितीची उपलब्धता हे घटक सिक्युरिटीज मार्केटमधील माहितीपूर्ण सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना सीडीएसएल आयपीएफ सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले, “‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर हे गीत एका साध्या पण प्रभावी संदेशावर आधारित आहेप्रत्येक अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल उचलण्यापासून होतेया उपक्रमाद्वारे आम्हाला अधिकाधिक महिलांना गुंतवणुकीच्या दिशेने ते पहिले पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहेज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करायचे आहेमहिला त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी अधिकाधिक प्रमाणात स्वीकारत असतानात्या केवळ स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेलाच बळकटी देत नाहीततर अधिक सर्वसमावेशक आणि सक्षम गुंतवणूक परिसंस्था उभारण्यातही महत्त्वपूर्ण योगदान देतात.

सीडीएसएल आयपीएफ विविध समाज घटकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) हा उपक्रम विविध पार्श्वभूमीतील महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

जाहिरात मोहिमेतील फिल्म पाहण्यासाठी लिंक:

YouTube: https://www.youtube.com/watch?v=6hpots_dUR8

Instagram: https://www.instagram.com/reel/DZ1oTUkjX8e

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

पुणे: पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस सह आयुक्त, सारंग आवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 24 जून 2026 रोजी 00.01 पासून ते 7 जुलै 2026 रोजी 24 वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे. ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम 37(1) व (3) विरुध्द वर्तन करणे. कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणेस बंदी घालण्यात येत आहे.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे व त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

अन्न औषध प्रशासनाचे पुण्यात स्वतंत्र कार्यालय व्हावे

-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : विविध सामाजिक संस्थांची मागणी लक्षात घेऊन पुणे शहरात अन्न औषध प्रशासनाचे (एफडीए) स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

आयटी आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहरात अन्न औषधं प्रशासनाचे स्वतंत्र हक्काचे कार्यालय नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. रिक्त पदे तातडीने भरून पुण्यात कार्यालय सुरू करावे, अशी ३० हून अधिक सामाजिक संस्थांची मागणी आहे. त्यामुळे पुणे शहरात अन्न औषधं प्रशासनाचे स्वतंत्र हक्काचे कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

खाजगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या दलालांची शिवाजीनगर एसटी स्थानकात दहशत

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची
कारवाईची मागणी

पुणे : खाजगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या दलालांची शिवाजीनगर एसटी स्टँड परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याचा त्रास प्रवासी आणि परिवहन खात्याला होत असल्याने एजंट विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज (मंगळवारी) केली.

भाजप आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांनी परिवहन विभागाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयावर सरकारचे लक्ष वेधले.
​आमदार शिरोळे यांनी पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्टँडच्या सद्यस्थितीचा उल्लेख करत खासगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या दलालांचा (एजंट्स) मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

या बेकायदेशीर दलालांची एसटी स्टँड परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, याचा त्रास केवळ प्रवाशांनाच नव्हे तर ‘राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. दलालांच्या वाढत्या प्रभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. ​

परिवहन विभागाच्या ‘भरारी पथक’ अधिक सक्षम करून दलालांवर विशेष आणि कठोर कारवाई करण्यात येईल का?, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नियमितपणे समन्वय साधून संयुक्त कारवाई केली जाईल का? असे प्रश्न आमदार शिरोळे यांनी उपस्थित केले.

आमदार शिरोळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारच्या दलालांविषयी कोणतीही माहिती किंवा तक्रार आल्यास भरारी पथकाला त्वरित निर्देश देऊन कठोर कारवाई केली जाईल. तसेच, बेकायदेशीर दलाल आढळल्यास त्यांना तातडीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी सभागृहाला दिले.

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी

योजना़च्या अटी शिथील कराव्यात
-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : श्रावणबाळ, संजय गांधी योजनांच्या अटी शिथील कराव्यात आणि त्या योजनांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, अशा मागण्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मांडल्या.

श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक अशिक्षित आहेत, तसेच त्यांचा जन्म घरी झालेला असल्याने त्यांच्याकडे जन्माची कोणतीही नोंद नाही. अनेकांनी शालेय शिक्षणच घेतले नसल्याने शाळा सोडल्याचा दाखला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे ही अट शिथिल करून पूर्वीप्रमाणेच शासकीय रुग्णालयाचा वयाचा दाखला किंवा इतर वैध पुरावे ग्राह्य धरण्यात यावेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना या संदर्भात दि.२ मार्च २०२६ रोजी शासनाने जीआर काढला आहे. त्यातील काही अटींमुळे हजारो वृद्ध, निराधार, गरीब लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित रहातील, अशी भीती आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.

