Home Blog Page 3124

आंदोलकांवर पोलीस दरोड्याचा गुन्हा कसा दाखल करतात -रुपाली पाटलांचा सवाल

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुशिक्षित डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत. जी सामाजिक कार्य करताना आंदोलने करतात अशा आंदोलकांवर दरवेळी  दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केला जातो. आम्ही गुंड आहोत, असे दाखविले जाते. आम्ही जर कानाखाली मारले असेल तर जी तरतूद कायद्यात असेल त्यानुसारच पुणे पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी वजा विनंती  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा अॅड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात ‘मनसे स्टाईल’ने आंदोलणाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असेही आवाहन त्यांनी केले .
सिनेमा गृहांतील लुटमार पोलिसांना चालते आणि हि लुटमार करणाऱ्यांच्या कानाखाली मारण्याचे काम खरे तर कायद्याच्या रक्षकांनी करायला  हवे ,पोलिसांना सिनेमागृहातील लुटीविषयी सांगितले असता ते म्हणतात, आमच्याकडे कायद्याची तरतूद नाही. जर पोलिसांकडे कायद्याची तरतूद नसेल, ते कारवाई करू शकत नसतील तर त्यांनी निदान आमच्यावर खोटे गुन्हे तरी दाखल करू नयेत. आम्ही जर कानाखाली मारले असेत तर कायद्यानुसार सरकारने, पुणे पोलिसांनी आमच्यावर केवळ कानाखाली मारल्याचा गुन्हा दाखल करावा, दरोड्याचा गुन्हा त्यांनी का दाखल करावा असा सवाल करून त्या म्हणाल्या    पुण्यातील सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात आणि घरचे खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. सिनेमागृहमालकांनी आठ दिवसात यावर निर्णय न घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल.

संजय-मुस्तफाने मॉन्सून चॅलेंज जेतेपद राखले

0

पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने महिंद्रा मॉन्सून चॅलेंज विजेतेपद राखले. समान वेळेची पेनल्टी बसूनही टाईम कंट्रोलला सरस कामगिरी नोंदविल्यामुळे संजय विजेता ठरला. यामुळे तो गतवर्षी मिळविलेले जेतेपद राखू शकला.

मंगळूर ते दक्षिण गोवा असा मार्ग असलेली सुमारे 650 किलोमीटर अंतराची रॅली रविवारी सायंकाळी पार पडली. ही रॅली टीएसडी (टाईम-स्पीड-डिस्टन्स) स्वरुपाची होती. संजयने नॅव्हीगेटर महंमद मुस्तफा याच्या साथीत ही कामगिरी केली. त्याने महिंद्रा एक्सयूव्ही चालविली. शुक्रवारी रात्रीच्या स्टेजपासूनच संजयने आघाडी घेतली होती. के. पी. कार्तिक मारुती-सी. शक्तीवेल यांनी दुसरे, तर बी. व्ही. रविंद्र कुमार-एम. सागर यांनी तिसरे स्थान मिळविले.

संजय-मुस्तफा आणि कार्तिक मारुती-शक्तीवेल यांना प्रत्येकी एक मिनिट 27 सेकंद अशी समान पेनल्टी बसली. अशावेळी टीएसडी रॅलीच्या स्वरुपातील कामगिरी निर्णायक ठरली. याविषयी संजयने सांगितले की, टीएसडी रॅलीत ठराविक वेळेत ठराविक अंतर पूर्ण करावे लागते. वेळ जास्त किंवा कमी लागला तरी सुद्धा पेनल्टी बसते. दिवसातून साधारण 10 ते 12 टाईम कंट्रोल असतात. ते निर्धारीत वेळेत पूर्ण केल्यास झिरो पेनल्टी बसते, जे महत्त्वाचे असते.

यंदा रॅलीचे स्वरुप जास्त खडतर होते आणि स्पर्धक सुद्धा तयारीनिशी आले होते, असे सांगून संजय म्हणाला की, मंगळूरपासून शुक्रवारी एका घाटातून जाऊन परत यायची स्टेज रात्री झाली. ही स्टेज वळणावळणांची होती. त्यात कस लागला. शनिवारी जंगलातून जाणाऱ्या स्टेजमध्ये नॅव्हीगेटर मुस्तफाकडील जीपीएस यंत्र बिघडले. त्यामुळे आम्हाला बरीच पेनल्टी बसली, पण रविवारी आम्ही कामगिरी उंचावली. जागतिक रॅली मालिकेच्या तयारीसाठी मी मायदेशातील फार रॅलींमध्ये सहभागी होऊ शकत नाही. अशावेळी हे यश आनंद देणारे आहे.

मुस्तफा हा अत्यंत मेहनती नॅव्हीगेटर असून तो प्रामाणिक प्रयत्न करतो, असेही संजयने आवर्जून नमूद केले. कर्नाटकमधील किनारपट्टी परिसरातील पश्चिम घाट मार्गावरून रॅली गेली. त्या भागात पाऊस आणि दमट हवामान होते. त्यामुळे मॉन्सून चॅलेंजचा थरार स्पर्धकांना लुटता आला, असेही संजय म्हणाला.

डॉ. एस. एन. पठाण लिखित समाजसंवाद या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

पुणे,दि.२ ः नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक तसेच युनेस्को विश्‍वशांती केंद्र, आळंदी, माईर्स एमआयटी पुणे येथे डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या सोबत कार्यरत असलेले व टाकीचे घाव, वेदना आणि प्रेरणा, रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग (आगामी) या ती खंडात्मक आत्मचरित्राचे लेखक डॉ. एस. एन. पठाण यांनी लिहिलेल्या “समाज संवाद” या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रफुल्लता प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेद्वारे संत ज्ञानेश्‍वर सभागृह, माईर्स एमआयटी, पुणे येथे दिनांक ४ जुलै  २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष मा. प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख विश्‍वशांती केंद्र, (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत, सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. माणिकराव साळुंके कुलगुरू, भारती विद्यापीठ, पुणे,  मा. प्रा. डॉ. सर्जेराव निमसे माजी अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषद, नवी दिल्ली, माजी कुलगुरू, लखनौ विद्यापीठ, लखनौ तसेच प्रमुख उपस्थिती मा. डॉ. सदानंद मोरे माजी अध्यक्ष, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन, मा. प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा ज्येष्ठ साहित्यिक, मा. प्रा. डॉ. अरूण सावंत,माजी कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, मा. प्रा. डॉ. किशोर सानप, प्रसिद्ध लेखक व माजी अध्यक्ष, विदर्भ साहित्य संमेलन, मा. श्रीमती राही भिडे मुख्य संपादक, दै. पुण्यनगरी, प्रा. एन. बी. पासलकर, माजी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य आणि पंडीत वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ संस्कृत-तज्ञ हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी समाजाशी सुसंवाद साधताना विश्‍वशांती व मानवतेचे विधायक मूल्य समाजात प्रतिष्ठित व्हावे या उद्देशाने, आपल्या जीवनातील अनुभवांचे व समाज संवर्धनाच्या विचारांचे पसायदान या ग्रंथात मांडले आहे. या ग्रंथाला विदर्भातील प्रसिद्ध लेखक व समिक्षक प्रा. डॉ. किशोर सानप यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे.
तरी नागरिकांनी या प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी धोरणांची देशाला गरज- ना. संजय राठोड

