Home Blog Page 38

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करणार आहे.

या धोरणासाठी शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर करून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी केली होती. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एकल महिला धोरण बनवण्याची घोषणा केली होती.

एकल महिलांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनात पीठासीन अधिकारी म्हणून विशेष बैठका घेतल्या होत्या. विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्या आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून धोरण निर्मितीची गरज त्यांनी अधोरेखित केली होती.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वीही एकल महिलांच्या निवारा, रोजगार, आरोग्य, कायदेशीर मदत आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर आवाज उठवत शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने महिला संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या चार दशकांपासून महिलांच्या प्रश्नांवर काम करताना एकल महिलांच्या विविध समस्या, सामाजिक वास्तव आणि त्यांच्यासमोरील अडचणी जवळून अनुभवल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अनेकदा मांडले आहे. त्यामुळे या धोरणात एकल महिलांच्या प्रश्नांचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब पडावे आणि त्यांच्या जीवनमानात प्रत्यक्ष बदल घडवणाऱ्या उपाययोजना समाविष्ट व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

  • संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव

पुणे: संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मेधा कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्रातून भाजपचे हेमंत सावरा, स्मिता वाघ, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व नरेश मस्के यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल रवर्षी खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कारांचे यंदा १६ वे वर्ष होते.

राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांना सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी रेल्वे, महिला सुरक्षा, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, कॉर्पोरेट जिहादच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. विशेष सत्रात, झिरो अवर, प्रश्नोत्तरे व विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, आधार प्रमाणीकरण, आरटीई प्रवेश प्रक्रिया, शेतजमिनी याबाबत लक्षवेधी मांडल्या.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर होणे आनंदाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. जनतेच्या आशीर्वादाची ही पोचपावती आहे. यापुढेही लोकहितासाठी परखडपणे भूमिका मांडत राहीन.”

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” व्याख्यानाचे प्रथम पुष्प

पिंपरी, पुणे (दि. २४ मे २०२६) सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद होते, परंतु देशासाठी ते एकत्र होते. त्याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटना आहे असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी व्यक्त केले.
रविवारी (दि. २४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंच च्या वतीने आयोजित केलेल्या “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात विजय तांबे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी तसेच विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर, मिलिंद फडतरे, किरण खाजेकर, मयूर जैस्वाल, गौरव चौधरी, अनिरुद्ध कांबळे, नरेंद्र बनसोडे, हभप सांगोळे, चैतन्य रणदिवे, महेश पाटील, बाबासाहेब पाटील, गिरिजा कुदळे, सायली नढे, जीविका उठाडा, संदेश भंडारी, महालिंग स्वामी, यशराज पारखी, मॅन्युअल डिसोझा, निक्सन ऑगस्टीन, इरफान शेख, बसवराज कंजे, जिंदा सांडभोर, सूरज कुलकर्णी, सचिन दुरगुडे, वैजनाथ शिरसाठ, अनिल कदम, मनोज ढकोलिया, मंगेश मोरे, राजू शेख, अल्ताफ शेख, सुर्यकांत जाधव, किरण नढे आदी उपस्थित होते.
विजय तांबे यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया १९२८ मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात रचला गेला. हा सत्याग्रह अस्मितेच्या मुद्द्यावर लढला गेला. यामध्ये सर्व समाज घटकांनी सहभाग घेतला होता. १९४२ मध्ये सेवाग्राम मध्ये झालेल्या बैठकीत निशस्त्र प्रतिकाराचा निर्णय झाला. १९४७ ला स्वातंत्र्यप्राप्ती वेळी विस्टन चर्चिल याने भाकीत केले की हा देश खूप काळ एकत्र राहू शकणार नाही. या देशात अनेक धर्म, जाती, वंश आहे. परंतु त्याचे भाकीत भारतीय लोकशाहीचा राज्यघटनेमुळे खरे ठरणार नाही. देशात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. भारतातील दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पुण्यामध्ये महात्मा फुले वाड्यावर गेल्यावर महात्मा गांधी म्हणाले होते की देश घडविणारे खरे महात्मा हे जोतीराव फुले आहेत. फुले, गांधी, नेहरू या महान व्यक्तींमुळे भारतीय राष्ट्रवाद सर्व समावेशक आहे. घटना समितीच्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले आहेत की घटना चांगली दिली आहे, परंतु ती चालवणारे देखील चांगले पाहिजेत. अशी १८८५ ते भारतीय राज्यघटना या काळातील विस्तृत माहिती विजय तांबे यांनी दिली.
अक्षय शहरकर, केनिथ रेमी यांनी स्वागत केले आणि दाहर मुजावर यांनी सूत्र संचालन केले.

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत नगरसेवक अजित घुलेंनी म्हटले आहे कि, हे काम 20 दिवसात झाले नाही तर… न्ग्र्सेव्क्प्द गेले तरी चालेल ..असे आंदोलन करेल.. जर कामे होणार नसतील तर या पदाचे करायचे काय ? कामे होणे महत्वाचे आहे ..

ते म्हणाले,’ केशवनगर-खराडी पुलाचे काम गेले अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर आज स्थानिक नागरिकांसह भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी पालिका प्रशासन तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पुलाचे काम आगामी 20 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम पूर्ण व्हावे ही आमची ठाम भूमिका आहे.

त्यासाठी आयुक्त, महापौर, बांधकाम विभागाचे सभापती, संबंधित अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात यावी आणि पुलाचे काम येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असा विनंती अर्ज आज पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला.जर आगामी 20 दिवसांत पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर महापौर आणि आयुक्त यांच्या समोर पालिका सभागृहात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.त्यासाठी मला माझ्या नगरसेवक पदावरून हटवले तरी चालेल.असेही घुले यांनी म्हटले आहे.

सुतारदरा भागातील वीज समस्या सुटणार,३१५ केव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर होणार कार्यान्वित

ना. चंद्रकांतदादांचे काम जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश

कोथरुड : कोथरुडमधील सुतारदरा भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रलंबित समस्या आता लवकरच निकाली निघणार आहे. या भागातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ३१५ केव्हीए (KVA) क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या निवासस्थानी आज शहर अभियंता आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे मुख्य शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महावितरणच्या कोथरुड विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने, हितेंद्र भिरूड, रोहन बिल्डर्सचे प्रतिनिधी ॲड. सावनकुमार कानडे, भाजप कोथरुड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आदी उपस्थित होते.

कोथरुडमध्ये उभ्या राहत असलेल्या नवीन मोठ्या सोसायट्या आणि इमारतींमुळे अनेक भागांतील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जुन्या ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊन जुन्या वस्त्यांमध्ये व्होल्टेज कमी-जास्त होणे, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. सुतारदरा परिसरातही गेल्या काही काळापासून नागरिकांना अशाच गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सुतारदरा, शिवतीर्थनगर, पेठकर साम्राज्य आदी भागातील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निश्चित केले आहे. मात्र, प्रस्तावित जागा खासगी विकासकाच्या ताब्यात असल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे सदर विषयावर मार्ग काढण्यासाठी आणि महावितरणला तातडीने जागा उपलब्ध व्हावी, यासाठी ना. पाटील यांची आज उच्चस्तरिय बैठक घेतली.

या बैठकीत ना. पाटील यांनी मुख्य शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना विकासकाचे म्हणणे जाणून घेऊन तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, आणि जागा महावितरणला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रक्रिया प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर सुतारदरा आणि परिसरातील विजेवरील ताण कमी होणार असून, वारंवार होणारे ट्रिपिंग आणि भारनियमनाच्या समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरणने या कामाचे नियोजन तातडीने सुरू केले असून, लवकरच काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

कॉकरोच जनता पार्टी संस्थापकाला इंस्टाग्राम अकाउंटचे नियंत्रण परत मिळाले:फॉलोअर्सचा डेटा शेअर करत म्हटले – 94% लोक भारतीय, रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणताहेत?

