पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुशिक्षित डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत. जी सामाजिक कार्य करताना आंदोलने करतात अशा आंदोलकांवर दरवेळी दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केला जातो. आम्ही गुंड आहोत, असे दाखविले जाते. आम्ही जर कानाखाली मारले असेल तर जी तरतूद कायद्यात असेल त्यानुसारच पुणे पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी वजा विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा अॅड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात ‘मनसे स्टाईल’ने आंदोलणाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असेही आवाहन त्यांनी केले .
सिनेमा गृहांतील लुटमार पोलिसांना चालते आणि हि लुटमार करणाऱ्यांच्या कानाखाली मारण्याचे काम खरे तर कायद्याच्या रक्षकांनी करायला हवे ,पोलिसांना सिनेमागृहातील लुटीविषयी सांगितले असता ते म्हणतात, आमच्याकडे कायद्याची तरतूद नाही. जर पोलिसांकडे कायद्याची तरतूद नसेल, ते कारवाई करू शकत नसतील तर त्यांनी निदान आमच्यावर खोटे गुन्हे तरी दाखल करू नयेत. आम्ही जर कानाखाली मारले असेत तर कायद्यानुसार सरकारने, पुणे पोलिसांनी आमच्यावर केवळ कानाखाली मारल्याचा गुन्हा दाखल करावा, दरोड्याचा गुन्हा त्यांनी का दाखल करावा असा सवाल करून त्या म्हणाल्या पुण्यातील सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात आणि घरचे खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. सिनेमागृहमालकांनी आठ दिवसात यावर निर्णय न घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल.