अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये केमिकल टँक लीक झाला. डिस्नेलँड थीम पार्कपासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या एरोस्पेस फॅक्टरीमध्ये ठेवलेला केमिकल टँक शुक्रवारी जास्त गरम झाला.
यानंतर आसपासच्या सुमारे 40 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत, जी आता भरली आहेत.
ही घटना कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटीमधील गार्डन ग्रोव्ह शहरात घडली आहे. येथे जीकेएन एरोस्पेस नावाच्या कंपनीत मिथाइल मेथॅक्रिलेट नावाचे रसायन असलेला दाबयुक्त टँक गरम झाला आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडू लागला.ऑरेंज काउंटी फायर अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनुसार, टँक फुटू शकतो किंवा त्याला तडे जाऊ शकतात, ज्यामुळे विषारी रसायन जमिनीवर पसरू शकते.
अधिकाऱ्यांच्या मते, टाकीत सुमारे २२,७०० ते २६,५०० लिटर प्लास्टिक बनवणारे धोकादायक रसायन मिथाइल मेथाक्रिलेट भरले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर आहे आणि टाकी फुटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांना अफवा आणि अनावश्यक कॉल टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरुवातीला फक्त गार्डन ग्रोव्हमधील लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु नंतर धोका वाढल्याने ऑरेंज काउंटीमधील सायप्रस, स्टॅंटन, अनाहिम, बुएना पार्क आणि वेस्टमिन्स्टर या पाच इतर शहरांमधील काही भागांमधूनही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
तथापि, डिस्नेलँडचे दोन्ही थीम पार्क सध्या स्थलांतरित क्षेत्रात समाविष्ट नाहीत. प्रशासनाने तीन हायस्कूलसह अनेक ठिकाणी निवारागृहे (शेल्टर होम) उभारली आहेत, जिथे लोकांना तात्पुरते ठेवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची बातमी नाही. कंपनीने निवेदन जारी करून म्हटले आहे की, ती आपत्कालीन सेवा आणि तज्ञ संघांसोबत स्थानिक लोक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे.
फायर टीम ड्रोनच्या मदतीने सतत टाकीच्या तापमानावर लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब झालेल्या दोन टाक्यांपैकी एक दुरुस्त करण्यात आली आहे, परंतु दुसरी टाकी अजूनही मोठ्या धोक्यात आहे. टीम सतत पाणी आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने टाकी थंड करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रशासनाने खबरदारी म्हणून वाळूच्या पोत्यांचे अडथळे तयार केले आहेत जेणेकरून जर रसायन गळती झाली तर ते गटार, समुद्र किंवा आसपासच्या जलस्रोतांपर्यंत पोहोचू नये.
ऑरेंज काउंटीच्या आरोग्य अधिकारी डॉ. रेजिना चिन्सियो-क्वाँग यांनी सांगितले की, हे रसायन अत्यंत ज्वलनशील आणि विषारी आहे. जर त्याचे तापमान वाढले, तर त्यातून बाहेर पडणारा वायू लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, डोकेदुखी आणि मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यात सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप सर्वाधिक 12 जागांवर निवडणूक लढवेल. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 3 व 2 जागांवर समाधान मानावे लागेल. पण महायुतीत 1-2 जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने विधान परिषदेच्या 6 जागांची मागणी केली आहे. पण भाजपने त्यांना केवळ 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पक्षाचे गाऱ्हाणे मांडणार आहेत.
विधान परिषदेच्या जागावाटपाच्या मुद्यावर राज्यात तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यास प्राधान्य दिले आहे. अमित शहांसोबतच्या बैठकीत शिंदे पक्ष विस्ताराच्या मुद्यावर अर्थात ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिवसेनेमध्ये बहुतांश जागांवर मतैक्य झाले आहे. पण ठाण्याच्या जागेवर घोडे अडले आहे. भाजप या जागेसाठी आग्रही आहे. तर शिवसेनेने ठाणे आपला बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यावरील दावा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पेच फसला आहे. शिंदे गटाने या प्रकरणी जागांची अदलाबदली करण्याचा आग्रह धरला आहे.
भाजपने ठाणे विधान परिषदेच्या जागेवर जोरदार दावा केला आहे. या ठिकाणी भाजप नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह भाजप आमदार संजय केळकर यांनी धरला आहे. ठाण्यात सध्या भाजपचे 444 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत शिवसेना व जिजाऊ संस्थेकडे केवळ 346 सदस्य आहेत. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत आहे. भाजप या ठिकाणी ठाण्याचाच उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. संजय केळकर यांच्या या भूमिकेला साजेशी भूमिका भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतल्यामुळे या जागेवरून महायुतीत फटाके फुटण्याची शक्यता आहे.
भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले होते, सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला गेल्यामुळे जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे.
शिर्डी: “जो देश स्वतःची शस्त्रास्त्रे स्वतः बनवतो , तो आपले भविष्य स्वतः घडवतो “ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत 23 मे 2026 रोजी शिर्डी येथे खासगी क्षेत्रातील कंपनी ‘निबे समूहाच्या ’च्या संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. या संकुलात प्रगत तोफखाना प्रणाली, क्षेपणास्त्र आणि अंतराळ तंत्रज्ञान, रॉकेट प्रणाली, स्फोटकांसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती आणि स्वायत्त संरक्षण प्रणाली तयार करण्याचा मानस आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारताच्या पहिल्या 300 किमी युनिव्हर्सल रॉकेट प्रक्षेपण प्रणाली ‘सूर्यास्त्र ’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या प्रणालीसाठीच्या क्षेपणास्त्र संकुलाची पायाभरणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय, या समारंभात स्वदेशी टीएनटी प्लांट टेक्नॉलॉजी, आरडीएक्स प्लांट टेक्नॉलॉजी आणि रिन्यूएबल बायो-एनर्जी कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्राचे अनावरण करण्यात आले. सॅटेलाइट असेंब्लीच्या क्षेत्रात निबे ग्रुप आणि ब्लॅक स्काय यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाणही झाली.
संरक्षण मंत्र्यांनी दारुगोळा उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या महत्त्वावर भर दिला आणि हे संकुल संरक्षण दलांच्या परिचालन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल व देशाच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देईल असा विश्वास व्यक्त केला. संरक्षण उत्पादन, जे पूर्वी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने आणि आयुध कारखान्यांपुरते मर्यादित होते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खाजगी क्षेत्रासाठी खुले केले आहे असे त्यांनी सांगितले. “आम्ही खाजगी क्षेत्राची क्षमता ओळखली आहे, ते भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवू शकते,” असे ते म्हणाले.
भविष्यातील युद्धांचे परिणाम हे त्या देशाच्या सैन्याच्या संख्येवर नव्हे, तर दारुगोळा आणि स्वयंचलित प्रणालीमधील प्रगती व क्षमतेवर अवलंबून असेल यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. “या वास्तवाची झलक सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षात आणि पश्चिम आशियातील परिस्थितीत दिसून येते. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान या क्षमतेचे दर्शन घडवले होते ” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की, भारताच्या खाजगी उद्योगांना भविष्यातील युद्धाच्या पद्धतींची सखोल जाण आहे आणि ते देशाला अत्याधुनिक प्रणालींनी सुसज्ज करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. भारताला दारुगोळा आणि स्वयंचलित प्रणालींचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, सरकार महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि प्रगत प्रणालींमध्ये ‘मेक-इन-इंडिया’ला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. “भारत दारुगोळा आणि स्वयंचलित प्रणालींमध्ये आघाडीवर राहील हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलण्यास आम्ही तयार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश सैनिकांची क्षमता कमी करण्याचा नाही, तर वाढवण्याचा आहे आणि अंतिम निर्णय नेहमी माणसाच्या हातातच असला पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. भविष्यकालीन युद्धात आधुनिक शस्त्रास्त्रे व स्वयंचलित प्रणालींचे महत्त्व सातत्याने वाढत राहील आणि त्या दिशेने प्रगती करणे भारतासाठी अनिवार्य आहे, असे ते म्हणाले. “आपण सगळे मिळून भारताला संरक्षण व अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात संपूर्णपणे आत्मनिर्भर बनविण्याची प्रतिज्ञा करूया,” असे सांगून भविष्यातील युद्धासाठी भारताचे सामर्थ्य वाढवण्याची विनंती त्यांनी संरक्षण सामग्री उत्पादक कंपन्यांना केली.
गेल्या दशकात संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपाययोजना अधोरेखित करुन संरक्षण मंत्री म्हणाले की, धाडसी धोरणात्मक बदल, एफडीआय नियमांमधील उदारीकृत बदल, धोरणात्मक भागीदारी प्रारुपाची सुरुवात, सकारात्मक स्वदेशी उत्पादन यादीची सूचना तसेच संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठी नवोन्मेष (आयडेक्स), आयडेक्सच्या मदतीने नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाला गती (अदिती) आणि तंत्रज्ञान विकास निधी (टीडीएफ) यासारख्या योजना सुरू केल्यामुळे युवा नवोन्मेषकांच्या संशोधनाला गती मिळत आहे. देशांतर्गत उद्योगांनी दिलेल्या पाठबळाच्या सहाय्याने आपले शूर सैनिक राष्ट्रहिताचे रक्षण करत आहेत त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया हे स्वप्न वास्तवात आणण्यामध्ये खाजगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
“एक काळ असा होता, जेव्हा संरक्षण सामग्री उत्पादनामध्ये खाजगी क्षेत्राचे योगदान नगण्य होते. आता ते जवळपास 25 ते 30 टक्के इतके झाले आहे. येत्या काही वर्षांत हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. हा नवा भारत आहे, इथे आता खाजगी क्षेत्र केवळ नटबोल्ट्सचा पुरवठा करत नाही; तर नवोन्मेषक म्हणून उदयास येत आहे आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींची निर्मिती करत आहे. जेव्हा सरकारचा दृष्टीकोन आणि खाजगी क्षेत्रातील नवोन्मेष यांचा मेळ साधला जातो; त्यावेळी देश प्रगतीची उंचउंच शिखरे काबीज करतो,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
आजच्या जगात सुरक्षा व अर्थव्यवस्था या दोन वेगवेगळ्या बाबी राहिलेल्या नाहीत कारण वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था लष्करी सामर्थ्य व आधुनिक संरक्षण क्षमता यासाठी मजबूत पाया रचण्याचे काम करते असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. “राष्ट्रीय सुरक्षेमुळे गुंतवणूक, औद्योगिक विकास व एकंदर प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होते. व्यापार व पुरवठा साखळीपासून दुर्मिळ खनिजांपर्यंत सर्वांचाच वापर शस्त्रासारखा केला जात असल्याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. अशा काळात आपल्या संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी आपण इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. संरक्षण सामुग्री निर्मितीमधील आत्मनिर्भरता ही केवळ युद्धकाळापुरती गरज नाही; तर शांतता, विकास व आर्थिक लवचिकतेसाठीही ती गरजेची आहे,” असेही ते म्हणाले. ज्या प्रकल्पांचे आजच्या दिवशी उद्घाटन होत आहे ,ते प्रकल्प पुढे जाऊन संशोधन केंद्रे बनण्यास सज्ज होतील, ज्यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेला आणखी बळकटी मिळेल,असे ही राजनाथ सिंह पुढे म्हणाले. युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टीमचे क्षेपणास्त्र संकुल, भारताच्या भविष्यातील युद्धक्षमतेला एक नवी दिशा देईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”स्वदेशी तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही रॉकेट प्रणाली हल्ला करण्याची आपली क्षमता अनेक पटींनी विकसित करून धोरणात्मक निर्णायक बदल घडवून आणेल,” असे ते म्हणाले.
संकुल केवळ उच्च-तंत्रज्ञान उद्योगांसाठीच नव्हे, तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs), लघु उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही एक बहुविध परिसंस्था निर्माण करेल,असे सांगत याची संरक्षणमंत्र्यांनी प्रशंसा केली.“दारुगोळा निर्मिती, क्षेपणास्त्रे, रॉकेट प्रणाली आणि उपग्रह घटकांच्या उत्पादनांसाठी सहायक युनिट्स, पुरवठादार आणि विक्रेते यांचा सहभाग यात असेल. यामुळे रोजगार निर्माण होईल आणि त्यायोगे या भागातील तरुणांना अत्याधुनिक तांत्रिक कौशल्यांनी सक्षम करून त्यांना राष्ट्रउभारणीत योगदान देण्यास सक्षम केले जाईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांच्या माध्यमातून देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.’ऑपरेशन सिंदूर’ हे भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचे तसेच देशाच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे एक देदीप्यमान उदाहरण आहे,असे ही ते म्हणाले. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या सक्रिय आणि समान सहभागामुळे भारताच्या संरक्षण परिसंस्थेमध्ये परिवर्तन झाले आहे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी तो संरक्षण दलांना सातत्याने बळ देत राहील, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.भारत आपली रणनैतिक शक्ती वाढवत असताना, जागतिक शांतता आणि स्थैर्य वाढविण्यात रचनात्मक भूमिका बजावत आहे,असे ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, एमएसएमई उद्योगांची संरक्षण क्षमता प्रदर्शने, तसेच उद्योग क्षेत्रातील नेते आणि संरक्षण क्षेत्रातील हितसंबंधितांशी संवाद संत्रे यांचाही समावेश होता.यावेळी संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान; महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील;संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार; संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत; तसेच इतर वरिष्ठ नागरी तसेच लष्करी अधिकारी, धोरणात्मक भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुणे-कराराचा भंग करत राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2025-26 पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे महानगरपालिकेने पेस एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई या संस्थेवर कठोर कारवाई केली आहे. संस्थेला 10 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून 10 लाख रुपयांची सुरक्षा ठेव जप्त करण्याचे आदेश उपआयुक्त वसुंधरा बारवे यांनी काढले आहेत.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेज चालवण्यासाठी पेस एज्युकेशनल ट्रस्ट व पुणे मनपा यांच्यात 6 जुलै 2013 रोजी 10 वर्षांसाठी करार झाला होता. करार 5 जुलै 2023 रोजी संपुष्टात आल्यानंतर संस्थेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार 8 मार्च 2024 रोजी नव्याने करार करण्यात आला.
करारातील अट क्र. 32 नुसार 10 लाख रुपये सुरक्षा ठेव मनपाकडे जमा ठेवण्यात आली होती. तसेच अट क्र. 15 नुसार, करार कोणत्याही कारणाशिवाय रद्द करायचा असल्यास 12 महिने आधी लेखी नोटीस देणे बंधनकारक होते.मात्र, संस्थेने 14 मे 2025 रोजी नोटीस देऊन 2025-26 पासून प्रवेश प्रक्रिया राबवणार नसल्याचे कळवले. 12 महिन्यांची मुदत न पाळता थेट प्रवेश बंद केल्याने हा करारभंग ठरतो. शिवाय संस्थेने अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीही केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या मान्यतेने संस्थेची 10 लाख रुपयांची सुरक्षा ठेव जप्त करून संस्थेला 10 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेची भूमिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या उपआयुक्त वसुंधरा बारवे यांनी 21 मे 2026 रोजी हे कार्यालयीन परिपत्रक जारी केले. करारातील अटी व शर्ती संस्थेवर बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या संस्थांवर मनपा कडक भूमिका घेत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाबाबत मनपा लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.
