Home Blog Page 42

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

0

पुणे, दि. २० : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी अर्जदाराकडे अनुज्ञप्ती, बॅज, वाहन परवाना, शिधापत्रिका, आधारकार्ड व पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. तरी सर्व ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक-मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

ज्या सभासदांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेली आहेत, तसेच १ मे २०२६ पर्यत धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक मालक कल्याणकारी मंडळाअंतर्गत सभासद नोंदणी केलेली आहे अशा सभासदांना सन्मान निधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

शीतल तेली- उगले यांनी स्वीकारला पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

पुणे, दि. २०: भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी शीतल तेली- उगले यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार आज स्वीकारला. २००९ च्या बॅचच्या भा.प्र.सेवेतील अधिकारी असलेल्या तेली यांचे राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्त पदावर बदलीचे आदेश नुकतेच निर्गमित झाले होते. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले.

तेली- उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखा पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेदरम्यान २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी अर्थसहाय्यित व प्रायोजित केलेल्या, ‘जलसुरक्षा’ आणि ‘वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ (सर्क्युलर इकॉनॉमी) या विषयांवर ऑस्ट्रेलिया येथे आयोजित विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला.

त्यांची नागपूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेतील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त, आयुक्त वस्त्रोद्योग आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि राज्याच्या क्रीडा आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

रायगड जिल्हाधिकारी असताना महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेदरम्यान प्रशासनाचे सक्षम नेतृत्व आणि ‘शोध व बचाव’ मोहिमांमधील कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान झाला होता. तसेच ‘डिजिटल इंडिया सप्ताह’मध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त‍ आयुक्तपदाच्या कारकिर्दीदरम्यान पुणे महानगरपालिकेला ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ आणि ‘हुडको अवॉर्ड फॉर बेस्ट प्रक्टिसेस’ (सर्वोत्तम कार्यपद्धतींसाठीचा पुरस्कार) यांसह अनेक पुरस्कार मिळाले. तसेच ‘जनाग्रह’ या अशासकीय संस्थेद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात, पुणे शहराला ‘शहरी प्रशासनातील सर्वोत्तम शहर’ म्हणून मानांकन मिळाले.

तेली यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने ‘फॅब्रिक ऑफ युनिटी’ मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेअंतर्गत खासदार, आमदार, सनदी सेवेतील अधिकारी यांच्यापासून ते विद्यार्थी, कामगार आदी ११०० हून अधिक, विणकाम क्षेत्रात नसलेल्या नागरिकांनी हातमागावर ९८ फूट लांबीचे कापड विनले. या कामगिरीची नोंद ‘आशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली.

सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदाच्या कालावधीत २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सोलापूर स्मार्ट सिटीला एकूण कामगिरीसाठीचा पश्चिम विभागासाठीचा ‘विभागीय स्मार्ट सिटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘पीएम स्वनिधी’ योजनेमध्ये २०२४ या वर्षात महानगरपालिकेने १२८ टक्के उद्दिष्ट साध्य केल्याच्या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ मध्ये महानगरपालिकेने दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा

पुणे दि. २०: विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या क्षमता विकासाचा विचार करावा लागेल. त्यासाठी क्षमता बांधणी आराखडा निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा असून अधिकाऱ्यांनी कर्तव्यासोबत नव्या गोष्टी जाणून घेत आपली वैयक्तिक प्रगती साधण्याचा आनंद घेण्यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेला यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपमहासंचालक सचिन कलंत्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव नीता शिंदे, डिजिटल लर्निंग लॅब प्रमुख कल्याणी गोखले, संचालक शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.

श्रीमती व्ही. राधा म्हणाल्या, प्रशासनाच्या शेवटच्या स्तरावरील कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणीचा विचारही आराखडा तयार करताना करायचा आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान आदींचा विचार करून प्रशिक्षण वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक पदानुसार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करून त्याअनुषंगाने आराखडा तयार करावा. कार्यात्मक आणि वर्तणूक संदर्भातील क्षमतांना विविध टप्प्यात आत्मसात करण्याजोगा प्रशिक्षण आराखडा तयार करावा.

अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात घेतलेला पुढाकार लक्षात घेता महाराष्ट्र हे क्षमता बांधणी कार्यक्रमात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम कार्यक्षमतेद्वारे चांगली सेवा देण्यासाठी आणि त्या माध्यमातून राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. नियमाधारित ऐवजी भूमिका आधारित प्रशासनाचा विचार करून क्षमता बांधणी आराखडा तयार करायचा आहे. विभागाच्या क्षमता, कार्य याबाबत आराखड्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. शिवाय या प्रशिक्षण आराखड्याला पदोन्नती आणि सेवा विषयक बाबींशी जोडण्यात येणार असल्याने अत्यंत सूक्ष्मरितीने आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. कलंत्रे यांनी क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि अधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले.
0000

नौदलाची निवृत युद्धनौका “INS गुलदार” निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित….

पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग संमेलन म्हणजे आपलं कोकण..!! याच कोकणातल एक महत्त्वाचं रत्न म्हणजे आपलं “सिंधुदुर्ग” जिल्हा. या जिल्ह्याचं एक अभिनव उपक्रम आकार घेतोय. तो म्हणजे “गुलदार”, निवृत युद्धनौकेचे सागर तळाशी प्रस्थापित होणारे संग्रहालय. नौदलाची चार दशके सेवा करून, गुलदार आता निवृत्त युद्धनौकेच्या प्रसारणासाठी सज्ज झालंय. 12 जानेवारी 2024 रोजी गुलदार नौकेचा औपचारीक सेवानिवृत्ती सोहळा झाला. तीच तिची शेवटची समुद्री मोहिम ठरली, पण इथेच तिची कहाणी संपली नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या सागरी संग्रहालयासाठी ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. नौदलाकडुन फेब्रुवारी २०२५ मध्ये औपचारिक हस्तांतरण झालं.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या दुरदृष्टीपुर्ण नेतृत्वाखाली व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडून नौकेचा ताबा घेवुन या हा प्रकल्प पुर्ण करण्याचे शिवधनुष्य उचललं. आता दि. 18/05/2026 रोजी Ex INS गुलदार च्या कृत्रिम प्रवाळ भिंती आणि पाणबुडी संग्रहालयाच्या प्रथम भागाचा अंतीम टप्प्या संपन्न झाला आहे.
युद्धनौकेच्या या संपूर्ण संग्रहालयाच्या प्रकल्पामध्ये एकूण पाच टप्पे येतात. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे नौदलाकडून युद्धनौकेचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे झालेले हस्तांतरण. अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने गलदारचे नौदलाकडुन महामंडळास हस्तांतरित करण्यात आले. प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे युद्धनौकेचे सिंधुदुर्गातील आगमन. इंजिन नसलेल्या या युद्धनौकेला टग बोटींच्या सहाय्याने खेचून तिला विजयदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून स्थिर करण्यात आले. यानंतर तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. म्हणजेच युद्धनौकेच्या पोटात असलेला सर्व पर्यावरणासहित हानिकारक घटकांची स्वच्छता करण्यात आली असुन टप्प्यासाठी युद्धनौका तयार करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यामध्ये ही नौका 20 ते 22 मीटर खोल सागरतळाशी आज दि. 19/05/2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. सागरतळाशी अतिशय सुरक्षितरित्या विराजमान झाली आहे. मागील 36 तासांपासुन सदरच्या युध्दनौकेस सागरतळाशी स्थापित करण्यासाठी तज्ञांचे पथक, स्थानिक प्रशासन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करीत होते. या प्रकल्पासाठी मा. जिल्हाधिकारी महोदया श्रीमती तृप्ती धोडमिसे, आयएएस, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. आय. एन. एस. गुलदार युध्दनौकेच्या धडाडीच्या आणि कार्यक्षमतेच्या आठवणींसह, आता ती पर्यटकांना, अभ्यासकांना आणि साहसी जलप्रेमींना भेटायला सज्ज होईल. या संग्रहालयातील दर्शनही तितकंच खास असणार आहे. स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या सहाय्याने, पर्यटक थेट सागरतळाशी जाऊन या युद्धनौकेचा अनुभव घेऊ शकतील. येथे उभं राहणार आहे प्रवाळ, समुद्री गवत, रंगीबेरंगी मासे, आणि जैवविविधतेने परिपूर्ण असे समुद्रातील एक वेगळे जग अनुभवू शकतात. हे सर्व पाहण्यासाठी स्थानिक स्कूबा डायव्हर्स पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्कुबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून कार्य करतील. आणि एवढंच नाही, तर तरुणांसाठी पॅडी या संस्थेशी सलग्नित “डाइव्ह मास्टर्स” चे शैक्षणिक अभ्यासक्रमही पूर्ण करता येतील.
या उपक्रमाचा उद्देश जहाजाचा इतिहास जपणे, डायव्हिंग पर्यटनाला चालना देणे आणि नवीन सागरी परिसंस्था निर्माण करणे हा आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटन वाढवण्यासाठी नव्हे तर सागरी जैवविविधतेचे संरक्षण, किनारी समुदायांसाठी रोजगारनिर्मिती, आणि भारतीय नौदलाच्या वारशाचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे कृत्रिम प्रवाळभित्ती निर्माण केल्यावर, एक वर्षाच्या आत ती स्वयंपूर्ण सागरी परिसंस्था बनते, जिथे मासे, प्रवाळ, स्पंज, समुद्री वनस्पती व अनेक जीवसृष्टी विकसित होते.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. संजय खंदारे, आयएएस, यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आकारास येत असुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गठणे सर म्हणाले, “ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणल्यानंतर, तिचे संपूर्ण स्वच्छीकरण करण्यात आले असुन आणि त्यानंतर ती नियोजित जागी नियंत्रितपणे समुद्रात विराजमान करण्यात आली आहे. पर्यटकांना प्रमाणित स्कूबा डायव्हर्ससह मार्गदर्शित सहलींमधून पाण्याखालील युद्धनौकेचा अनोखा अनुभव घेता येईल. सेवानिवृत्त जहाजांचे असे पाणबुडी संग्रहालय व कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून रूपांतर केल्याने त्यांचा इतिहास पुढील अनेक शतकांसाठी जपला जातो. या प्रत्येक जहाजामागे सेवा बजावलेले नौसैनिक आणि त्यांची शौर्यगाथा जिवंत ठेवता येते.”
शेकडो हात, हजारो तास, आणि एक सामूहिक स्वप्न – हे सगळं एका यंत्रण निर्माण करत आहे भारतातला आणि आशिया खंडातला पहिला सागर तळाशी स्थापित होणारा पर्यटन प्रकल्प..! गुलदार ही केवळ एक युद्धनौका नव्हे, तर ती एक नव्या युगाची सुरुवात आहे. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी पर्यटन मंत्री मा. ना. श्री. शंभुराज देसाई, सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. नितेश राणे, पर्यटन राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
सदरच्या उपक्रमासाठी महामंडळाचे अधीक्षक अभ‍ियंता संजय पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे, वरीष्ठ व्यवस्थापक श्रीमती श्रीप्रा बोरा, प्रादेशिक अधिकारी श्री. दिपक माने, व्यवस्थापक (बांधकाम) दिपक हरणे यांनी सक्रीय सहभाग आणि परीश्रम घेतले आहे.

पुण्यात आरसीसी कोचिंग क्लास सील:महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत

पुणे- महापालिकेने जंगली महाराज रस्त्यावरील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वापर आणि ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर यामुळे महापालिकेने क्लासच्या आवाराला टाळे ठोकून ते सील केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या मालकीचा हा क्लास आहे.पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. डेक्कन येथील ‘बोरावके टॉवर्स’मधील ‘नालंदा कॅम्पस’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील क्लासला महापालिकेच्या पथकाने सील ठोकले.

निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर

महापालिकेने जागेचे मालक/विकसनकर्ते श्रीराम जोशी आणि आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६८ (१) (ओ) अन्वये ‘जागेच्या विनापरवाना वापराबाबत’ कायदेशीर नोटीस बजावली आहे. शिवाजीनगर येथील सि.स.नं. १२५६/२अ, फा.प्लॉट नं. ६२१/२अ मधील सदनिकेमध्ये पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अंतर्गत फेरबदल करून निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर सुरू होता, असे नोटीसमध्ये नमूद आहे.तपासणीत असे स्पष्ट झाले की, पहिल्या मजल्यावरील शॉप नंबर ९, दुसरा मजला आणि तिसऱ्या मजल्यावर विनापरवाना पद्धतीने वर्ग चालवले जात होते. या इमारतीवर महापालिकेने ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत ठेवला आहे, जो तातडीने भरणे आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.कारवाईदरम्यान क्लासच्या मुख्य दरवाजावर नोटीस लावून प्रशासनाने दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सर्व शैक्षणिक साहित्य, बाकडी, लोखंडी कपाटे आणि फ्लेक्स एक महिन्याच्या आत काढून घेऊन मजले रिकामे करण्याची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली जाईल आणि या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असेही बजावण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, इमारतीच्या तळघरात लोखंडी पत्रे लावून तयार केलेले अनधिकृत तात्पुरते कार्यालय महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकले आहे. मनसेने या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पुणे मनपा आंदोलन केले होते, त्यानंतर पुणे मनपा आयुक्तांनी इमारत सील करण्याचे आश्वासन दिले होते.

गौण खनिज उत्खननासाठी अल्प मुदतीच्या परवान्याबाबत शासन निर्णय जारी

उप विभागीय अधिकारी व तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २०: महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ५८ व ५९ अन्वये अल्प मुदतीचे परवाने तहसीलदार यांच्या स्तरावरून देतांना महसूल व वन विभागाच्या १९ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

गौण खनिज उत्खननासाठी तात्पुरते परवाने मिळवण्याकरीता तहसिलदार यांचेकडे अर्ज प्राप्त झाल्यास सदर सर्व्हे कमांक , गट क्रमांक हा नियम ५८ अन्वये जिल्हा खाणकाम योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा कसे यांची त्यांनी खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.
अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने हे जिल्हा खाणकाम योजनेत नियम ५८ अन्वये समितीच्या मान्यतेअंती समावेश केला असेल केवळ अशा क्षेत्रावर देण्यात (स.नं./ग.नं.) यावेत. समावेश करण्यासाठी प्रस्तावित अथवा विचाराधीन असलेल्या क्षेत्रावर किंवा ज्या क्षेत्रावर खाणपट्टा मंजूर करण्यात आलेला आहे अशा क्षेत्रावर अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने देण्यात येवू नयेत. तसेच समितीने एखाद्या विभागाची ना-हरकत प्राप्त करून घेण्याच्या अधीन राहून मान्यता दिली असल्यास हे ना-हरकत प्राप्त झाल्याशिवाय अल्प मुदतीचे तात्पुरते परवाने देण्यात येऊ नयेत.

तहसिलदार यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील तरतूदीनुसार ५०० ब्रास परिमाणापर्यंत गौण खनिजाचे अल्प,तात्पुरते परवाने देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. एखाद्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी संपूर्ण वर्षासाठी जेवढे गौण खनिज आवश्यक आहे, त्या गौण खनिजाचे एकत्रित परिमाण विचारात घ्यावे. तसेच एखाद्या व्यक्तीस किंवा संस्थेस वारंवार गौण खनिजाचे अल्प, तात्पुरते परवाने आवश्यक असतील तर त्याकरीता वर्षभरात आवश्यक असलेल्या एकूण गौण खनिजाचे परिमाण विचारात घ्यावे. अशा प्रकारे वर्षभराचे परिमाण निश्चित केल्यानंतर गौण खनिजाचे अल्प किंवा तात्पुरते परवान्याचे परिमाण ५०० ब्रासपेक्षा अधिक होत असल्यास त्यानुषंगाने अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करण्यासाठी परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तहसिलदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. तथापि, एखाद्या व्यक्तीस अथवा संस्थेस परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने (जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी) थेट अर्ज करण्याची मुभा असेल.

अल्प मुदतीच्या परवान्यांसाठी जे क्षेत्र (सर्व्हे कमांक, गट क्रमांक) जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत, अशा क्षेत्रातून तहसीलदार यांनी एका वर्षांमध्ये एकदाच अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. मात्र एखाद्या शेतकरी, गावकरी यांना विहीर बांधकाम किंवा घराच्या बांघकामासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८ मध्ये नमूद करण्यात आलेल्या मर्यादेत मुरूम, माती गौण खनिजासाठी अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांना त्यांच्या अधिकारात करता येईल.

