पुणे – ‘बॉलिवूडसह राज्यातील चित्रनगरी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असून, आधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे सर्व प्रकाराच्या चित्रपटांची निर्मिती तेथे होऊ शकेल आणि या चित्रनगरी जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनतील,‘‘ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
कोथरूड येथील सिटी प्राइड चित्रपटगृहात “तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा‘चे (पिफ) उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “”पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने यंदा “युद्धाविरुद्ध युद्ध‘ हा चपखल विषय निवडला आहे. जगात मानवतेशी युद्ध सुरू आहे. त्याचा मुकाबला केवळ संस्कृतीची आदान-प्रदान करूनच होऊ शकतो. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, भारतीय सिनेमाही आमचा सांस्कृतिक राजदूत आहे.‘‘ ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री तनुजा यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘या सन्मानामुळे मराठी शेतकरी कवी “इंटरनॅशनल‘ झाला आहे. या पुढेही मी मराठी चित्रपटसृष्टीला कवितेतून नवे आकाश देत राहीन,‘‘ अशा शब्दांत महानोर यांनी भावना व्यक्त केल्या. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा सन्मान हा त्यांनी शिक्षण घेतलेल्या पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटला अर्पण केला.
डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक करताना, या चित्रपट महोत्सवाचा निधी वाढविण्याची तसेच, परदेशी चित्रपटांना भारतात आणण्यासाठी वा चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या परवानगी घ्याव्या लागतात, असे सांगितले. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चित्रपट क्षेत्र हा उद्योग असल्याने परदेशी असो वा देशी, त्यासाठी लागणाऱ्या परवानगी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आम्ही यंत्रणा तयार करीत आहोत. पुढील चित्रपट महोत्सवापर्यंत “एक खिडकी‘ योजना सुरू झालेली असेल.‘‘