0

नागपूर येथे विधान मंडळ परिसरात अभिवादन कार्यक्रम

यवतमाळ, दि. 01 – हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी धोरणांची देशाची आज खऱ्या अर्थाने गरज असून त्याची अंमलबजावणी व्हावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त नागपूर येथे विधान मंडळ परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. सुनील केदार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. गिरीष व्यास, विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, देशातील कृषी समृद्धीत कै. वसंतराव नाईक यांनी दूरदूष्टीने राबविलेल्या धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. कालांतराने शेती करण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले. आज शेती आधुनिक झाली आहे. तरीही शेतकरी मात्र समृद्ध होताना दिसत नाही. शेती आणि शेतीचे अर्थकारण विविध कारणांनी बदलले आहे. शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कै. वसंतराव नाईक यांच्या धोरणांची आज देशाला नितांत गरज आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास ना. राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विधान मंडळ परिसरातील कै. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून ना. राठोड यांच्यासह उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला विधान मंडळाचे सचिव यु.के. चव्हाण, विधान परिषद सभापतींचे सचिव काज, उपसचिव थिटे, कुरतडकर, मुख्य ग्रंथपाल बाबा वाघमारे, यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विधान मंडळ सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी व बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे वितरण,प्रकाश जाधव,माजी न्या.सी एल थुल यांना पुरस्कार जाहिर

0

मुंबई / प्रतिनिधी

दलित,शोषित,वंचित समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणा-या व्यक्तीस  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देण्यात येणार महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2017-18 या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे वितरण येत्या मंगळवार दिनांक 3 जूलै रोजी सकाळी 11 वा.नागपूर येथे करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी 61 व्यक्ती व 6 संस्थांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये मुंबई मरोळ मधून बौध्दाचार्य,कोंडिवटे बुध्द लेणी बचाव कृती समितीचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश कमळाकर जाधव ( मेढेकर) व एससी एसटी आयोगाचे न्यायिक सदस्य माजी न्यायाधीश सी एल थुल यांचा समावेश आहे.एससी /एसटी विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणा-या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासना मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात.

2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तींची निवड समितीने केली आहे.मंगळवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वा.नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ,सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.दरम्यान रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे म्हणाले कि प्रकाश जाधव हे आंबेडकरी चळवळीचा सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता आहे.आंबेडकरी चळवळीत नि:स्वार्थपणे काम करीत असताना जाधव यांनी कोणालाही दुखविले नाही.रात्री अपरात्री आंबेडकरी चळवळीच्या विचाराने,कृत्याने झपाटलेला माणूस म्हणून प्रकाश जाधव यांची ओळख असून बाबासाहेबांच्या नावाने सच्चा चळवळीच्या कार्यकर्त्याचा सन्मान होत आहे ही अभिमानाचे गोष्ट आहे.प्रकाश जाधवांच्या रुपाने राज्य शासनाने योग्य माणसाची निवड केल्याबद्दल त्यांचेही आभार यावेळी गौतम सोनावणे यांनी मानले.

संभाजीराजे – दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार?

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान…

संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते… काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले… मला इथे संधी मिळत नाही, तर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढणं साहाजिक आहे.

आता स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. तिथे नेमकं काय आहे? असं असताना खरा इतिहास टप्प्याटप्प्याने समोर आणणाऱ्या या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे बघणं कुतूहलाचं ठरणार आहे.

स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं… या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय. आता संभाजीराजे- दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच  आता कसा सुटणार याकडे  प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जुलै महिन्यात याचा उलगडा होणार असल्याने हा महिना प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा आणि मालिकेसाठी कसोटीचा असणार आहे.

५ जुलै रोजी वरसगाव धरण क्षेत्रात वृक्ष लागवड – खा. अनिल शिरोळे

पुणे-महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष  लागवडीच्या महत्वाकांशी योजनेत पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जल आणि मृद संधारण कामांतर्गत बांबूची लागवड करावी अशी विनंती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी मध्यंतरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांना केली होती. बांबू तसेच तत्सम प्रजातींची लागवड केल्यास अतिवृष्टीमुळे वाहून येणाऱ्या मृदेस अटकाव होऊन धूप थोपविता येते. प्रस्तावित बांबू लागवडीमुळे मान्सून पश्चात पाण्याचा प्रवाह (post mansoon flow) वाढून शहराची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणवहाळ क्षेत्रात नदी किनारी वसलेल्या गावांना पुरापासून संरक्षण देखील करत येते. यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित सचिव यांची बैठक आयोजित करून शासन निर्णय निर्गमित करण्याच्या शिरोळे ह्यांच्या  मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे ह्यांनी आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर बरोबर बैठक घेतली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ५ जुलै रोजी वरसगाव धरणाच्या तीव्र उतार क्षेत्रात वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. ह्या प्रसंगी जल संधारण विभागाचे अधिकारी संजीव चोपडे, रंगनाथ नाईकडे, पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते.

सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स तिसरा पदवी प्रदान समारंभ संपन्न

पुणे-विद्यार्थ्यांना शैक्षणिक मॉलमध्ये मुक्तपणे खरेदी करण्याची परवानगी दिली पाहिजे. कला, विज्ञान आणि मानवशास्त्र यांच्या मध्ये समाविष्ठ असलेल्या विविधतेचे शिक्षणात विकासासाठी संपूर्णपणे एकत्रित केले पाहिजे, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्सच्या (एससीएसी) तिसऱ्या पदवीप्रदान समारंभात तावडे बोलतहोते. यावेळी त्यांनी ‘श्रम आणि निष्ठा’ या महत्त्वाच्या विषयावर भर दिला आणि शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी सोनम वांगचुक यांचे उदाहरण दिले आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षण पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.  “भारतातील विद्यार्थ्यांना आघाडीवर येण्यासाठी त्यांनी स्थानिक विचार करणे आणि जागतिक स्‍तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वापरण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. पदवीप्रदानातून खरोखरच बाहेरील शिक्षकांच्या मार्गदर्शन निष्कर्ष दर्शविले जातात आणि विद्यार्थी स्वतःच्या मतेच शिकू लागतो, असेही ते म्हणाले.

या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी  सांगितले की, “शिक्षणाने आम्हाला सन्मान दिला आहे. ज्यायोगे आपण देशाच्या आर्थिक विकासात भाग घेऊ शकतो आणि राष्ट्राची उंची वाढविण्यासाठी हातभार लावू शकतो. नोकरीच्या संधींबाबत १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतापुढे एक आव्हान आहे. याउलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीस स्‍टॅण्‍ड अप इंडिया, स्‍टार्टअप इंडिया, कौशल्य विकास  विविध योजनांची सुरूवात केली आहे.”

सिंबायोसिस विश्वविदयालयाचे (अभिमत विद्यापीठ) संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजूमदार म्हणाले, “माणुसकी, अभियांत्रिकी आणि विज्ञान यासारख्या विविध विषयांचे, शास्त्रांचे एकत्रित करणे गरजेचे आहे. आम्हाला तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने विज्ञान आणि मानवशास्त्र यांच्यात सहजीवन संबंध असणे आवश्यक आहे, परंतु आम्हाला कवी, लेखक, इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञांचीही गरज आहे.”

ते पुढे म्हणाले, “एससीएसीने विविध प्रकारचे नवीन अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. ज्यात प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि लिबरल आर्ट्समधील डिप्लोमाचा समावेश आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आमचे ध्येय असून ‘एससीएसी ’ त्यानुसारच कार्यरत आहे. केवळ मोठ्या अंतःकरणाचे लोक ओळखू शकतात की संपूर्ण जग एक जागतिक गाव आहे आणि आपण सर्व एक आहोत.” तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण, करुणामय आणि सहानुभूती देण्याचा सल्ला दिला.

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ‘एससीएसी’चे अभिनंदन केले. “सिंबायोसिस सातत्याने दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर मूल्यांवर आधारित शिक्षण वर्गातील चार भिंतींमध्ये दिले जात आहे. हे ‘ एससीएसी ’, ‘ऑनर्स प्रोग्राम’, ‘लिबरल आर्ट्स’, ‘सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेन्ट’, शिक्षक हे विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी मूल्य शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढीसाठी लागावी, यादृष्टीने ‘एसीसीए’ देतआहे.”

या पदवीदान समारंभात ४७६ पदवीपूर्व विद्यार्थ्यांना कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी प्रदान करण्यात आल्या. बी.ए. आणि बी.कॉम विद्यार्थ्यांना सन्मानाने पदवी प्रदान करण्यात आली. आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र, इंग्रजी आणि मानसशास्त्र आदी विशेष विषयांचा अभ्यास केला, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बँकिंग, कॉस्टिंग, उद्योजकता आणि मार्केटिंग हे विशेष विषय अभ्यासले. कला शाखेत अनन्या दत्ता आणि वाणिज्य शाखेतून सिमरन छाबरा यांनी अग्रस्थान पटकाविले.

खासदार अनिल शिरोळेंनी घेतली अभय फिरोदिया आणि बाबा आढावांची भेट …

पुणे-‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची हमाल पंचायत येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी आढाव यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी शहरातील तसेच देशातील विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सुनील कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर तसेच हमाल पंचायत चे नितीन पवार आदी उपस्थित होते.

संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी फिरोदिया यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी विविध सामाजिक आणि अर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक विजय शेवाळे उपस्थित होते.

” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वसंतराव साळवे सन्मानित

   

      पुणे-लतिकाताई साठे सामाजिक फाउंडेशनच्यावतीने लतिकाताई साठे यांच्या स्मरणार्थ ” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षण मंडळाचे माजी सदस्य वसंतराव साळवे यांना जेष्ठ विचारवंत व्ही. जी . दस्तुरे यांच्या हस्ते देण्यात आला . क्वीन्स गार्डन मधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लतिकाताई साठे सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भंडारी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे , मुरलीधर जाधव , शैलेंद्र चव्हाण ,अशोक शिरोळे ,  सुधीर पवार , बाळासाहेब पठाण , रमेश तेलवडे , अजय भोसले , बाळासाहेब कावरे , संजय रोकडे , अरुण भिंगारदिवे , चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते .

         या कार्यक्रमामध्ये वसंतराव साळवे , मुरलीधर जाधव , महेंद्र कांबळे , छाया लोंढे , निलेश आल्हाट याना  ” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले .

           या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत संतोष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले तर आभार डॉ. बळीराम ओहोळ यांनी मानले . या कार्यक्रम संयोजन करण्यासाठी देविका चव्हाण , पूनम तावरे , ट्रेझा विल्सन , गिरीश जाधव , जयसिंग साठे , बाळासाहेब तावरे , अजय भोसले , चंद्रकांत सोनवणे , दीपक ससाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

रुग्णांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दगडूशेठ गणपतीला घातले साकडे …

पुणे : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त १ जुलै रोजी सकाळी पुण्यातील सर्व डॉक्टर्स संघटनानी एकत्र येऊन रुग्णांसाठी प्रार्थना केली आणि निरामय आरोग्यासाठी काम करण्याचा संकल्प केला.
रविवारी सकाळी ८ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तसेच दत्त मंदिरासमोर  सर्व डॉक्टर्स व असोसिएशन्स चे सदस्य यांनी एकत्र येऊन आरती केली. रुग्णांना आराम पडावा, सर्वत्र निरामय आरोग्य राहावे,यासाठी हा उपक्रम केल्याचे   साई स्नेह हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी यावेळी सांगीतले.
डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध दृढ होणे यासाठी डॉक्टर्स व असोसिएशन्स चे सदस्य मिळून एकत्र काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
 राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप  ,डॉ. मिलिंद भोई, काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रवींद्र काटकर, भाजपा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र खेडकर,जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए)चे अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक,इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए, पुणे)चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, शिवसेना डॉक्टर सेल च्या अध्यक्ष डॉ.सौ. प्रांजली थरकुडे , डॉ.मनोज रांका, डॉ. राजेश पवार, डॉ. सुनील इंगळे उपस्थित होते.
या प्रार्थना उपक्रमामध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए, पुणे), पुणे डॉक्टर्स असोसिएशन्स (पीडीए), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल (पुणे), ​काँग्रेस डॉक्टर सेल (पुणे), आयएमए डॉक्टर असोसिएशन, ​​​​जनरल प्रॅक्टिस असोसिएशन (पुणे), डॉक्टर्स असोसिएशन्स ​​​​हडपसर, डॉक्टर असोसिएशन कोथरूड, डॉक्टर असोसिएशन, ​​​​शिवाजीनगर, ​​​​सिंहगड डॉक्टर असोसिएशन, भाजपा डॉक्टर सेल (डॉ. राजेंद्र खेडेकर), ​​​इंडियन डेंटल असोसिएशन (पुणे) व इतर संघटना सहभागी झाल्या.

‘मला पहिला त्याचा खून करायचा ‘ .राज ठाकरेंचा टोला ….(व्हिडीओ)

पुणे-मी समजा राष्ट्रपतींना भेटलो तर त्यांना सांगेन एक खून मला माफ करा … मला मोबाईल मध्ये कॅमेरा निर्माण करणाऱ्याचा पहिला खून करायचा आहे .. अशा वाक्यात समोर मोबाईल धरणाऱ्या असंख्य तरुणाईचा  समाचार आज राज ठाकरे यांनी येथे घेतला . ते म्हणाले ..मला काही पाहू देतच नाही, गेलो कुठे कि आहेच हे मोबाईलवर असे काही, तर तसे काही ,….तेव्हा वसंत मोरे ,मी एकदा कोणाला न सांगता येथे येईल आणि बाग पाहून जाईल, आणि काही सूचनाही देवून जाईल 

राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे उद्घाटन येथे झाले कात्रज च्या मोरे बागेत झालेल्या या महापालिकेच्या उद्यान निर्मिती पासून ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या संयोजानापर्यंत सर्व काम स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी पाहिले .येथील कोनशिलेवर महापौर यांच्या पासून भाजपच्या सर्व आमदारांची नावे होती ,व्यासपीठावरील फलकावर देखील महापौर मुक्ता  टिळक यांचे नाव होते पण महापौर किंवा स्थानिक आमदार या महापालिकेच्या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत .  यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्यक्षात कोनशिलेवर नावे कोणा कोणाची पहा … 2 मंत्र्यासह शहरातील भाजपचे आठ हि आमदार ..एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्याचे हि नाव . महापौर आणि आयुक्तांचे हि नाव कोनशिलेवर पण हि सारी मंडळी गैर हजर … आहे कि नाही गजब कारभार …उद्घाटक राज ठाकरे आणि बागेसाठी सातत्याने परिश्रम घेणारे नगरसेवक वसंत मोरे हजर..

असंख्य लोकांनी सुमारे 2 तास उन्हात बसून राज ठाकरे यांची प्रतीक्षा केली .ठाकरे आल्यानंतर त्यांच्या भोवती मोबाईलवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेणाऱ्या असंख्य लोकांनी गर्दी केली .
जास्त वेळ न घेता राज ठाकरे यांनी आपले भाषण सुरु करताच पहिल्याच टप्प्यात त्यांनी या सर्व कॅमेरा पंटर्स चा समाचार घेतला .
राज म्हणाले, प्रत्येक शहरात मनसेच्या नगरसेवकांनी चांगली कामे केली आणि करीत आहेत. पण कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे, असे सांगून ते म्हणाले , निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात. थापांवर जर मतदान होत असेल तर मग कशाला कुणी कामं करेल, अशा शब्दांत त्यांनी मतदारांवर थेट  निशाणा साधला.
वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला तर बदलेल्या प्रभागात हि ते वाघासारखे काम करत आहेत . मी तर म्हणतो दर वेळेस बदलू देत त्याचा प्रभाग ..म्हणजे सर्वत्र काम तरी होईल ,वसंत जेथे जातो तेथे बागा फुलवतो. माझे नगरसेवक चांगलेच काम करतात .कचऱ्याच्या समस्यावर नगरसेवकांनी सात वर्षांपूर्वी त्यावर उपाय योजना करण्यास सुरुवात केली. चांगल्या प्रकारे कचरा प्रकल्प उभारून नागरिकांची कचरा समस्येतून सुटका केली. एवढी कामे करून देखील कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे. जर  मतदान होणार नसेल तर काम का कराव? असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.मी येथे राजकीय भाषण करायला आलो नाही .. मी ज्योतिषी नाही ,पण मी बोलतो तसेच होते , माझे राजकीय अंदाज खरे ठरतात .  संध्याकाळी बांद्र्यात सभा आहे ती जरूर ऐका असे ते जाता जाता सांगून गेले .
कात्रजच्या मोरेबागेत महापालिकेने हि बाग निर्माण केली आहे .मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच पुढाकाराने या बागेची निर्मिती झाली आहे . 

रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाईचा कर्मचारी संघटनेकडून काळ्या फिती लावून निषेध

0

पुणे: पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डिएसके प्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक  आर के गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्याच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरुद्धची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून आज दिनांक 30 जून 2018 शनिवार रोजी बँकेच्या एकूण-एक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला. तसेच बँकेतील सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांची या संदर्भामध्ये तातडीची एक द्वारसभा आज दिनांक 30 जून शनिवारी संध्याकाळी 5.00 वाजता लोकमंगल, पुणे या बँकेच्या मुख्यालायामध्ये आयोजित करण्यात आल्याचे फोरमच्या प्रतीनिधींनी सांगितले आहे.

संचालक मंडळ आणि त्यांना दिग्दर्शन करणारे वित्त मंत्रालय, बँकिंग विभाग यांनी काल संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची दुर्दैवी, अप्रस्तुत आणि अन्यायकारक निर्णय अशी संभावना करीत बँकेतील कार्यरत सर्व संघटनांनी ‘युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स’ हे व्यासपीठ स्थापन करून संघर्षाचा पवित्र घेतला आहे, ज्याची सुरुवात म्हणून दिनांक 30 जून ते 05 जुलै हा निषेध सप्ताह म्हणून पाळला जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्याची अर्थ संदर्भातील जीवन रेषा (फायनान्शियल लाईफ लाईन) आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक ही जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असून ही प्रतिमा जपण्यासाठी बँकेतील एकूण-एक कर्मचारी एकदिलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विशेष म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापनावरील अन्यानायकारक कारवाई विरुद्ध बँकेतील सफाई कर्मचारी ते महाव्यवस्थापक पदावरील सर्वांनी एकत्र येवून पाठींबा देण्याची बँकिंग उद्योगातील ही अपवादात्मक घटना म्हणता येईल.

युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स मधील सहभागी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या आज लोकमंगल पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात आला. पदाधिकार्‍यांच्या या शिष्ठमंडळाने बँकेचे कार्यकारी संचालक व सध्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार असलेले श्री ए सी राऊत यांची भेट घेऊन आपली भूमिका विशद केली आणि सद्यस्थितीत सर्व संघटना व्यवस्थापनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहाणार असल्याची ग्वाही दिली.

बँकेतील सर्व कर्मचार्‍यांनाच्या भावनांचा आणि विनंतीचा आदर करून संचालक मंडळाने आणि वित्त मंत्रालयातील बँकिंग विभागाने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास भविष्यातील आंदोलनाचे स्वरूप आणि मार्ग काय असावेत या विषयी चर्चा करण्यासाठी युनायटेड फोरमची महत्वपूर्ण सभा दिनांक 6 जुलै रोजी लोकमंगल, पुणे या बँकेच्या मुख्यालायामध्ये होणार असून त्याच दिवशी पुण्यातील सर्व कर्मचार्‍यांची व्यापक सभा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना मिळाला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

0

सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे आज, दि. 30 जून रोजी झालेल्या 42 व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी अजंठा,एलिफंटा, वेरुळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर्जा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि दक्षिण मुंबई भागातील जतन कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या पथकाने युनेस्को परिषदेत आपली भूमिका मांडली. केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असा निर्णय युनेस्कोने घेतला. मुख्यमंत्र्यांनी यासाठी इतिहासकालीन वास्तूच्या जतनासाठी अग्रेसर असणाऱ्या नागरिकांच्या संघटनांनी केलेल्या जतन कार्याबद्दल आभार मानले.

दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह व फोर्ट परिसरात असलेल्या 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तू शैलींच्या इमारती व 20 व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे. युनेस्कोची तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर  मोमेंटस अँड साईटस् या समितीने नामांकनाचे पत्र राज्य शासनाला पाठविले  होते. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मुंबईतील परिसराच्या समावेशास हिरवा कंदील दाखविला होता.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या परिसराचा समावेश व्हावा, यासाठी राज्य शासनाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. भारतातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे मुंबईतील व्हिक्टोरियन व आर्ट डेको वास्तुशैलीच्या इमारतींचा प्रस्ताव अधिकृतपणे जावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. यासंबंधी श्री. फडणवीस यांनी केंद्र शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, या मानांकनामुळे मुंबईतील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असून यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशात मुंबईचे स्थान अग्रेसर होण्यास मदत होईल. लंडन व युरोपियन शहरांतील अनेक उद्योगपती यामुळे मुंबईकडे आकर्षित होतील.

राज्यातील या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेशामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत 37 व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत 7 व्या क्रमांकावर येणार आहे.

वारसा स्थळांच्या यादीत समावेशसाठी युनेस्कोकडून सल्लागार समितीने सप्टेंबर 2017 मध्ये मुंबईमध्ये येऊन या परिसराची पाहणी केली होती.  या समितीने मुख्यमंत्री, नगर विकास विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेची हेरिटेज समितीचे अधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली होती. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर व वास्तुरचनाकार आभा नरिन लांबा यांनी मुंबईतील वरील परिसराचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये व्हावा,यासाठी खंबीरपणे बाजू मांडली.

            यासंबंधी युनेस्कोचे संचालक व भारतातील प्रतिनिधी इरिक फेट यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन करून म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने अतिशय उत्तमरित्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी प्रस्ताव सादर करून नामांकन मिळविले आहे. या इमारतींच्या समुहांमुळे वैश्विक मुल्यांची जपवणूक केली आहे. अशा या वास्तुंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे.

नगर विकास सचिव नितीन करीर म्हणाले, व्हिक्टोरियन व आर्ट डेको पद्धतीच्या इमारती या जगभरात दिसून येतात. मात्र एकाच परिसरात एवढ्‌या मोठ्या प्रमाणात दोन्ही शैलीच्या इमारती या फक्त मुंबईतच आढळतात. 19 व्या व 20 व्या शतकातील दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या अद्वितीय वास्तुरचना मुंबई वगळता इतर कुठल्याही शहरात आढळून येत नाहीत. या परिसराचा समावेश जागतिक यादीत झाल्यामुळे महाराष्ट्र हे प्रमुख जागतिक वारसा स्थळे असलेल्या राज्यांमध्ये अग्रेसर राज्य ठरणार असून एकट्या मुंबईतील तीन स्थळांचा समावेश जागतिक यादीत असणार आहेत. मुंबईने 1995 वारसा नियमावली तयार केल्या असून नागरी संवर्धनामध्ये देशात अग्रगणी ठरला आहे. संवर्धन व विकास यांचा समतोल साधून अनोखी वारसा व्यवस्थापन यंत्रणा तयार केली आहे.

बोपोडी गांधीनगरवर पोलीस बंदोबस्तात कारवाई

0

पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून हॅरिस पुलाला समांतर दोन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणा-या झोपड्यांवर पुणे महापालिकेने आज  कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हॅरिस पुलाच्या कामाला गती मिळणार आहे.

हॅरिस पुलावर वाहनांची गर्दी वाढून दापोडी, बोपोडीमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरीस पुलाला समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही बाजुंनी दोन पुलाचे काम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून एकत्रित करण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपरीकडून पुण्याला जाणा-या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर, पुण्याकडून पिंपरीकडे येणारा पूल अतिक्रमणांमुळे अर्धवट स्थितीत आहे.

बापोडी येथील अतिक्रमणे व झोपडपट्ट्या हटविल्याशिवाय या पुलाचे काम करता येणार नव्हते. त्यामुळे अखेर पुणे महापालिकेने आज  सकाळी कारवाई करत ही अतिक्रमणे हटविली आहेत. महापालिका अधिकारी व मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यामुळे हॅरिस पुलाच्या कामाला गती मिळणार असून लवकरच दोन्ही बाजुचे समांतर वाहतुकीसाठी खुले होऊ शकतील.