महिनाभरात पडक्या इमारती पा डून परिसर सुरक्षित करणार, सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
- महिला डब्यांजवळील सिग्नल पॉइंटवर गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्यासाठी ‘अॅक्सेस’ यंत्रणा उभारणार
- प्लॅटफॉर्मवर बीट मार्शल नेमण्याची आणि स्थानकांवर सातत्याने संवेदनशील उद्घोषणा (Announcements) करण्याची मागणी
- रेल्वे डीआरएम हरीश मीना यांच्यासोबत शिवसेना शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक
मुंबई दि.२० : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मध्य रेल्वेचे डीआरएम (Divisional Railway Manager) हरीश मीना यांची शिवसेना शिष्टमंडळासह भेट घेतली. या वेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला स्थानक परिसर आणि रेल्वे हद्दीतील महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले. या बैठकतीतील सविस्तर चर्चेअंती, रेल्वेच्या हद्दीतील धोकादायक आणि पडक्या इमारती येत्या महिन्याभराच्या आत पाडण्याचे आश्वासन डीआरएम यांनी शिष्टमंडळाला दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार या संपूर्ण प्रकरणाचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि रेल्वे प्रशासनाला दिलेल्या सूचना:
- ज्या मोडकळीस आलेल्या आणि निर्जन रेल्वे इमारतींचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार कृत्य करतात, अशा रेल्वे लगतच्या सर्व पडक्या इमारती महिन्याभराच्या आत पाडून तिथे रखडलेल्या विकासकामांना गती दिली जाईल, असे आश्वासन डीआरएम हरीश मीना यांनी दिले.
- रेल्वे यार्ड, शेवटचे प्लॅटफॉर्म्स आणि रेल्वेच्या निर्जन जागांवर तात्काळ हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि संपूर्ण परिसरात पुरेशी प्रकाशयोजना (Flashing/Searchlights) करण्यात यावी.
- शहरात पोलिसांचे बीट मार्शल ज्याप्रमाणे फिरतात, त्याच धर्तीवर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कर्तव्य दक्ष रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान तैनात राहावेत. रात्रीच्या शेवटच्या लोकलच्या वेळी प्रवासी उतरतात, तिथे चोख बंदोबस्त असावा.
- लोकल ट्रेन किंवा स्थानकांवर एखाद्या महिलेला अडचण आल्यास तिला तात्काळ मदत कुठे मिळेल, याबद्दलची माहिती देणारी उद्घोषणा सातत्याने रेल्वे स्थानकांवर स्पष्ट आणि संवेदनशील भाषेत केली जावी, जेणेकरून पीडित महिला त्वरित संपर्क साधू शकेल.
- अनेकदा रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी गाड्या आऊटर किंवा सिग्नलला थांबतात. याचा फायदा घेऊन गर्दुल्ले किंवा समाजकंटक महिलांच्या डब्यात घुसून त्रास देतात. अशा संवेदनशील जागांवर काय घडतंय याचा थेट ‘अॅक्सेस’ आणि नियंत्रण यंत्रणा रेल्वे पोलिसाकडे असणे आवश्यक आहे.
- रेल्वे क्षेत्रात सध्या साडेतीनशे महिला कर्मचारी/अधिकारी कार्यरत आहेत. त्यांची सक्षमता आणि संख्या वाढवून, महिला प्रवाशांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल.
- रेल्वे गाड्यांमधून अनेकदा लहान मुली आणि महिलांची अनैतिक वाहतूक केली जाते. अशा गुंड प्रवृत्तींना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क केली जाईल.
- रेल्वे परिसरात रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या किंवा बेवारस आढळणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित निवारा गृह (Shelter Home) उपलब्ध करून देऊन, नंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेत दाखल करण्याची व्यवस्था रेल्वे आणि राज्य शासनाच्या मदतीने केली जाईल.
या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळात तसेच धर्मवीर आनंद दिघे साहाय्यता राज्य प्रमुख राजर्षी अहिरराव, महिला विभागप्रमुख निलम पवार, रेखा सुरणकर, स्मिता देवकर, कल्याण संपर्क संघटक कविता गावंड, रेल्वे पोलीस कल्याण सहाय्यक आयुक्त श्री पाटील आदी उपस्थिती होती.
”महिलांचा अधिकार आणि सन्मान राखणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेल्वे प्रशासनाकडे या विषयाचा तीव्र पाठपुरावा केला आहे. पीडित महिलांना रेल्वे प्रवासात कुठे आणि कशी मदत मिळेल, याची माहिती देणारी विशेष योजना आम्ही तात्काळ सुरू करत आहोत. रेल्वे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावावी, अशा सूचना दिल्या आहेत.”
— डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या व आमदार