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे म्हणणे आहे की, त्यांना इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा नियंत्रण मिळाले आहे. अभिजीत यांनी रविवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे.पोस्टमध्ये दीपके यांनी लिहिले – आम्ही परत आलो आहोत, तुम्ही विसरलात की आम्ही जिवंत राहण्यासाठी काय करू शकतो. यासोबत त्यांनी कॉकरोचची एक इमेज देखील लावली आहे.

अभिजीत यांनी X अकाउंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी फॉलोअर्सचा डेटा शेअर केला आहे. तसेच विचारले आहे की, आमचे 94% पेक्षा जास्त फॉलोअर्स भारतातून आहेत, मग केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू भारतीय तरुणांना ‘पाकिस्तानी’ का म्हणत आहेत?

खरं तर किरेन रिजिजू यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले होते – मला त्या लोकांची दया येते जे सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोस टोळीतून शोधतात. भारतात पुरेशी लोकसंख्या, उत्साही तरुण आहेत जे खरे फॉलोअर सिद्ध होऊ शकतात. भारत-विरोधी टोळीकडून मदत घेण्याची काही गरज नाही.
यापूर्वी शनिवारी अभिजीतने सांगितले होते की, त्यांच्या पक्षाची वेबसाइट बंद करण्यात आली आहे. दीपकेने दुपारी 1.14 वाजता X वर म्हटले होते की – सरकारने आमची वेबसाइट बंद केली आहे. त्यावर 10 लाख लोकांनी नोंदणी केली होती. 6 लाख लोकांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

मात्र, ही वेबसाइट सध्या बंद आहे. ती उघडल्यावर ‘दिस साइट कान्ट बी रीच्ड’ (This site can’t be reached) असा मेसेज दिसत आहे.
अकाउंट हॅक झाल्यानंतरही इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स सातत्याने वाढले. रविवार दुपारपर्यंत हा आकडा 2.27 कोटी होता. तर X वर संस्थापक अभिजीतचे एकट्याचेच 2.18 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी..

अहिल्यानगर: सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न झाले असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. “नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण उभा राहिला आहे, हे महत्त्वाचे आहे,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’ ही एक उपहासात्मक ऑनलाइन मोहीम आहे. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी CJI सूर्यकांत म्हणाले, “झुरळांसारखे असे तरुण आहेत, ज्यांना या व्यवसायात रोजगार मिळत नाहीये. यापैकी काही मीडिया, काही सोशल मीडिया आणि काही RTI व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनत आहेत. हे प्रत्येकजणावर हल्ला करायला सुरुवात करतात.” त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही मोहीम सुरू झाली.

लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी कॉकरोच जनता पार्टीबाबत भाष्य करताना सरकारला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “झुरळ हे नाव कदाचित योग्य वाटणार नाही, पण या पार्टीचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. नाव काहीही असले तरी देशातील तरुण या पार्टीच्या पाठीशी उभा आहे. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती असते. जेव्हा या दोन्ही शक्तींचा संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”
दरम्यान, गेल्या काही दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट आणि त्यानंतर १० लाख नोंदणी झालेले अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. यंत्रणांनी दिलेल्या या झटक्यानंतरही सीजेपीने हार मानलेली नाही. संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा मिळवले असून पक्ष नव्या दमाने कामाला लागला आहे.

दरम्यान, या आभासी पक्षामुळे चर्चेत आलेले अभिजीत दीपके यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सिडको वाळूज महानगर-१ येथील त्यांच्या पालकांच्या घरासमोर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी दोन अधिकारी आणि २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

आठ वर्षाच्या लिशा मतकर व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे:
अत्यंत गुणी आणि आश्वासक अवघ्या आठ वर्षाची संगीतकार लिशा विवेक मतकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मानाची संधी मिळवली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये व्हिएतनाम येथे होणाऱ्या इंटरनॅशनल म्युझिक फेस्टमध्ये तिची निवड झाली आहे.ती या महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे . लिशाने भारत उत्सव २०२६ या स्पर्धेत. सोलो परफॉर्मन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या संगीत प्रवासात महत्त्वाचे यश मिळवले. तसेच तिने ऑर्केस्ट्रा गटामध्ये ड्रम वादनाचे कौशल्य सादर केले. या गट सादरीकरणालाही द्वितीय क्रमांक मिळाला.