पुणे: अनुसूचित जातीच्या (SC) ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील दलित समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘बार्टी’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) कडे आतापर्यंत सुमारे ८० हजार ई-मेल प्राप्त झाले असून, त्यापैकी ८५% म्हणजेच ६५ ते ७० हजार ई-मेल हे या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डंबाळे यांनी विशेष मोहीम राबवून उपवर्गीकरणावर तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
३० जून रोजी मुंबईत होणाऱ्या या महा-घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी पुनर्विलोकन समितीच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर समाजबांधवांना एकत्र करून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या बैठकांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
विशेष मोहिमेला ७० हजार ई-मेलचा पाठिंबा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे अवघ्या काही दिवसांत बार्टीकडे हजारो आक्षेप नोंदवले गेले. एकूण आलेल्या ई-मेलपैकी ८५ टक्के जनतेने उपवर्गीकरणाच्या विरोधात कौल दिला आहे, जेणेकरून समाजाचा या निर्णयाला किती मोठा विरोध आहे हे स्पष्ट होते.
समाजात फूट पडण्याची भीती आक्षेप नोंदवताना राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केले की, ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या विविध उपजातींमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली सामाजिक आणि राजकीय एकजूट या वर्गीकरणामुळे मोडीत निघेल. हा निर्णय दलित समाजात फूट पाडणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“बार्टीकडे आलेल्या ७० हजार आक्षेपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. बहुतांश समाजाचा या उपवर्गीकरणाला विरोध असतानाही जर सरकारने एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर ३० जून रोजी मुंबईत होणारा विधानसभेचा घेराव हा ऐतिहासिक असेल,” असा थेट इशारा राहुल डंबाळे आणि पुनर्विलोकन समितीने सरकारला दिला आहे.
डोंबिवली- कॉलेजपासूनचे आठ वर्षांचे प्रेम, त्यानंतर न्यायालयात कायदेशीर ‘कोर्ट मॅरेज’ होऊनही, केवळ मुलगा ‘बौद्ध’ (दलित) समाजाचा आहे म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीने गायब केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डोंबिवली परिसरात राहणारा ओंकार आणि पीडित तरुणी यांचे कॉलेज जीवनापासून म्हणजेच गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मुलीच्या घरच्यांनी जेव्हा तिच्यासाठी इतरत्र स्थळे पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने धीर करून कुटुंबाला आपल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, मुलगा दलित समाजाचा असल्याचे समजताच मुलीच्या आई-वडिलांनी आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध करत तिला घरात बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
घरच्यांचा विरोध पाहाता, या प्रेमी युगुलाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले. दोघांनी ठाणे न्यायालयात जाऊन रीतसर कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर दोन दिवस ते एकत्रही राहिले. मात्र, त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अचानक मवाळ भूमिका घेत एक नवी चाल खेळली. “समाजासाठी आपण चारचौघांत रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावू,” असे सांगत मुलीच्या कुटुंबीयांनी व मुलाची समजूत काढली. त्यांच्यावर विश्वास ठेवून ओंकारने स्वतः हॉलचे पैसे भरले आणि २४ मे २०२६ चा लग्नाचा मुहूर्त ठरला. २१ मे रोजी हळदीच्या विधीची तयारी सुरू असतानाच, काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आल्याने ओंकारने पोलिसांना सोबत घेऊन मुलीचे घर गाठले. मात्र, तिथे पोहोचताच सर्वांचेच पाय जमिनीला खिळले; मुलीच्या घराला मोठे कुलूप ठोकलेले होते आणि तिचे संपूर्ण कुटुंब मुलीसह गायब झाले होते. ‘चार चौघांत लग्न लावू’ म्हणून केला विश्वासघात!
याबाबत ओंकारने सांगितले की, “आम्ही कोर्ट मॅरेज केले होते. पण तिच्या आई-वडिलांनी आणि मामाने आमच्याशी गोड बोलून समजूत काढली. ‘समाजासाठी आणि अब्रूसाठी आपण चार चौघांत रितीरिवाजाप्रमाणे तुमचे लग्न लावून देऊ’ असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतः लग्नकार्यासाठी हॉल बुक केला, त्याचे पैसे भरले आणि लग्नाची सर्व तयारी केली. मात्र, २१ मे रोजी हळदीच्या दिवशीच त्यांनी माझ्या पत्नीला जबरदस्तीने कुठेतरी गायब केले आणि स्वतःच्या घराला टाळे लावून पळून गेले. माझ्या पत्नीच्या जिवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याला तिचे आई-वडील आणि मामाच सर्वस्वी जबाबदार असतील.”
या धक्कादायक प्रकारानंतर ओंकारने तातडीने मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची (Missing) अधिकृत तक्रार नोंदवली आहे. “२१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी गायब झाल्याची तक्रार पतीकडून प्राप्त झाली आहे. आंतरजातीय विवाहाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच तिचा शोध घेतला जाईल,” असे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी म्हटले आहे.
मुंबई दि. २३ : महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील येरवडा (पुणे), ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील चार प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालये समाजातील विशेषतः वंचित घटकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवत आहेत. बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवांद्वारे ही रुग्णालये हजारो रुग्णांना उपचार देत असून, सुमारे ५७०० खाटांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा व मनुष्यबळ आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने या रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनालाही चालना मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या योजनेशी सुसंगत उपक्रम
केंद्र शासनाच्या मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत, स्ट्रेंथनिंग पीजी डिपार्टमेंट इन मेंटल हेल्थ स्पेशालिटिज (स्कीम बी) या योजनेनुसार मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (एनएमएचपी) १२व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेने विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
शासन निर्णय आणि अभ्यासक्रमांची सुरुवात
राज्य शासनाने १६ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करून खालील अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे: एम.डी. सायकिअॅट्री एम.फिल क्लिनिकल सायकॉलॉजी एम.फिल सायकियाट्रिक सोशल वर्क डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग
हे अभ्यासक्रम प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, पुणे (येरवडा) आणि नागपूर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर येथे एम.डी. सायकिअॅट्रीला सुरुवात
प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एम.डी. सायकिअॅट्री अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील अध्यापकांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सुरू झाला असून, दरवर्षी ४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. आजपर्यंत १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
नर्सिंग क्षेत्रातही प्रगती
प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे व पुणे येथे डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रम २०२२-२३ पासून सुरू करण्यात आला आहे.प्रत्येक ठिकाणी दरवर्षी २० विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.आतापर्यंत ठाणे येथून ५९ आणि पुणे येथून ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होत आहे.
या चारही प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे पूर्णतः अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर केल्यामुळे पुढील फायदे अपेक्षित आहेत. रुग्णांना अधिक दर्जेदार आणि विशेषज्ञ उपचार सेवा. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढ. संशोधन आणि नवोपक्रमाला चालना. ग्रामीण व वंचित भागांपर्यंत गुणवत्तापूर्ण मानसिक आरोग्य सेवा विस्तार होणार.
महाराष्ट्रातील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर हा केवळ आरोग्य क्षेत्रातील नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील मानसिक आरोग्य सेवांना नवे बळ देणारा ठरेल.
चंद्रपुरातील वाघ हल्लाप्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
रोजगार हमी योजनेअंतर्गत तेंदूपत्ता लागवडीवर भर द्यावा; मजुरांसोबत कंत्राटदारांनी सुरक्षा रक्षक देणे बंधनकारक करावे.
मुंबई, दि.२३ : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
या घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २०० ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यांत बळी गेला असून, चालू वर्षातच १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीही १० मे २०२५ रोजी गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हजारो ग्रामीण नागरिकांचा उदरनिर्वाह तेंदूपत्ता संकलनावर अवलंबून असताना, त्यांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागत असल्याची खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. “वन विभागाने तेंदूपत्ता संकलनाचे ठेके देण्याऐवजी स्थानिक नागरिकांना रोजगार हमी योजनेतून पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार हमी योजनेअंतर्गत तेंदूपत्ता लागवडीवर भर द्यावा. तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांसोबत कंत्राटदारांनी सुरक्षा रक्षक देणे बंधनकारक करावे. नागरिकांना जंगलात ढकलून त्यांच्या जीवाशी खेळणे थांबले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘चंद्रपूर जिल्हा वाघ-मानव संघर्ष तांत्रिक समिती’ने २०२१ मध्ये विविध उपाययोजना सुचवून अहवाल सादर केला होता. मात्र, पाच वर्षांनंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रोजगार हमी विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना पुन्हा जंगलावरच अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळेच अशा दुर्घटना वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“वन्यप्राण्यांचे संरक्षण आवश्यक आहे; मात्र त्याचवेळी स्थानिक नागरिकांचे जीवही तितकेच महत्त्वाचे आहेत. जंगलातील लोकांना सुरक्षित आणि सन्मानजनक पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच समितीच्या शिफारशींवर साधक-बाधक चर्चा करून तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत प्रशासनाकडून आढावा घेतला असून, तात्काळ योग्य ती मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुणे काँग्रेसला नवी उभारी देणार; दोन्ही शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करतील: – डॉ. विश्वजित कदम
