पुणे : शास्त्रीय संगीत व नृत्य यांची जोपासना करणा-या उद्गार तर्फे “डगर चलत” या शास्त्रीय नृत्याच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ तारखेला बाल शिक्षण मंदिर ऑडीटोरीयम, मयूर कॉलनी येथे संध्याकाळी ५.३० वाजता ही मैफिल रंगणार आहे. अशी माहिती उद्गार संस्थेच्या अध्यक्षा सौ.आसावरी पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या अनोख्या मैफिलीमध्ये वयाच्या चौथ्या वर्षापासून कथक शिकणारे, जयपूर घराण्याचे राजेंद्र गंगाणी कथक नृत्य सादर करणार आहे. तसेच बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पंडित अरविंद कुमार आजाद त्यांना तबल्याला साथ देतील. या दोन्ही हरहुन्नरी कलाकारांच्या कलेचा आनंद अनुभवायची संधी एकाचवेळी पुणेकरांना मिळत आहे. उद्गार ही संस्था शास्त्रीय संगीत व नृत्य याचा प्रचार व प्रसार व्हावा या उदेशाने नेहमी कार्यरत असते. गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांच्या कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या शिष्या सौ.आसावरी पाटणकर या नेहमी कार्यरत असतात. या हेतूनेच या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकाच वेळी दोन वेगळ्या घराण्यातील कलाकारांची कला अनुभवयास मिळणार आहे. या मैफिलीच्या प्रवेशिकांसाठी ९५४५२०८६८४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
उद्गारतर्फे “डगर चलत” या शास्त्रीय नृत्याच्या मैफिलीचे आयोजन
किशोरी गद्रे यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून पुणे महापालिकेत पाचारण करावे : स्वयंसेवी संस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे :
शहरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी किशोरी गद्रे (व्यवस्थापकिय संचालक, ‘महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’, मुंबई) यांना पाचारण करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ‘रिस्पॉन्सिबल रिसायकल इंडिया फाऊंडेशन’ चे ललित राठी, ‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’चे दीपक बिडकर, श्यामला देसाई (‘नॅशनल सोसायटीज फॉर क्लिन सिटीज्’), प्लास्टिक असोसिएशनचे प्रमोद शहा, ‘ग्रीनी’चे सुनील भोंडवे यांनी केली आहे. सध्या किशोरी गद्रे या ‘महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (मुंबई) च्या व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘जनवाणी’ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2011 साली कात्रज शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यावेळी किशोरी गद्रे यांनी कचर्याचे नियोजन आणि कचर्याचे वर्गीकरण याविषयी जनजागृती निर्माण करून कात्रज शून्य कचरा प्रकल्प यशस्वीरित्या करून दाखविला होता.
या दरम्यान शहरातील कचरा समस्येचा पूर्ण अभ्यास किशोरी गद्रे यांनी केला. नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालिका आणि उद्योगांच्या सहाय्याने कचरा मुक्तीचे यशस्वी मॉडेल कात्रजमध्ये उभारून दाखविले. त्यानंतरच प्रभागातील कचरा प्रभागात वर्गीकरण करता येतो हा विचार मूळ धरू लागला.
पुण्यातील कचरा समस्या गंभीर झाली असताना प्रत्येक प्रभागाात मूलभूत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करावी असे या पत्रकात म्हटले आहे.
पर्यावरण जनजागृतीसाठी ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ तर्फे भव्य प्रदर्शन व विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे: पर्यावरण जनजागृती, रक्षण व संवर्धन यास चालना देण्यासाठी ‘लायन्स सर्व्हिस फोरम’ तर्फे दि. १६ ते १८ जानेवारी २०१५ दरम्यान साखर संकुल, शिवाजीनगर येथे ‘लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो-2015’ (प्रदर्शनाचे ) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उध्दघाटन जलसंपदा राज्यमंत्री, (महाराष्ट्र राज्य) मा. विजयबापु शिवतारे यांच्या शुभहस्ते भिडे पुल येथे दि.१२ जानेवारी रोजी, सकाळी ९ वाजता होणार आहे.
‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ हि सेवाभावी संस्था नेहमीच सामाजिक कार्यात कायमच अग्रक्रमी राहुन विविध विधायक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करित असते. याच अनुषंगाने यावर्षी ‘लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ (प्रदर्शनाचे) चे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात येणार आहे. या पर्यावरण सप्त्यामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविणार आहेत. तसेच पर्यावरण जनजागृती संदर्भात १६ ते १८ जानेवारी दरम्यान प्रदर्शानासोबतच अनेक नामांकित मान्यवरांची व्याख्याने व तज्ञांचा परिसंवाद आयोजित केला आहे. या प्रदर्शन व परिसंवादाचे उध्दघाटन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दि.१६ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच दि. १२ ते १६ दरम्यान विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणीय विषयक प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम, स्वच्छता-साफसफाई मोहिम, नदीपात्र स्वच्छता मोहिम, विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाविषयीची माहिती व सहभाग अशा प्रकारे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे. विशेष म्हणजे, या पर्यावरण जनजागृती मोहिमेमध्ये ‘पुणे महानगरपालिका’, ‘महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळ’, ‘महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग व अनेक स्वयंसेवी संस्था या सहभागी असणार आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये या प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती लायन हसमुख मेहता (अध्यक्ष), लायन बाळासाहेब पाथरकर (समन्वयक) यांनी दिली. याप्रसंगी लायन श्रीकांत सोनी (व्हिडीजी-१) लायन अशोक मिस्त्री (सचिव), लायन कमलेश शहा, लायन सुनिल ओक, लायन सतीश राजहंस, व लायन योगेश कदम, लायन आनंद आंबेकर हे उपस्थित होते.
“सध्या पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल अन त्याचा सजीव सृष्टीवर होत असलेला परिणाम यामुळे पर्यावरण जनजाजगृती महत्त्वाची असून तिचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे असे मेहता म्हणाले. या प्रदर्शनाच्या लोगोची टॅगलाईन “बेटर इन्व्हॅारन्मेंट फॅार बेटर टुमारो” अशी आहे. या लोगोच्या माध्यमातून “चांगले पर्यावरण, आपलीच जबाबदारी” अशी संकल्पना पुणेकरांसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाथरकर यांनी दिली.
हा संपुर्ण कार्यक्रम व प्रदर्शन नागरिकांकरिता मोफत असणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा व पर्यावरण जनजागृती मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन मेहता व पाथरकर यांनी पुणेकरांना केले.
माझा प्रत्येक चित्रपट हा माझा नवा अनुभव — तनुजा मुखर्जी
पुणे
”आजूबाजूंच्या व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण करणे हेच अभिनय करणाऱ्या कलाकारांचे सर्वात महत्वाचे काम असते. कारण अभिनय कसा करावा ते शिकविता येता नाही. भावनाशील अभिनय हा मुळात आतूनच यावा लागतो. माझ्या दृष्टीने माझा प्रत्येक चित्रपट हा नवा अनुभव असतो” असे मत ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले. गुरुवारपासून सुरु झालेल्या तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पिफ विशेष गौरव सन्मान २०१५’ प्रदान करण्यात आला त्यानिमित्त आज (शुक्रवारी) पत्रकारांशी वार्तालाप करताना अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांनी सांगितले की, अभिनय हा कधीच बदलत नसतो. बदलत असते ते सादरीकरण. कारण अभिनय हा मुळातच यावा लागतो. चित्रपटसृष्टीत काम करताना ‘कैमेऱ्यालाच मी मित्र मानले त्यामुळे मी यशस्वी अभिनेत्री होऊ शकले. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
आपल्या चुलबुल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि अभिनयाचे ‘समर्थ’ घराणे लाभलेल्या तनुजा मुखर्जी म्हणाल्या की माझे घराणे जरी पहिल्यापासून चित्रपटसृष्टीत होते तरी माझ्या कारकिर्दीला त्याची फार मोठी मदत झाली असे मुळीच नाही कारण मी आधी माझे शिक्षण पूर्ण करावे असा माझ्या आईचा आग्रह होता. मला मराठीसह, गुजराती, बंगाली, मल्याळम, इंग्रजी आदी अनेक भाषा येतात हे त्याचेच एक कारण आहे असेही त्यांनी सांगितले. मी माझ्या भूमिका पारखूनच स्वीकारल्या आणि दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणेच भूमिका केल्या असे सांगून त्यांनी आपण मधुबाला, मीनाकुमारी यांच्या सारख्या अभिनेत्रींचे चाहते होते तसेच दिलीपकुमार, किशोरकुमार यांच्यासारखे अलौकिक अभिनेते हे आपले आदर्श होते असे सांगितले. आपली कन्या असलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री काजोल ही देखील अतिशय ‘समर्थ’ अभिनेत्री असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन असले तरी जो चित्रपट सामाजिक संदेश देतो तो मी चांगला मानते असे सांगून तनुजा मुखर्जी पुढे म्हणाल्या की कालच्या आणि आजच्या चित्रपटसृष्टीत फारसा काही फरक आहे असे मला वाटत नाही बदल घडला आहे तो फक्त तंत्रज्ञानातील फरकांमुळे. मात्र हा बदल खूप चकित करणारा आहे असेही त्यांनी सांगितले. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये कोणत्याही समस्यांवर तोडगा सांगितला जात नाही त्यामुळे माझ्या दृष्टीने त्या मालिकां निरर्थक आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
……. आणि उलगडला शत्रुघ्न सिन्हा यांच्या चित्रपटसृष्टीचा प्रवास
पुणे,
” चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मला नाट्यसृष्टीचीही पार्श्वभूमी नव्हती. महाविद्यालयात तर मी ‘नटखट’ विद्यार्थी म्हणून मशहूर होतो मात्र काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द होती शिवाय त्यावेळी मी प्रसिद्ध अभिनेते ‘राज कपूर यांचा ‘दिवाना’ होतो त्यामुळे मी पुण्यातील फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलो आणि संघर्ष करीत करीत आजपर्यंत चित्रपटसृष्टीत उभा आहे ” या शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या जीवनप्रवास उलगडून दाखविला. विशेष म्हणजे ‘कालीचरण’ चित्रपटाद्वारे शत्रुघ्न सिंहा यांना चित्रपटसृष्टीत ‘नायक’ म्हणून ब्रेक देणारे प्रसिद्ध निर्माते सुभाष घई हेही याप्रसंगी उपस्थित होते त्यांनीही अधूनमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुवारपासून सुरु झालेल्या तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पिफ विशेष गौरव सन्मान २०१५’ प्रदान करण्यात आला त्यानिमित्त आज (शुक्रवारी) पत्रकारांशी वार्तालाप करताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या जीवन प्रवासाची अनेक वैशिष्ठ्ये सांगितली. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
पुण्यातील फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेत असताना मला बरेच काही शिकायला मिळाले असे सांगून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, त्यामुळेच मी माझा गौरव पुरस्कार फिल्म इंन्सिट्युटला अर्पण केला आहे . फिल्म इंन्सिट्युटमध्ये प्रशिक्षण घेत असताना माझा आवाज आजच्यासारखा खर्जातील नव्हता मात्र मी प्रयत्न करून माझ्या आवाजात सुधारणा केली जेणेकरून नंतर माझा ‘आवाज’ हेच माझ्या कामाचे एक वैशिष्ठ्य बनले. कलाकाराजवळ नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही त्यासाठी प्रशिक्षणही आवश्यक असते आणि ते मिळाल्यानंतर आणखी सुधारणा होण्यासाठी ‘रियाज’ही महत्वाचा असतो असे त्यांनी सांगितले. कलाकाराला मिळालेली भूमिका आणि त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराने घेतलेले परिश्रम याचा योग्य मिलाफ झाला तरच तो कलाकार यशस्वी होऊ शकतो असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. स्वत:ला कलाकार म्हणून सिद्ध करताना सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा किंवा स्वत:चे वेगळेपण तरी जपा असाही कानमंत्र त्यांनी यावेळी नवोदित कलाकारांना दिला.
नेता आणि अभिनेता यांच्यातील फरक विशद करताना ते म्हणाले चित्रपटसृष्टीत ‘ग्लैमर’ आहे तर राजकारणात ‘पॉवर’ (सत्ता) आहे. आपल्या हातून सामान्य जनतेचे भले यावे या शुद्ध हेतूनेच आपण राजकारणात आलो असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कोर्पोरेशन चे चेअरमन असताना आपण तेथील चित्रपटसृष्टीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कसे प्रयत्न केले याचीही त्यांनी माहिती दिली. तर चित्रपटसृष्टीला ‘इंडस्ट्रीज’चा दर्जा देण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी फार मोलाची मदत केली अशी पावती सुभाष घई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सुभाष घई यांनी ‘कालीचरण’ चित्रपटामागच्या अनेक गोष्टी सांगून शत्रुघ्न सिन्हा दोन-तीन पानांच्या ‘डॉयलौग डिलीव्हीरीतही’ कसे तरबेज होते व ते त्यासाठी कसे परिश्रम घ्यायचे याची आठवण सांगितली.
‘साटं लोटं’चा युथफुल लूक
मैत्री.. प्रेम.. या पलीकडे तरुणांचे नातेसंबंध, लाईफस्टाईल, वेगवान आयुष्याबद्दलचे त्यांचे विचार आजच्या काळाप्रमाणे झपाट्याने बदलत चाललेत. तरुणाईचा हाच जोश, सळसळता उत्साह ‘मुव्हिंग पिक्चर्स’ प्रस्तुत नितीन तेज अहुजा, अशोक भूषण निर्मित ‘साटं लोटं’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. मराठीत उत्तोमोत्तम कलाकृती सादर करणाऱ्या श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाची कमाल बऱ्याच अवधीनंतर पुन्हा नव्याने अनुभवायला मिळणार आहे.
नुकताच चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गाण्यांची खास झलक मुंबईत आयोजित सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. चित्रपटाच्या टीमसमवेत हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर, महेश कोठारे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, गायक-संगीतकार शंकर महादेवन, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, लेखक – श्रीरंग गोडबोले, कलाकार मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे, यतीने कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, सुनील बर्वे, जयंत वाडकर, हेमंत ढोमे, क्षमा राज, सुकन्या कुलकर्णी, गिरीजा ओक, क्षिती जोग, दिपाली सय्यद, मानसी नाईक, नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर, उमेश जाधव.. यांनी या प्रसंगी हजेरी लावली.
‘थॉटरेन एंटरटेन्मेंट’चे सई देवधर-आनंद आणि शक्ती आनंद सहनिर्मित फन, रोमान्स आणि फुल्ल ऑफ ड्रामा असलेल्या ‘साटं लोटं’ या चित्रपटाचं फर्स्ट लूक लॉंचही हटके होतं. पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत या युथफुल कलाकारांनी गमतीदार स्कीट सादर करत कार्यक्रमाचे धमाल सूत्रसंचलन केले.
आपल्या अफलातून अभिनयाने मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, नागेश भोसले, मालिनी डे यांनी चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. ‘साटं लोटं’ ची खळखळून हसवणारी कथा श्रावणी देवधर यांनी लिहिली असून खुमासदार पटकथा- संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिलेत. श्रीरंग गोडबोले लिखित यातील गीतांना युवा संगीतकार सिद्धार्थ महादेवन व सौमिल शृंगारपुरे यांनी सुरेल संगीत दिलंय. चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलंय. फ्रेश लूक, उत्तम कथानक, वास्तवदर्शी मांडणी, नेटकं दिग्दर्शन, कलाकारांचा सहज सुंदर अभिनय जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञांची साथ असलेला ‘साटं लोटं’ २० फेब्रुवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
माध्यमांनी विश्वासार्हता कायम राखावी-मुख्यमंत्री
पुणे : माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य हेच लोकशाहीचे खरे मूल्य असून, त्याची चांगल्या प्रकारे जोपासना होत आहे. लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने माध्यमांनी आपली विश्वासार्हता कायम राखावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सव शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष स्मरणीकेचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खा. अनिल शिरोळे आदी मान्यवर.पुणे पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवाचा शुभारंभ आणि त्यानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे व खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. पत्रकारितेचे माध्यम बदलत असून, नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. याद्वारे चांगल्या-वाईट गोष्टींना खतपाणी घालण्याचे प्रकार वाढल्यामुळे या माध्यमांपुढे विश्वासार्हता जपण्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या या माध्यमांनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज असून, ते रुजवण्याचे काम प्रामुख्याने पत्रकाराने केले पाहिजे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाळ्यामध्ये वृत्तपत्रांनी आपले स्थान टिकविले आहे. परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून समाजाची शाश्वत मूल्ये जपण्याची गरज असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सोशल मीडिया हे खूप महत्त्वाचे साधन आहे. त्याचा वापर कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार होणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला असल्याने त्याला किती महत्त्व दिले पाहिजे हे ठरविणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींसाठी त्याचा वापर वाढला असल्याने त्याच्या वापरावर निर्बंध हवा आहे. आपल्या देशात लोकशाहीला फार महत्त्व देण्यात आले आहे. इथे प्रत्येकाला बोलण्याचे, विचार मांडण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्य संविधानाने बहाल केले आहे. दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करता त्याचा वापर चांगल्या कामांसाठी करणे व चांगल्या कामांचे कौतुक करणे हे वृत्तपत्रीय माध्यमांचे काम असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.बातमीचे मूल्य तेव्हा कळले!सन २00३ मध्ये मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सकाळी माझा सन्मान करण्यात आला. योगायोगाने त्याच दिवशी दुपारच्या सत्रात विधानसभेमध्ये विदर्भावर झालेल्या अन्यायाबाबत बोलत होतो. माझे मत मांडताना शेवटच्या क्षणी अत्यंत आवेगाने तत्कालीन राज्य कारभारावर टीका केली. त्यानंतर सभागृहात खूप गोंधळ निर्माण झाला. गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. दुसर्या दिवशी मला वाटले, मला पुरस्कार मिळाल्याची बातमी ठळकपणे येईल, मात्र दैनिके पाहताच धक्काच बसला. सर्व दैनिकांनी पुरस्काराची बातमी न देता सभागृहामध्ये झालेल्या गोंधळाची बातमी अत्यंत रंजकदार पद्धतीने दिली होती. तेव्हा मला बातमीच्या मूल्यांची प्रथमच जाणीव झाली.
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचं निधन
मुंबई-वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचं गुरुवारी मध्यरात्री निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सावंत यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले बाळा सावंत २००९मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे कृष्णा पारकर यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला होता. मनमिळावू स्वभावाच्या सावंत यांचा वांद्रे मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता.
स्वस्त घरांसाठी पुढाकार घ्यावा-केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांचे ‘क्रेडाई’ला आवाहन
पुणे – ‘गरिबांना कमी किमतीतील घरे देण्यासाठी ‘क्रेडाई’ने पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी पुण्यात केले. घरे विकत घेणाऱ्या गरिबांची फसवणूक टाळण्यासाठी उपाय आखले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
‘क्रेडाई’च्या पुणे मेट्रोतर्फे भरविण्यात येणाऱ्या पंधराव्या ‘दी ग्रॅण्ड पुणे प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे अनौपचारीक उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. ‘क्रेडाई’चे (पुणे मेट्रो) अध्यक्ष हेमंत नाईकनवरे, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, शांतिलाल कटारिया, अनुज भंडारी आदी उपस्थित होते. एसएसपीएमएस मैदानावर रविवारपर्यंत (ता. ११) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन खुले आहे.
जावडेकर म्हणाले, ‘विश्वास हा ग्राहकांचा अधिकार असून, तो या प्रदर्शनातून लोकांना मिळतो. देशातील गरीब जनतेने सरकारवर मोठा विश्वास दाखविला आहे. त्याच्या जाणिवेतून सात वर्षांत त्यांना मोठ्या प्रमाणात घरे देण्यात येणार आहेत. घरांसाठी लोक पैसे भरायला तयार असतात. मात्र, त्यांच्या आवाक्यातील मुख्यत: चतुर्थश्रेणी कामगारांना घरे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते घरांपासून लांब राहण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून नवे गृहप्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गैरव्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांमुळे लोकांची फसवणूक होण्याची भीती असते. ती आता थांबली पाहिजे. त्यासाठीही ‘क्रेडाई’ने पुढे येण्याची गरज आहे.’’बांधकामासंदर्भातील सर्व बाबी तपासूनच आणि अटींची पूर्तता केल्याशिवाय पर्यावरण विभाग परवानगीस मंजुरी देत नाही. व्यवसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होतील. गरिबांसाठी घरे देण्यासाठी एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. खुल्या प्रॉपर्टी’ प्रदर्शनामुळे घरे घेण्याचा निर्णय लोकांना तातडीने घेता येतो,’’ असेही जावडेकर म्हणाले. नाईकनवरे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाची माहिती दिली. परांजपे यांनी आभार मानले.
पुण्यात मोठे गृहप्रकल्प उभे राहात असले तरी, सध्याच्या घडीला ‘वन बीएचके’ फ्लॅटचे प्रमाण कमी झालेले आहे. या फ्लॅटला मोठी मागणी असूनही पुरवठा होत नाही. त्यामुळे भविष्यात सामान्यांसाठी असे फ्लॅट निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
चित्रनगरी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न

पुणे – ‘बॉलिवूडसह राज्यातील चित्रनगरी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असून, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे सर्व प्रकाराच्या चित्रपटांची निर्मिती तेथे होऊ शकेल आणि या चित्रनगरी जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनतील,‘‘ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
कोथरूड येथील सिटी प्राइड चित्रपटगृहात “तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा‘चे (पिफ) उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “”पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने यंदा “युद्धाविरुद्ध युद्ध‘ हा चपखल विषय निवडला आहे. जगात मानवतेशी युद्ध सुरू आहे. त्याचा मुकाबला केवळ संस्कृतीची आदान-प्रदान करूनच होऊ शकतो. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, भारतीय सिनेमाही आमचा सांस्कृतिक राजदूत आहे.‘‘ ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री तनुजा यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘या सन्मानामुळे मराठी शेतकरी कवी “इंटरनॅशनल‘ झाला आहे. या पुढेही मी मराठी चित्रपटसृष्टीला कवितेतून नवे आकाश देत राहीन,‘‘ अशा शब्दांत महानोर यांनी भावना व्यक्त केल्या. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा सन्मान हा त्यांनी शिक्षण घेतलेल्या पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटला अर्पण केला.
डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक करताना, या चित्रपट महोत्सवाचा निधी वाढविण्याची तसेच, परदेशी चित्रपटांना भारतात आणण्यासाठी वा चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या परवानगी घ्याव्या लागतात, असे सांगितले. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चित्रपट क्षेत्र हा उद्योग असल्याने परदेशी असो वा देशी, त्यासाठी लागणाऱ्या परवानगी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आम्ही यंत्रणा तयार करीत आहोत. पुढील चित्रपट महोत्सवापर्यंत “एक खिडकी‘ योजना सुरू झालेली असेल.‘‘
वैद्यकीय विम्याची कॅशलेस सुविधा बंद नाही
पुणे – ‘वैद्यकीय विम्याची कॅशलेस सुविधा बंद करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत; उलट ही सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, असाच प्रयत्न आहे,‘‘ असे “विमा नियामक आणि विकास प्राधिकरण‘चे (आयआरडीए) उपसंचालक डॉ. एन. एम. मेहेरा यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील वैयक्तिक वैद्यकीय विम्याची कॅशलेस सुविधा एक डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्याच वेळी कार्पोरेटची वैद्यकीय सुविधा सुरू ठेवण्याची सूचना सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्यांनी रुग्णालयांना ई-मेलद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर “सजग नागरिक मंच‘च्या विवेक वेलणकर यांनी रुग्णालय आणि विमा कंपन्या यांच्या वादात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे “आयआरडीए‘ यांना कळविले. वेलणकर यांनी पाठविलेल्या ई-मेलची “आयआरडीए‘ने तातडीने दखल घेतली.
वेलणकर यांच्या मेलला उत्तर देताना मेहरा यांनी नमूद केले की, ‘वैद्यकीय विम्याची कॅशलेस सुविधा बंद करण्यात आलेली नाही. उलट, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन कॅशलेस सुविधा वाढविण्यासाठी “आयआरडीए‘ प्रोत्साहन देत आहे.‘ विमा कंपन्यांनी कॅशलेस सुविधा नाकारल्याचे कोणते प्रकरण असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संगीतमय ‘एक तारा’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात
ओपन स्टेज, रोषणाईने उजळलेला रंगमंच, भरगच्च प्रेक्षागृह, तबल्यापासून गिटारपर्यंत विविध इंडो-वेस्टर्न म्युझिक इन्स्ट्यूमेन्टसच्या सुरांनी भारलेला आसमंत.. प्रचंड हल्लकल्लोळ माजवणारी.. एकाच ताला-सुरात मग्न होऊन धुंदीत गाणारी-नाचणारी तरुणाई आणि त्यांना आपल्या सुरावटींवर-भेदक तानांवर लक्ष एकवटवणारा ‘एक तारा’. सामान्यतः हे चित्र म्युझिक कॉनसर्टसचं. तरुणाईच्या गळ्यातले ताईत असणारे हे तारे.. त्यांचे स्टारडम, त्यांची एक झलक पाहण्याकरिताही खूप आसुसलेले असतात. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या ताऱ्यांचा-कलाकारांचा इथवरचा प्रवास हा जितका सहजसोपा दिसतो, ज्यावर तरुणाई भुलते तो खरंच तितका सरळसोपा असतो का..? या यशामागे, ग्लॅमरमागेखरंच काय दडलंय..? असण्यापासून दिसण्यापर्यंतची त्यांची धडपड.. या सगळ्या पडद्यामागील गोष्टींचा उहापोह ‘एक तारा’ या चित्रपटाद्वारे गायक – संगीतकार – दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या दृष्टीकोनातून रेखाटला गेला आहे.
३०
रईस लष्करिया निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित महत्वाकांक्षी चित्रपट ‘एक तारा’ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. चित्रपटाची उत्सुकता लक्षात घेता प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा दिमाखदार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांची या सोहळ्याला असलेली उपस्तिथी लक्षवेधी ठरली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, अस्लम लष्करीया, अभिनेता रितेश देशमुख, बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजीद, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर, महेश मांजरेकर, मकरंद देशपांडे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर तसेच चित्रपटाची टीम आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा रंगला.
रईस ल्ष्करिया प्रोडक्शन्सने स्वराज्य.. मराठी पाऊल पडते पुढे! या दर्जेदार मराठी चित्रपटाद्वारा मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकले. स्वराज्य नंतर एक तारा आणि तो येतो या दोन आगामी चित्रपटांची घोषणा करत त्यांनी मराठीत चित्रपटसृष्टीत आपले पाय भक्कमपणे रोवण्यास सुरुवात केली आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही. या सोहळ्यादरम्यान आपल्या पहिल्या आणि आगामी चित्रपटांचा ट्रेलर दाखवून रईस ल्ष्करीया प्रॉडक्शनचा दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा मनसुबा व्यक्त केला.
अवधूत गुप्तेंचा चित्रपट म्हणजे संगीतमय पर्वणीच! ‘एक तारा’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे यातील गाण्यांची गंमतच न्यारी आहे. तब्बल १३ गाण्यांचा रसस्वाद ‘एक तारा’मधून रसिकप्रेक्षकांसोबतच कानसेनानांही घेता येणार आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी ‘एक तारा’साठी लिहिलेली वेगवेगळ्या बाजाच्या गीतांना अवधूत गुप्तेंनी आपल्या संगीताच्या लहरींनी स्वरसाज चढवून न्याय तर दिलाच पण आपल्याकडूनही चत्रुस्र गीतलेखन करून घेतल्याबद्दल आभार मानले. या रम्यवेळी अवधूत गुप्ते, ज्ञानेश्वर मेश्राम, मुग्धा कऱ्हाडे तसेच बालगायक विदित पाटणकर यांचे स्वर उपस्थितीत कलाकार-तंत्रज्ञांच्या पसंतीस उतरले. गायकांच्या पर्फोर्मन्सनी साऱ्यांची मनमुराद दादही मिळवली.
तरुणांच्या आवडी-निवडी जपत.. बोली शब्दांची योग्य सांगड घालत, ओठी रुळणारी ‘जिंदगी हे झाड’, ‘ठोक साला’, ‘विसर तू (रॉक)’, ‘हर काश में’, ही वेड लावणारी गुरु ठाकूरची गीते तर अवधूत गुप्तेंच्या लेखणीतून ‘येड लागलं’, ‘देवा तुझ्या नावाचं येड लागलं’, ही दोन भक्तिमय गीतं खरोखरीच उत्तमरीत्या सांधली गेलीयेत. तसेच ‘वाली तू लेकरांचा’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘चालते नाणे’ आणि ‘अर्ध्या हळकुंडानं’ हे मॉडन भारुडही खासचं जमून आलंय. चित्रपटातील गाण्यांच्या बाजाप्रमाणे सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम, विदित पाटणकर, मुग्धा कऱ्हाडे आणि अवधूत गुप्ते या कसलेल्या गायकांकडून त्यांच्या सुरेल स्वरात गाऊन घेतली आहेत. तसेच अवधूत गुप्तेंच्या मैत्रीखातर दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि साउंड रेकॉर्डीस्ट अवधूत वाडकर यांनीही आपल्या आवाजाची कमाल आजमावली आहे.
संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित, उर्मिला निंबाळकर, सागर करंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई आणि चैतन्य चंद्रात्रे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक तारा’ ची कथा लिहिली आहे अवधूत गुप्ते, सचिन दरेकर यांनी तर पटकथा-संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. सादिक लष्करीया, विशाल घाग सहनिर्मित विशाल देवरुखकर यांचे सहदिग्दर्शन लाभलेल्या ‘एक तारा’चं छायांकन अमलेंदू चौधरी यांचे असून शैलेश महाडिक कला दिग्दर्शक आहेत. संकलक इम्रान महाडिक, फैझल महाडिक तर वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केली आहे.
निर्मात्याने केले होते ३ महिने कैद – बाळासाहेब ठाकरेंनी सोडविले – मराठी अभिनेत्रीने केला गौप्यस्फोट
ठाणे : मराठी नाटक आणि चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “एका निर्मात्याने मला तीन महिने ‘कैद’मध्ये ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर माझी सुटका झाली,” असा दावा सुप्रिया यांनी केला आहे.
ठाण्यात आयोजित केलेल्या ‘महिला सुरक्षा परिसंवाद’ला संबोधित करताना सुप्रिया पाठारे यांनी हा आरोप केला. “1995 मध्ये एक निर्माता सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने ‘कैद’ केलं,” असं पाठारे यांनी सांगितलं. मात्र त्यांनी निर्मात्याचं नाव आणि घटनास्थळाचा नेमका पत्ता याचा खुलासा केला नाही.सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं की, “शूटिंसाठी मी इथली एकटीच होते. पुढील तीन महिने निर्मात्याने बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून अभिनय करवून घेतला. मला तिथल्याच परिसरात डांबलं होतं. मात्र माझ्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधण्याची परवानी त्याने दिली होती.””मराठीत बोलू नको, असा दम निर्माता देत असे. पण मी कसंतरी बहिणीला गुप्त भाषेत माझ्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुंबईत असलेल्या माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुखांकडे मदतीची विनंती केली. यानंतर बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.””एक दिवस राजस्थान पोलिसांतील 50 शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. 20 तासांचा प्रवास करुन मी सुरतला पोहोचले आणि यावेळी माझ्याकडे अवघे 12 रुपये शिल्लक राहिले होते. पण सुखरुप सुटकेसाठी मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन,” असं सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं.
‘जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
पुण्यातील संवाद-माध्यमातील आघाडीचे नाव असलेल्या ‘जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस’ या संस्थेच्या नूतन कार्यालयाचे अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ आणि ‘साम’ चे रोव्हिंग संपादक संजय आवटे होते. प्रारंभी ‘जनसंपर्क : मीडिया सर्व्हिसेस’चे मुख्य संचालक रामकुमार शेडगे यांनी प्रमुख पाहुणे तसेच उपस्थितांचे हार्दिक स्वागत केले.
अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच अॅड. गणेश सातपुते आणि संजय आवटे यांनी आपल्या भाषणात रामकुमार शेडगे यांच्या जिद्दीचे कौतुक करून त्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
चित्रपट आणि जनसंपर्क माध्यमातील सर्व सेवा पुरविण्याची खास व्यवस्था असलेले हे कार्यालय कोथरूड बसडेपोसमोरील शिवम आर्केड येथे नव्याने सुरु करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमास पुरुषोत्तम बाबर, चित्रपट निर्माते मच्छिंद्र धुमाळ, अभिनेते निखिल वैरागर, चित्रपट लेखक आबा गायकवाड, नावडकर बंधू, तसेच टी.व्ही मालिका लेखक अभिजित पेंढारकर, सुभाषचंद्र जाधव, श्रीकांत कुलकर्णी, राम झोंड, सचिन लंके, योगेश बारस्कर, अॅड. वाजीद खान, आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक मंडळी उपस्थित होती. श्री जितेंद्र वाईकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हदये जिंकूनच जग जिंकता येईल -दलाई लामा यांनी पुण्यात साधला थेट संवाद
माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या “चाणक्य मंडल परिवार’च्या वारजे येथील नूतन वास्तूचे उद्घाटन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी दलाई लामा यांच्याशी खुला संवाद कार्यक्रमाचे “गणेश कला क्रीडा सभागृह’ (स्वारगेट) येथे आयोजन करण्यात आले होते .

“जागतिक शांतता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथून पुढे बंदूकीच्या धाकावर जग जिकंता येणार नाही, हृदय जिंकूनच जग जिंकता यईल. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये पारंपारीक मुल्यांबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ करणे आवश्यक आहे. “चाणक्य मंडल’ ने या संदर्भात सुरू केेलेल्या शैक्षणिक चळवळीने मी अत्यंत प्रिअभावित झालेलो आहे’, असे प्रतिपादन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी पुणे येथे केले.
माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या “चाणक्य मंडल परिवार’च्या वारजे येथील नूतन वास्तूचे उद्घाटन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नामफलकाचे आणि कोनशीलेचे अनावरण झाले. आज दि. 31 डिसेंबर रेाजी सकाळी 10 वाजता “चाणक्य मंडल’ चे संचालक अविनाश धर्माधिकारी, सौ. पूर्णा धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत वारजे महामार्गावरील चाणक्य मंडलच्या नवीन वास्तूत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना दलाई लामा म्हणाले, “चाणक्य मंडल’ ची मानवतेला समर्पित “ज्ञानमंदीर’ ही संकल्पना मला आवडली. आधुनिक ज्ञान, जागतिक भान ठेवून राष्ट्रीय चारित्र्याचे प्रतिभावान विद्यार्थी, कार्यकर्ते, अधिकारी घडविण्याचा “चाणक्य मंडल’चा संकल्प सिद्धीस जाईल. इथून पुढे शिक्षणात पारंपरिक मूल्ये, संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ करायला लागणार आहे. आताचे शिक्षक पैशाच्या मागे धावत आहेत. मात्र, “चाणक्य’ ने शिक्षणात जी मूल्ये आणली त्याने मी प्रभावित झालो आहे.
सर्वंकष विचार करून ज्ञानाधारित स्वयंसेवी प्रयत्नातूनच उद्याचे आनंदी जगाची उभारणी करता येणार आहे.
हिंसेने धाकाने जग नियंत्रित करता येत नाही. हदये जिंकूनच जग जिंकता येईल. हे सर्वांना पटलेले आहे. चीनमध्येसुद्धा याबाबत बोलले जात आहे. चीनसुद्धा बदलत आहे. चीनची बाजारपेठ सर्वांना खुली करण्यात येत आहे. आर्थिक आणि अन्य उदारीकरणाच्या चीनच्या धोरणाने तिबेटी संस्कृतीचे रक्षण करण्याच्या मागणीला सर्व मान्यता मिळत आहे. तिबेट स्वतंत्र होऊ शकणार नाही. मी स्वत: ती मागणी करीत नाही, मी राजकीयदृष्ट्या निवृत्तही झालो आहे. मात्र, चीन बदलत आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण चीनने त्या देशात उपलब्ध असलेले अधिकार तरी तिबेटींना द्यायला हवेत.
जे स्वातंत्र्य चीनच्या इतर भागात उपलब्ध आहे. ते तरी तिबेटींना उपलब्ध व्हायला हवे. तिबेटी लॉयल्टी, अध्यात्मिक स्फूर्ती चीनला धाकाने, अथवा विकत मिळविता येणार नाही. सत्याची ताकद ही बंदुकीच्या ताकदीपेक्षा अधिक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
सत्ता, संशय, हव्यास इथून पुढे चालणार नाही. अहिंसा, एकात्मता, सर्व धर्म समभाव, निर्भयता, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. 3 हजार वर्षांपासून ही मूल्ये नांदत आहेत. यावर विश्वास ठेवूनच मानवता बळकट होणार आहे.
देवावर फार जबाबदारी टाकतो, ते चुकीचे आहे. स्वत:वर विसंबून चांगली कामे हाती घेतली पाहिजेत.
भारतात शिया मुसलमान जितके सुरक्षित राहतात. तितके पाकिस्तानातही राहू शकले नाहीत असा उल्लेखही त्यांनी केला. भारत हा धार्मिक लोकांचा देश आहे. मात्र, वाईट कृत्य करताना भ्रष्टाचार करताना धार्मिक शिकवणूक पाळली जात नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे फक्त प्रार्थना उपयोगी पडणार नाही, तर प्रयत्नांचीही गरज आहे.
बौद्धधर्मीय सुद्धा आता 21 व्या शतकातील बुद्ध बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.
जागतिक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असे सर्वांनाच वाटते. पण जागतिक शांतता प्रस्थापित करा असे म्हणताना एक बोट आपल्याकडेही असले पाहिजे. स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशी प्रेरणा प्रत्येकाचा मनात निर्माण व्हायला हवी.
सौ. पूर्णा धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकात “चाणक्य मंडल’ ची वाटचाल विषद केली. “राष्ट्रीय चारित्र्य असणारे कार्यक्षम कार्यकर्ता – अधिकारी घडविण्यासाठी “चाणक्य मंडल’ची स्थापना झाली. 16 वर्षांत हजारो कार्यकर्ता अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवेत आहेत प्रशासनाव्यतिरिक्त जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात “चाणक्य मंडल’ चे विद्यार्थी योगदान देत आहेत’. “चाणक्य’ च्या इमारतीला अधिक मजले बांधायची परवानगी देणे राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. ती त्यांनी द्यावी.’ असेही त्या म्हणाल्या.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “दलाई लामा यांच्या हस्ते मानवतेला समर्पित या ज्ञान मंदिराचे लोकार्पण होणे, ही अत्यंत आनंददायक आणि औचित्यपूर्ण घटना आहे. त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने “चाणक्य मंडल’ चा ध्येयवाद अधिक बळकट होणार आहे. भारताचा वैश्विक वारसा असलेल्या विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचारावर उभे राहिलेले हे ज्ञान मंदिर आहे, आणि त्याचे लोकार्पण जगद्गुरू दलाई लामा यांच्या हस्ते मानवतेला अर्पण केले जात आहे. हा नव्या पर्वाचा आनंददायक प्रारंभ आहे. विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचारावर आधारीत अत्याधुनिक विद्यापीठ उभे रहावे ही इथुन पुढची दिशा असेल’.
डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला व्यासपीठावर “चाणक्य’चे विश्वस्त डॉ. भीष्मराज बाम, डॉ. भूषण केळकर, तसेच अनंतराव गोगटे, माधव जोगळेकर हे उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे माता-पिता, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, डॉ. दीपा लागू, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, चंद्रकांत दळवी, ज्ञानप्रबोधिनी संचालक गिरीश बापट, विश्वंभर चौधरी, राजीव खांडेकर, डॉ. राजा दांडेकर, डॉ. श्रीकांत बहुलकर, वि. दा. कराड, वा. ना. अभ्यंकर, आमदार मेधा कुलकर्णी, वेदाचार्य घैसास गुरूजी, शीतला बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. पूर्णा धर्माधिकारी यांनी केले.
मानसरोवर तसेच भारतातील 27 नासांचे जल चाणक्य मंडल च्या अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांनी दलाई लामांसमोर पवित्र कलशात जमा केले. दलाई लामा यांनी इमारतीचे उद्घाटन म्युरलचे उद्घाटन केले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे ही दिली.
नंतर “खुला संवाद’ कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. तेथे दलाई लामा यांना ओमकार शिल्प प्रतिमा भेट देण्यात आली.
बाएफ जवळ स.क्र. 118/2 ए येेथे चाणक्य मंडलची पर्यावरणपूरक, सौरउर्जेवर चालणारी, रेन हार्वेस्टिंगसहीत अनेक वैशिष्ट्ये असलेली अत्याधुनिक वास्तू उभारण्यात आली आहे. येथे स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासक्रमांकांची सुविधा, ग्रंथालय व गुरूकूलवर आधारीत निवास व्यवस्था आहे.
कार्यक्रमादरम्यान स्मिता देशपांडे (साहाय्यक संपादक, “जडणघडण’ मासिक), शशांक देवगडकर (खठड 2009, बडोदा), विशाल सोळंकी (खअड 2005, जिल्हाधिकारी, जोरहाट, आसाम) या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली.
जानेवारी 1996 रोजी अविनाश धर्माधिकारी यांनी आयएएस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर दि.10 ऑगस्ट 1996 रोजी “चाणक्य मंडल’ ची स्थापना किरण बेदी यांच्या हस्ते झाली. सदाशिव पेठेतील सध्याच्या वास्तूचे उद्घाटन पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते दि. 5 ऑक्टोबर 1998 रोजी झाले होते. त्यानंतर 19 वर्षांनी वारजे येथे 8 मजली शैक्षणिक वास्तुच्या लोकार्पणाचा योग जुळून आला.






