पुणे,दि.२ ः नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक तसेच युनेस्को विश्वशांती केंद्र, आळंदी, माईर्स एमआयटी पुणे येथे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या सोबत कार्यरत असलेले व टाकीचे घाव, वेदना आणि प्रेरणा, रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग (आगामी) या ती खंडात्मक आत्मचरित्राचे लेखक डॉ. एस. एन. पठाण यांनी लिहिलेल्या “समाज संवाद” या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रफुल्लता प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेद्वारे संत ज्ञानेश्वर सभागृह, माईर्स एमआयटी, पुणे येथे दिनांक ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष मा. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख विश्वशांती केंद्र, (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत, सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. माणिकराव साळुंके कुलगुरू, भारती विद्यापीठ, पुणे, मा. प्रा. डॉ. सर्जेराव निमसे माजी अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषद, नवी दिल्ली, माजी कुलगुरू, लखनौ विद्यापीठ, लखनौ तसेच प्रमुख उपस्थिती मा. डॉ. सदानंद मोरे माजी अध्यक्ष, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन, मा. प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा ज्येष्ठ साहित्यिक, मा. प्रा. डॉ. अरूण सावंत,माजी कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, मा. प्रा. डॉ. किशोर सानप, प्रसिद्ध लेखक व माजी अध्यक्ष, विदर्भ साहित्य संमेलन, मा. श्रीमती राही भिडे मुख्य संपादक, दै. पुण्यनगरी, प्रा. एन. बी. पासलकर, माजी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य आणि पंडीत वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ संस्कृत-तज्ञ हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी समाजाशी सुसंवाद साधताना विश्वशांती व मानवतेचे विधायक मूल्य समाजात प्रतिष्ठित व्हावे या उद्देशाने, आपल्या जीवनातील अनुभवांचे व समाज संवर्धनाच्या विचारांचे पसायदान या ग्रंथात मांडले आहे. या ग्रंथाला विदर्भातील प्रसिद्ध लेखक व समिक्षक प्रा. डॉ. किशोर सानप यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे.
तरी नागरिकांनी या प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.