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या वडार व कुंभार समाजाच्या अधिकृत व्यक्तींना प्रचलीत नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या त्यांच्या करिताच्या वार्षिक मर्यादेत गौण खनिज उत्खननासाठी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांनी करावी. अल्प किंवा तात्पुरत्या परवानाद्वारे कोणत्याही वेळी खड्याची पृष्ठभागापासूनची खोली सहा मीटर (६ मीटर) पेक्षा अधिक असणार तसेच शासकीय जमिनीवर खनिपट्टे जाहीर लिलावा किंवा लिलावाव्दारे देण्यात येणारे असल्याने शासकीय जमिनीवर (पारंपारिक कुंभार व वडार समाजाचे व्यक्तीस नियमानुसार वगळून) इतरत्र अल्प किंवातात्पुरते परवाने दिले जाणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.
तहसीलदारांनी त्यांच्या संबंधित अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) ५०० ब्रासपेक्षा अधिक नसतील एवढ्या प्रमाणात गौण खनिज उत्खननाची वार्षिक मुदत संपल्यानंतर ई.टी.एस. मोजणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा व जास्तीचे उत्खनन झाले असल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्वामित्वधन भरून घेण्याची कार्यवाही अथवा दंडात्मक कारवाई करावी.

(सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) उत्खननास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांनुषंगाने वर्षातून एकदा ई.टी.एस. मोजणी करुन मोजणीच्या अनुषंगाने अतिरिक्त उत्खनन आढळल्यास ७ दिवसाच्या आत खाणपट्टाधारकांना अतिरिक्त उत्खननाचे स्वामित्वधनाची रक्कम भरण्याची सूचना देण्यात यावी. स्वामित्वधनाची रक्कम ३० दिवसाच्या आत जमा करून घ्यावी. ३० दिवसात रक्कम जमा न केल्यास पुढील ७ दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात येवून दंड वसूल करण्यात यावा. परवान्यांची मुदत संपल्यानंतर उत्खनन क्षेत्राची खड्डयांचे संदर्भाने आवश्यक सुरक्षात्मक उपययोजना करणे व त्याचे अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकावर निश्चित करावी. गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीकरीता शासन वेळोवेळी निश्चित करेल त्या संगणक प्रणालीचा वापर करणे अनिवार्य राहील.

या सूचना जशाच्या तशा उपविभागीय अधिकारी यांना देखील लागू आहे. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तहसीलदार अथवा उप विभागीय अधिकारी यांच्याकडून अंमलबजावणी करण्यास कसूर केल्यास करणाऱ्या संबंधितांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अधिक माहितीकरिता शासन निर्णयाचे बारकाईने अवलोकन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या आहेत.

गाई-म्हशींच्या प्रजननाबाबत पशुसंवर्धन आयुक्तांचा कडक इशारा:बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा


पुणे, दि. 20: राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, २०२३” लागू केला आहे. मात्र, अद्यापही क्षेत्रीय स्तरावरील खाजगी कृत्रिम रेतन सेवादाता व संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली असल्याने संबंधितांवर या अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी ५ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे. उत्तम दर्जाच्या वळूंचा वापर करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्र), भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरता येईल. या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाची’ स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाला केंद्रांची तपासणी, झडती व नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली असल्याने संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी प्राधिकरणाकडे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

दंड व शिक्षेच्या तरतुदी

कलम ४ व ५ अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर रु. ५०,०००/- पर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे, अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर रु. १,००,०००/- पर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची / दिशाभूल करणारी जाहिरात किंवा प्रसिद्धी केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर ६ महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. २,००,०००/- पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे व होणारे फायदे

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यमात्रांचाच वापर करा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासा व नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्या. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून आपल्या पशुधनाचे संरक्षण करा. सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढ. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास. दुग्ध व्यवसायात स्थैर्य व आर्थिक उत्पन्नात वाढ

0000

साडे तीनशेहून अधिक स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण

पुणे, दि. 20: “ऑफ सिंदूर” पक्षात “ऑफ अभ्यास” अंतर्गत 360 स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण” देण्यात आलेले आहे. याअंतर्गत पाठ्यक्रम पुर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

केंद्रीय गृह विभाग व राज्य गृह विभागाकडून शासनाच्यावतीने उपनियंत्रक नागरी संरक्षण दलामार्फत सेवाभवन, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, नगरपरिषद प्रशासन सहाय्यक आयुक्त, प्रताप भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे विंग कमांडर शैलेंद्र मराठे, कर्नल निशाद मंगळुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष युध्दाच्या वेळेस सीमेवर भुदल, नौदल आणि वायुदलाचे सैनिकी बल कर्तव्य करीत असतातच परंतु, प्रत्यक्ष नागरिकांमध्ये युध्दाच्या परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलांची भूमिका ही फार महत्वाची असते. याच धर्तीवर या प्रशिक्षण देण्यात आलेले असून प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा उपयोग युध्दाच्या परिस्थितीत करावा. अधिकाधिक नागरिकांना प्रशिक्षण, प्रबोधन देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अर्जून कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वे दिली आहे.