ही आठवडाभर चालणारी स्पर्धा *अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन (ALCO)*यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील अनेक गुणी कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उदयोन्मुख कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.

लिशाच्या या यशामागे तिची मेहनत, संगीतावरील प्रेम आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला आहे. तिच्या यशात तिच्या गुरूंचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यांचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.

लिशाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्या कुटुंबीयांनी, मित्रपरिवाराने आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून व्हिएतनाममधील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पार्किंग, वाहतूक प्रश्न लवकर सुटेल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : प्रवासी आणि स्थानिक रहिवासी यांना पार्किंग आणि वाहतूक या प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यावर महिनाभरात ठोस मार्ग काढण्यात येईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (रविवारी) प्रसारमाध्यमांना सांगितले.

छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला आमदार शिरोळे यांनी भेट देत स्टेशन परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. विशेषतः पार्किंगची समस्या असून प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहतूक व्यवस्थेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर त्यांनी स्टेशन व्यवस्थापक धनंजयजी सदानंद चंद्रात्रे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पार्किंगच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, येत्या एका महिन्यात ही समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

तसेच स्वच्छता, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांबाबतही चर्चा झाली. वाढत्या प्रवासी संख्येनुसार छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन अधिक स्वच्छ, सुस्थित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी स्थानिक नागरिकांना दिले.

बिडकरांना प्रत्युत्तर:तुमचे तर ३३३ पण आमचे ३७० त्यामुळे विधानपरिषदेवर राष्ट्रवादीचाच दावा -सुनील टिंगरे

पुणे- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच स्वाभाविक दावा असणारच आहे असे येथे माजी आमदार, आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केला आहे. काल भाजपच्या महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आमचे ३३३ मतदार असल्याचा दावा केल्यावर महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी आमचे ३४४ सदस्य मतदार असल्याचा प्रतिदाव केला होता या पार्श्वभूमीवर आज शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुनील टिंगरे, का र्याध्यक्ष प्रदीप देशमुख विरोधी पक्षनेते निलेश निकम व राकेश कामठे उपस्थित होते. आज टिंगरे यांनी एकूण ८६७ सदस्यांपैकी तब्बल ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असून त्याखालोखाल भाजपा व इतर पक्षांचे सदस्य आहेत. असे म्हटले आहे .

महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे, तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांमध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश असून या मतदारसंघात एकूण ८६७ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७९८ निवडून आलेले तर ६९ नियुक्त सदस्यांचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, १८ नगरपरिपदा व नगरपंचायती तसेच ३ कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. एकूण ८६७ सदस्यांपैकी तब्बल ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असून त्याखालोखाल भाजपा व इतर पक्षांचे सदस्य आहेत.
पुणे जिल्हा हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पुणे जिल्ह्यात सातत्याने भक्कम संघटन उभे केले आहे. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच स्वाभाविक आणि न्याय्य दावा आहे.
या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सातत्याने प्रभावी प्रतिनिधित्व केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता यावेळीही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे केली आहे.
केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी किंवा अनाठायी वाद निर्माण करण्यासाठी जर कोणी या जागेवर दावा करत असेल, तर ते योग्य नाही. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची आणि सहकार्याची अपेक्षा आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात प्रबळ पक्ष असून अपक्षांसह मित्रपक्ष देखील आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

हौशी कलाकारांच्या प्रकाशचित्र प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात

निसर्गातील अव्यक्त भावभावनांचे ‘प्रतिबिंब’

पुणे : वन्यजीव, पक्षी, विहंगम निसर्गदृश्ये या विषयी शब्दातून व्यक्त न करता येणाऱ्या भावभावना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत. निमित्त आहे ते ‘प्रतिबिंब’ या प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाचे!

