पुणे- विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ४ जुलै २०१८ ते शुक्रवार, दि. ६ जुलै २०१८ या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थाना निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान/प्रवचन/कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सायंकाळच्या ५.३० ते ६.३०च्या सत्रात आळंदी देवाची येथील प्रज्ञाचक्षू ह.भ.प. गणपत महाराज जगताप, आळंदी देवाची येथील ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव व परभणी येथील ह.भ.प श्री. ठाकुरबुवा दैठणेकर आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प. मा. बबनराव पाचपुते यांची व्याख्याने / प्रवचने होणार आहेत.
सायंकाळच्या ७ ते ९च्या सत्रात आळंदी देवाची येथील राष्ट्रीय कीर्तनकार, पर्यावरण व व्यसनमुक्तीचे प्रणेते ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर माऊली वाबळे गुरूजी, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर) आणि आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसनमहाराज साखरे यांची कीर्तने होणार आहेत.
रोज रात्री ९.१५ ते ११.३०च्या सत्रात संगीत अलंकार ह.भ.प.श्री राधाकृष्ण गरड गुरूजी यांचा भक्ती स्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम होईल. मावळ येथील ह.भ.प. श्री अरूणमहाराज येवले व सहकारी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम. तसेच, प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे व श्री. रमेशबुवा शेनगांवकर यांचा सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच सकाळच्या सत्रात ह.भ.प.डॉ. सुदाममहाराज पानेगांवकर, ह.भ.प. श्री.आसाराम महाराज बढे व ह.भ.प.श्री अच्यूतमहाराज दस्तापूरकर यांचीही कीर्तने होणार आहेत.
काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ हे करतील.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.