Home Blog Page 1552

“अजित पवार आता शांत बसणार नाहीत…”, अंजली दमानियांचा मोठा दावा

मुंबई-अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. परंतु मला नाही वाटत ते इतके शांत बसतील. येत्या काही दिवसात, किंवा काही महिन्यात, कदाचित दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदरांना एकत्र करून मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही असे वक्तव्य आप च्या नेत्या अंजली दमानिया यांनी येथे केला आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. ३ मे रोजी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले, मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही. माझा निवृत्ती घेण्याचा निर्णय ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” दरम्यान, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा करण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार अनुपस्थित होते. यावरुन वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नसल्याबाबत खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले की, “प्रत्येकजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत, तर काही लोक इथे उपस्थित नाहीत.”

दरम्यान, अजित पवारांबाबत सातत्याने वेगवेगळे दावे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक मोठा दावा केला आहे. दमानिया म्हणाल्य की, अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. परंतु मला नाही वाटत ते इतके शांत बसतील. येत्या काही दिवसात, किंवा काही महिन्यात, कदाचित दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदरांना एकत्र करून मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही.दमानिया म्हणाल्या, या सर्व राजकारण्यांनी राजकारणाचा उकिरडा करून ठेवला आहे. यावेळी दमानिया यांना विचारण्यात आलं की, शरद पवार आता पुन्हा राजीनामा देतील का? या प्रश्नावर दमानिया म्हणाल्या, मला नाही वाटत शरद पवार आता राजीनामा द्यायच्या फंदात पडतील. परंतु ते कधीही आणि काहीही करू शकतात.

१०० सेकंद कोल्हापूर जिल्हा स्तब्ध; लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

◆ शाहू महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले
◆ गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी लोकराजाला अभिवादन
◆ सर्व प्रकारची वाहतूक थांबून कोल्हापूर स्तब्ध
◆ शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये अभिवादन

कोल्हापूर, दि.6 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त आज शनिवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता अवघे कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध झाले.. गतवर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.

शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. याठिकाणी आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. याठिकाणी शाहूंप्रेमींनी दिलेल्या “श्री शाहू महाराज की जय ..!” या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.

सकाळी ठिक 10 वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जागेवर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

• ड्रोनद्वारे अनोख्या अभिवादन उपक्रमाची क्षणचित्रे
• शहरातील प्रमुख चौकांसह संपूर्ण शहर व जिल्हा 100 सेकंदासाठी स्तब्ध
• 100 सेकंद अभिवादन कालावधीत जिल्ह्याने अनुभवली अनोखी शांतता.
• जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय यंत्रणा, संस्था, संघटना व लोकसहभागातून उपक्रम.
00000

आयआयपीएस 64 व्या दीक्षांत समारंभात 199 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

मुंबई, 6 मे 2023

मुंबईतील लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्था (आयआयपीएस), या मानद विद्यापीठाचा 64 वा दीक्षांत समारंभ आज (6 मे, 2023) पार पडला. यावर्षी एकूण 199 विद्यार्थ्यांना पदवी /पदविका प्रदान करण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट संशोधन आणि शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले आणि त्यांना सुवर्ण तसेच रौप्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. बहल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पदवी, पदविका आणि पदके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी योगदान देण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. लोकसंख्या संबंधी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणाऱ्या तसेच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण आणि भारतातील वृद्धत्वासंबंधी सखोल अभ्यास विषयांवर सर्वेक्षणांच्या माध्यमातून उच्च-गुणवत्तापूर्ण माहिती तयार करणाऱ्या लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या योगदानाचे, डॉ. बहल यांनी कौतुक केले. कोविड-19 च्या व्यवस्थापनासारख्या आव्हानांना तोंड देताना भारताने साधलेल्या विकासाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आणि देशाने प्रतिस्थापन प्रजनन क्षमतेची निम्न पातळी गाठल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थी आणि संशोधकांनी राष्ट्र उभारणीसाठी काम करावे, असे आवाहन डॉ. बहल यांनी केले.

भारत सरकारच्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी लोकसंख्येच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भूमिकेचे कौतुक केले तसेच पदवी/ पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. देशाच्या विकासासाठी लोकसंख्याशास्त्रज्ञ/ लोकसंख्या संशोधकांनी सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे डॉ. भूषण यांनी सांगितले. ती क्षेत्रे म्हणजे : (i) कौशल्य विकासाद्वारे लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ प्राप्त करणे, (ii) वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या लोकसंख्येला आधार देणे (iii) स्थलांतर आणि शहरीकरणाकडे लक्ष केंद्रित करणे (iv) हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणे (v) लैंगिक समानता सुनिश्चित करणे (vi) उच्च दर्जाची संबंधित आणि संदर्भित माहिती तयार करणे, आणि (vii) तांत्रिक प्रगतीच्या सीमांची ओळख. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व्हावे आणि शिकण्याची जिज्ञासा कधीही सोडू नये असा सल्ला डॉ. भूषण यांनी दिला.

लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक प्राध्यापक के एस जेम्स यांनी, 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी संस्थेचे उपक्रम आणि कामगिरीचा आढावा घेणारा संचालक अहवाल सादर केला. या संस्थेतर्फे पुढील चार नियमित शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जाता

शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते; जयंत पाटलांचे वक्तव्य

सांगली-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यासाटी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधले वादळ शमल्यानंतर जयंत पाटील आज स्वगृही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अनेकांना जोरदार टोले हाणले.

जयंत पाटील यांनी आज ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमानिमित्त वाळवा तालुक्यातील साखराळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची चिंता, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी, असा टोला हाणला.

जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही सूचक भाष्य केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे वादळ निर्माण झोले होते. मात्र, बरेच लोक त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावे, अशी त्यांची इच्छा होती, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. हे लोक कोण, पक्षातले की पक्षाबाहरेचे, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. हा एक धक्काच होता. ज्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो. त्यावेळी आपले ध्येय होते, एक विचार होता. साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आपण सर्व अस्वस्थ झालो. आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारलीही.

जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातूनही जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणतात की, आज देशात एक वेगळी परिस्थिती आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारीने तरुण पिढी हैराण झाली आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवर भर न देता इतर गोष्टींकडे लोकांचे लक्ष वळवले जात आहे. दुर्दैवाने देशातील माध्यमेही यात सहभागी होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील पुढे म्हणतात की, महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र, ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. मात्र, माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे ध्येय आहे.

जयंत पाटील पुढे म्हणतात की, आज शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे, पण पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना काल मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत होती आणि या पुढेही जोमाने लढत राहणार.

“अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

पुणे-

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त पुणे महानगरपालिका इमारत येथील छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून स्मृती दिन कार्यक्रम आयोजित केला.यावेळी मान्यवर *पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब , नगरसचिव कार्यालय अधीक्षक सौ योगिता भोसले* तसेच शिवसेना पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांच्या हस्ते प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.यावेळी *अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले, महिला शहर अध्यक्ष श्रुतिका पाडळे , युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , सरचिटणीस गणेश मापारी,सचिन वडघुले, मिलन पवार,सुशील पवार ,अनिल बालवडकर,तानाजी शिरोळे, शिवराज कौलगे पाटील, योगेश टापरे* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुधीर कुरुमकर यांनी शाहू महाराचे सामाजिक विचार व कार्य या विषयी विचार मांडले.     ह्या कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.मराठा महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत युवक सरचिटणीस सचिन वडघुले , सुत्रसंचालन महिला शहर अध्यक्ष श्रुतिका पाडळे यांनी केले, ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.

राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये  रंगली  ‘ मनसोक्त आंबे खा पार्टी’! 

पुणे –माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने उपक्रम पुणे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या  शिवदर्शन, सहकारनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये     ‘ मनसोक्त आंबे खा पार्टी’ रंगली. विशेष म्हणजे यावेळी  आंबे खा स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी आनंदही लुटला. 
 माजी उपमहापौर व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून या विशेष उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा इयत्ता सहावी ते दहावीच्या  साडे तीनशे विद्यार्थी – विद्यार्थिनींनी  लाभ घेतला. यावेळी  अमित बागुल यांच्यासह  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत,  नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,   रमेश भंडारी तसेच  शाळेचे मुख्याध्यापक मसलकर ,  ताठे,कदम  आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा कसा सदुपयोग करायचा यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी  ‘ मनसोक्त आंबे खा पार्टी’ चा आनंद लुटला. यावेळी आंबे खा स्पर्धा घेण्यात आली त्यात इयत्ता सहावीतील  विराज काळे( प्रथम),  सई अनिल जगताप (द्वितीय)  इयत्ता सातवीतील    कुड्सिया शेख (प्रथम), चैतन्य पवार (द्वितीय)
इयत्ता आठवीतील  अरमान सय्यद (प्रथम),  लक्ष्मी कांबळे (द्वितीय),इयत्ता नववीतील पार्थ शेंडगे ( प्रथम),रोहित शिंदे ( द्वितीय),इयत्ता दहावीतील  तनूजा शिंदे (प्रथम),साईं करपे (द्वितीय  ) यांनी यश मिळवले. या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात आंबे प्रदान करण्यात आले. हास्यकल्लोळात  विद्यार्थीवर्ग  आंबे खा पार्टीमध्ये दंग  झाली होती. या उपक्रमासाठी अमित बागुल मित्रपरिवाराने पाच हजार आंबे उपलब्ध करून दिले.  

सोनिया, ईश्वरी, साई उपांत्य फेरीत

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन

पुणे : सोनिया सूर्यवंशी, ईश्वरी रणदिवे, अदिती जाधव, साई सिद्धी, नरेंद्र टेकळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर सुरू आहे. भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, शिरीष मोहिते, ट्रस्टचे अध्यक्ष तेजस जाधव, कार्याध्यक्ष नीलेश खाणेकर, उपाध्यक्ष डॉ. अमरसिंह भोरे, खजिनदार शैलेश खाणेकर, चिटणीस प्रितम मळेकर, सरचिटणीस यश खाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील ३२ ते ३५  किलो वजनी गटाच्या मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत ईश्वरी रणदिवेने साक्षी मीनाचा ५-० ने पराभव केला, तर अदिती जाधवने जिया शेखला ५-० ने नमविले. मुलींच्या ३५ ते ३७  किलो वजनी गटात श्रेया धांधरने जान्हवी सांगळेला ५-० ने नमविले. सोनिया सूर्यवंशीच्या आक्रमक ठोश्यांसमोर जिनसा कुंभार निष्प्रभ ठरली.

मुलांच्या गटाच्या ३५ ते ३७ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत साई सिद्धीने सोहम जाधवचे आव्हान ३-२ ने परतवून लावले. नरेंद्र टेकळेने प्रभू चालवडीला, तर रणवीर कटारियाने ओंकार भालचिमला ५-० ने नमविले.

निकाल : उपांत्यपूर्व फेरी – मुली – ३७ ते ४० किलो – आर्या कोंडके वि. वि. स्वराली जाधव ५-०, आंचल कुमारी वि. वि. झिनत शेख नॉक आउट. ४० ते ४३ किलो – आर्या पागरे वि. वि. श्रावणी वाघमारे ३-२, प्रांजल आठवले वि. वि. चैतन्या शिंदे ५-०. ४३ ते ४६ किलो – कृष्णा पवार वि. वि. इशिका मंडल ५-०, सोरा ढगे वि. वि. सृष्टी दोडमिसे नॉक आउट, ४४ ते ४६ किलो – सृष्टी चौरिया वि. वि. जान्हवी घोडे ५-०. ४८ ते ५० किलो – सृष्टी जाधव वि. वि. रोस सय्यद ३-२. ५० ते ५२ किलो – अलिझा जोविस वि. वि. सिमरन चौगुले ५-०. ५४ ते ५७ किलो – प्रांजल इंगळे वि. वि. ऋतुजा रणदिवे ५-०.

मुले – ३७  ते ४० किलो – आर्यन सरतापे वि. वि. संकेत धारणे नॉक आउट, पृथ्वीराज लोखंडे वि. वि. वेदांत भिलारे ५-०, प्रज्ज्वल सितापुरे वि. वि. कल्पेश बिका ५-० . ४६ ते ४९ किलो – शफिक शेख वि. वि. साईराज चौधरी ३-२. ४४ ते ४६ किलो – साहिल लोट वि. वि. उदय घोरपडे ५-०, भवंतू सूर्यवंशी वि. वि. यशदानी शेख ५-०. ५४ ते ५७ किलो – तन्मय जानराव वि. वि. प्रज्ज्वल हुबळीकर ३-२, ओम पवार वि. वि. टोनी तेलगू ४-१. ६६ ते ७० किलो – शिवम इजगज वि. वि. सुहान शेख नॉकआउट. ४९ ते ५० किलो – अमय सरगडे वि. वि. हर्ष गावडे नॉक आउट. ५२ ते ५६ किलो – सार्थक पारधी पुढे चाल वि. शिवम मोरे. ६० ते ६३ किलो – आकाश जाधव पुढे चाल वि. सुमीत गायकवाड.

गुरुप्रसाद, आकाश उपांत्यपूर्व फेरीत

एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा, सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन

पुणे: गुरुप्रसाद राउत, आकाश भालेकर यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन पीडीएमबीएचे सचिव रणजित नातू यांच्या हस्ते झाले. या वेळी बायजूजचे विभागीय संचालक निशांत प्रियदर्शनी, मॅच पॉइंट सहसंस्थापकचे राहुल कौल, होस्टरोयलच्या संचालिका संपदा मेडसीकर, सुधांशू बॅडमिंटन अकादमीचे सुधांशू मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत गुरुप्रसाद राउतने कीर्तन सेरलाथनवर १५-८, १५-६ असा, आकाश भालेकरने ओम भावेवर १०-१५,१५-७, १५-८ असा विजय मिळवला. सुशांत पाटीलने पीनाक वाडीकरला १५-४, १५-५ असे, अथर्व घाणेकरने राजू ओव्हळला १५-१०, १५-५ असे नमविले. लोकेश जुंगिडने मुझामिल अन्सारीवर १५-७ , १५-७ अशी, तर हिमांशू मेहराने विपूल अन्वेकरवर १६-१४, ८-१५, १५-१२ अशी मात केली. आनंद साबूने हृषीकेश खाडिलकरवर १५-१३, १५-१२ असा विजय मिळवला.

जावेद, दिगांतची आगेकूच

स्पर्धेतील ४० वर्षांवरील पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत मधुसुदन मुदगलने जावेद शेखवर १५-१२, १५-१० असा विजय मिळवला. हसप्रित सहानीने राजू पिल्लईला १५-१३, १५-७ असे, तर सलील गाडगीळने पवन ठाकरेला १५-६, १५-११ असे नमविले. सांरग व्यासने अभिषेक जोशीवर १५-५, १५-११ असा, तर कुणाल लोकरेने सुदाम तांडलेवर १५-१३, १५-१० असा विजय मिळवला. दिगांत गुप्ताने सागर वैरागडेला १५-८ , १५-११ असे नमविले. 

निकाल – पहिली फेरी – ३०  वर्षांवरील पुरुष एकेरी – आनंद साबू वि. वि. योगेश गुंजाळ १५-८, १५-८, ओंकार केळकर वि. वि. चिराग देशपांडे १५-१३, १२-१५ , १५-३, शांतनू पाटील वि. वि. राहुल बांगर १५-७, १५-१२, देवेश सतवाणी वि. वि. जावेद शेख १५-१२, ६-१५, २१-१९, अनिकेत शुक्ला वि. वि. मेघराज जाधव १५-७ १५-९, विपूल अन्वेकर वि. वि. सिद्धान्त अमृतवार १५-१०, १५-५, सुशांत पाटील वि. वि. वरद सहस्त्रबुद्धे १५-१, १५-३.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – दुसरी फेरी – आनंद साबू वि. वि. मेघराज जाधव १५-९, १५-७, सुदाम तांडले वि. वि. पुष्कर जोशी ९-१५, १५-११, १६-१४, सलील गाडगीळ वि. वि. आरिफ गिलानी १५-१२, १५-१० अजिंक्य धर्माधिकारी वि. वि. सागर वैरागडे १५-११, १५-११, शांतनू पाटील वि. वि. अनिरुद्ध गोखले १५-१२, १६-१४, हसप्रित सहानी वि. वि. निशांत अगरवाल १५-६, १५-६ आलोक देशपांडे वि. वि. राजू पिल्लई १५-९, १५-१३, अक्षय गद्रे वि. वि. गीतेश प्रसाद १५-३, १५-७.

शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन

मुंबई, दि. 6 – राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन करून या राज्यस्तरीय उपक्रमाचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, डॉन बॉस्को संस्थेचे संचालक फादर अँथनी पिंटो, माजी नगरसेवक हरीश भांदिर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुमारे 3 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सना विद्यार्थ्यांसह पालकांनीही भेट देऊन माहिती घेतली. याठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत होते. यासोबतच दिवसभर शिक्षण आणि करिअरविषयक क्षेत्रातील तज्ज्ञानी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांना अनुसरून विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेकांना नसते. त्यामुळे अनेक युवक-युवती पारंपरिक शिक्षण, प्रशिक्षणच घेताना दिसतात. या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात दि. 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्किलिंग, अपस्किलिंग गरजेचे – प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, आपले ज्ञान, कौशल्य सतत अद्ययावत ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून सतत अद्ययावत ज्ञान मिळविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच कौशल्य विकास विभाग आता स्किलिंग, अपस्किलिंगवर भर देत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित या करिअर शिबिरांमधून राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची नवनवीन क्षितिजे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना  आदरांजली वाहण्यात आली. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी प्रास्ताविक केले, तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नवनवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी माहिती दिली.

हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवू- उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

बारसू- येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ठाकरे यांनी सोलेगाव येथे जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांना बारसू सोलगाव येथे सभा घ्यायची होती. मात्र, प्रशासनाने या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधला. सरकारने स्थानिकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन. आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. ते आज शनिवारी राजापूरच्या सोलगाव येथील रिफायनरी विरोधक ग्रामस्थांना भेटले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी या ग्रामस्थांशी संवाद साधला. सोलगाव-बारसू रिफायनरीविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुम्ही काळजी करु नका. कोकणात लोकांचे मुडदे पाडून मी विकास होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी मी पत्र दिले होते. पण त्याचा अर्थ याचठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. लोक भिकारी झाले तरी चालतील, पण रिफायनरी करा, असे मी बोललो होतो का? नाणार प्रकल्पाला आम्ही विरोध केला होता. बारसूमध्येही माणसं राहतात, याठिकाणीही आंबा आणि काजूच्या बागा आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.सध्याच्या मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, समृद्धी महामार्गावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन आम्ही मार्ग काढला होता. समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन जिल्हेही मंत्री म्हणून ओळखत नव्हते. आज ३३ देशांत गद्दार म्हणून त्यांची ओळख आहे. समृद्धी महामार्गाच्यावेळी मी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात गेलो होतो. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा दाखवल्या. या शेतांमधील झाडं फळांनी लगडलेली होती. तेव्हा शेतकऱ्यांशी बोलून आम्ही समृद्धी महामार्गाचा रस्ता पलीकडून नेला आणि त्यांच्या फळबागा वाचवल्या. अशाप्रकारे लोकांशी बोलून मार्ग काढावा लागतो. सरकारला रिफायनरी आणायची असेल, पण स्थानिक लोकांचा विरोध असेल तर येथे रिफायनरी येता कामा नये. मी राज्य सरकारला आव्हान देतो की, त्यांनी माझ्याप्रमाणे लोकांसमोर उभे राहून बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करुन दाखवावे. चांगल्या प्रकल्पांना विरोध करायला कोकणी माणूस मुर्ख नाही. पण राखरांगोळी करणारे विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारले जात असतील तर तो प्रयत्न खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला यायचाय; संजय राऊतांचा राणेंना टोला

मुंबई-शिवसेनेला थांबवणारा ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला आलेला नाही, अशाप्रकारे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राणे कुटुंबीयांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राणेंवर निशाणा साधला आहे.शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही.असाही टोला त्यांनी लगावला .

उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर राजापुर तालुक्यातील साखरकुंभे गावात दाखल झाले आहे. याठिकाणी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आहे. ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी नारायण राणेंनी पाय ठेवून दाखवा असे आव्हान केले होते. या आव्हानाचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे.

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांशी चर्चा करतील. राणे म्हणाले होते ठाकरेंना याठिकाणी येऊ देणार नाही. येऊ देणार नाही म्हणजे काय? ठाकरे परिवार आणि कोकणचे जिव्हाळ्याचे नाते आहे. जेव्हा जेव्हा कोकणावर आघात झालेला आहे तेव्हा तेव्हा शिवसेना त्यांच्या मदतीला धावली आहे.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. ज्यांची तिकडे गुंतवणूक आहे त्यांनीच उद्धव ठाकरेंना येऊ देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र शिवसेनेला थांबवणारा आणि ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला यायचाय. त्यामुळे पोकळ धमक्या देणे बंद करा. या देशात लोकशाही आहे. राणे कुटुंबीय पाय ठेवू देणार नाही, असे म्हणाले होते. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागताला यायला हवे होते.

संजय राऊत म्हणाले, बारसूतल्या लोकांना रोजगाराचे अमिष तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार याठिकाणी सरकार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रवादीत घडलेल्या गोष्टीला शक्तीप्रदर्शन म्हणता येणार नाही. शरद पवार त्यांच्या पक्षाचे संस्थापक आहेत. वर्षानुलवर्षे लोक त्यांच्यासोबत काम करत आहेत. तसेच 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाकडे शरद पवारांसारखे नेतृत्व हवे आहे. असाही पुनरुच्चार शरद पवारांनी केला.

बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृध्द करा – ज्येष्ठ लेखक डॉ. रतनलाल सोनग्रा: एमआयटी डब्ल्यूपीयूत बुद्ध पौर्णिमा साजरी

पुणे: आजच्या काळात संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे. मनुष्य हा भविष्य व भूत काळाचा विचार करतो परंतू बुद्धांनी वर्तमान काळात सुखी राहण्याचे तत्त्व मांडले. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते. शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. असे उद्गार ज्येष्ठ लेखक डॉ. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, कुलसचिव गणेश पोकळे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
डॉ. रतनलाल सोनग्रा म्हणाले, बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणेची शिकवण दिली.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. त्यांनी संपूर्ण जगासमोर ज्ञानाचे स्वरूप मांडले. त्याच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात आज संपूर्ण जग शांती शोधत आहे. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, बुद्धांचे विचारच जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.एस.एन.पठाण यांनी सांगितले भगवान गौतम बुद्ध हे शांतीदूत म्हणून ओळखले जातात व त्यांनीच जगाला शांतीचे तत्त्व सांगितले.
यावेळी मैत्रेय बुध्द व तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज यांनी बुद्ध जयंती ही शाश्वत असल्याचे सांगितले. डॉ. आर.एम. चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
प्रा. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले.  

अजित पवार गैरहजर का ? पत्रकारांना सतावणाऱ्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

मुंबई-ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे.मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले.एकूणच शरद पवारांच्या मागे बसलेले सर्व चेहरे बदलले आणि तरुणाईत ले होते . हे वेगळे चित्र पत्रकारांना सतावणारे दिसले.मात्र शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही युवा ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं.

या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का?काही लोक येथे आले आहेत, काही गैरहजर आहेत. आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो निर्णय मला कळवला. त्यामुळे येथे कोण आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. शिवाय अजित पवार दिल्लीला गेले, ही माहिती चूक आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाऊ इच्छितात हे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले..

“उत्तराधिकारी निर्माण करेन

शरद पवार म्हणाले, “उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.”“काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राजीनामा मागे घेत शरद पवार म्हणाले,तरुण नेत्यांना वाव दिला पाहिजे .. उत्तराधिकारी निर्माण व्हावा हि इछ्या ..

मुंबई -राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून तेच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी आज (ता. 5) पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर आता शरद पवार आपली ठोस भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.

शरद पवार म्हणाले, मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने मागणी केली होती.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

शरद पवार म्हणाले, मी कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम बघून भारावून गेलो. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणांसह काम करेल. उत्तराधिकारी असावा हे माझे स्पष्ट मत आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो हा निर्णय मी पुनश्च जाहीर करतो.

शरद पवार म्हणाले, माझी नैतिक जबाबदारी होती की, वरिष्ठांना विश्वासात घेणे, पण मी त्यांना विश्वासात घेतले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यास विरोध केला असता. त्यावेळीचा माझा निर्णय योग्य नव्हता या निष्कर्षापर्यंत मी आलो असे मला वाटते.

शरद पवार म्हणाले की, भाकरी फिरवणार होतो पण आता भाकरीच थांबली. मविआला काहीही फरक पडणार नाही. आम्ही एकत्र काम करू. अजित पवार या पत्रकार परिषदेला गैरहजर होते त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, ”इथे कोण आहे कोण नाही याचा वेगळा अर्थ काढू नका. मी फेरविचार करावा हेच सर्वांचे मत होते.” कुणाला जायचे असेल तर मी थांबवू शकत नाही. मात्र अशा परिस्थितीत नेतृत्वाला आघाडीवर राहून काम करावे लागते.

शरद पवार म्हणाले, काम करण्याची संधी द्या ही अनेकांची सूचना आहे. याबाबत आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याच्याशी मला काही घेणे देणे नाही. राहुल गांधी स्वतः बोलले. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत आणि बाकीचे सहकारी राजीनामा मागे घेण्याबाबत बोलले.

शरद पवार म्हणाले, मी माफी मागतो कारण मी कुणाला राजीनाम्याची कल्पना दिली नव्हती. फक्त अजित पवारांनाच याची कल्पना दिली होती. सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार हे खोटे आहे.

शरद पवारांचे निवेदन जसेच्या तसे

दिनांक २ मे २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती…परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.
आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !

(शरद पवार)
5 मे, 2023

अजित पवार, प्रफुल्ल पटेलांना भाजपात जायचे होते; हा डाव हाणून पाडण्यासाठी पवारांचा राजीनाम्याचा ड्रामा- दमानिया

मुंबई-अजित पवार, प्रफुल्ल पटेलांना भाजपमध्ये जायचे होते; पण त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शरद पवारांच्या राजीनाम्याचा ड्रामा केला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, राजकीय निरीक्षणाचा विचार केल्यानंतर आपल्याला कळते की, एखादी व्यक्ती आनंदी आहे की, दुःखी एखादा व्यक्ती आनंदी असेल तर कार्यकर्ते येऊन त्यांना पेढे भरवतात. जितेंद्र आव्हाडांना पेढेही भरवले नाही. त्यांचा चेहराही हसरा नव्हता. ते माध्यमांना न बोलताच निघुन गेले. यावरुनच बरेच काही समजते.

अंजली दमानिया म्हणाल्या, दिसत होते की, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपमध्ये जायचे होते. पण त्यांचा डाव अटकावयचा कसा? हे त्यांनी केलाला एक प्रकारचा मोठा ड्रामा होता. कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या कार्यकर्त्यांसमोर राजीनामा देणे मला गंमतच वाटली.

अंजली दमानिया म्हणाल्या, मुळ मुद्दा असा की, एखादी व्यक्ती अर्थात प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार हे दोघेच पवारांच्या राजीनाम्याला उघड समर्थन करीत होते. दुसरा अध्यक्षाला त्यांची हरकत नव्हती. बाकी मागे बरेच जण म्हणत असतील. त्याच व्यक्तीला प्रस्ताव मांडायला लावला. त्याच व्यक्तींना पत्रकार परिषद घ्यायला लावणे व तोच प्रस्ताव घेवून सिल्व्हर ओकला जाणे हे सर्व मोठे केलेले षडयंत्र आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर अजित पवारांवर गत काही दिवसांपूर्वी ट्वीट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही ट्वीट करुन पुन्हा अजित पवारांना टोला लगावले होते.

पवारांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की, ”अजित पवार हतबल दिसत आहेत, त्यांना पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची खात्री करून घ्यायची आहे. भाजपलाही राष्ट्रवादी हवी आहे पण शरद पवारांशिवाय.” असे ट्वीट करीत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ”भाजप – राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा?”