हॉटेल कोरोनेट मधील उद्योजक अशोक जैन यांच्या मृत्यूचे गूढ उकलले: चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे १० मे रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या उद्योजक अशोक जैन यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून १५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने उद्योजक अशोक जैन यांनी विषारी औषध पिऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नथुसिंह राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित आणि प्रल्हाद चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. सॅलीसबरी पार्क) असे विषारी औषध पिऊन जीवन संपविलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्याचे पुत्र मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मिनाक्षी सोसायटी, सॅलीबरी पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे १० मे रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजेच्या दरम्यान घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे बांधकाम व्यवसायिक असून कोंढव्यात त्यांचा एक प्रकल्प सुरु होता. प्रचित हाईट या प्रकल्पामध्ये आरोपींनी त्यांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हॉटेल कोरेनेट येथील रुममध्ये विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविले होते. जैन यांचा फोन बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते घरातून दुचाकीवर बाहेर पडले होते. पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत आपटे रोडवर आले. तेव्हा हॉटेल कोरेनेटमधील त्यांची रुम आतून बंद असल्याचे लक्षात आले. रुम उघडली तेव्हा आतमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले होते. १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानेच त्यांनी जीवन संपविल्याचे मोहित जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.

SBI ला नकली सोने देऊन सवाचार कोटीची फसवणूक मोक्ष जैन आणि चिराग हिम्मतलाल जैन यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी व्हॅल्युअर म्हणून काम करत असताना दोघा भावांनी १३ जणांशी संगनमत करुन बनावट सोने तारण ठेवून स्टेट बँकेची ४ कोटी २३ लाख ४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत स्टेट बँकेच्या हिंगणे शाखेचे व्यवस्थापक मनोजकुमार (वय ४३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोक्ष हिम्मतलाल जैन (Moksha Himmatlal Jain) आणि चिराग हिम्मतलाल जैन Chirag Himmatlal Jain (रा. शनिवार पेठ) यांच्यासह १३ कर्जदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ मे २०२५ पासून आतापर्यंत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हे स्टेट बँकेच्या हिंगणे शाखेचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या शाखेमध्ये हिम्मतलाल जैन हे सराफ गेली काही वर्षे व्हॅल्युअर म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्याचे निधन झाले. त्यानंतर त्यांची दोन मुले मोक्ष व चिराग जैन यांची सोने तारणासाठी व्हॅल्युअर म्हणून नेमणूक केली. त्यांनी १३ सोने तारण ठेवणार्‍या लोकांचे बनावट सोन्याचे दागिने हे खरे असल्याचे प्रमाण पत्र दिले. त्यावरुन बँकेकडून अर्जदारांनी ४ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील सुरुवातीला काही हप्ते या कर्जदारांनी भरले. त्यानंतर कर्जदारांनी हप्ते थकविले. बँकेने कर्जदारांना अनेकदा नोटीस पाठवूनही त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत, तसेच सोने सोडवुन घेतले नाही. त्यानंतर कर्ज थकल्याने तारण ठेवलेल्या सोन्या विषयी शंका आली. त्यामुळे बँकेने नवीन सराफाकडून सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी केली. त्यात तारण ठेवलेले सोने हे बनावट व कमी शुद्धतेचे असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्याच्या पडताळणीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ तपास करीत आहेत.

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू; सिंहगड रोडवरील सोसायटीतील धक्कादायक घटना

पुणे : सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगरमधील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये अडकल्याने शिवांश शैलेश धूत (वय ७) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. त्याने लिफ्टमधील बटणे दाबल्यानंतर लिफ्ट सुरू झाली. मात्र दुसरा मजला येण्यापूर्वीच लिफ्ट अचानक अडकली. बराच वेळ झाल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलाला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले.

वनराज आंदेकर हत्येचा बदला:मुख्य आरोपीच्या भावावर गोळ्या झाडल्या अन् कोयत्यानेही केले वार ..बालाजीनगरमध्ये सकाळची घटना


पुणे- वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बालाजी नगर परिसरात घडली असून, शहरात खळबळ उडाली आहे. ज्यावर हल्ला झाला त्या तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय 26, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे आहे. हल्लेखोरांनी बालाजी नगर येथे दबा धरून अक्षयवर जवळून गोळ्या झाडल्या. त्याला तीन गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर त्याच्या तोंडावर आणि डोक्यात धारदार कोयत्याने वारही करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार,अक्षय बापू मस्के ऊर्फ बाळा Akshay Bapu Maske alias Bala (वय २६, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, आंबेगाव पठार) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. ही घटना बालाजीनगर येथील संविधान चौकात बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली. अक्षय म्हस्केवर यापूर्वी तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते, परंतु तो त्यातून बचावला होता. मात्र, चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. मृत अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हत्येसाठी लागणारे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून पुण्यात आणले होते.आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आणि ‘फिल्डिंग’ लावण्यात सोमा गायकवाड व आकाश म्हस्के यांचा सहभाग होता. त्यानंतर आंदेकरांवर गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती.

आकाश म्हस्के सध्या कारागृहात आहे. त्याच्या कृत्याचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याचा भाऊ अक्षय म्हस्केला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारतातील सर्वात मोठ्या रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती

‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुणे : भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत ‘एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वतः विकसित केले असून, या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग अॅस्पिरंट्स’ (CRIEYA) मार्फत विद्यापीठाने अर्थसहाय्य केले आहे.

९.२५ मीटर एवढ्या विशाल विंगस्पॅनसह आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतात तयार झालेले सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी ‘CRIEYA’कडून तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

यशस्वी उड्डाणानंतर या विमानाची आता ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान (२६१ किलो) आणि भारतातील सर्वांत मोठ्या विंगस्पॅनचे आरसी विमान (९.२५ मीटर) अशा विक्रमांसाठी नोंद झाली आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या अधिकाऱ्यांकडून ‘प्रोजेक्ट गरुडा’ला विक्रमाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. त्यामुळे पूर्णपणे विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प अनुभवाधारित शिक्षण, प्रगत एरोस्पेस संशोधन आणि विद्यार्थी-केंद्रित नवोन्मेषाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

या प्रकल्पाला ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू (टेक्नॉलॉजी क्लस्टर) डॉ. रामचंद्र पुजेरी, प्र-कुलगुरू (इनोव्हेशन क्लस्टर) डॉ. मोहित दुबे, प्र-कुलगुरू (क्रिएटिव्ह क्लस्टर), कुलसचिव डाॅ.महेश चोपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे तसेच CRIEYAचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स आणि स्थैर्य विश्लेषण, पिक्सहॉक फ्लाइट कंट्रोलर प्रणाली, आरटीके-जीपीएस आधारित नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम, फ्लाइट टेस्टिंग, रिमोट पायलटिंग, स्ट्रक्चरल व्हॅलिडेशन आणि प्रोपल्शन ऑप्टिमायझेशन ही सर्व कामे स्वतंत्रपणे पार पाडली.

या यशाबद्दल बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “प्रोजेक्ट गरुडा हे अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातील ज्ञानाचा वापर करून संशोधन, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील एरोस्पेस क्षेत्रातील मोठी कामगिरी साध्य केली आहे. अशा प्रकल्पांमधून भारताचे भावी एरोस्पेस तज्ज्ञ आणि संशोधक घडतील, अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विद्यापीठाने आवश्यक ती मदत पुरवून त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे.”

दोनदा अपयश; तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण…

गेल्या जवळपास चार वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक आणि कार्यात्मक अडचणींचा सामना करावा लागला. प्रोपल्शन सिस्टीममधील अडथळे, स्ट्रक्चरल डिझाईनमधील बदल, फ्लाइट कंट्रोलर ट्युनिंग, प्रतिकूल हवामान, धावपट्टीच्या मर्यादा आणि अपयशी चाचण्या अशा अनेक आव्हानांवर त्यांनी मात केली.

२०२४ मधील प्रारंभीच्या चाचण्यांमध्ये आलेल्या अपयशानंतरही विद्यार्थ्यांनी फ्लाइट डेटा विश्लेषण, नव्याने डिझाईन, एरोडायनॅमिक्स व्हॅलिडेशन आणि सिस्टिमॅटिक टेस्टिंगच्या माध्यमातून विमानात सातत्याने सुधारणा केल्या. अखेर, ४ मे २०२६ रोजी धुळे येथील धावपट्टीवर या विमानाने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग करत भारतीय विद्यार्थी-नेतृत्वाखालील एरोस्पेस संशोधनात नवा विक्रम प्रस्थापित केला.

‘CRIEYA’कडून ४८ लाख रुपयांचा निधी

या प्रकल्पाची संशोधन क्षमता आणि शैक्षणिक महत्त्व लक्षात घेऊन ‘CRIEYA’ने तीन टप्प्यांत ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना १:६ स्केल प्रोटोटाइप विकसित करणे, अत्याधुनिक टी-मोटर्स तंत्रज्ञानाद्वारे प्रोपल्शन सिस्टीममध्ये सुधारणा, स्ट्रक्चरल मजबुतीकरण, डायनॅमिक थ्रस्ट आणि टॅक्सी टेस्टिंग तसेच टेलिमेट्री आणि कंट्रोल सिस्टीम अधिक सक्षम करण्यास मदत झाली.

भविष्यातील योजना…

या प्रकल्पाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्कायडायव्हर शीतल महाजन आणि ‘थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा. लि.’चे संचालक कॅप्टन अमोल यादव यांचेही मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म तसेच संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत महापौरांचा वाढदिवस साधेपणात साजरा

पुणे : आजच्या काळात वाढदिवस म्हटला की मोठे बॅनर्स, ढोल-ताशे, फटाके आणि दिखाऊ कार्यक्रम यांचे चित्र पाहायला मिळते. मात्र महापौर मंजुश्री नागपुरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक जाणीव जपत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला.कोणत्याही प्रकारचा गाजावाजा, बॅनरबाजी किंवा ढोल-ताशांचा वापर न करता त्यांनी एका सामान्य आश्रय/सेवा संस्थेला भेट दिली. संस्थेतील मुलांबरोबर वेळ घालवत त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच त्यांच्यासोबत शांत आणि आपुलकीच्या वातावरणात वाढदिवस साजरा केला.

यावेळी महापौर नागपुरे यांनी आपल्या एका महिन्याचे मानधन देखील संबंधित संस्थेला देण्याचा निर्णय घेत सामाजिक दायित्वाची जाणीव अधिक अधोरेखित केली. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलतेने पुढे येण्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.या प्रसंगी मुलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले व समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. महापौरांच्या या साधेपणपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, समाजासाठी संवेदनशील नेतृत्व कसे असावे याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

जीवनातील आईचे योगदान अविस्मरणीय : ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे

स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान

पुणे, १९ मे : आई ही आपल्या आयुष्यातील पहिला गुरू असते. दिवस रात्र राबून,स्वत: झिजून आपल्या पाल्यांसाठी जीवाचे रान करते.आपण आयुष्यभर आईसाठी कितीही केले तरी तिचे उपकार फिटत नाहीत,असे मत ज्येष्ठ साहित्यिका मा.चंद्रलेखाताई बेलसरे यांनी व्यक्त केले.

        अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या वतीने स्व.सौ.उर्मिलाताई कराड यांच्या जयंतीचे औचित्य साधून “स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार ” प्रदान समारंभ  वेदशास्त्रोतेजक सभागृह येथे संपन्न झाला.  यावेळी अपेक्षा मातृसेवा विशेषांकाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींच्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका देवयानीताई वैदानकर, सौ.मीनाताई सत्यशील नाईक, मायाताई प्रभूणे व  श्री.रामहरी कराड-रुईकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

       सदर कार्यक्रमात  सीताबाई नरके,सुनेत्रा गायकवाड, श्रध्दा सिंदगीकर, निर्मला बाचल, प्रमिला विश्वे, स्नेहा मुसरीफ, मंजू महाबळेश्वरकर, वैदेही भोमे, सरिता बक्षी,ज्योती सिनफळ  रूपा करडखेडकर, मंगला कुमावत, प्राची देशपांडे यांना स्व.सौ.उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सौ.श्रध्दा सिंदगीकर यांनी उर्मिलाताई कराड यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कविसंमेलनात अस्मिता मराठे, गणेश पुंडे, सीमा माने, ज्योती मनोहर, पुष्पा कुलकर्णी, अंजली महाजन, प्रकाश नाईक यांनी  सादर केलेल्या आईवरील कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
      कार्यक्रमाचे आयोजक अपेक्षा मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे यांनी प्रास्ताविक केले. श्री.राजेंद्र सगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.