Home Blog Page 41

नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात-पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

पुणे, दि. २१: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेमध्ये पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्यात याव्यात; या सेवा नागरिकांना घरपोच देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना राज्य लोकसेवा आयोगाच्या पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिल्या.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हणुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदी उपस्थित होते.

श्री. तेलंग म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना राज्यशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कायद्यान्वये पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अधिनियमांच्या अनुषंगाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबध्द सेवा, कार्यक्षम सेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व ई-प्रशासन संस्कृतीचा अवलंब करणे याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बारामती तालुक्यामध्ये एकूण १४७ इतके महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र आहेत. यापैकी किमान ५ आदर्श आपले सरकार सेवा ग्रामपंचायत व आपले सरकार सेवा केंद्र तयार करावेत. तसेच सर्व महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रांकरिता सेवा-सुविधाबाबतचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करणेत येईल, असेही श्री. तेलंग म्हणाले.

श्री. तेलंग यांनी मौजे माळेगाव बु. येथील महा ई-सेवा केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

रेल्वे विभागातर्फे प्रवाशांना प्रवासादरम्यान सावध आणि दक्ष राहण्याचे आवाहन


रेल्वेला लक्ष्य करणाऱ्या समाज-विघातक घटकांना आळा घालण्यासाठी संशयास्पद कृती अथवा ती करणाऱ्या व्यक्तींची माहिती 139 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी

रेल्वेला लक्ष्य करण्याबाबत अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, प्रत्यक्ष क्षेत्राच्या ठिकाणची गुप्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुधारण्यात येत आहे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

रेल्वे गाड्या, प्रवासी, स्थानकांचा परिसर तसेच रेल्वेचे प्रचंड जाळे यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे विभाग कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ड्रोन्स, सीसीटीव्ही इत्यादींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) बीटस्तरावर गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करुन मोहीम तत्वावर हे काम हाती घेण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आज घेण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या उच्च-स्तरीय सुरक्षा आढावा बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने दिल्लीस्थित ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभरातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी विस्तृत विचारविनिमय केला. रेल भवन येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णा आणि रवनीतसिंह बिट्टू देखील उपस्थित होते.

बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत असे लक्षात आले की गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आगीच्या घटनांसह विविध घटनांच्या प्राथमिक तपासामध्ये समाज-विघातक घटकांचा सहभाग दिसून येतो आहे. भारतीय रेल्वे विभागाने या घटनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून आरपीएफ या घटनांचा बारकाईने तपास करत आहे. अनेक प्रकरणांमध्ये रेल्वे विभागाने तातडीने केलेल्या सक्रीय कारवाईमुळे मोठ्या दुर्घटना टाळण्यात मदत झाली आहे. या संदर्भात असेही जाणवले आहे की गुप्तचर यंत्रणा बळकट करणे तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात वाट बघत थांबलेले असताना समाज-विघातक कारवायांना आळा घालण्यासाठी सक्रियपणे मदत करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले पाहिजे. म्हणूनच रेल्वे विभागाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद कृती घडताना अथवा संशयास्पद व्यक्ती वावरताना दिसल्यास त्याबद्दलची माहिती तातडीने 139 या रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी असे विभागाने सांगितले आहे.

सुरक्षा आढावा बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत सुधारित माहिती यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष घटनास्थळावरून गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. तंत्रज्ञान-चलित सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढ, रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यामध्ये सीसीटीव्हीचा विस्तार तसेच रेल्वे मंडळाचे मुख्यालय आणि क्षेत्रीय विभाग यांच्या दरम्यान परिचालनात्मक सुरक्षाविषयक समन्वय सुधारणे यांवर देखील अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. सदर बैठकीत सायबर सुरक्षेचे बळकटीकरण, कॅमेरा स्पेसिफिकेशन्सचे अद्ययावतीकरण तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित टेहळणी आणि देखरेख यंत्रणा यांचा वापर करणे अशा बाबींवर देखील या बैठकीत अधिक भर देण्यात आला. रेल्वे सेवेच्या जाळ्यामध्ये अधिक परिणामकारक सुरक्षा व्यवस्थापनासाठी आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलीस यांच्यातील माहिती सामायीकीकरण यंत्रणा सुधारून समन्वय अधिक बळकट करण्यावर या बैठकीत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.

रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे. यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झलक पाहायला मिळते. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं. मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी , ओम भुतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडीत, शार्दूल सराफ यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यातून या गोष्टीची आणि या गावाची अतरंगी झलक आपल्या बघायला मिळते. पण सोबतीनेच ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गुढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे ?तिच्या गुढतेमागची गोष्ट काय आहे ? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो. रहस्य उलगडण्याच्या प्रवासात प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ट्रेलर यशस्वी ठरताना दिसत आहे.

दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, ”करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”

झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, ”तुंबाडची मंजुळा हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आहे त्यामुळे आमच्यासाठी त्याचं विशेष महत्त्व आहे. आपल्या प्रेक्षकांना एक परीपूर्ण मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकाहून एक दिग्गज कलाकार , गुढता आणि रहस्याभोवती फिरणाऱ्या गोष्टीला दिलेला विनोदाचा तडका , श्रवणीय संगीत असे मनोरंजनाचे विविध पैलू यात प्रेक्षकांना बघायला मिळतील. सध्या प्रेक्षकांना मनोरंजनासोबत काहीतरी वेगळं आणि ताजं पाहायचं आहे आणि हा चित्रपट त्याच अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल, असा विश्वास आम्हाला आहे. रहस्य, विनोद आणि कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल.”

रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आता ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.

१०० दिवसांमध्ये महायुतीचा मुंबई पालिकेत पारदर्शक कारभाराचा धडा

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली २३ निर्णयाची माहिती

२५ वर्षानंतर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार विरहीत सुशासन अवतरल्याचा आमदार अमीत साटम यांचा दावा

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येताच पहिल्या १०० दिवसांमध्ये तब्बल २३ मोठे निर्णय घेऊन मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहीत कारभाराची झलक दाखवून दिली असून तब्बल २५ वर्षानंतर महानगरपालिकेत सुशासन अवतरले आहे, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केला.

भाजपा, शिवसेना आणि रिपाइं महायुतीच्या मुंबई महापालिकेतील पहिल्या १०० दिवसांतील कामगिरीचा लेखाजोखा आमदार अमीत साटम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी आमदार साटम यांनी २३ निर्णयाची यादी दिली. पत्रकार परिषदेला महापाैर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले व इतर समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

पालिकेतील स्टँडिंग कमिटी मधील अंडरस्टँडींग बंद केले. २७ शालेय वस्तुंची खरेदी जीईएम पोर्टलव्दोर होत असून औषधे व वैद्यकीय उपकरणांची खरेदी या पोर्टलव्दारे करण्यात येणार आहे. महापालिका रुणांलयांमधील उपलब्ध खाटा आता ऑनलाईन समजतील. भायखळा प्राणिसंग्रहालयाची बिल्डरधार्जिणी ४९० कोटींच्या निविदा, ३८५ काेटींचे रेलींग टेंडर तसेच रस्ते चिन्हांकीतचे १५० कोटींचे टेंडर रद्द करुन मुंबईकरांच्या हजार कोटी रुपयांची बचत कल्याचा दावा आमदार साटम यांनी केला.

गारगाई पिंजाळ योजनेत २७० कोटींची बचत केली. मुंबई क्लीन लिग अभियानाला गती दिली. राडारोडा उचलण्याचे धोरण आणले असून आवश्यक प्रकल्पांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी (सीएसआर) पोर्टल विकसीत केले जात आहे. जन्म मृत्यु प्रकरणी ८७ हजार बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड केला. १९०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून २०२७ पर्यंत मुंबईतले ९३ टक्के रस्ते सिमेंटचे होतील, अशी ग्वाही आमदार साटम यांनी दिली.

अधिकृत फेरीवाल्यांसाठी कोड प्रणाली लागू करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आयआयटी तज्ज्ञांच्या मतदीने आराखडा बनवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान मूल्यावर आधारीत अभ्यासक्रमासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. मैदानाखाली २७ भूमिगत वाहनतळांचा प्रस्ताव असून १४ वर्षांच्या आतील मुलींना गभार्शय मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंधासाठी मोफत एचपीव्हीची लस देण्यात येणार असल्याचे आमदार सामट यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या प्रसारासाठी तसेच पालिका शाळांमध्ये एआय आणि रोबोटीक लॅब्जसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. झोपडपट्टीच्या दत्तक वस्ती याेजनेत अमूलाग्र बदल प्रस्तावित असून भायखळा प्राणिसंग्रहालयासाठी गुजरातकडून दोन आशियाई सिंहाची मागणी करण्यात आल्याची आली आहे. तसेच पुढच्या काळातही महायुतीचा मुंबई महापलिकेतील कारभार भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक राहील, असा राहील असा निर्धार आमदार साटम यांनी व्यक्त केला

सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार; ‘एक्स-आयएनएस गुलदार’मुळे महाराष्ट्र सागरी पर्यटनात जागतिक नकाशावर -पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.२१ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली असून, देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार होत आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून हा प्रकल्प जागतिक स्तरावर सागरी पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, भारतातील पहिल्या एकात्मिक सबमरीनव्दारे अनुभवात्मक पर्यटनाची सुरवात होत असून या पर्यटन स्थळामध्ये मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव,डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत),प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत),अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन,सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येईल,

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती प्राप्त झाली असून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सहकार्य, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भाप्रसे) यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहेृ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या जागतिक दर्जावर आयकॉनिक पर्यटन केंद्रांचा विकास “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (SASCI) या योजनेतंर्गत एमटीडीसी मार्फत विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने रु.46.91 कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹112.46 कोटी इतक्या रक्कमेस मंजुरी दिली आहे.

एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील “मगर” वर्गातील लँडिंग शिप टँक (LST) प्रकारातील युद्धनौका असून तिने तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावून दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे दि.30 डिसेंबर 1985 रोजी नौकेचे उद्घाटन झाले होते. 83.9 मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्धकारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांच्या माध्यमातून दिनांक 19 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आले. या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली असून परिसरात नैसर्गिक प्रवाळभित्ती नसल्याचे तसेच विपरित पर्यावरणीय परिणाम नसल्याचे प्रमाणीत झाले आहे असेही मंत्री देसाई असे म्हणाले.

स्कटलिंगपूर्वी नौकेची पर्यावरणीय स्वच्छता करण्यात आलेली असून एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे.या प्रकलामध्ये जेट्टीवरुन स्पीडबोट द्वारे निवती रॉक येथे पोहोचणे व तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबा व्दारे जहाजामधील प्रवाळ, मत्स्य पाहणी करणे अपेक्षित आहे.

प्रकल्पामुळे होणारे बहुआयामी परिणाम

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प स्थानिक आर्थिक विकासासाठी व स्थानिक रोजगारासाठी, पूरक व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

एक्स-आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होत आहे. साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त होणार असून महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे. समुद्रतळावर स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) म्हणून विकसित होणार असून त्यामुळे सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होईल. विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी हे संरक्षित अधिवास (Habitat) ठरणार आहे.

भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत राहिलेल्या युद्धनौकेचा पर्यावरणपूरक व पर्यटनाभिमुख पद्धतीने पुनर्वापर करण्यात येत असून हा उपक्रम राष्ट्रसेवेतील ऐतिहासिक वारशाला अभिवादन करणारा आहे. या माध्यमातून नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि सागरी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पर्यटन प्रकल्प राबविणाऱ्या अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळवून देणार आहे. तसेच भारताच्या सागरी पर्यटन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र व भारताची शाश्वत व नाविन्यपूर्ण पर्यटन क्षेत्रातील जागतिक ओळख अधिक मजबूत करणार आहे.

फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.MTDC तर्फे देश-विदेशातील पर्यटक, स्कुबा डायव्हर्स, सागरी अभ्यासक, विद्यार्थी, छायाचित्रकार व संशोधकांना या अद्वितीय अंडरवॉटर पर्यटन अनुभवासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. अशी बाब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केली.

वनराज आंदेकर हत्येचा बदला:बालाजीनगरच्या खुनी हल्ल्यातील सहाजणांना पकडले,एका अल्पवयीन तर अन्य ५ १९ ते २५ वयोगटातील

पुणे- पुण्यातील तरुणाई किती खतरनाक मार्गावरून जीवन प्रवास करतेय याबाबत हल्ली काही वर्षांपासून नेहमीच चर्चा होतेय, अगदी याच अनुषंगाने काल वनराज आंदेकर च्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय म्हस्केवर गोळीबार आणि कोयत्याने वार करत खुनी हल्ला केलेल्या आरोपींची पुष्टी होते आहे. पोलिसांनी सहजांना या हल्ल्याच्या प्रकरणी पकडले आहे ज्यातील एक अल्पवयीन मुलगा आहे तर अन्य ५ जन १९ ते २५ वयोगटातील तरुण आहेत. ज्यांनी भर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या बालाजीनगर परिसरात हा खुनी हल्ला केला .या सर्व आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .

पोलिसांनी या संदर्भात सांगितले कि,’पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सुर्यकांत आंदेकर याचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी आकाश बापु म्हस्के याचा लहान भाऊ अक्षय उर्फ बाळु बापु म्हस्के, वय २६ वर्ष याचेवर पाळत ठेवुन त्याला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तो दिनांक २०/०५/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. चे सुमारास राजश्री शाहु बँक चौक, बालाजीनगर, धनकवडी, पुणे येथे रिक्षात बसलेला असताना त्याचेवर पिस्टलने फायर करुन तसेच धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले म्हणुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०२६ भा.न्या.सं.क १०९, ६१ (२), १८९, १९०,१९१ (२) (३), ३(५) आर्म अॅक्ट क. ३ (२५), ४ (२५) व मपोॲक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे मागर्दशनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांचेकडील तपास पथक हे आरोपींचा शोध घेत असताना नमुद गुन्ह्यात ऋषिप्रसाद मोहन आंबट हा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे वडीलांच्याकडे चौकशी केली असता ऋषिप्रसाद हा नमुद गुन्ह्यातील इतर साथीदारांसह लोणावळा येथे असल्याची माहीती मिळाली.
युनिट-१ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव व युनिट-०१, गुन्हे शाखा कडील पोलीस अंमलदार असे लोणावळा तेथे जावुन आरोपीतांचा शोध घेत असताना आरोपी हे पुणे-मुंबई हायवे वरील बेहेरगाव, कार्ला, लोणावळा येथे एकविरा देवी कडे जाणारे रस्त्याचे कमानी जवळ येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्याने तात्काळ बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असताना गुन्ह्यातील आरोपीत आवेज आश्पाक शेख हा त्याचे साथिदारांसह तेथे आला असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) आवेज अशपाक शेख वय २६ वर्ष रा. २७१, गणेश पेठ, अजय सी फुड शेजारी, पुणे २) अमन फारुख बागवाले वय २१ वर्ष, रागोल्डनग्रेस, तळ मजला, भारत टॉकीज जवळ, भवानी पेठ, पुणे ३) वेदात श्रीनिवास टेमगिरे वय १९ वर्ष रा ६० भवानीपेठ, पालखी विठोबा चौक, पुणे ४) त्रह्मीप्रसाद मोहन आंबट वय २१ वर्ष रा. हमाल तालीमनाना पेठ, नवरंगमित्र मंडळा जवळ, पुणे ५) आफ्ताब शरिफ सय्यद, वय २२ वर्ष रा. भाग्योदय नगर, वैशाली नर्सिंग होम शेजारी, कोंढवा, खुर्द, पुणे व एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासाकरीता सहकारनगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त, प्रशासन (अति. कार्य. पोलीस सह आयुक्त) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्विनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, शैलेद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-१ गुन्हे शाखा अजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-२ गुन्हे शाखा अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे पोलीस अंमलदार विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयुर भोसले, सुहास डोगरे, निलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती व अविनाश दळवी यांचे पथकाने केली आहे.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा व सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी बैठकीत विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक संवाद, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

तसेच राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातही सविस्तर आढावा घेण्यात आला. समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती वाढविणे, तक्रारींवर तातडीने कारवाई करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यातील गावांची व वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या प्रक्रियेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव, स्थानिक स्तरावरील कार्यवाही आणि प्रशासनिक प्रक्रिया गतीमान करण्याबाबत निर्देश देण्यात आले. सामाजिक समतेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असून संबंधित विभागांनी यावर प्राधान्याने काम करावे, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्या, त्यांचे पुनर्वसन, पर्यायी रोजगार, सुरक्षा साधनांची उपलब्धता आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबतही चर्चा झाली. संबंधित विभागांनी अशा कामगारांची अद्ययावत माहिती संकलित करून त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्थलांतर, आरोग्य सुविधा, मुलांचे शिक्षण, निवास आणि शासकीय योजनांचा लाभ यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

तृतीय पंथीयांच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक समस्यांचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, ओळखपत्र, आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

बैठकीत घेण्यात आलेल्या सर्व विषयांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. काही अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले तर काही अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

यावेळी या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला. प्रलंबित गुन्ह्याच्या अनुषंगाने विहित काल मर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार.

पुणे-

आज दि. २१ मे २०२६ रोजी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्ष पदाचा पदभार माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कडून दिप्तीताई चवधरी यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने माजी आमदार दिप्तीचवधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पदभार स्विकारण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘माझ्या सारख्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्ष पद दिले ही माझ्या आयुष्‍यातील खुप मोठी गोष्ट आहे. अध्यक्ष असताना शहरातील निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून व पदाधिकारी व नगरसेवकांना विचारात घेवून पक्षाचे काम गेली ४ वर्ष मी प्रामाणिकपणे केले काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढविली. यावेळी अनेक ज्ञात – अज्ञात कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सहकार्य केले त्यामुळे मी पक्षाची धुरा सांभाळू शकलो.’’

नवनिर्वाचित अध्यक्ष दिप्ती चवधरी यावेळी म्हणाल्या की, ‘‘काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना एक काँग्रेसची कार्यकर्ती ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिली. पक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आज अध्यक्ष पदाच्या रूपाने मला मिळाले. यामागे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सतेज उर्फ बंटी पाटील, निरिक्षक विनोद सुलतानपुरी व पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम मी करेन. त्याचबरोबर येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला उर्जा प्राप्त करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्ते व नेते यांच्या विचारांची काँग्रेस करण्याचा प्रयत्न करेन.’’

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभाग अध्यक्ष पदी प्रशांत जगताप व पश्चिम विभाग अध्यक्ष पदी दिप्ती चवधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पी. एम.टी. चे माजी अध्यक्ष  चंद्रशेखर कपोते यांच्या हस्ते करण्यात आला.
 यावेळी बाळासाहेब अमराळे, राजाभाऊ कदम, अजीज सय्यद, सुरेश नांगरे, विक्रम शहाणे, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते. 

यानंतर पुणे शहर काँग्रेस सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे व पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी दिप्तीताईंचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक रफिक शेख, सुनिल शिंदे, माजी नगरसेवक अजित दरेकर, मेहबुब नदाफ, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, प्राची दुधाने, राजाभाऊ कदम, सेवादल प्रमुख लतेंद्र भिंगारे, अजिज सय्यद, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, सुरेश नांगरे, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, ऋग्वेदिता सपकाळ, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, ॲड. ताम्हणकर विनोद चौरे, नितीन वायदंडे, कुशल चव्‍हाण, गणेश साळुंके, राजू बजेरी, राजेश जाधव, भारत पवार, राहुल वंजारी, बबन गोल्डे, स्नेहा रेणूसे, अन्वर पठाण, सुंदर ओव्‍हाळ, विकास कांबळे, अन्वर शेख, महेश पवार, विक्रम शहाणे, विजय सरोदे, सेल्वराज ॲन्थोनी, विल्सन मॅसी, भोला वांजळे, गणेश गुगळे आदी उपस्थित होते.

राजीव गांधींच्या स्मृतींना दिला उजाळा

पुणे- आज पुण्याच्या कॉंग्रेस भवनात संगणक क्रांतीचे जनक आणि भारतचे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांना पुष्पांजली वाहताना नाव नियुक्त शहराध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी राजीव गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला.

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षा दीप्तीताई चवधरी, पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, नगरसेवक अरविंद शिंदे, नगरसेवक रफिक शेख,माजी नगरसेवक अजित दरेकर, महिला शहराध्यक्ष स्वाती शिंदे, बाळासाहेब अमराळे,पुणे शहर उपाध्यक्षा प्राची दुधाने,सुंदरताई ओव्हाळ,हर्षद हांडे,राजाभाऊ कदम, वैभव डांगमाळी, राहुल वंजारी, सुरेश नांगरे, रमेश सोनकांबळे, भगवान कडू,अनवर शेख, संतोष देसाई,चंद्रशेखर कपोते,अजिझ सय्यद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. सदानंद बनसोडे, डॉ. मंडलिक, वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारूशिला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. तलवारे आणि संचालक व विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कविता पटेकरसह ९ जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल,महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ अन खंडणी मागितल्याचा आरोप


पुणे-कविता पटेकरसह नऊ जणांविरुद्ध महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्रास दिल्याप्रकरणी तसेच खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या आवारात घडली. विभागीय अतिक्रमण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणी ऋषिकेश अभिमान सावंत, सुनिल जयवंतराव पवार, उमेर मैनुद्दीन शेख, राजेंद्र विलास जाधव, रमेश विष्णु खामकर, शंकर किन्नु ठाकूर, मिलिंद जाधव, नागुबाई ऊर्फ मीनाताई सिद्धप्पा धोत्रे आणि कविता विनयकुमार पटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कविता पटेकर यांनी दिव्यांगत्वाचा फायदा घेत मनपा भवनाबाहेर वारंवार आंदोलने करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करून अधिकाऱ्यांची बदनामी केल्याचाही आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अधिकारी शासकीय कर्तव्य बजावत असताना ऋषिकेश सावंत यांनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली आणि ‘तुझी नोकरी खातो’ अशी धमकी दिली. यानंतर सुनिल पवार आणि इतरांनी त्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींच्या रस्त्यावरील बेकायदेशीर स्टॉल्सवर कारवाई होऊ नये यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणला.संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विविध शासकीय विभागांकडे खोटे तक्रार अर्ज दाखल करून त्यांना त्रास देण्यात आला. तसेच, अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले करत आहेत.

संगणक क्रांतीचे जनक स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेत प्राजत नायर यांनी केले अभिवादन, घेतली शपथ

पुणे-भारतातील संगणक क्रांतीचे जनक आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मनपा भवन परिसरात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि अहिंसेचा संदेश दृढ करण्यासाठी शपथ घेतली.

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर , नगरसचिव योगिता भोसले ,उपायुक्त रवी पवार ,आशा राऊत, किशोरी शिंदे आदी मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विकास लवांडेंना अखेर अटक; वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं

पुणे–राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लवांडे यांचे संरक्षण काढून घेतल्याने वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा विकास लवांडे यांनी केल्याचा आरोप होता. या वक्तव्याविरोधात नलिनी आशिष वायाळ (वय 41, रा. येरवडा) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवांडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी 20 मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी, सरकार पक्ष आणि वाघोली पोलिसांना याबाबत भूमिका मांडण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

दरम्यान, तपासादरम्यान विकास लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वतःविरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचे समोर आले. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात यावर जोरदार आक्षेप घेत लवांडे यांचे संरक्षण रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत लवांडे यांना अटक केली.

दरम्यान आपल्या अटकेची बातमी लवांडे यांनी स्वतः ट्विटर वरून शेअर केली आहे काय म्हटले आहे त्यांनी ते त्यांच्याच शब्दात पहा

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.
आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.

काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी दीप्ती चवधरी,प्रशांत जगताप

पुणे, : काँग्रेसने पुणे शहर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करत दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. शहर पूर्व भागाच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रशांत जगताप, तर पश्चिम भागाच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार दीप्ती चवधरी यांची नियुक्ती केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून अरविंद शिंदे यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. नवनियुक्त दोन्ही अध्यक्षांनी यापूर्वी पुण्याचे महापौरपद भूषविले आहे. चवधरी यांच्या नियुक्तीमुळे दीर्घकाळानंतर शहराध्यक्षपदी महिलेला संधी मिळाली.
आहे. याबरोबरच पुणे ग्रामीण उत्तरचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते कमलाकर सातव आणि दक्षिणच्या अध्यक्षपदी वरिष्ठ नेते लहू निवंगुणे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाच्या संघटन सृजन’ अभियानांतर्गत हे फेरबदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धर्तीवर. पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मान्य केला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधी विनोद सुलतानपुरी यांनी कार्यकत्र्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन शहराध्यक्षांची आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली.

जगताप यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तर चवधरी या विधान परिषदेच्या माजी आमदार आहेत. या नियुक्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने मराठा आणि ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देत सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली मध्य रेल्वेच्या डीआरएमची भेट;

महिनाभरात पडक्या इमारती पा डून परिसर सुरक्षित करणार, सुरक्षा वाढवण्याच्या सूचना

  • ​महिला डब्यांजवळील सिग्नल पॉइंटवर गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्यासाठी ‘अॅक्सेस’ यंत्रणा उभारणार
  • ​प्लॅटफॉर्मवर बीट मार्शल नेमण्याची आणि स्थानकांवर सातत्याने संवेदनशील उद्घोषणा (Announcements) करण्याची मागणी
  • ​रेल्वे डीआरएम हरीश मीना यांच्यासोबत शिवसेना शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक

​मुंबई दि.२० : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मध्य रेल्वेचे डीआरएम (Divisional Railway Manager) हरीश मीना यांची शिवसेना शिष्टमंडळासह भेट घेतली. या वेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला स्थानक परिसर आणि रेल्वे हद्दीतील महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले. या बैठकतीतील सविस्तर चर्चेअंती, रेल्वेच्या हद्दीतील धोकादायक आणि पडक्या इमारती येत्या महिन्याभराच्या आत पाडण्याचे आश्वासन डीआरएम यांनी शिष्टमंडळाला दिले. ​

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार या संपूर्ण प्रकरणाचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

​बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि रेल्वे प्रशासनाला दिलेल्या सूचना:

  • ज्या मोडकळीस आलेल्या आणि निर्जन रेल्वे इमारतींचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार कृत्य करतात, अशा रेल्वे लगतच्या सर्व पडक्या इमारती महिन्याभराच्या आत पाडून तिथे रखडलेल्या विकासकामांना गती दिली जाईल, असे आश्वासन डीआरएम हरीश मीना यांनी दिले.
  • रेल्वे यार्ड, शेवटचे प्लॅटफॉर्म्स आणि रेल्वेच्या निर्जन जागांवर तात्काळ हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि संपूर्ण परिसरात पुरेशी प्रकाशयोजना (Flashing/Searchlights) करण्यात यावी.
  • शहरात पोलिसांचे बीट मार्शल ज्याप्रमाणे फिरतात, त्याच धर्तीवर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कर्तव्य दक्ष रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान तैनात राहावेत. रात्रीच्या शेवटच्या लोकलच्या वेळी प्रवासी उतरतात, तिथे चोख बंदोबस्त असावा.
  • लोकल ट्रेन किंवा स्थानकांवर एखाद्या महिलेला अडचण आल्यास तिला तात्काळ मदत कुठे मिळेल, याबद्दलची माहिती देणारी उद्घोषणा सातत्याने रेल्वे स्थानकांवर स्पष्ट आणि संवेदनशील भाषेत केली जावी, जेणेकरून पीडित महिला त्वरित संपर्क साधू शकेल.
  • अनेकदा रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी गाड्या आऊटर किंवा सिग्नलला थांबतात. याचा फायदा घेऊन गर्दुल्ले किंवा समाजकंटक महिलांच्या डब्यात घुसून त्रास देतात. अशा संवेदनशील जागांवर काय घडतंय याचा थेट ‘अॅक्सेस’ आणि नियंत्रण यंत्रणा रेल्वे पोलिसाकडे असणे आवश्यक आहे.
  • रेल्वे क्षेत्रात सध्या साडेतीनशे महिला कर्मचारी/अधिकारी कार्यरत आहेत. त्यांची सक्षमता आणि संख्या वाढवून, महिला प्रवाशांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल.
  • रेल्वे गाड्यांमधून अनेकदा लहान मुली आणि महिलांची अनैतिक वाहतूक केली जाते. अशा गुंड प्रवृत्तींना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क केली जाईल.
  • रेल्वे परिसरात रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या किंवा बेवारस आढळणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित निवारा गृह (Shelter Home) उपलब्ध करून देऊन, नंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेत दाखल करण्याची व्यवस्था रेल्वे आणि राज्य शासनाच्या मदतीने केली जाईल.

    ​या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळात ​तसेच धर्मवीर आनंद दिघे साहाय्यता राज्य प्रमुख राजर्षी अहिरराव, महिला विभागप्रमुख निलम पवार, रेखा सुरणकर, स्मिता देवकर, कल्याण संपर्क संघटक कविता गावंड, रेल्वे पोलीस कल्याण सहाय्यक आयुक्त श्री पाटील आदी उपस्थिती होती.

​”महिलांचा अधिकार आणि सन्मान राखणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेल्वे प्रशासनाकडे या विषयाचा तीव्र पाठपुरावा केला आहे. पीडित महिलांना रेल्वे प्रवासात कुठे आणि कशी मदत मिळेल, याची माहिती देणारी विशेष योजना आम्ही तात्काळ सुरू करत आहोत. रेल्वे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावावी, अशा सूचना दिल्या आहेत.”
— डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या व आमदार

मुळशी, भोर व जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांना निधी मंजूर

0

शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या यांच्या पुढाकाराने विकासकामांना गती; स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

पुणे.दि.१८: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२०२६ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर आणि जुन्नर तालुक्यात विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नेत्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून या कामांना मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मुळशी तालुक्यातील जवळगाव येथे अंतर्गत रस्ता विकासकाम तसेच रस्ताळवाडी येथे स्मशानभूमी दुरुस्ती व शेड बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लवळे येथे सावता माळी मंदिराजवळील अंतर्गत रस्ता आणि भादस येथे विठ्ठल मंदिर ते धोंडीबा गावडे रस्ता विकासकामासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भोर तालुक्यात खेड शिवापूर प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता, खेड शिवापूर स्मशानभूमी वॉल कंपाउंड तसेच खानापूर येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे धनगरवाडी-नारायणगाव-येडगाव शिवरस्ता विकासकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून दळणवळण, नागरिक सुविधा तसेच स्मशानभूमींच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होणार आहे. ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. गोऱ्हे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

याबाबत पुणे जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्या सौ. रुपाली रमेशबाप्पू कोंडे, शिवसेना संपर्क प्रमुख बारामती लोकसभा मतदारसंघ कांताताई पांढरे, शिवसेना युवासेना पुणे जिल्हाप्रमुख श्री. निलेश राजेंद्र घारे, युवासेना जुन्नर तालुका प्रमुख विकास राऊत यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. “ग्रामीण भागातील विकासकामांना त्यांच्या माध्यमातून मोठी चालना मिळत असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे त्या सातत्याने लक्ष देत आहेत,” असे त्यांनी सांगितले.