दोन्ही योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा केवळ रु. २१,०००/- निश्चित करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या काळात ही मर्यादा अत्यंत जुनी आणि अव्यवहार्य ठरत आहे. यामुळे हजारो गरजू कुटुंब या योजनेतून बाद होत आहेत. ही वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवून ती किमान रु. ५०,०००/- पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट, अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत घसरण

वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘यूएस सिनेट’ने इराणविरुद्धच्या युद्धाला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. ५० विरुद्ध ४८ मतांनी मंजूर झालेल्या या ठरावाद्वारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’नेही असाच ठराव मंजूर केला होता.

१९७३ च्या ‘वॉर पावर्स ॲक्ट’नंतर प्रथमच अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्राध्यक्षांकडे युद्धसदृश कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे. मतदानादरम्यान चार रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सची बाजू घेतल्याने ट्रम्प यांच्या पक्षातही या मुद्द्यावर मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.

तथापि, व्हाईट हाऊसने या ठरावाचा कोणताही कायदेशीर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणविरुद्धची अमेरिकेची लष्करी कारवाई आधीच पूर्ण झाल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन आणि कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिका-इराण चर्चेबाबत आखाती देशांच्या चिंता दूर करणे हा त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. प्रस्तावित करारामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये इराणचा प्रभाव वाढू शकतो, अशी भीती काही आखाती देशांनी व्यक्त केली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींचा भाग म्हणून इराणच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल ३०० अब्ज डॉलर्सच्या निधीबाबतही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. या निधीसाठी आखाती देशांकडून आर्थिक मदत घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिपटीने वाढली

‘मरीनट्रॅफिक’ या जहाजवाहतूक माहिती देणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार, १२ ते १४ जूनदरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून केवळ ३२ जहाजे गेली होती. मात्र, १९ ते २१ जूनदरम्यान ही संख्या वाढून ९३ वर पोहोचली आहे.

अमेरिका-इराण संबंधांमध्ये अलीकडे झालेली राजनैतिक प्रगती आणि इराणी तेलावरील काही निर्बंधांमध्ये झालेली तात्पुरती शिथिलता यामुळे जहाजवाहतूक कंपन्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ट्रम्प यांची नाराजी

इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईवर निर्बंध घालण्याच्या उद्देशाने सिनेटने मंजूर केलेल्या ठरावावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इराण करारासाठी तयार असल्याचे संकेत मिळत असतानाच असा ठराव मंजूर करून सिनेटने अमेरिकेची भूमिका कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने मांडलेल्या बहुतांश अटी स्वीकारण्यास इराण तयार आहे. अनेक दशकांनंतर प्रथमच इराण अमेरिका आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयी आदर दाखवत असल्याचेही त्यांनी म्हटले.

सिनेटने मंजूर केलेला ‘वॉर पावर्स’ ठराव अयोग्य वेळी आणलेला आणि निरर्थक असल्याची टीकाही त्यांनी केली. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या चार रिपब्लिकन सिनेटरांवरही त्यांनी निशाणा साधला.

तेलाच्या किमतीत घसरण

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत प्रगती होण्याची शक्यता वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ०.५ टक्क्यांनी घसरून ७६.७१ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत होईल आणि जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहील, या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून तेलाच्या किमतींवर दबाव कायम आहे.

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची आशा

“गेल्या वर्षी 10.44 TMC, यंदा केवळ 3.82 TMC साठा”

पुणे : दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागांत रिमझिम हजेरी लावली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र उष्णता आणि दमट हवामानाने त्रस्त झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.

सकाळपासूनच शहरावर ढगांचे आच्छादन होते. दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या, तर सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. मध्यवर्ती भागासह अनेक परिसरांत रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

भारतीय हवामान विभागाने पुणे शहर व जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

धरण क्षेत्रात चांगल्या पावसाची नोंद

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे २४ मिमी, पानशेत येथे ५४ मिमी, वरसगाव येथे ५५ मिमी तर टेमघर येथे ३४ मिमी पावसाची नोंद झाली.

मात्र, अद्याप खडकवासला धरण साखळीत नवीन पाण्याची लक्षणीय आवक झालेली नसून चारही धरणांमध्ये मिळून एकूण आवक शून्य एमसीएफटी नोंदविण्यात आली आहे.

केवळ १३.१० टक्के पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मिळून आज अखेर ३.८२ टीएमसी (१३.१० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरणनिहाय साठा पुढीलप्रमाणे :

  • खडकवासला : ०.४४ टीएमसी (२२.४६ टक्के)
  • पानशेत : १.८८ टीएमसी (१७.६३ टक्के)
  • वरसगाव : १.५० टीएमसी (११.६७ टक्के)
  • टेमघर : ०.०० टीएमसी (० टक्के)

गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत ११.२७ टीएमसी (३८.६७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक

राज्य सरकारच्या धोरणानुसार उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.धरण क्षेत्रात सुरू झालेला पाऊस कायम राहिल्यास आगामी काळात धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता धरण क्षेत्रातील पावसाकडे लागले आहे.

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

0
  • सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश

पुणे :
कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्तांच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी सह धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावत अर्ज नामंजूर केले आहेत. पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांनी हे आदेश दिले आहेत.सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या विश्वस्त नियुक्ती आदेशाला स्थगिती देण्याची यशोधन शिवराज कदम पवन झेंडे, महेश ठोंबरे, विशाल मोरे आणि राजीव मराठे यांनी मागणी केली होती. नव्याने नियुक्त विश्वस्तांना कामकाजापासून रोखावे आणि आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती द्यावी, अशी विनंती या अर्जदारांनी केली होती.
या प्रकरणात नितीन पंडित, सूरज थोरात, मनीषा खेडेकर, महेंद्र गाडवे, राजू बलकवडे, वर्षा थोरवे, डॉ. पराग काळकर, ॲड. विवेक भरगुडे आणि पुनीत बालन हे प्रतिवादी होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सह धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले की, सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाविरोधात त्यांच्यासमोर कोणताही अपील किंवा पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे केवळ स्थगितीचा स्वतंत्र अर्ज दाखल करून आदेशाला स्थगिती देण्याचा अधिकार या प्राधिकरणाला नाही.
अर्जदारांच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियमातील कलम ३, ३-अ, ६९ आणि नियम ३६ चा आधार घेत स्थगिती देण्याचे अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, नियमांमुळे स्वतंत्र अधिकार निर्माण होत नाहीत आणि अपील अथवा पुनर्विलोकन प्रलंबित नसताना स्थगिती देता येणार नाही, असे निरीक्षण आदेशात नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान अर्जदारांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती न्यायालयास दिली. त्यामुळे एका महिन्याच्या स्थगितीची त्यांची मागणी निष्प्रभ ठरल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.

अर्जांमध्ये कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसताना ‘कार्यवाही निकाली निघेपर्यंत स्थगिती’ अशी मागणी करण्यात आल्याबद्दल सह धर्मादाय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. अर्ज अत्यंत निष्काळजीपणे तयार करण्यात आल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. तसेच हे अर्ज ग्राह्य धरता येत नसल्याने ते फेटाळण्यात येत असल्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्त कोठलीकर यांनी दिले.

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

0

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा व भव्य आसूड मोर्चा.

मुंबई/नांदेड, दि. २३ जून २०२६.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव सातत्याने पडत आहेत. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगन घालून स्वाभिमान गहाण ठेवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे सांगतील तेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणंघेणं नाही. झोपे गेलेल्यांना जागे करने सोपे आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी मात्र आसूड हाती घ्यावा लागतो, म्हणून शेतकरी विरोधी भाजपा सरकारविरोधात आसूड मोर्चा काढण्यात आला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. रविंद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, नांदेड शहर अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, पप्पू पाटील कोंडेकर, बालाजी गाडे पाटील, प्रदेश सचिव श्रवण रापनवाड, धनराज राठोड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली भरमसाठ आश्वासने दिली, शेतमालाला दिडपट भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, १०० स्मार्ट सीटी निर्माण करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, पेट्रोल-डिझेल ४० रुपये लिटर तर गॅस सिलेंडर ४०० रुपयांना देणार, पण सत्तेत आले आणि मोदी सर्व विसरले. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करु म्हणणारा भाजपा आता ७/१२ वरून शेतकऱ्यांचे नाव कोरे करून अदानी-अंबानीच्या नावे करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज नसताना शक्तीपीठ मार्ग केला जात आहे, तो शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यासाठी आहे. दुसरीकडे तरुणांकडे डिग्री आहे पण नोकरी नाही, पेपरफुटी दरवर्षी होत आहे. लाडक्या बहिणांचा विश्वासघात केला आहे, २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले पण १५०० रुपये देतानाही ८० लाख लाडक्या बहिणांना योजनेतून वगळले आहे. भाजपा महायुतीने लाडक्या बहिणांना फसवले, तरुणांना फसवले आणि शेतकऱ्यांनाही फसवले आहे. इंधनाचे दर १०० रुपयाच्या वर गेले, गॅस सिलेंडर १००० रुपयांच्या वर गेला. जिवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या पण शेतमालाच्या किमती मात्र वाढल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाक करताना तेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, सोने खरेदी करु नका असे आवाहन केले पण स्वतः मात्र विदेश वाऱ्या करत फिरत आहेत. मुठभर उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केली पण सर्वसामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. मोदींचे सरकार हे बहुजन समाज, गरिब, शेतकरी यांच्यासाठी नाही तर अदानी व अंबानीसाठीच काम करत आहे, असे सपकाळ म्हणाले. मोदी सरकार लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत आहे, पण लोकशाही व संविधानाशी खेळलात तर खबरदार, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला.

सपकाळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दैवी शक्ती आहे, असे त्यांचे लोक सांगतात पण त्यांची ही तथाकथित दैवीशक्ती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, ही तथाकथित दैवी शक्ती फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी कामाला येत आहे, असा टोला लगावत, ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्ला’, असे सपकाळ म्हणाले..

नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनाही यावेळी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करू असेही खासदार रविंद्र चव्हाण म्हणाले.
सभेनंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आसूड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी, टॅक्टर व हाती आसूड घेऊन शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी विरोधी भाजपा सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट..

अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकरी गुनाजी बापूराव पवार यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या घरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांत्वनपर भेट दिली आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण करून मदतीसाठी तसेच तणावग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणाची सूचना केली. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांना पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर

पुणे, दि. २३ जून : मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, निवेदक आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

चंद्रकांत काळे हे मराठी रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. अभिनय, दिग्दर्शन, निवेदन आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. अमृतगाथा, प्रियरंग, रंगवेध, श्रीमंतांची बखर यांसारख्या साहित्यकृतींसह सिंहासन, एक होता विदूषक, गंध, मुक्ता आदी चित्रपटांमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या बालगंधर्व पुरस्कार निवड समितीने त्यांच्या दीर्घकालीन आणि बहुआयामी योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
इतर पुरस्कार विजेते
यंदाच्या बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकार आणि कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

विशेष पुरस्कार :
संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत – दीप्ती भोगले
बुकिंग क्षेत्रातील पुरस्कार – संदीप चव्हाण
दिग्दर्शन क्षेत्रासाठी – विनोद रत्ना
संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार – अनुष्का आपटे
पुरषोत्तम करंडक विजेता २०२५ – ओमकार कापसे

मागील दोन वर्षांचे प्रलंबित पुरस्कारही प्रदान करणार

कोरोना काळानंतर विविध कारणांमुळे २०२० आणि २०२१ या वर्षांतील पुरस्कार वितरण समारंभ होऊ शकला नव्हता. त्यामुळे यंदाच्या सोहळ्यात २०२० व २०२१ मधील पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

बालगंधर्व पुरस्कार सन २०२०
ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री – निर्मलाताई गोगटे (मुख्य पुरस्कार)
लेखन व दिग्दर्शन – किरण यज्ञोपवीत
नाट्य व्यवस्थापन – प्रवीण बर्वे
बॅकस्टेज आर्टिस्ट – संदीप देशमुख
संगीत रंगभूमीतील योगदान – रविंद्र कुलकर्णी
नव्या पिढीला रंगभूमीची आवड निर्माण करण्यासाठी विशेष योगदान – अनुराधा राजहंस

बालगंधर्व पुरस्कार सन २०२१
शास्त्रीय संगीत गायन क्षेत्र – डॉ. रेवा नातू (मुख्य पुरस्कार )
व्हायोलित त्यानंतर क्षेत्रातील शिक्षिका व कलाकार – रमा चोभे
नाट्य व्यवस्थापन – समीर हंपी
बहू आयामी नाट्यकर्मी – प्रसाद वनारसे
बॅकस्टेज आर्टिस्ट – गणेश माळवदकर
बॉक्स थिएटर निर्मिती – प्रवीण वैद्य

पुरस्कार वितरण समारंभ
ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांच्या हस्ते गुरुवार, दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी ४. ०० वाजता बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्कार स्वरूप

मानपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाबाच्या फुलांचा हार आणि फुलांचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमास कला, साहित्य, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.

माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले, ज्येष्ठ कलाकार अनुराधा राजहंस यांचा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश होता.

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

:

🔴 १४ जूनचा प्रयत्न फसला… १८ जूनला झाला घात?
⚠️ तपासात नवा धक्कादायक दावा समोर
🕵️ श्रीमंताघरच्या प्रेमकहाणीचे उलगडताहेत धागेदोरे?