पुणे : काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. पुणे शहर, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, महिला व चिमुरड्यांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. “राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते आणि गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. अनेक प्रकरणांमध्ये केवळ जलदगती न्यायालयांची घोषणा झाली, परंतु प्रत्यक्षात किती जणांना न्याय मिळाला, असा सवाल करत राज्य सरकार झोपले आहे की जागे, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरात पहिल्यांदाच पूर्व व पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. हे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच, पुण्याचे पुढील महापौर व खासदार हे काँग्रेसचेच असतील, असा दावाही नवनियुक्त शहराध्यक्षांनी या प्रसंगी केला. नुकतीच पुणे शहर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी व पुणे पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनीही डॉ. कदम यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. या पदग्रहण समारंभास माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, शानी नौशाद, अमिर शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, नगरसेवक विशाल मलके, नगरसेवक सुनिल शिंदे, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका वैशाली भालेराव, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका अश्विनी लांडगे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, उस्मान तांबोळी, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, संजय मोरे, अस्लम बागवान, अनिल सोंडकर, सचिन आडेकर, सतिश पवार, लता राजगुरू, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, एन.एस.यु.आय. अध्यक्ष अभिजीत गोरे, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, लता राजगुरू, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रमेश सकट, राजू ठोंबरे, प्रदिप परदेशी, मोहसिन शेख, मजहर मणियार, विक्रम खन्ना, सुरेश कांबळे, गणेश गुगळे, अमित कांबळे, संजय मानकर, मतिन शेख, ॲड. राजश्री अडसूळ, सचिन दुर्गाडे, ऋषिकेश जाधव, चेतन पडवळ, हर्षद हांडे, देविदास लोणकर, अविनाश अडसूळ, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, ‘संघटन सृजन’ या देशव्यापी अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. केंद्रीय निरीक्षकांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून तयार केलेल्या अहवालाच्या आधारे या दोन्ही अनुभवी नेत्यांची निवड करण्यात आली आहे. चवधरी यांनी विधान परिषदेतही काम केले असून, हे दोन्ही शहराध्यक्ष पुणे काँग्रेसला निश्चितच नवी उभारी देतील. शहरातील वाहतूक कोंडी, बिघडलेलीकायदा-सुव्यवस्था आणि पाणीटंचाई या सत्ताधारी भाजपच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंधन दरवाढ आणि युवकांचा अपमान केंद्रातील भाजप सरकारने निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला. “आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती मुळे इंधन दरावर परिणाम होणार याची कल्पना असूनही सरकार केवळ निवडणुकांमध्ये मग्न होते आणि मतदान संपताच अवघ्या ४८ तासांत दरवाढ करण्यात आली,” असे ते म्हणाले. याशिवाय, देशातील युवा शक्तीला ‘झुरळ’ म्हणून हिणवणे हा युवकांचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
‘नीट’ पेपर फुटीबाबत केंद्रावर निशाणा वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीवर बोलताना डॉ. कदम यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात असा कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रारंभी काँग्रेस भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी, स्व. इंदिराजी गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण, हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांस डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक वंदे मातरमने झाली. याप्रसंगी पुणे पश्चिमचे अध्यक्ष दीप्ती चवधरी व पुणे पूर्वचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या निवडीबाबत पक्षनेत्यांचे आभार मानून, पुणेकरांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलने करेल व आगामी काळात पुण्यात अनुकूल बदल घडवून आणेल असे म्हटले. कार्यक्रमास कार्यकर्त्यांने मोठी गर्दी केली होती.
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांची ताकद असल्याचा दावा करत पुण्याची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला २५ मे पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महायुतीच्या कंपूत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. पुण्याची जागा आमची पारंपरिक असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले सर्वाधिक सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जात असताना दुसरीकडे आपल्या संख्याबळासह स्थानिक आघाड्यांचीही साथ घेत पुण्याची जागा भारतीय जनता पक्षालाच मिळायला हवी, असा दावा केला जात आहे.
पुण्यातील भाजपच्या नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात पुण्याची जागा ही भाजपनेच लढवावी, असा आग्रह धरण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. गणेश बिडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची आकडेवारी मांडत जिल्ह्यात भाजपच मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आलेले आहेत. तर दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य, आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्यांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा बिडकर यांनी केला आहे. सर्व आकडे पाहिल्यास एकूण ३३३ मतांची भक्कम ताकद भाजपकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
भाजपकडून मांडल्या जाणाऱ्या गणितानुसार भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य आहेत, त्यात स्थानिक आघाड्यांची २४ मतांची भर पडल्यामुळे भाजपने तब्बल ३५ मतांची आघाडी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे महायुतीतील जागावाटपात पुण्याची जागा भाजपनेच लढवावी, यासाठी पक्षाने जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.
पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते असणारे गणेश बिडकर हे स्वतः विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्थानिक पातळीवर मोठ्या ताकदीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेत पुण्याच्या जागे संदर्भात चर्चा केली. ही जागा राष्ट्रवादीची पारंपरिक असल्याने आत्ताही आपल्याकडेच राहायला हवी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र आता भाजपने जुळलेल्या ३३३ सदस्याच्या आकड्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होणार आहे.
महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याला न्याय देणारा निर्णय
पुणे.दि.२३: पत्नीने स्वयंपाक, साफसफाई किंवा घरातील इतर कामे करण्यास नकार दिला म्हणून ती वैवाहिक कायद्यानुसार क्रूर ठरत नाही, तसेच पत्नी ही घरकामासाठी ठेवलेली मोलकरीण नसून तिच्या सन्मानाचा आदर राखला गेला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आमदार व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे.