व्यवसाय सांभाळून निसर्गाचे ‘प्रतिबिंब’ टिपणाऱ्या १३ गुणी हौशी कलाकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला रविवारी (दि. २४) बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली. ‘सुखी पांडा’, ‘देहम नेचरक्युअर’, ‘डिस्कव्हर नेचर’ आणि ‘शांतीवन, पाचगणी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रतिबिंब’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे दुसरे वर्ष असून अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, शंतनू अंबुळगेकर, शिवयोगी कंठी, नूतन खेडेकर, व्यंकटेशन कालवै, समीर अय्यर, विश्वेश बेहेरे, अनंतप्रसाद देशपांडे, आमोद फडके, भुपिंदर रंधावा आणि सागर मुथा यांच्या १३० कलाकृती या प्रर्दशनात पाहता येणार आहेत. प्रदर्शन दि. २६ मेपर्यंत सकाळी १०:०० ते रात्री ८:०० या कालावधीत सर्वांसाठी खुले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध व ज्येष्ठ प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ प्रकाशचित्रकार सुधीर हसमनीस, सुरतवाला बिझनेस ग्रुपचे संचालक जतिन सुरतवाला, आर्किटेक्ट हैतवी सुरतवाला, डिस्कव्हर नेचरचे संचालक अनंतप्रसाद देशपांडे, शांतीवनचे संचालक प्रदीप कामत, केदार दंडगे, समीर चाफेकर आदी उपस्थित होते.

सतीश पाकणीकर म्हणाले, निसर्गातील अद्‌भुत क्षण टिपून ते रसिकांपर्यंत पोहोचविणे मनाला समाधान देणारे असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात स्वत: काढलेल्या प्रकाशचित्रांच्या स्वामित्व हक्काबाबत प्रत्येकाने जागरूक राहा असा सल्लाही त्यांनी दिला.

जतिन सुरतवाला उपक्रमाचे कौतुक करून म्हणाले निसर्ग किती सुंदर आहे हे येथे मांडण्यात आलेल्या कलाकृतींमधून दिसून येत आहे. सुधीर हसमनीस, हैतवी सुरतवाला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रिया मुळगुंद यांनी सूत्रसंचालन केले.

‘प्रतिबिंब’ प्रदर्शनाच्या निमित्ताने सोमवारी (दि. २५) सायंकाळी ६:३० वाजता ‘फोटोग्राफी संवाद, अनुभव चर्चा आणि गप्पा’ असा कार्यक्रम सुधीर हसमनीस यांच्या समवेत आयोजित करण्यात आला आहे. तर मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता राहुल गोळे यांच्याकडून ‘लेन्समागच्या गोष्टी’ ऐकता येणार आहेत.

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई


चंद्रपूर-येथील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहाणी होण्याची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणीही वाढली होती. त्यानंतर वनविभागाने केलेल्या तपासात हा हल्ला टी-2 नामक वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून तिचा माग काढणे सुरू होते. अखेर शनिवारी रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना टी-2 वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, पवनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई करण्यात आली. टी-2 वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश प्राप्त होताच वन विभागाच्या विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. या पथकाने शनिवारी रात्री 7.15 च्या सुमारास ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे एका वाघाचा वेध घेतला. सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला वाघ हल्लेखोर वाघीण आहे किंवा नाही याविषयी संभ्रम होता. पण त्यानंतर सदर वाघ ही नरभक्षक टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 8 च्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले.
विशेष म्हणजे ही कारवाई झाली त्यावेळी टी-2 वाघिणीचे बछडे तिच्यासोबत नव्हते. त्यामुळे त्या बछड्यांचा वनविभाग स्वतंत्रपणे शोध घेणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या घटनेप्रकरणी विरोधकांनी सरकार व वन विभागावर टीकेची झोड उठवली होती. वाघिणीच्या हल्ल्यात 4 निष्पाप भगिनींचा झालेला मृत्यू ही केवळ दुर्घटना नव्हे, तर तो प्रशासकीय अनास्थेने केला घात आहे. हे सरकार नक्की कुठे झोपले आहे? ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? असा सवाल विरोधकांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

गतवर्षी गेला होता 3 महिलांचा बळी

गुंजेवाहीच्या घटनेमुळे गतवर्षीच्या मेंढा (माल) घटेनच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. गतवर्षी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा (माल) जंगलात वाघाने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता. त्यात 3 महिलांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर मोठे राजकारण झाले होते. वन विभागाला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता गुंजेवाहीच्या जंलगात 4 महिलांचा बळी गेल्यामुळे स्थानिकांच्या रोषाचा कडेलोट झाला आहे.