पुणे-लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, केतनला मिठी मारून वेळ मारून नेली होती. हा धक्कादायक खुलासा खुद्द केतनच्या वडिलांनी केला असून, या कटात सियाचे कुटुंबीय देखील सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

केतनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजीची बालीची ट्रिप रद्द झाल्यानंतर सियाने केतनसोबत खूप भांडणे केली आणि लोहगडला जाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार १४ जून रोजी केतन आणि सिया दोघेच लोहगडवर गेले होते. तिथे गेल्यावर संधी साधून सियाने पहिल्यांदा केतनला किल्ल्यावरून खाली धक्का दिला. मात्र सुदैवाने केतनच्या हाती एक झुडूप लागल्याने तो बचावला. केतन वाचल्याचे पाहताच सियाने तत्काळ ‘साप आला… साप आला’ असे ओरडत नाटक सुरू केले आणि केतनला मिठी मारली. सापाला घाबरून सियाने चुकून धक्का दिला असावा, यावर केतनने भाबडेपणाने विश्वास ठेवला. मात्र, सियाचा तो त्याला संपवण्याचा पहिला प्रयत्न होता, हे आता उघड झाले आहे.

हत्येच्या या कटाची सुरुवात जून महिन्याच्या सुरुवातीलाच झाली होती. केतनच्या वडिलांनी सांगितले की, ६ जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या गाडीत केतन, सिया, केतनची बहीण आणि सियाचा भाऊ साहिल असे चौघे होते. प्रवासाला निघताना सर्वांचे पासपोर्ट, चलन आणि क्रेडिट कार्ड एकाच पाऊचमध्ये ठेवण्यात आले होते. वाटेत एका फूडमॉलवर थांबले असता, सिया ‘मोबाईल गाडीत राहिला’ असा बहाणा करून एकटीच गाडीजवळ गेली आणि परत आली. त्यानंतर विमानतळावर पोहोचल्यावर केवळ केतनचाच पासपोर्ट गायब असल्याचे निदर्शनास आले. तो खूप शोधूनही न सापडल्याने सर्वांना माघारी फिरावे लागले. सियानेच मुद्दाम तो पासपोर्ट गायब केला होता, हे आता स्पष्ट होत आहे.
१८ जून: ‘प्री-बर्थडे’च्या बहाण्याने नेऊन संपवले

केतनच्या वडिलांनी सांगितले की, १४ जूनचा प्रयत्न फसल्यानंतर, सियाने १९ जून रोजी असलेल्या तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधले. ‘माझा प्री-बर्थडे साजरा करूयात’ असा हट्ट धरून तिने १८ जून रोजी केतनला पुन्हा लोहगडवर नेले. सकाळी ८.२० वाजता ते घरातून निघाले. यावेळी सियाचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी हा त्यांच्या पाठीमागे २०-२५ फुटांवरून फिरत होता. किल्ल्यावर वर पोहोचल्यानंतर सिया आणि चेतनने संगनमत करून केतनला दरीत ढकलून दिले. पावणे अकरा वाजता सियाच्या आईने केतन दरीत पडल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.

केतनच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही लोहगडवर पोहोचलो तेव्हा स्थानिक आणि पोलिसांनी मृतदेह शोधून काढला होता. मात्र, ज्या मुलीचा भावी नवरा डोळ्यांसमोर दरीत पडून वारला आहे, तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा किंवा धक्क्याचा कोणताही भाव नव्हता. सियाच्या या निर्विकार प्रतिक्रियेमुळेच केतनच्या कुटुंबाला पहिल्यांदा संशय आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या तपासात सिया आणि चेतन चौधरी यांचे नोव्हेंबरपासून अफेअर असल्याचे आणि ते दोघे ‘हनिमून’लाही जाऊन आल्याचे उघडकीस आले.

केतनचे वडील म्हणाले, केतन आणि सियाचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने (अरेंज मॅरेज) ठरला होता. दोन्ही कुटुंबांची गेल्या ३५-४० वर्षांपासून ओळख होती. मात्र, सियाच्या अफेअर आणि भानगडींबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला माहिती होती, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक आमची फसवणूक केली, असा आरोप केतनच्या वडिलांनी केला आहे. “एका २० वर्षांच्या मुलीला कुणाचा तरी जीव घेण्याचे संस्कार कसे मिळू शकतात? यात तिचे आई-वडील, भाऊ किंवा इतर नातेवाईक सामील असू शकतात,” असा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी या दुर्दैवी पित्याने केली आहे.