न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले आहे. महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याला न्याय देणारा हा निर्णय अनेक महिलांना दिलासा देणारा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आजच्या काळातील कामकाजी महिलांच्या वास्तवाचा विचार करून न्यायालयाने घेतलेली भूमिका संवेदनशील आणि दिशादर्शक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले. पत्नी ही केवळ घरकामासाठी नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वातंत्र्याचाही आदर झाला पाहिजे, हा महत्त्वाचा संदेश या निर्णयातून समाजाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या, विधानपरिषद सदस्या व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा, या नात्याने न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल दोन्ही न्यायमूर्तींचे आपण मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत तीव्र नाराजी
पिंपरी, पुणे (दि.२३ मे २०२६) चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ- चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्तता मिळावी, यासाठी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. यापूर्वी मुंबई, आझाद मैदान येथे आणि पुण्यामध्ये आरटीओ कार्यालयावर वाहन चालकांनी आंदोलन केले आहे. तरी देखील या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, ‘इ-चलन’ कारवाई चुकीची आहे. शासनाने बस मालकांना या त्रासापासून मुक्त करावे, अन्यथा पुन्हा राज्यात बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलनाच्या भडका उडेल असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला. शुक्रवारी, (दि.२२ मे) पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपरी येथे झाली. यावेळी पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी चिंचवड बस असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, दशरथ पानमंद, भाऊसाहेब घोमल, स्वामी गुजर, राहुल मुळे, देवदत्त रावल सर्व सभासद, पदाधिकारी आणि राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. राजन जुनवणे यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या युरो सिक्स वाहनांमुळे खर्चामध्ये खूप वाढ झाली आहे. परंतु त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही. या तंत्रज्ञानामुळे ब्रेक डाऊनचे प्रमाण देखील वाढले आहे हे त्रासदायक आहे. तसेच टायर आणि स्पेअर पार्ट चे वाढलेले भाव उत्पन्नावर विपरीत परिणाम करतात. याच्या किमती कमी करून सरकारने वाहतूकदार, बस चालकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. किरण देसाई यांनी या व्यवसायातील अडचणी वर मात करण्यासाठी संघटनेची गरज असल्याचे सांगितले. तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे लॉक डाऊन सारखी परिस्थिती होऊ शकते, यासाठी संघटनेने तयार राहायला हवे. येणाऱ्या संकटांना संघटना एकत्रितपणे सामोरे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकाश गवळी यांनी महाराष्ट्रातील संघटनेच्या कामाची माहिती दिली. एआरटीओ पवन नवादे यांनी सांगितले की, आरटीओ या सभासदांसाठी अनेक माहितीपर उपक्रमांचे आयोजन करत असते. प्रत्येक बस मालकांनी नियम आणि कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले. टाटा मोटर्स कंपनीने प्रायोजक तसेच अशोक लेलँड आणि व व्ही. ई. कमर्शियल व्हेईकल या कंपन्यांनी सह प्रायोजक म्हणून सहकार्य केले.
समारोप सत्रात संगीत कार्यक्रम आणि लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. स्वागत दीपक कलापुरे, सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे आणि आभार बाळासाहेब बोराटे यांनी मानले.
पहिल्याच दिवशी रसिकांची प्रचंड गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह
मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी, ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’ च्या ६ व्या पर्वाचा आज सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला. २२ ते २४ मे २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकर रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांचा अफाट उत्साह आणि मिळालेला हाऊसफुल प्रतिसाद पाहता, हा वीकेंड चित्रपटप्रेमींसाठी एक मोठी धमाल ठरणार यात शंका नाही!
महोत्सवाचे उद्घाटन आणि उद्घाटनाची संध्याकाळ अत्यंत दिमाखदार ठरली. मराठी चित्रपटांच्या समृद्ध परंपरेचा सन्मान करत, उद्घाटन सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा आणि दिग्गज कलावंतांचा ‘प्राईड ऑफ मराठी सिनेमा’ या मानाच्या किताबाने गौरव करण्यात आला.
यामध्ये दिग्गज अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा गौरव विशेष ठरला. त्यांना मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
या सोहळ्यात चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर प्रतिभावंतांनाही ‘प्राईड ऑफ मराठी सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यांची यादी खालीलप्रमाणे:
आशिष बेंडे (‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी)
सुजय डहाके (‘श्यामची आई’ चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी)
सुधाकर रेड्डी यक्कंती (‘नाळ २’ चित्रपटाच्या अप्रतिम छायांकन आणि दिग्दर्शनासाठी)
त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (‘नाळ २’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी बालकलाकार कंपनी म्हणून विशेष सन्मान)
कबीर खंदारे (‘जिप्सी’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी), आणि दशावतार (अनोख्या सिनेमॅटिक सादरीकरणासाठी आणि लोककलेच्या सन्मानासाठी).
तसेच या सोहळ्यात सिद्धार्थ जाधव यांना ‘पॉवरहाउस परफॉर्मर ऑफ द इयर’ अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल आणि गिरिजा ओक यांना ‘मराठी दिवा ऑफ द इयर’ सौंदर्य आणि कसदार अभिनयासाठी हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
‘मॅगझिन’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगने झाली सुरुवात!
पुरस्कार सोहळ्यानंतर महोत्सवाचा ओपेनिंग चित्रपट ‘मॅगझिन’ चा प्रीमियर दाखवण्यात आला. तरुण दिग्दर्शक शुभम शेवडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पहिल्याच दिवशी थिएटर पूर्णपणे हाऊसफुल होते आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.
हा महोत्सव २४ मे पर्यंत चालणार असून, पुढील दोन दिवसांत दर्जेदार मराठी चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुणेकर प्रेक्षकांना आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना जवळून अनुभवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, हा फेस्टिव्हल सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, अनेक सेलिब्रिटींना भेटण्याची आणि एका सिनेमॅटिक वीकेंडचा भरभरून आनंद घेण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत आहे. ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स, युनिव्हर्सिटी रोड येथे सुरू असलेला हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.
अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. या कारवायांमध्ये अंदाजे 11.25 कोटी मूल्य असलेले 2.25 किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. शरीरामध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चार परदेशी नागरिकांना या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, 22 मे 2026 रोजी डीआरआय अधिकाऱ्यांनी अदीस अबाबा येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एक महिला आणि एक पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर, दोन्ही प्रवाशांनी तस्करीसाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्याकडून एकूण 84 कॅप्सूल हस्तगत करण्यात आल्या. अवैध बाजारात जवळपास 7 कोटी रुपये किंमत असलेले 1.40 किलोग्रॅम कोकेन आढळून आले.
या आधीच्या कारवाईत, 19 मे 2026 रोजी डीआरआय अधिकाऱ्यांनी अदीस अबाबा येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका आफ्रिकन पुरुष आणि एका आफ्रिकन महिला प्रवाशाला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान, दोन्ही प्रवाशांनी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या शरीरातून एकूण 63 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. अवैध बाजारात सुमारे 4.25 कोटी रुपये किंमत असलेले 850 ग्राम कोकेन जप्त करण्यात आले.
हा सर्व अंमली पदार्थांचा साठा अंमली पदार्थ आणि अंमली द्रव्ये कायदा, 1985 अंतर्गत जप्त करण्यात आला असून, या दोन्ही कारवायांधील एकूण 4 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
नशामुक्त भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पावर डीआरआय ठाम असून, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि देशाचे आरोग्य, कल्याण व सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
पुणे : भाऊसाहेब भोईर यांच्या ‘मोरया थिएटर्स’ निर्मित ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या संगीत नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने प्रेक्षकांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव दिला. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विठ्ठल भक्ती, अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक विचार यांचा सुरेख संगम या नाटकातून अनुभवायला मिळाला.
नाटक सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृह परिसर हरिनामाच्या गजराने आणि अभंगांनी भक्तिमय झाला होता. प्रवेशद्वारावर संजावटीतून करून वारीचे वातावरण साकारण्यात आले होते. नाट्यगृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रसिकाच्या कपाळी चंदनाचा टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी संप्रदायातील मंडळी, कला रसिक आणि युवा प्रेक्षकांनी नाट्यगृह खचाखच भरले होते. तिसरी घंटा झाल्यानंतर ‘सांगा विठ्ठल माझा मला पावलं का?’ या अभंगाने नाटकाची सुरुवात होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
लेखक विनोद रत्ना यांनी आधुनिक विचारांचा युवक ‘डीके’ अर्थात ज्ञानेश्वर कदम आणि त्याच्या अध्यात्माकडे होणाऱ्या प्रवासाची कथा प्रभावीपणे उभी केली आहे. सुरुवातीला वारीकडे अंधश्रद्धा म्हणून पाहणारा डीके विविध वारकऱ्यांच्या सहवासातून आत्मिक परिवर्तन अनुभवतो. “तुमच्या रक्तात पण वारी आहे,” हा संवाद नाटकाचा गाभा स्पष्ट करून जातो. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संघर्ष आणि समन्वय संवादातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
दिग्दर्शक मनोज डाळिंबकर आणि सहायक दिग्दर्शक आकाश थिटे यांच्या कल्पक दिग्दर्शनामुळे नाटक अधिक प्रभावी ठरले. प्रकाशयोजना, ध्वनी, पारंपरिक वेशभूषा, नृत्यरचना आणि जिवंत नेपथ्यामुळे आळंदी, जेजुरी, दिंडी, पालखी आणि चंद्रभागेचा प्रवास रंगमंचावर साकारण्यात आला. प्रेक्षकांमधून निघणारी दिंडी, रिंगणातील घोडा आणि संतांची गळाभेट हे प्रसंग विशेष दाद मिळवून गेले.
नाटकातील संगीत हे या प्रयोगाचे मोठे वैशिष्ट्य ठरले. अभंग, पोवाडा, गोंधळ आणि आधुनिक रॅप शैलीचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. निरंजन पेडगावकर यांच्या संगीतबद्ध चालींना गायक-वादकांनी समर्थ साथ दिली. ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर, ‘मल्हारी माझा राजा’चा जल्लोष आणि दिंडीवरील पदांनी वातावरण भारून गेले.
प्रमुख भूमिकेत प्रणव सपकाळे यांनी डीकेच्या मनातील संभ्रम, तर्क आणि अध्यात्मिक परिवर्तन प्रभावीपणे साकारले. मनोज डाळिंबकर यांच्या ‘जाधव साहेब’ भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मानसी कुलकर्णी यांच्या वृद्ध आजीच्या भूमिकेने अनेकांना भावूक केले. “जगणं आणि मरण यांच्या मधली जी पायवाट आहे ना, ती वारी आहे,” हा संवाद सभागृहात शांतता पसरवून गेला.
प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू होते. काही जण अभंग गुणगुणत बाहेर पडत होते, तर काहींनी प्रत्यक्ष पंढरपूर वारी करण्याची इच्छा व्यक्त केली. “हे नाटक नाही, ही प्रत्यक्ष वारी आहे,” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ रसिकाने व्यक्त केली.