मुंबईच्या फौजदारावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस उपनिरीक्षकाने तरुणीवर वारंवार अत्याचार करत तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वदेश विजय चव्हाण असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नावे आहे. चव्हाण हा सध्या मुंबईतील मालाडमधील कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याबाबत ३१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चव्हाणवर बलात्कारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करावी, अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि चव्हाण यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये एका डेटिंग ॲपवरून ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर मार्च २०२४ मध्ये दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळी चव्हाण याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत चव्हाण याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, मे २०२४ मध्ये आपण गर्भवती असल्याचे तरुणीला समजले. त्याबाबत माहिती दिल्यानंतर ‘आधी नोकरी लागू दे, त्यानंतर लग्न करू,’ असे सांगत चव्हाणने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये चव्हाणची राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुंबई येथे नियुक्ती झाली. त्यानंतर लग्नाबाबत वारंवार विचारणा करूनही चव्हाण टाळाटाळ करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. मार्च २०२६ मध्ये चव्हाण याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनुसार, वारजे माळवाडी पोलिसांनी चव्हाण याच्याविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, ट्रम्प आत होते: सुरक्षा दलाच्या गोळीबारात संशयिताचा मृत्यू

0

महिन्यापूर्वी वार्ताहर डिनरमध्येही झाला होता गोळीबार

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये शनिवारी एका संशयिताने व्हाईट हाऊसजवळ सुमारे 30 गोळ्या झाडल्या. घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते.

अहवालानुसार, व्हाईट हाऊसच्या संशयित हल्लेखोराने सुरक्षा तपासणी नाक्यावर गोळीबार केला, जिथे यूएस सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी तैनात होते. अधिकाऱ्यांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत संशयित हल्लेखोराला गोळी लागली. रुग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाला.

या गोळीबारात एक सामान्य नागरिकही गोळी लागून जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्याला हल्लेखोराची गोळी लागली की प्रत्युत्तरादाखल गोळीबारात दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

गोळीबारानंतर व्हाईट हाऊस परिसरात गोंधळ उडाला. तेथे उपस्थित पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सीक्रेट सर्व्हिस एजंट्स शस्त्रांसह संपूर्ण परिसरात तैनात झाले आणि सुमारे 40 मिनिटे लॉकडाऊनसारखी परिस्थिती राहिली.एफबीआय, सिक्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी परिसर वेढला आणि तपास सुरू केला. व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्समधील नॉर्थ लॉन रिकामा करण्यात आला आहे. एफबीआय संचालक काश पटेल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, सुरक्षा यंत्रणा गोळीबाराच्या बातमीवर कारवाई करत आहेत.

सिक्रेट सर्व्हिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की त्यांना 17th स्ट्रीट आणि Pennsylvania Avenue NW परिसरात गोळीबाराची माहिती मिळाली होती. हा परिसर व्हाईट हाऊसपासून सुमारे एक ब्लॉक दूर आहे. एजन्सीने सांगितले की, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी माहितीची पुष्टी करण्यात व्यस्त आहेत.

वॉशिंग्टनच्या मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाकडून घटनेवर तात्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. सध्या सुरक्षा यंत्रणा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

यापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यानही गोळीबार झाला होता. कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते.

न्यूज एजन्सी एपीनुसार हल्लेखोराने हॉटेलच्या बॉलरूमबाहेर गोळीबार केला होता. ट्रम्प आणि पाहुणे बॉलरूममध्ये होते. हल्ल्याच्या सुमारे दीड तासानंतर ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित केले होते.

ते म्हणाले- अमेरिकेच्या संविधानावर हल्ला झाला. सीक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शौर्याने काम केले. ज्या अधिकाऱ्याला गोळी लागली, तो सुरक्षित आहे. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. हल्लेखोराजवळ शक्तिशाली बंदूक होती.

अमेरिकेत 15 हजार भारतीयांची कपात,नवी नोकरी नाही.

0

वाशिंग्टनDC:अमेरिकेत सुमारे १५ हजार भारतीय टेक कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यानंतर त्यांच्यासमोर आता हद्दपारीचे संकट उभे राहिले आहे. हे सर्व कर्मचारी एच-१बी व्हिसावर अमेरिकेत गेले होते. मात्र, नोकरी गेल्यानंतर नव्या नोकरीसह व्हिसाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांच्याकडे मर्यादित वेळ उरला आहे. नियमांनुसार नोकरी गेल्यानंतर ६० दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधावी लागते.

या काळात नवीन नियोक्ता किंवा स्पॉन्सर मिळाला नाही तर अमेरिकेबाहेर जावे लागू शकते.मेटा, अॅमेझॉन आणि ओरेकलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये अलीकडेच सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात आणि पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये १५ हजारांहून अधिक भारतीयांचा समावेश आहे. यापूर्वी नोकरी गेल्यानंतर टेक कर्मचाऱ्यांना लवकर नवी संधी मिळत होती. मात्र आता मुलाखतींची प्रक्रिया दीर्घ होत असून कंपन्या व्हिसा स्पॉन्सरशिप देण्यास टाळाटाळ करत आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे व्हिसा कोटाही कमी झाला आहे.

अमेरिकेतील डोनाल्ट ट्रम्प प्रशासनाने ग्रीन कार्ड प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. नव्या नियमानुसार ग्रीन कार्डसाठी अर्जदारांना अमेरिकेत राहून प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. त्यांना आपल्या मायदेशात परत जाऊन अमेरिकन वाणिज्य दूतावासामार्फत अर्ज करावा लागणार आहे. आतापर्यंत अमेरिकेत राहूनच ‘ॲडजस्टमेंट ऑफ स्टेटस’ प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रीन कार्ड मिळत होते. याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार आणि एच-१बीसारख्या तात्पुरत्या व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. तथापि, निर्वासितांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

२०२४ मध्ये अमेरिकेने १४ लाख ग्रीन कार्ड जारी केले होते. त्यापैकी ८.२० लाख लोकांना अमेरिकेत राहूनच ग्रीन कार्ड मिळाले होते. गेल्या २० वर्षांत दरवर्षी ५ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत राहून ग्रीन कार्ड मंजूर झाले.

ग्रीन कार्ड अनुशेष -कॅट इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, रोजगाराधारित ग्रीन कार्डच्या प्रलंबित अर्जांमध्ये भारतीयांची संख्या १८ लाख प्रकरणांच्या बॅकलॉग पैकी ११ लाख प्रकरणे भारतीयांची आहेत.

१०-१५ वर्षांची प्रतीक्षा : ईबी-२ आणि ईबी-३ श्रेणीतील भारतीयांना आधीच १० ते १५ वर्षे प्रतीक्षा करावी लागते नव्या धोरणामुळे प्रक्रिया लांबू शकते.नोकरी, अमेरिकेत प्रवेश कठीण होईल.

एच-१ बी वर अवलंबित्व जास्त : २०२४ मध्ये अमेरिकेने मंजूर ४ लाख एच-१बी अर्जांपैकी २.८३ लाख अर्ज भारतीयांचे होते. म्हणजेच ७१ टक्के होता.

नोकरी गमावलेल्या भारतीयांसाठी नवीन नोकरी मिळवणे आणखी अवघड झाले आहे. आता त्याच क्षेत्रात, त्याच दर्जाची आणि समान वेतनश्रेणीतील नोकरी मिळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर अभियंता हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करून एच-१बी दर्जा कायम ठेवू शकत नाही. तसेच कंपन्यांना आता अधिक कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. यातून भारतीयांना स्पॉन्सर मिळणे अधिक कठीण बनले आहे.