Home Blog Page 40

बाणेर-बालेवाडीतील वाढत्या वीज समस्यांवर चंद्रकांतदादा पाटील आक्रमक

0

नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे- ना. पाटील

महावितरण अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूड येथील आपल्या निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बजावले.

बैठकीदरम्यान बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भागात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, जोडणीच्या ठिकाणी केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून; त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

याशिवाय, बाणेर-बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याने विद्युत भारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत विद्यमान वीज यंत्रणा अपुरी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी ना. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस आदी भागातील वीज वितरण यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

याशिवाय या भागासाठी नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, त्याबाबत महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी NCL अतिउच्चदाब केंद्रातून दोन नवीन फीडर सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

वरील कामांमध्ये कोणत्याही स्तरावर अडथळे निर्माण झाल्यास मंत्रालय स्तरावर अथवा महावितरण मुख्यालय स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. विशेषतः अत्यावश्यक वीज दुरुस्तीच्या कामांसाठी रस्ते खोदाई परवानग्यांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पुणे महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सदर प्रश्न सोडविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना आश्वास्त केले.

तसेच, बाणेर-बालेवाडी परिसरातील वीजपुरवठ्याचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. नागरिकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला नगरसेविका मयूरी कोकाटे, महावितरणचे गणेशखिंड मंडळाचे अधिक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, पंडित दांडगे, उमेश उर्पे, भाजप कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर,उमाताई गाडगीळ, अनिकेत चांदेरे,निकीता माथाडे तसेच BBPRA (बाणेर, बालेवाडी, पाषाण रेसिडेंस असोसिएशन)चे अध्यक्ष विजय वरणगावकर, सारंगजी वाबळे, संजयजी वाघूलदे, अमेय जगताप, सारंग रानडे यांच्यासह बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल: हर्षवर्धन सपकाळ

0

SIR मोहिमेसंदर्भात काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार आमदार व BLA1 ची राज्यस्तरीय रणनीती बैठक टिळक भवन येथे संपन्न

मुंबई दि. २२ मे २०२६

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आज टिळक भवन, दादर येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात व नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खासदार शोभा बच्छाव, खासदार बळवंत वानखेडे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार रविंद्र चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते खासदार, आमदार व BLA1 उपस्थित होते. मतदार यादीतील कथित गैरप्रकार, वोटचोरी आणि SIR संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा तसेच केरळचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR मोहिमेबाबत सुरु केलेल्या मोहिमेच्या लोगोचे सर्व प्रमुख्य नेत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बैठकीदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, सतेज ऊर्फ बंटी पाटील, आशुतोष शिर्के, निमिष साने यांनीही SIR मोहिमेच्या अनुषंगाने सादरीकरण आणि मार्गदर्शन केले. बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,
सपकाळ यांनी सांगितले की, SIR मोहिमेअंतर्गत BLA-1 संदर्भातील विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली असून संपूर्ण राज्यात बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची टीम तसेच राज्यातील अनुभवी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पडताळणी, हरकती व दुरुस्त्या यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेशी समन्वय साधून मतदार यादी पडताळणी मोहिमेला गती देण्याचे काम समितीमार्फत करण्यात येणार आहे.

आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, “राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.
राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “पेट्रोल डिझेल टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही.

आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. भाजप मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर सर्व समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे. जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिलेले आश्वासन आणि त्यानंतर उधळलेला गुलाल महाराष्ट्राने पाहिला. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाबाबत सरकारने काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रकाश मेहतांपासून तानाजी सावंतांपर्यंत या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. मात्र सरकार स्वतःच्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी झाली तर सरकारमध्ये सहभागी असलेले अनेकजण गजाआड जातील. वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारला धारेवर धरत म्हटले की, हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली रक्कम भरण्याची ताकद शेतकऱ्यांकडे राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. ते पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली धार्मिक आणि जातीय विभाजन निर्माण करून देशाला लुटण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहेत.

महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय: छत्रपती वृषाली राजे भोसले

एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा

पुणे:

महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या अनेक मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्य ही देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केली.

एनसीईआरटीने हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे. याबाबत राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. खुद्द राज्य सरकारने पत्र देऊन देखील एनसीईआरटीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या बाबीच्या निषेधार्थ छत्रपती वृषाली राजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्र धर्म मोर्चाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून दैदीप्यमान इतिहासाला लपवण्याचा आणि खोटा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती घराण्यासह संपूर्ण महाराष्ट्राकडून आपण त्याचा निषेध करीत आहोत, असे छत्रपती वृषाली राजे यांनी यावेळी नमूद केले.

तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबतीत केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करतानाच त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशाची पाठ्यपुस्तकात पुनर्स्थापना होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही दिला. या मोर्चात इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विविध संघटना, संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

देवस्थानांच्या हितासाठी सूचना-हरकती सादर करा; शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करू — शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई.दि.२२: महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६” संदर्भात सूचना व हरकती मागविल्या असून राज्यातील सर्व संबंधित देवस्थान संस्थांनी या मसुद्याचा सखोल अभ्यास करून आपली मते शासनाकडे सादर करावीत, असे आवाहन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील विविध देवस्थान संस्थांना पत्र पाठवून दि. ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सूचना, हरकती व मते सादर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सूचना व हरकतींची प्रत माहितीस्तव त्यांच्या कार्यालयालाही पाठवावी जेणेकरून शासन स्तरावर देवस्थानांच्या हिताच्या मुद्द्यांवर प्रभावी पाठपुरावा करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील देवस्थानांचा आराखडा, व्यवस्थापन, परंपरा आणि हक्क यासंदर्भातील विविध विषय सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. देवस्थानांच्या हिताचे रक्षण व्हावे आणि नवीन कायद्यात त्यांचे मत प्रतिबिंबित व्हावे, यासाठी सर्व संबंधितांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील मसुदा काळजीपूर्वक वाचून आपली भूमिका मांडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेला मसुदा ‘घोषणा’ विभागात प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर देवस्थान संस्थांनी अभ्यासपूर्ण सूचना सादर कराव्यात, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

कार्यालय पत्ता:
डॉ. नीलम गोऱ्हे
मा. शिवसेना नेत्या व आमदार,
सिल्व्हर रॉक्स, हरे कृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, पुणे ४११०१६,
संपर्क: 9028333305

ईमेल: c3purandar@gmail.com

आदित्य बिर्ला कॅपिटलकडून व्यवसायाच्या वाढीसाठी उभारले ४,००० कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल

आदित्य बिर्ला ग्रुपकडून ३,०८० कोटी रुपये आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून ९२० कोटी रुपये

मुंबई: आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या (“एबीसीएल”) संचालक मंडळाने भांडवलाचा पाया मजबूत करण्याच्या आणि विकासाच्या पुढील टप्प्यातील गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रासिमि इंडस्ट्रीज लिमिटेडला (प्रवर्तक) २,८८० कोटी रुपये, सूर्याजा इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड, सिंगापूरला (आदित्य बिर्ला समूहाची संस्था) २०० कोटी रुपये आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला (आयएफसी) ९२० कोटी रुपयांच्या प्राधान्य शेअर्स वाटपास मंजूरी दिली आहे. सेबीच्या आयसीडीआर  नियमांनुसार, हे प्राधान्य शेअर्स वाटप प्रति इक्विटी शेअर ३५६.०२ रुपये किमतीवर केले जाईल, जे भागधारक आणि इतर आवश्यक मंजूरी तसेच नेहमीच्या अटींच्या अधीन असेल.

या प्राधान्य शेअर्स वाटपातून मिळणारा निधी विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल, ज्यामध्ये भांडवली पाया वाढवणे, कर्ज देण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक निधीची पूर्तता करणे आणि कंपनीच्या उपकंपन्या/ संयुक्त उपक्रम/ सहयोगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे यांसारख्या इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंचा समावेश आहे.

या गुंतवणुकीबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “आर्थिक सेवा भारताच्या आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आल्या असून त्या भांडवल निर्मितीला गती देत आहेत, वित्तीय समावेशन वाढवत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणाला पाठबळ देत आहेत. जसे हे क्षेत्र विकसित होत आहे, तसे विविधीकृत प्लॅटफॉर्म, मजबूत सुशासन (governance) आणि तंत्रज्ञान-आधारित अंमलबजावणी असलेल्या संस्था विकासाच्या मार्गाला वेगाने आकार देत आहेत. गेल्या काही वर्षांत, एबीसीएलने आर्थिक सेवा क्षेत्रात आपली व्याप्ती वाढवली असून भक्कम डिजिटल क्षमता आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीच्या जोरावर उच्च दर्जाच्या व्यवसायांचा पोर्टफोलिओ तयार केला आहे. विविध विभागांमधील तिची व्याप्ती आणि संस्थात्मक क्षमता निर्माण करण्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन, भारताचे वित्तीय क्षेत्र विस्तार आणि अत्याधुनिकतेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना या समूहाला अधिक मजबूत स्थितीत आणतो.”

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या एमडी आणि सीईओ कु. विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “आमच्या प्रवर्तकांच्या निरंतर विश्वासाबद्दल आणि आयएफसीने आमच्यावर दाखवलेल्या भरवशाबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. सर्व आवश्यक घटक उपलब्ध असल्याने, या भांडवल उभारणीमुळे (capital infusion) आम्हाला भारतातील विकासाच्या संधींमध्ये सहभागी होणे, ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करणे आणि डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्स प्रदान करणे शक्य होईल. आमच्या एकूण कर्ज पोर्टफोलिओपैकी सुमारे ५७ टक्‍के हिस्सा एसएमईच्या व्यावसायिक कर्जांचा आहे, जो या क्षेत्राप्रती असलेली आमची मजबूत वचनबद्धता दर्शवतो. जबाबदार व्यावसायिक पद्धतींवर आधारित सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था तयार करण्यावर आमचा भर आहे. शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्यासाठी आम्ही व्यक्ती आणि व्यवसायांना अखंड कर्ज उपलब्धता, डिजिटल क्षमता आणि सखोल परिसंस्था सोल्यूशन्सद्वारे सक्षम करत आहोत.”

आयएफसीचे आशिया आणि पॅसिफिक क्षेत्राचे प्रादेशिक उपाध्यक्ष श्री. सर्वेश सुरी म्हणाले, “लहान व्यवसाय हे मोठ्या संकल्पनांवर आधारलेले असतात आणि आदित्य बिर्ला कॅपिटलसोबतच्या या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करत आहोत. रोजगाराची निर्मिती करणे आणि आर्थिक संधींचा विस्तार करणे हे जागतिक बँक समूहाच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एमएसएमई हे वित्तपुरवठ्यासाठीच्या सर्वात मोठ्या न वापरलेल्या (untapped) संधींचे प्रतिनिधीत्व करतात. एबीसीएलची व्याप्ती, १,५०,००० पेक्षा जास्त मजबूत एमएसएमई ग्राहक वर्ग आणि डिजिटल क्षमतांचा वापर करून, रोजगार वाढवणाऱ्या क्षेत्रांमधील उद्योजक आणि व्यवसायांसाठी जबाबदार वित्तपुरवठ्याची पोहोच वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांना गुंतवणूक करणे, उत्पन्न वाढवणे, अधिक व चांगल्या रोजगारांची निर्मिती करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे शक्य होईल. ही गुंतवणूक वित्तीय समावेशन पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेची निदर्शक आहे आणि ती ‘विकसित भारत’ संकल्पनेशी सुसंगत आहे, जो भारताच्या विकासाची गाथा घडवणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगांना सक्षम करतो.”

आदित्य बिर्ला कॅपिटल ही एक विविधीकृत वित्तीय सेवा कंपनी आहे, जी ग्राहकांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांवरील बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज, गुंतवणूक, विमा आणि पेमेंट्स या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक सोल्यूशन्स प्रदान करते. व्याप्तीमधील मजबूत विस्तार, विविधीकरण आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीच्या जोरावर या कंपनीने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले असून ती आदित्य बिर्ला समूहासाठी एक प्रमुख ग्रोथ इंजिन म्हणून उदयास आली आहे. आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान, कंपनीने आपल्या पोर्टफोलिओची मजबूत गुणवत्ता राखत सर्व व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक वाढ नोंदवली आहे.

एनबीएफसी आणि हाउसिंग फायनान्सचा एकूण कर्ज पोर्टफोलिओ ३०% च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (सीएजीआर) वाढून २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे, तर अॅसेट मॅनेजमेंट आणि विमा व्यवसायांचे एकत्रित एयूएम १८ टक्‍क्‍यांच्या सीएजीआरने वाढून अंदाजे ५.९ लाख कोटी रुपये झाले आहे. विमा व्यवसायातील एकूण ग्रॉस प्रीमियम २१% च्या सीएजीआरने वाढून ३१,६३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत, कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा म्हणजेच पीएटी (अपवादात्मक आणि एकरकमी बाबी वगळून) २३ टक्‍क्‍यांच्या सीएजीआरने वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३,७९७ कोटी रुपये झाला आहे.

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ

मराठमोळा संगीतकार ‘सागर पाटिल’ ने रचला इतिहास, दुबईत प्रदर्शित केले “मॅंगो अँथम ” हे मराठी गीत
 दुबई, UAE :दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील (BeatXX) यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती,  आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दुर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. मध्यपूर्वेत ढोल-ताशाचा जागतिक ठसा सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केली आहे.

संगीतकार सागर पाटील (BeatXX) त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगतात, “‘BeatXX’ या कलाकार नावाखाली मी स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी संगीतशैली निर्माण केली आहे. मी संपूर्ण आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट देशात पहिल मराठी ढोल ताशा पथक सुरू केलं. त्यासाठी मला नुकताच महाराष्ट्र शासनाकडून “मराठी भाषा सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. भावना, कथा आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा आधुनिक संगीताशी केलेला संगम यामुळे संगीताची खास ओळख ठरली आहे. दुबईस्थित माझ्या होम स्टुडिओमधून मी विविध क्षेत्रांसाठी संगीत निर्मिती केली आहे, ज्यामध्ये लघुपटांसाठी बॅकग्राऊंड स्कोअर प्रादेशिक व अरबी चित्रपटांसाठी संगीत जाहिरातींसाठी जिंगल्स व ब्रँडेड ऑडिओ कंटेंट यांचा समावेश आहे. माझ नव गाण “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतच प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठी  नवनवीन गाणी घेऊन येईन.”

Link – https://youtu.be/XuzydHilIaY?si=dXwFi-OqakNfbc36

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

नवी दिल्लीतील जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत मानाचा पुरस्कार

मुंबई, दि. २२ मे २०२६: जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी अॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६’ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते व प्रामुख्याने विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता यावर विचारमंथन झाले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी ८६ हजार कर्मचारी आणि सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून विद्युत सुरक्षिततेचे उपक्रम व त्यासाठी जागतिक विक्रमी लोकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरण, कर्मचारी संघटना संवाद-उपक्रम, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण, मानव संसाधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला कर्मचारी सन्मान व सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहन यासारखे कर्मचारी-हितैषी अनेक उपक्रम राबविले. व्यवस्थापनाच्या मंजुरीने धोरणात्मक निर्णय अंमलात आणले.

या कामगिरीचे मूल्यमापन करून ‘जीईईएफ’च्या निवड समितीकडून जागतिक परिषदेत पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकासाच्या योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्याहस्ते श्री. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘गणा धाव रे’; सिद्धिविनायकाच्या दर्शनाने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

एका सामान्य भक्ताच्या असामान्य श्रद्धेची कथा मोठ्या पडद्यावर; ‘गणा धाव रे’मधून प्रेक्षकांना मिळणार अध्यात्मिक आणि भावनिक अनुभूती

मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा, सांस्कृतिक भान आणि भावनांचा हळुवार स्पर्श यांचा प्रभावी संगम घडवणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावविश्वाला स्पर्श करणारा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत. ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘गणा धाव रे’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तीभाव यांच्या गाभ्याशी जोडलेली एक भावस्पर्शी कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, नूतन जैन , चैतन्य राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या नेतृत्वाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण टीमने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला अधिकृत सुरुवात करण्यात आली. श्रद्धा आणि भक्ती या भावनेशी घट्ट नाळ जुळलेल्या या चित्रपटाची सुरुवातही बाप्पांच्या आशीर्वादाने झाल्याने संपूर्ण टीमसाठी हा क्षण अत्यंत भावनिक, समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरला. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह अभिनेत्री प्रणाली घोगरे तसेच अभिनेते आशुतोष गायकवाड आणि ओंकार पाटील उपस्थित होते.

कोकणाच्या निसर्गरम्य, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’ हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेचा प्रवास मांडणारा आहे. गणपती बाप्पांवरील नितांत विश्वास, गावकुसातील परंपरा, सण-उत्सवांची सांस्कृतिक उधळण आणि सामूहिक भावविश्व यांच्या माध्यमातून ही कथा अधिक जिवंत आणि प्रभावी बनते. श्रद्धा माणसाला संकटांशी सामना करण्याची ताकद कशी देते, भावनांना आधार कसा देते आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी निर्माण करते, याचा हृदयस्पर्शी वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे.

कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या या कथेमध्ये भक्त आणि दैवत यांच्यातील अदृश्य, पण भावनिक नात्याचा सूक्ष्म शोध घेण्यात आला आहे. कोकणातील ग्रामसंस्कृती, पारंपरिक जीवनपद्धती, लोकविश्वास आणि स्थानिक भावविश्व यांचे वास्तवदर्शी चित्रण चित्रपटाला अधिक समृद्ध आणि अस्सल बनवते. त्यामुळे ‘गणा धाव रे’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट न ठरता, प्रेक्षकांच्या मनात श्रद्धा, माणुसकी आणि भावनांचे नवे पदर उलगडणारा अनुभव ठरणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ही फक्त एक कथा नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाशी जोडलेला एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. अनेकदा आपण कथा निवडतो, पण या वेळी या कथेनेच मला निवडले. या कथेमधील अध्यात्मिक आणि मानवी भावनांचा प्रवाह प्रेक्षकांच्या मनापर्यंत निश्चित पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

दर्जेदार आशय, भावनिक गाभा, दमदार कलाकारांची फळी आणि सांस्कृतिक समृद्धी यांमुळे ‘गणा धाव रे’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप निर्माण करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रद्धा, माणुसकी आणि भक्तीभाव यांचे अतूट नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक, अध्यात्मिक आणि मनाला भिडणारा सिनेमॅटिक प्रवास ठरणार आहे.

उमेदवारांने नामनिर्देशन दाखल करतावेळी अवलंब करावयाच्या कार्यपद्ध्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि.२२: महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीच्या २०२६ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निवडणूक प्रचाराकरिता वापरण्यात येणारे वाहन, उमेदवारांने नामनिर्देशन दाखल करतावेळी अवलंब करावयाची कार्यपद्धती, मतपत्रिका छपाईच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील, या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्यावाहनाच्या टपापासून २ फुट उंधी पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस लावू नये. वाहनावर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार, प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी, त्यांच्या हितचिंतक, मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना पुढील बाबीवर निर्बंध घालण्यात येत आहेत. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे नमूना मतपत्रिकेसाठी कागद वापरणे तसेच कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिकेची छपाई करणे.

महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीच्या २०२६ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केले आहेत, सदरचे आदेश २२ जून २०२६ पर्यंत अंमलात राहणार असून या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

२९ मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत; एकूण ८६७ मतदारांचा समावेश

पुणे, दि. २२ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. २९ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील मतदान केंद्रांचा समावेश आहे :
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल, जुनी दगडी (हेरिटेज) इमारत, शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल, प्राथमिक शाळा, खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरुर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मुलींची शाळा, बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर या ठिकाणांचा समावेश आहे.

मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र सदस्य मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.

प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ,निवासी उपजिल्हा अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी , जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे निवडणूक विभागाच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून आवश्यक असल्यास मतदार यादीवर मुदतीत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. यादीवर हरकत ७ नंबर,यादीत नावं समाविष्ट करणे १७ नंबर, नावात बदल करणे ८ नंबर फॉर्म भरून देता येईल.

NEET पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका ‘मनीषा’ला अटक

नीट पेपरची महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री-आत्तापर्यंत 11 जणांना अटक
पुणे दि.२२:नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकरणातील एका नव्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी मनीषा संजय हवालदार या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या असून, या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे पेपरफुटीच्या या मोठ्या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनीषा हवालदार हिला सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तिची पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती, ज्यामुळे तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत सहज पोहोचता येत होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे हिच्या संगनमताने तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते आणि तपासादरम्यान हेच लीक झालेले प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या प्रश्नपत्रिकेत आल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी नीट-यूजी परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती रद्द करून आता ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाणार आहे. या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत असून, त्यांनी धडक कारवाई करत आपले अटकसत्र सुरू ठेवले आहे. मनीषा हवालदार हिच्या अटकेच्या रूपाने सीबीआयने पुण्यातून केलेली ही अकरावी मोठी कारवाई असून, यामुळे या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

सीबीआयचे म्हणणे आहे की, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे प्रकरण आणखी मोठे असू शकते. याच कारणामुळे एजन्सीला अजून हे निश्चित करता येत नाहीये की, किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला होता. चौकशीत समोर आले आहे की, काही पालकांनी पेपर पुढे इतर लोकांना विकला होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ

पुणे, दि. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्वेता पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचाराला विरोध करण्याची तसेच शांतता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शपथ दिली.
दहशतवाद व हिंसाचारामुळे समाजात भीती, अस्थिरता आणि द्वेषाचे वातावरण निर्माण होते. अशा प्रवृत्तींपासून दूर राहून लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच समाजात शांतता, बंधुता आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
या शपथविधी कार्यक्रमात नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधन

पुणे, दि. २१ – दैनिक प्रभातचे वरिष्ठ छायाचित्रकार संदीप अशोक घोडके (वय ४६) यांचे गुरुवारी (दि. २१ मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे पत्रकारितेसह सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. विश्रांतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक प्रभातमध्ये रुजू झाल्यानंतर दीड दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी अचूक टिपल्या. कर्तव्यदक्ष छायाचित्रकार असण्यासह पुणे स्टेशन परिसरात त्यांची स्वतःची वृत्तपत्र एजन्सीही होती. ते पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य होते. एक मनमिळावू, कष्टाळू आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या अकाली एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, आमदार बापू पठारे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात संदीप यांच्या कामाचा गौरव केला. याप्रसंगी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक रविकुमार इंडी, मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, एचआर व्यवस्थापक प्रवीण थूल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, नगरसेवक बॉबी टिंगरे, सुहास टिंगरे, सुरेंद्र पठारे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांसह छायाचित्रकार आणि नातेवाईक उपस्थित होते.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक सोशल इंजिनिअरिंग; सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत संघटन सृजन अभियानाला गती

मुंबई, दि. २१ मे २०२६

काँग्रेस पक्षाने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करताना व्यापक सोशल इंजिनिअरिंगचा अवलंब केला आहे. सामाजिक समतोल, विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व, संघटनात्मक क्षमता आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय नेतृत्व या निकषांवर आधारित या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यातील जिल्हाध्यक्ष नियुक्ती प्रक्रिया अत्यंत व्यापक आणि संघटनात्मक पद्धतीने राबवली होती. पक्षाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जवळपास १० दिवस मुक्काम करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, स्थानिक नेते आणि विविध समाजघटकांशी सविस्तर संवाद साधला. जिल्हानिहाय संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक नेतृत्वाची स्वीकारार्हता, जनाधार, सामाजिक प्रतिनिधित्व आणि पक्षविस्ताराची क्षमता यांचा अभ्यास करून निरीक्षकांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे जिल्हाध्यक्षांच्या नावांच्या शिफारसी सादर केल्या होत्या.

या शिफारसींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण ६९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये विविध समाजघटकांना पुढीलप्रमाणे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

  • ओपन प्रवर्ग – २४
  • ओबीसी – २२
  • अल्पसंख्याक – ७
  • अनुसूचित जाती (SC) – ७
  • अनुसूचित जमाती (ST) – ३
  • VJNT – २
  • महिला – ३

या नियुक्त्यांमधून काँग्रेस पक्षाने सामाजिक वास्तव लक्षात घेत सर्वसमावेशक संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेषतः ओबीसी समाजातील विविध घटकांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले असून आगरी, धनगर, कोमटी, कोष्टी, कुणबी, लेवा पाटील, लिंगायत, माळी, तेली, अशा समाजघटकांना संधी देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गात बौद्ध, मातंग, हिंदू खाटीक अशा समाजघटकांचा समावेश करण्यात आला आहे. अल्पसंख्याक समाजामधून मुस्लिम समाजालाही महत्त्वाचे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांचे सरासरी वय सुमारे ५० वर्षे असून अनुभवी, संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला संधी देण्याचाही प्रयत्न या प्रक्रियेत दिसून येतो.

या अभियानासोबतच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील निरीक्षकांवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. निरीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि काँग्रेसच्या विविध आघाड्या व सेल संघटनांशी संवाद साधत संघटनात्मक आढावा घेतला. त्यानंतर रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष, तसेच विभाग, आघाडी व सेल संघटनांच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून राज्यभरात सुमारे सात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरु आहे.

काँग्रेस पक्षाच्या या व्यापक संघटनात्मक पुनर्बांधणीमधून आगामी काळातील राजकीय आणि संघटनात्मक लढाईसाठी पक्ष सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी २६ ते ३० मे दरम्यान टिळक भवनमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबई, दि. २१ मे २०२६
राज्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राज्यात सात हजार नविन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन, दादर येथे २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत विविध विभागांच्या ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कार्याध्यक्षांसाठी विभागनिहाय एकदिवसीय कार्यशाळा पार पडणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळांमध्ये संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये सहभागी होऊन पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

कार्यशाळांचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे :

  • २६ मे – सोशल मीडिया विभाग
  • २७ मे – ओबीसी विभाग
  • २९ मे – अनुसूचित जाती विभाग
  • ३० मे – अल्पसंख्याक विभाग

प्रत्येक दिवशी सकाळी १० वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून दिवसभर विविध सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेचा समारोप सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले असून नव्या पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामासाठी सक्षम करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली.