सरकारने जारी केलेल्या सुधारित सुट्टीसंदर्भातील अधिसूचनेनुसार, ईद-उल-झुहा (बकरीद) निमित्त सुट्टी 27 मे 2026 ऐवजी 28 मे 2026 रोजी असेल. त्यानुसार, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत कार्यरत असलेली सर्व कार्यालये गुरुवार, 28 मे 2026 रोजी बंद राहतील. 28 मे 2026 रोजी नियोजित असलेल्या पासपोर्ट-संबंधित सर्व अपॉइंटमेंट्स एक दिवस आधी म्हणजेच 27 मे 2026 रोजी घेण्यात येतील.
अपॉइंटमेंट्स पुनर्निर्धारणाचा तपशील:
* जुनी तारीख: 28 मे 2026 (गुरुवार)
* नवीन तारीख: 27 मे 2026 (बुधवार)
ज्या अर्जदारांच्या अपॉइंटमेंट्स 28 मे 2026 रोजी नियोजित होत्या, त्यांना विनंती आहे, की त्यांनी 27 मे 2026 रोजी त्यांच्या नियोजित वेळेनुसार आपापल्या पीएसके/पीओपीएसके (PSK/POPSK) कार्यालयात भेट द्यावी. पुनर्निर्धारित अपॉइंटमेंट्स संदर्भात संबंधित अर्जदारांना एसएमएस द्वारेही सूचना पाठवल्या जातील.
ज्या अर्जदारांच्या ‘चौकशी’ अपॉइंटमेंट्स 28 मे 2026 रोजी नियोजित आहेत, त्यांना 27 मे 2026 रोजी पासपोर्ट भवन, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी, अर्जदार खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
केडगाव,ता.२५ : “समाज जीवनातील घडामोडी शब्दात पकडून पुस्तक रूपाने प्रसिद्ध होतात. तेच सत्य वास्तव हा खरा इतिहास असतो असे समाज घडविणारे सृजनशील साहित्य लिहिणाऱ्या लेखकांची खरी गरज आहे.” असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.२३ व दि.२४ मे २०२६ रोजी दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी श्री शिंदे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, स्वागताध्यक्ष डॉ.रोहन खवटे, निमंत्रक डॉ.भरत खळदकर व सहनिमंत्रक रामचंद्र नातू, मराठी चित्रपट सैराट फेम अभिनेता सुरज पवार, अभिनेत्री कोमल शिंपी, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ समन्व्यक ह.भ.प संजय वाबळे, विनोद जगताप, कैलास शेलार, डॉ.अशोक जाधव, प्रमोद ढमाले, संभाजी फडके, एकनाथ अडसूळ, भाऊसाहेब फडके, तानाजी केकाण, अरुण यादव, बाळुतात्या यादव, चंद्रकांत बोरावके आदी उपस्थित होते.
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी, साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, लोकरंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आणि समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन रंगले.
श्री जानकर म्हणाले, “ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व त्यांचे सहकारी हे अनेक अडचणी सहन करीत या साहित्य मेळाव्याचे आयोजन करतात. कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने त्यांची ताऱेवरची कसरत होते. नवोदित कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत त्यांना हे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. आम्ही सत्तेत असू की नसो, आम्ही नेहमी पाठीशी उभे राहून आपणास सहकार्य करू आणि या साहित्य चळवळीस पाठबळ देऊ.”
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल म्हणाले, “दौंड तालुका हा नेहमी विकासकामात आघाडीवर आहे. भीमथडी मराठी साहित्य संमेलन ही साहित्य चळवळ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या तालुका सक्षम करण्यासाठी भीमथडी मराठी साहित्य संमेलन महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांना कायम मदत करू.”
ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, “साहित्य व मराठी संस्कृती मजबूत झाल्याशिवाय समाज हा सक्षम होणार नाही त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य भवन हे दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी पाच एकरात भव्य दिव्य स्वरूपात साकरण्यात येणार आहे. यामध्ये लोकसहभागातून व शासकीय मदतीने हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, मराठी साहित्य भवनात भव्य सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक उद्यान, साहित्यिकांसाठी आश्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असे विविध उपक्रम या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.”
साहित्य संमेलनाची सुरुवात श्री बोरमलनाथ देवाला भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक ह भ प संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महादेव जानकर, अरुण यादव, माजी न्यायाधीश वसंत पाटील उपस्थित होते.
यावेळी भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय डाडर, सुशांत जगताप, अरविंद जगताप, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले.आभार भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सचिव दिपक पवार यांनी मानले.
• राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. २५: राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख, व्यापार सल्लागार मार्क बिरेल, वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे महत्त्वाचे केंद्र बनत असून या जीसीसी कॅपिटलमध्ये अग्रेको कंपनीचे स्वागत आहे. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळेल. पुणे येथील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे.
अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. आज झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारणार असून त्याचे काम यावर्षी मध्ये सुरु होणार आहे. हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील ॲग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र असेल. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे; तसेच अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे.
अग्रेको कंपनीचा कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर असणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासाठी ॲग्रेकोकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबरह राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा आणि तापमान नियंत्रण प्रणालींच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याचीदेखील ग्वाही कंपनीने दिली आहे.
३० व ३१ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य आयोजन; देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग
पुणे : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि डिजिटल कौशल्य यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी मेंदूतील कल्पनाशक्तीवर आधारित ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अथवा ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ ही भारताच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा ठरत असून त्याच संकल्पनेवर आधारित ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो २०२६’चे आयोजन येत्या ३० आणि ३१ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच,पुणे येथे करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य आयोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन चे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या परिषदेला आयआयसीटीचे संचालक आशिष कुलकर्णी, प्रशांत महाडीक – डायरेक्टर, शारदा बिज़नेस सोल्यूशन प्रा लि., निखिल हळ्ळी डायरेक्टर अरेना, विनीता बच्छानी – डायरेक्टर मोशन पिक्चर्स स्कूल आदी मान्यवर उपस्थित होते.
एक्स्पो विषयी अधिक माहिती देताना संतोष रासकर म्हणाले, हा एक्स्पो केवळ कला, ॲनिमेशन किंवा तंत्रज्ञानाचा मेळावा नसून भारतातील भविष्यातील अब्जावधी रुपयांच्या क्रिएटिव्ह अर्थकारणाची झलक ठरणार आहे. असल्याचे आयोजकांनी सांगितले . जगभरात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामुळे रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासासाठी नवे मार्ग खुले होत आहेत. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिक स्तरावर मोठी संधी निर्माण झाली आहे.
सध्या जागतिक स्तरावर ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा वाटा GDP मध्ये सातत्याने वाढत असून ॲनिमेशन, गेमिंग, VFX, डिजिटल डिझाईन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित क्रिएटिव्ह सोल्यूशन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. केंद्र सरकारनेही डिजिटल आर्ट आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला राष्ट्रीय आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे केंद्र बनवण्याचे व्हिजन मांडले असून त्यासाठी विविध धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. आयआयसीटी चे डायरेक्टर आशीष कुलकर्णी यांनी ही माहिती दिली
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला ‘पुणे-मुंबई AVGC-XR कॉरिडॉर’ हा या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. AVGC-XR म्हणजे Animation, Visual Effects, Gaming, Comics आणि Extended Reality या क्षेत्रांचा समावेश असलेला हा कॉरिडॉर पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडून सर्जनशील उद्योगांचे नवे केंद्र निर्माण करणार आहे. शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा मजबूत पाया असलेल्या पुणे शहराला यामुळे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या एक्स्पोमध्ये देश-विदेशातील सुमारे ३५ नामांकित कंपन्या आणि स्टुडिओ सहभागी होणार आहेत. यात असेंबलाज स्टुडिओ, रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, रेड चिलीज VFX, एनव्हिजन स्टुडिओ, कंपनी 3, NY VFXWala, निली गेम्स, गेमडोरा, रॅम्पन्ट स्टुडिओ, हायटेक, डब्ल्युआरसी, विजडम ग्राफिक्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या केवळ मनोरंजन क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन, वैद्यकीय 3D सिम्युलेशन, डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत.
ऑरेंज इकॉनॉमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या क्षेत्रासाठी मोठ्या भांडवलाची किंवा प्रचंड जागेची आवश्यकता नसते. एक संगणक, इंटरनेट आणि सर्जनशील विचार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक देखील जागतिक स्तरावर काम करू शकतो. त्यामुळे हे क्षेत्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवते. महिलांचा वाढता सहभाग, स्टार्टअप संस्कृतीला मिळणारे प्रोत्साहन आणि डिजिटल माध्यमातून निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार संधी यामुळे क्रिएटिव्ह इकॉनॉमी सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
आज ऑनलाईन शिक्षण, मोबाईल ॲप्लिकेशन्स, गेमिंग, व्हर्च्युअल टूर, वैद्यकीय शस्त्रक्रियांचे 3D सिम्युलेशन, डिजिटल जाहिरात, सोशल मीडिया कंटेंट आणि OTT प्लॅटफॉर्म यांसारख्या गोष्टी सामान्य नागरिकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. अगदी Uber, Swiggy आणि Zomato यांसारख्या सेवा देखील या नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेचेच उदाहरण असल्याचे संतोष रासकर यांनी स्पष्ट केले.
भारतातील पुढील पिढी कोणत्या नव्या डिजिटल आणि सर्जनशील जगात प्रवेश करणार आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणती नवी दिशा मिळणार आहे आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर भारत महासत्तेकडे कसा वाटचाल करत आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा एक्स्पो ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, कलाकार, डिझायनर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे पुष्कर श्रोत्री यांचा नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्काराने गौरव
पुणे : मी गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहे. माझे पाय कायम या रंगभूमीला लागले असावेत. त्यातूनच एखादेतरी मराठी नाटक करण्याकडे माझा कल असतो. मला कायम रंगभूमीवर कार्य करण्याची इच्छा आहे, यासाठी रसिकांचे बळ, सदिच्छा, पाठींबा सातत्याने लाभावा, अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली. चित्रपट व नाट्यसृष्टीत प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या केशवराव दाते यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी वंदनीय आहे, अशा कृतार्थतेच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेच्या ४८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्काराने पुष्कर श्रोत्री यांचा गौरव करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देतान श्रोत्री बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, अभिनेत्री प्रिया बेर्डे, भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अशोक जाधव, शिरूर शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके, हडपसर शाखेचे अध्यक्ष प्रमोद रणनवरे मंचावर होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी (दि. २५) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. माणिक वर्मा स्मृती पुरस्कार सौ. सुनीता गुणे यांचा, कै. बबनराव गोखले अखंड नाट्यसेवा पुरस्काराने वसंत भडके यांचा तर कै. भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्काराने प्रदीपकुमार कांबळे यांचा गौरव करण्यात आला. विराजस कुलकर्णी, राज कुबेर, स्वप्नील कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, ओंकार खाडिलकर, मयूर आडागळे, विश्वास पांगारकर, आनंद जोशी, दत्तात्रय गाडेकर, सुशील भोसले, दिलीप वाघमारे, राहुल भालेराव, आशा मुसळे, हेमांगी काळे-गरुड, दशरथ पाचरणे, अक्षया देवधर, सावनी दातार यांचा सत्कार प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, शशिकांत कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिवादन करणारा ‘आठवणीतला लक्ष्या!’ हा विशेष कार्यक्रम पुण्यातील कलाकारांनी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची संकल्पना चेतन चावडा आणि जतीन पांडे यांची होती.
योगेश सोमण म्हणाले, योग्य वयात मिळालेला पुरस्कार कलाकारासाठी त्याने केलेल्या कार्याची पावती असते तसेच पुढे जोमात कार्य करण्यासाठी मिळालेली प्रेरणाही असते. नाट्य परिषेच्या माध्यमातून राबविला जाणारा ‘इतिहास रंगभूमीचा’ हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा ज्या योगे कलावंत, साहित्यिक, लेखक यांच्या कार्याचा इतिहास जीवंत ठेवता येईल आणि त्याचे दस्तावेजीकरण होईल, या करीता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संपूर्ण सहकार्य लाभेल. नाट्य परिषदेच्या सर्वच शाखा उत्तम कार्य करीत असून ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांसाठी सातत्याने पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.
पुणेकरांच्या प्रेमाची लक्ष्मीकांत यांना जाण होती : प्रिया बेर्डे…
प्रिया बेर्डे म्हणाल्या, मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मोठे असून त्यांच्या निधनाला २१ वर्षे झाल्यानंतरही रसिकांच्या प्रेमातून ते आपल्याच आहेत हे सातत्याने जाणवते. लक्ष्मीकांत बेर्डे हे पुणेकर रसिकांचे प्रेम जाणून होते. ते एक उत्तम माणूस व कलाकाराचे मूर्तीमंत उदाहारण होते. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवरच असत. त्यांनी दुसऱ्याचा विनोद हडपण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. कारण ते अतिशय प्रतिभावन कलावंत होते. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून नाटक, चित्रपट, मालिका कलावंतच नव्हे तर लोककलाकारांच्याही समस्या जाणून घेत कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सांगीतिक कारकीर्द पुण्यात घडली : सुनीता गुणे….
सत्काराला उत्तर देताना सौ. सुनीता गुणे म्हणल्या, मी सांगलीची असले तरी माझी सांगीतिक कारकीर्द पुण्याने घडविली आहे. या क्षेत्रातील सेवा जाणून घेत नाट्य परिषदेतर्फे माणिक वर्मा यांच्या नावे दिला गेलेला पुरस्कार माझ्यासाठी मौल्यवान आहे.
परिषदेचे सर्वातोपरी सहकार्य : मेघराज राजेभोसले….
नाट्य परिषदेच्या सर्व शाखा उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. कला क्षेत्रात एकमेकांचा आदर करत सहकार्याने काम केल्यास उत्तम कार्य घडते. कलावंताला जगण्यासाठी कलेशिवाय दुसरे साधन उपलब्ध करून देण्यासाठी परिषद कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविकात दिली.
संतप्त शिवसैनिक थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चढले, महापालिकेत शिरून प्रशासनाला विचारला जाब
पुणे- पहिल्याच पावसात पुणे शहरातील रस्ते, चौक, नाले आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेवर अत्यंत आक्रमक पद्धतीचे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शेकडो शिवसैनिक पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करा नाहीतर पुणेकरांना होड्या वाटा”, “पुणेकरांना पावसात बुडवणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो” अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात संतप्त शिवसैनिकांनी थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. “महानगरपालिकेने हजारो कोटींच्या निविदा काढल्या, वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या, मात्र प्रत्यक्षात एकही काम वेळेत आणि दर्जेदार झालेले नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात संपूर्ण पुणे शहर पाण्यात बुडाले. सामान्य पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रस्ते, चौक आणि वस्त्या जलमय झाल्या. हा हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला याचा जाब आता पुणेकर विचारणार आहेत,” असा इशारा त्यांनी दिला. “पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना शिवसेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असेही ते म्हणाले.
पहिल्याच मुसळधार पावसात पुणे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने सर्वसामान्य पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली, अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, तर शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे निकामी झाल्याचे चित्र दिसून आले. पावसाळ्यापूर्व कामांवर हजारो कोटींच्या निविदा काढल्याचा दावा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा भोंगळ आणि गलथान कारभार पहिल्याच पावसात उघड झाल्याचा आरोप शिवसेनेने केला. “शेकडो कोटींचा निधी गेला कुठे?”, “पुणेकरांचा पैसा खाल्ला कोणी?” असा सवाल करत शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने महानगरपालिकेचा निषेध नोंदवला. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने प्रतीकात्मक होड्या भेट देण्यात आल्या. याचवेळी आंदोलक शिवसैनिकांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्यानंतर अनेक शिवसैनिक अधिक संतप्त झाले आणि त्यांनी थेट प्रवेशद्वारावर चढून आंदोलन तीव्र केले. काही शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरून आत शिरत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर घेतलेली जलपर्णी. मुळा-मुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी थेट अंगावर जलपर्णी घेत “मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?” अशा घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना प्रत्यक्षात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्याचे चित्र असल्याने शिवसेनेने प्रशासनाला लक्ष्य केले. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिक आणि माध्यमांचे विशेष लक्ष वेधले गेले.
पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण करण्यात झालेल्या हलगर्जीपणाविरोधात शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सर्वसामान्य पुणेकरांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, शहराला पाण्यात बुडवणाऱ्या प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवला जाईल, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर घुले, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, पंकज कोद्रे,विकी माने, अभिजित बोराटे, आनंद गोयल,मिलिंद अहिरे, दत्ता खवळे, नितीन पवार, सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, नवनाथ निवंगुणे, प्रकाश ढमढेरे, दीपक कुलाळ, प्रवीण हिलगे, तुषार मरळ, अक्षय टकले, महेंद्र जोशी, अनिकेत सपकाळ,संतोष लांडगे,अक्षय तारू, सचिन तरवडे,एकनाथ ढोले, अनिल दामजी, संदेश पावसकर, लक्ष्मण कामलेकर, स्मिता साबळे, विशाल सरोदे, अजित ढोकळे,रोहित कदम, अश्विनी मल्हारी,हेमंत बत्ते, स्वराज बाबर, प्रशांत मते, प्रणव धंगेकर, आकाश रेणूसे, मार्तंडराज धंधुके, उमेश गालींदे, अमित दाभाडे,अकबर शेख, सुहास कांबळे, श्याम ताठे, उद्धव कांबळे, राजू परदेशी, श्रीधर कामठे, मंगेश सातपुते,तुषार सातपुते, आशिष कामठे, सोनू रणपिसे श्रीराम चौक जेष्ठ नागरिक, शिवसेना पुणे शहरातील पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन
मुंबई, 25 मे 2026-जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या बारा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या काळात मोदींनी या देशाचा असा भक्कम पाया रचला आहे की यापुढे सातत्याने त्यावरच्या इमारतीवर मजलेच चढत आपण पुढेच जाणार. आता पाठीमागे जाण्याचे काहीच कारण नाही. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली ही प्रगती थक्क करणारी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. रविंद्र नाट्य मंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, राजेश पांडे, आ. संजय कुटे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या 12 वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत गरिबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे असा गरीब केंद्रित कारभार झाला. त्यामुळे दहा वर्षांमध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी 2013-14 साली 103 लाख कोटी होता, तो जीडीपी आज 357 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे दहा वर्षांमध्ये आपला जीडीपी तिपटीने वाढला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 2013 -14 मध्ये जो जीडीपी 13 लाख कोटींचा होता तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची ही वाढ मोदींनी देशाच्या अर्थकारणात आणलेल्या बदलामुळे शक्य झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. युपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांसाठी योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊन त्याच्यावर लोकांनी जगले पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून अनुदानप्रणित अर्थव्यवस्था त्या काळात तयार झाली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी निर्माण करू शकलो नाही. म्हणून मोदींनी अर्थव्यवस्था तयार केली की ज्यात गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होतील. त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीत पैसा येईल आणि आलेल्या पैशाच्या उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून त्याला आपल्या पायावर उभा करण्याचे काम देशातील सरकार करेल. आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही. त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत धोरण आणि विकासाचा कार्यक्रम पंतप्रधानांनी उभा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरोधात एक जनआंदोलन उभे केले. देशात या काळात पारदर्शक कारभार कसा होईल याची दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांच्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना जात आहेत. त्यांच्या असंख्य योजना एका पुस्तकात मांडता येणार नाहीत इतक्या त्या व्यापक आहेत. स्वच्छ भारत योजनेपासून एलपीजी लाभार्थ्यांना लाभ सोडून देण्याचे आवाहन करत तो लाभ त्यांनी देशाला मिळवून दिला हे क्रांतिकारी आहे.
पुणे, दि. 25 : पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात मोठी कारवाई करत सुमारे रु. २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १७१६ बॉक्स अवैध मद्यसाठा आणि दोन ६ चाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात आली.
मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रथम शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे छापा टाकून गोवा आणि कर्नाटक राज्य विक्री परवानाधारक मद्यसाठा जप्त करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातून एक कंटेनर ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये बिअर आणि मद्याच्या ६९६ बॉक्सचा साठा आढळून आला. यामध्ये एकुण सुमारे रु. 81,27,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपासात सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ आणखी एक कंटेनर पकडण्यात आला. त्यात विविध राज्यांसाठी विक्री परवानगी असलेले मद्याचे १०१६ बॉक्स आढळून आले. वाहनांवर बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचेही निष्पन्न झाले. यामध्ये एकूण सुमारे 1,21,99,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचाली मुंबई– राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या वाटपावरून जोरदार चर्चा रंगली आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांनाही वेग आला आहे.
विधान परिषद निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला 4 जागा देण्याची चर्चा सुरू असली तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपसमोर 6 जागांचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांवर दावा कायम ठेवला आहे. तर भाजपकडून अधिकाधिक जागा आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवताना दिसत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महायुतीत कोणताही वाद टोकाला जाऊ नये आणि सर्व पक्षांमध्ये समन्वय राखला जावा, यासाठी भाजप नेतृत्वाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा वाढू लागल्यानंतर भाजपने समेटाची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांची नाराजी दूर करून तोडगा काढण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महायुतीमध्ये सुवर्णमध्य साधत निवडणुकीत एकत्रित ताकद दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार आणि शिवसेनेच्या मागण्यांवर भाजप कितपत सकारात्मक भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत महायुती एकसंघ राहणार की अंतर्गत नाराजी आणखी वाढणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
पुणे, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सुमारे ९१ लाख १६ हजार ३२५ मतदारांच्या नोंदींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्म द्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मोहीमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून २० ते २९ जूनदरम्यान गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. ७ ऑक्टोबर २०२६ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए)या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, अशी ग्वाही श्री. डुडी यांनी यावेळी दिली.
सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे 7 “प्रति- आवाहन”
पुणे- पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात महागाई व बेरोजगारीच्या विरोधात पुण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने अभिनव बैलगाडी आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून ते पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी “पेट्रोलचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “डिझेलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “गॅसचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “महागाई कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ” अशा घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोदींनी संपूर्ण देशाला तयार करण्याचे मेलडी चॉकलेट दिले आहे. त्यागाचा सर्व बोजा सर्वसामान्य जनतेवर सोपवून केवळ एक दिवसाच्या साधेपणाचा आव सत्ताधाऱ्यांनी रील द्वारे आणलेला दिसला. केवळ एक दिवस बुलेट अथवा टू व्हीलर वर फिरून आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आहे तसा आपला लवाजमा, वाहनांचा ताफा, बडेजाव करत फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीस व सत्ताधाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या आव्हानातील गांभीर्य काढून घेतले. दोन दिवसांची चमकोगिरी आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती दिसत आहे ! ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीला सामान्य जनता उबली आहे.
सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्वतः पासून सुरुवात करावी अशी मागणी करत आम आदमी पार्टीने 7 “प्रति- आवाहन” दिले.
१. शासकीय उत्सवांवरील, उद्घाटने व भूमिपूजन सोहळ्यांवरील उधळपट्टी थांबवा: पुढील १ वर्ष कोणतेही अनावश्यक व भव्य शासकीय सोहळे, उद्घाटन कार्यक्रम, भूमिपूजन कार्यक्रम साजरे करणे बंद करा. ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करा. २. साधेपणाचा अवलंब: सर्व शासकीय कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात पार पाडावेत. महापौर, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनांच्या सजावटीवर होणारा खर्च तात्काळ थांबवा. ३. वेतन आणि पेन्शनचा त्याग: प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपच्या सर्व महापौर, नगरसेवक यांनी स्वेच्छेने १ वर्षासाठी आपले वेतन आणि भत्ते (Perks) सोडून द्यावेत. ४. भव्य रॅलींवर बंदी: शक्ती प्रदर्शनासाठी आणि भव्य रॅलींसाठी होणारा अवाढव्य खर्च थांबवून तो पैसा लोककल्याणासाठी वापरावा. ५. विदेशी दौरे रद्द करा: जोपर्यंत अत्यंत आवश्यक नसेल, तोपर्यंत सरकारी खर्चाने होणारे विदेशी अभ्यास दौरे आणि मोठमोठी शिष्टमंडळे पाठवणे बंद करावे. ६. VIP संस्कृतीचा अंत, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी थांबवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर: पुढील १ वर्ष सर्व व्ही.आय.पी. कॉन्व्हॉय (ताफा) आणि लक्झरी सरकारी गाड्यांचा वापर थांबवावा. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा ‘कार पूलिंग’चा वापर करावा. तसेच १ वर्ष कोणत्याही नवीन सरकारी गाड्यांची खरेदी करू नये. सरकारी आस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याचे काटेकोर पालन करावे. ७. भ्रष्टाचारमुक्त वर्ष: किमान १ वर्ष तरी प्रशासनातून भ्रष्टाचार पूर्णपणे हद्दपार करण्याची शपथ घेऊन ती पाळावी आणि सर्वसामान्य त्रस्त नागरिकांना प्रशासकीय सेवा तात्काळ देऊन दिलासा द्यावा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई करावी.
यावेळी विजय कुंभार (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ अभिजीत मोरे (प्रदेश सचिव), अमित म्हस्के (प्रदेश समन्वयक), मुकुंद किर्दत (प्रदेश प्रवक्ते), रविराज काळे (प्रदेश युवा अध्यक्ष), संजय कोने (प्रदेश संघटक – कामगार आघाडी), सुदर्शन जगदाळे ( पुणे शहर अध्यक्ष), धनंजय बेनकर (पुणे शहर अध्यक्ष), सुभाष कारंडे (पुणे शहर महासचिव), सतीश यादव (पुणे शहर सचिव), ऋषिकेश कनवटे (प्रदेश युवा आघाडीडी उपाध्यक्ष), एडवोकेट गणेश थरकुडे, विकी पासोटे, शुभम चव्हाण, ऋषिकेश मारणे व इतर उपस्थित होते.
पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे.
पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला ‘रुमॅटिक हार्ट डिसीज’ (Rheumatic Heart Disease – RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे ‘रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती.
पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून ‘ओपन-हार्ट सर्जरी’ करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते.
पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले.
“डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.
या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला.
“पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे.” – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे)
“हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे.” – मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ)
या यशाबद्दल बोलताना डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर म्हणाले, “भविष्यात हृदय शस्त्रक्रिया याच पद्धतीने केल्या जातील. रोबोटिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हृदय शस्त्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या पद्धतीमुळे अत्यंत बारकाईने आणि अचूकपणे काम करता येते. रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी जखमा होतात, ज्यामुळे तो वेगाने बरा होतो आणि लवकर घरी जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाला त्याच्या नेहमीच्या दिनक्रमात लवकर परतणे सोपे होते. जी शस्त्रक्रिया पूर्वी खूप अवघड आणि कठीण वाटायची, ती आता आपण अधिक सुरक्षितपणे, खात्रीशीरपणे आणि अचूकपणे करू शकत आहोत.”
पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले.रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल होत असल्याचे निरीक्षण नसिरुद्दीन शाह यांनी नोंदवले.ते पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एस. पी कुलकर्णी, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, आनंद लागू, डाॅ. मोहन आगाशे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. स्पर्धात्मक उपक्रमांतूनच स्वतःमधील अभिनयाची आवड लक्षात आल्याचे दोघांनीही सांगितले.
नसिरुद्दीन शाह यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) अनुभवकथन केले. ते म्हणाले की, नट प्रशिक्षित नसला तरी चालेल, पण तो शिक्षित असलाच पाहिजे. शेक्सपिअरची नाटके वर्गात शिकताना झोप येत असे, पण तीच रंगभूमीवर बघताना वेगळीच जादू घडत असे.
चित्रपटांनीही माझ्यावर अशीच जादू केली. परेशच्या अभिनयानेही मी प्रभावित झालो होतो. प्रशिक्षण आणि शिक्षण यात फरक आहे, हे मला एनएसडी आणि एफटीआयआयमुळे समजले. पुण्यात एफटीआयआयमध्ये आल्यावर मला नट म्हणून शिक्षित होण्याची दिशा मिळाली, असे शाह यांनी सांगितले.
परेश रावल यांनी इंटरक्लास स्पर्धेच्या निमित्ताने अभिनय करताना वाट सापडल्याचा उल्लेख केला. गुजराती रंगभूमीवर प्रयोग होत असत, पण त्यात बारकावे नसायचे. मराठी रंगभूमी मात्र सुरुवातीपासून समृद्ध होती आणि आजही आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एनएसडीचे नावही मला ठाऊक नव्हते आणि मी या संस्थेचा अध्यक्षही झालो, असा गमतीदार उल्लेख रावल यांनी केला.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, गाड्या आणि पानटपऱ्या रात्री १० वाजेनंतर बंद करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सारसबाग आणि नदीपात्रासह इतर चौपाट्यांवरीलही खाद्यपदार्थ विक्री रात्री १० नंतर बंद राहील, असे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर होणारी गर्दी, त्यातून होणारे वाद आणि भाईगिरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची नाकाबंदी आणि पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रस्त्यावरील आणि चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, पानटपरीचालकांची दुकाने रात्री दहानंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारे स्टॉल्स आणि हॉकर्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा शहरात प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरात रात्रीच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. महत्त्वाचे चौक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे अड्डे असणाऱ्या भागांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
हॉटेल, बार यांना मध्यरात्री दीडपर्यंत नियमानुसार परवानगी दिली आहे, ती पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, बार आणि पबचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शस्त्रसंधी वाटाघाटीदरम्यान, अमेरिकेच्या सैन्याने होर्मुज सामुद्रधुनीजवळ इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि सुरुंग पेरणाऱ्या बोटींना लक्ष्य केले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) नुसार, ही कारवाई सेल्फ-डिफेन्स म्हणजेच आत्मसंरक्षणासाठी करण्यात आली. CENTCOM चे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स म्हणाले की, अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांना धोक्यापासून वाचवण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. तथापि, त्यांनी असेही सांगितले की, शस्त्रसंधीदरम्यान अमेरिका संयम बाळगत आहे.
होर्मुज सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. याच मार्गातून मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा होतो. अमेरिकेच्या सैन्याचा आरोप आहे की, इराणी बोटी सागरी मार्गात सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करत होत्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाजे आणि अमेरिकन युद्धनौकांना धोका निर्माण होऊ शकला असता.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, इराणचे युरेनियम एकतर अमेरिकेला सुपूर्द केले जाईल किंवा आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली नष्ट केले जाईल.
इराणसोबत ओबामांसारखा करार नाही: ट्रम्प म्हणाले की ते इराणसोबत ओबामांसारखा करार करणार नाहीत. त्यांनी सांगितले की, एकतर चांगला करार होईल किंवा काहीही होणार नाही.
इराणच्या दोहा चर्चेत होर्मुज आणि युरेनियमचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा: इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या कतार दौऱ्यात होर्मुज सामुद्रधुनी आणि उच्च-समृद्ध युरेनियम हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. तसेच, इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता सोडण्यावरही चर्चा सुरू आहे.
अमेरिका-इराणमध्ये करारावर स्वाक्षऱ्या नाहीत: अमेरिका आणि इराण यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रविवारीच दोन्ही देश युद्धविराम वाढवण्यासाठी आणि होर्मुझ उघडण्यासाठी करार करू शकतात.
सुप्रीम लीडरच्या मंजुरीशिवाय कोणताही निर्णय नाही: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी सांगितले की, इराणमध्ये कोणताही मोठा निर्णय सुप्रीम लीडरच्या मंजुरीशिवाय घेतला जाणार नाही.
इराणचा हिजबुल्लाहला पुन्हा पाठिंबा: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी लेबनॉन आणि हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले की, इराण, इस्रायलविरुद्ध लेबनॉनच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक अखंडतेच्या बाजूने उभा आहे.