Home Blog Page 1550

अ‍ॅन इव्हिनिंग वीथ अ‍ॅकॉर्डियन:रंगली सुरेल सायंकाळ

पुणे : प्यार हुआ इकरार हुआ, अजा सनम मधुर चांदनी में हम,  गोरे गोरे ओ बाकी छोरे ,दिल की गिरह मे, बचपन के दिन भूला ना देना, तुझी चाल तुरुतुरु उडते केस भुरुभुरु… अशा हिंदी आणि मराठी संगीताचा सुवर्णकाळ  वादकांनी आपल्या अप्रतिम वादनाने जागा केला. तसेच काही पाश्चात्य फोक संगीतील रचनांसह कलाकारांच्या अकॉर्डियन वादनाने  एक प्रकारे संगीत रसिकांची सायंकाळ सुरेल झाली.
जागतिक अ‍ॅॅकॉर्डियन दिनानिमित्त ‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ अ‍ॅॅकॉर्डियन’ हा अ‍ॅॅकॉर्डियन वादनाचा कार्यक्रम पुण्यातील अकॉर्डियन वादक अमित वैद्य यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कोथरुडमधील बालशिक्षण मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. प्रसाद जोशी, अबुझार मॅनेजर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अमित वैद्य यांसह गजानन नवाथे (पुणे), रवी बेन्ने (बंगळुरु), सागर साठे (मुंबई) यांनी देखील अकॉर्डियन वादन करून रसिकांची मने जिंकले. त्यांना पद्माकर गुजर व विनोद सोनावणे यांनी साथसंगत केली. डॉ. केतकी वैद्य यांनी उत्तम निवेदनाची साथ देऊन कार्यक्रमाची लज्जत वाढवली.
ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे ह्यांचा ही सत्कार करण्यात आला.. त्यानंतर कलाकारांनी अकॉर्डियन वादनाची सुरेल मैफल सुरू केली. अमित वैद्य यांनी श्री ४२० या चित्रपटातील राज कपूर यांचे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आणि बन के पंछी गाये प्यार का तराना ही गाणी सादर करून रसिकांना अकॉर्डियन वादनाची अप्रतिम झलक दाखवली व रसिकांची मने जिंकली. त्यानंतर गजानन नवाथे यांनी ‘बडे हे दिल के काले’ आणि ‘मस्ती भरा है समा’ या गाण्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सागर साठे यांनी ‘गोरे गोरे ओ बाकी छोरे’ आणि ‘दिल की गिरह मे’ या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना बॉलीवूडच्या संगीत सुवर्णकाळाची सफर घडवली. 
रवी बेन्ने यांनी  पोलका या  संगीत प्रकारची धून मधून पाश्चात्त्य फोक संगीताची मजा रसिकांना दिली तर त्यांनी ती पिगाल या फ्रेंच धून मधून युरोपियन संगीताची ही झलक रसिकांना आपल्या अकॉर्डियन वादनातून अतिशय तरलपणे दाखवून दिली.
अबिझार मॅनेजर म्हणाले, संगीत ही कोणतीही मर्यादा नसलेली भाषा आहे. या संगीताचा केवळ रसिकांचे मनोरंजन म्हणून उपयोग न होता देशाच्या आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून सर्वांना एकत्र आणण्यासाठी उपयोग होत आहे. त्यामुळेच संगीतकार आणि वादक हे एक प्रकारे दैवी देणगी लाभलेले आहेत.

‘भवरे की गुंजन है मेरा’, ‘बोले रे कठपुतली डोली’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’ अशा विविध प्रकारच्या अ‍ॅॅकॉर्डियनचा अंतर्भाव असलेली हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील गाणी, पाश्चात्य  लोकसंगीत, अ‍ॅॅकॉर्डियन आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रयोग अशा विविध प्रकारांमध्ये कलाकारांनी अतिशय अप्रतिम सादरीकरण केले.

अदिती काळेला दुहेरी मुकुट

एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा- सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे: अदिती काळे हिने सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. सुधांशू मेडसीकर, होस्टरोयलचे संस्थापक साकेत काळे, ऑल थिंग्ज फिजियोच्या संस्थापिका तेजस्विनी वसवे, रसल नेस्टचे संस्थापक सागर हिरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अदितीने अदिती रोडेला १५-५, १५-३ असे सहज पराभूत केले आणि जेतेपद पटकावले. यानंतर मिश्र दुहेरीत अदितीने ऋतुराज देशपांडेच्या साथीने बाजी मारली. अंतिम फेरीत अदिती-ऋतुराज जोडीने अद्वैत साठे – प्रचिती वालापुरे जोडीला १५-१०, १६-१४ असे नमविले. अदितीला महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचा तिहेरी मुकुट हुकला. प्रचिती वेलापुरे – उन्नती मुनोत जोडीने अदिती काळे-राधिनी भामेरे जोडीवर १५-१० १५-४ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. 
लोकेशला जेतेपद पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लोकेश जुंगडने अथर्व घाणेकरला १६-१४ १०-१५ १८-१६ असे नमविले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत ४२ मिनिटे चालली. 
निकाल – अंतिम फेरी –३० वर्षांवरील पुरुष एकेरी – सुशांत पाटील वि. वि. ओंकार केळकर १५-११,१५-११. ३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – अक्षय गद्रे वि. वि. आनंद साबू १५-८, १४-१६, १५-११.
४० वर्षांवरील पुरुष एकेरी – दिगांत गुप्ता वि. वि. सारंग व्यास १३-१५, १५-५, १५-९.५० वर्षांवरील पुरुष एकेरी – रवी कोळगे वि. वि. एस. कुमार १५-१२, १५-७.
पुरुष दुहेरी – अनिकेत बंडगर – नरेंद्र गोगावले वि. वि. मिहीर रतनजांकर – रोहन जाधव १५-१२, १५-१०.
३० वर्षांवरील पुरुष दुहेरी – अजित उमराणी – हरजितसिंग वि. वि. सचिन मानकर – तुषार बलापुरे १५-१०, १५-१०. 
३५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अक्षय गद्रे – विनीत दबक वि. वि. सचिन मानकर – स्वप्नील मालपाठक ७-१५, १५-१२, १५-६.
४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – स्वप्नील मालपाठक – विनीत दबक वि. वि. आनंद अय्यर – दिनेश गोपानी १५-१२, १५-७.
५० वर्षांवरील पुरुष दुहेरी – केदार टांकसाळे – रवी कोळगे वि. वि. नागेश पालकर – विवेक जबडे १५-११, १५-५.

खुशी, प्रियानी, तेजवीर, कायाला सुवर्णपदक

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन

पुणे : खुशी परदेशी, प्रियानी शिर्के, तेजवीर साहोटा, काया चौधरी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, पुणे बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष रमेश बागवे, नंदकुमार जाधव, माजी नगरसेविका रूपाली पाटील, दिलीप काळोखे, यूके बॉक्सिंग अकॅडमीचे संचालक उमेश खानेकार, पूजा भगत उपस्थित होते. 

या स्पर्धेतील एलिट मुलींच्या ५२ ते ५४ किलो गटाच्या अंतिम फेरीत खुशी परदेशीने अनुराधावर ५-० ने मात केली. यानंतर ५४ ते ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रियानी शिर्केने ऋतुजा रणदिवेवर ४-१ ने विजय मिळवला आणि सुवर्णपदक निश्चित केले. ५७ ते ६० किलो गटात तेजवीर साहोटाने राखी घाडगेला ४-१ ने मात करून सुवर्णयश मिळवले. यानंतर ६० ते ६३ किलो गटाच्या अंतिम फेरीत काया चौधरीने गौरी साकळेला ४-१ ने पराभूत केले.

निकाल : सब – ज्युनियर – ३२ ते ३५ किलो – जिया शेख वि. वि. आइशा शेख.

३५ ते ३७ किलो – सोनिया सूर्यवंशी वि. वि. श्रावणी गायकवाड.

३७ ते ४० किलो – आर्या गर्दे वि. वि. झिनत शेख. ४० ते ४३ किलो – प्रांजल आठवले वि. वि. माही शिंदे.

४३ ते ४६ किलो – सृष्टी दोडमिसे वि. वि. साशा हरपाळे.

४६ ते ४८ किलो – तनिक्षा लोखंडे वि. वि. पूर्वा गाढवे.

ज्युनियर मुली – ४४ ते ४६ किलो – सृष्टी चोरगे वि. वि. अक्षदा जाधव.

४६ ते ४८ किलो – ज्ञानदा जामदर वि. वि. तनिष्का कांबळे.

४८ ते ५० किलो – भूमिका खिलारे वि. वि. रोझ सय्यद.

५० ते ५२ किलो – रिया कुटे वि. वि. एलिझा झोव्हिस

जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे ११ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. ८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ११ मे रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून विशेष लोक अदालतीचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.

या विशेष लोक अदालतीत सन २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे मुख्यत्वे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व त्यांच्या विधिज्ञांनी हजर राहून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गोविंद शिंदे उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर (पुणे) यांनी केले आहे.
***

पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी घेतला नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा

पुणे, दि. 8: पुणे शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश पाटील, श्रमदान मारुती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, नागझरी आजुबाजूला असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी नाल्यातील पाणी गेल्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण आणि स्वच्छता जून महिन्याअखेर पूर्ण करा. नाल्याच्या भोवती असलेली अतिक्रमणे तात्काळ काढण्याची कार्यवाही करा. मान्सून कालावधीत नाल्यातील पाण्यासोबत येणाऱ्या कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करा, अशा सूचना देऊन ते पुढे म्हणाले, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 57 कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.


बाणेर-बालेवाडी पाणी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे, दि. ८: समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा:पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश

पुणे दि. ८: पुणे महापालिकेतील १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण २ हजार ५५३ सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन २०१६ पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी १ हजार ९४३ आहेत. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण ३५० सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या.

महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण १०७ निवृत्तीवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तीवेतन धारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत ७ वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
0000

भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी!

जगातील  सर्व देशांमध्ये ” इंटरनेटचा ”   मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर वाढत आहे. गेल्या काही वर्षात भारतानेही त्यात  मोठी मजल मारली असून  आपण जागतिक पातळीवर इंटरनेट धारकांची ” उप राजधानी” बनत आहोत. मात्र चीन त्यात अद्यापही आघाडीवर असल्याने ते याबाबत जगाची राजधानी बनले आहेत. त्यामुळे भारताबरोबरच जागतिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या क्षमतेचा हा मनोरंजक मागोवा.

भारताची आजची लोकसंख्या 141 कोटींच्या घरात आहे. त्यातील सुमारे 75.9 कोटी लोक किमान एकदा तरी इंटरनेटचा वापर करतात. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ 54 टक्के लोक  कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महिन्यातून एकदा तरी इंटरनेटचा वापर करत आहेत. गेल्या वर्षात म्हणजे २०२२ या वर्षांमध्ये भारतातील इंटरनेट धारकांच्या संख्येत तब्बल दहा टक्के वाढ झाली असून आगामी दोन वर्षात म्हणजे 2025 मध्ये भारतातील 90 कोटी जनता इंटरनेटचा वापर करण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर पाहायला गेले तर  भारतात ज्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे ते लक्षात घेता भारत हा इंटरनेट धारकांची “उपराजधानी” बनत आहे.

भारतापेक्षा आज चीनमध्ये सर्वाधिक इंटरनेट धारकांची संख्या असून ती सध्या 105 कोटींच्या घरात आहे. आपण जसे “गुगल” माध्यम इंटरनेट साठी वापरतो तसेच चीनमध्ये जवळजवळ 82 टक्के लोक त्यांचे “वुईचॅट” चा वापर करतात. चिनी इंटरनेट धारक दररोज साधारणपणे सहा तास २५ मिनीटे इंटरनेटचा वापर करतात. त्याखालोखाल अमेरिकेत 32 कोटी तर इंडोनेशियामध्ये 21 कोटी इंटरनेट धारक आहेत.अन्य देशांमध्ये ब्राझील 18 कोटी, रशिया १३ कोटी ,जपान दहा कोटी, इजिप्त एक कोटी, व्हिएतनाम एक कोटी, मेक्सिको एक कोटी, नायजेरिया 12 कोटी अशी विविध देशातील इंटरनेट धारकांची संख्या आहे.

जगात आज 500 कोटींच्या घरात इंटरनेट धारक आहेत. इंटरनेटच्या माध्यमातूनही विविध सोशल मीडिया हाताळला जातो. त्यात सर्वाधिक वापर फेसबुकचा केला जात असून तीस कोटींपेक्षा जास्त लोक दररोज त्याचा वापर करतात. त्यात 53 टक्के अमेरिकन लोकांचा समावेश आहे.त्या खालोखाल ट्विटर चा वापर केला जातो. त्या खालोखाल यूट्यूबचा वापर करणाऱ्यांची संख्या 25 कोटींच्या घरात असून व्हॉट्सअप चा वापर करणारे वीस कोटी ग्राहक आहेत. इन्स्टाग्रामचेही  जवळपास तेवढेच ग्राहक असून त्यानंतर चीनमधील” वुई चॅट” चा वापर केला जातो. अमेरिकेत दररोज दहा कोटी अमेरिकन फेसबुकचा दररोज वापर करतात.

जगातील वादग्रस्त “ट्विटर” या सोशल मीडियाचा वापर अमेरिकेत सर्वाधिक केला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यात आघाडीवर असून त्यांचे जवळजवळ साडेतेरा कोटी फॉलोअर्स म्हणजे पाठीराखे आहेत. त्या खालोखाल एलन मस्क यांचे 12.7 कोटी पाठीराखे तर जस्टिन बायबर याचे 11 कोटी; कॅटपेरी दहा कोटी; रिहाना एक कोटी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही जवळपास 86 लाख फॉलोअर्स आहेत.

भारतामध्ये इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय)  नावाची संस्था असून त्यांनी कंतार (KANTAR ) या जगातील अग्रगण्य बाजारपेठ संशोधन संस्थेच्या नुकतीच भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची पहाणी केली. हा अहवाल “इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022” म्हणून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये खूप महत्वाचे निष्कर्ष हाती आले आहेते. भारतात  शहरी भागात इंटरनेटचा जास्त वापर केला जातो असे स्पष्ट झाले असले तरीही ग्रामीण भारतामध्ये इंटरनेटचा प्रसार झालेला तेवढ्याच वेगाने होताना दिसत आहे.  शहरी व ग्रामीण भागात इंटरनेट धारकांची संख्येत फार मोठा फरक दिसत नाही.   ग्रामीण भारतामध्ये जवळजवळ 71 टक्के लोकसंख्या म्हणजे 40 कोटी जनता इंटरनेटचा वापर करत आहे आणि त्यात 2022 मध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र शहरी भारतामध्ये इंटरनेट धारकांचा वापर तुलनात्मक रित्या कमी असून सध्या 36 कोटी जनता इंटरनेटचा वापर करत आहे. शहरी भागात साधारणपणे गेल्या वर्षी सहा टक्के वाढ झालेली दिसली. विविध राज्यांचा विचार करता गोव्यामध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे 70 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत असून बिहारमध्ये मात्र केवळ 32 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे.

इंटरनेटचा वापर करण्याऱ्यांमध्ये आजही पुरुषांची संख्या जास्त असून एकूण इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येपैकी  54 टक्के पुरुष इंटरनेटचा सातत्याने वापर करत आहेत. तर 46 टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात. मात्र 2022 या वर्षांमध्ये  महिला वापरकर्त्यांच्या संख्येत  त्यात  57 टक्के वाढ झाल्याचे  लक्षात आले आहे. दोन वर्षांमध्ये महिलांची संख्या 65 टक्क्यांच्या घरात जाईल असा एक अंदाज आहे. त्यामुळे इंटरनेट धारकांच्या एकूण संख्येमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचाही मोठा वाटा असून २०२५ मध्ये महिला वापरकर्त्याची संख्या वाढेल असे अनुमान काढता येईल. इंटरनेटचा वापर विविध उपकरणांच्या माध्यमातून केला जातो. त्यात मोबाईलच्या माध्यमातून सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जात आहे . याशिवाय गेल्या वर्षभरात टॅबलेट किंवा स्ट्रीमिंग डिव्हाइस, स्मार्टफोन किंवा स्मार्ट डिव्हाइस यांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढताना दिसत आहे. डिजिटल एंटरटेनमेंट ,डिजिटल कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया या सर्व क्षेत्रांमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. किंबहुना सोशल मीडियाच्या क्षेत्रात गेल्या वर्षात त्यात 51 टक्के वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातही गेल्या वर्षभरात 13 टक्के वाढ झाली असून सध्या भारतात 33.8 कोटी लोकसंख्या त्याचा वापर करीत असून यातील 36 टक्के लोक  ग्रामीण भारतातील आहेत. डिजीटल पेमेंटमध्ये “यूपीआय ” च्या माध्यमातून जवळजवळ ९९ टक्के धारक  डिजिटल पेमेंट करताना दिसत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून ई-कॉमर्स करण्याचे प्रमाणही भारतात चांगल्या प्रमाणावर वाढत आहे.

जागतिक पातळीवरच एकंदरीत इंटरनेटच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाचा वापर सातत्याने वाढत आहे. चीन अमेरिका यांच्या जोडीने आता भारतानेही त्यात मोठ्या प्रमाणावर मजल मारलेली आहे.

लेखक:प्रा.नंदकुमार काकीर्डे

*(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

‘ अनुभूती ‘ भरतनाट्यम सादरीकरणाला चांगला प्रतिसाद !

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ अनुभूती ‘ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ ओजस, पुणे ‘ यांनी आयोजन केले होते .
कार्यक्रमामध्ये डॉ. अपूर्वा जयरामन ( चेन्नई ) यांनी भरतनाट्यम नृत्यप्रकारात प्रभावी एकल ( सोलो ) सादरीकरण केले.भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. डॉ. अपूर्वा जयरामन यांनी प्रारंभी कृष्णस्तुती, अंबा कामाक्षी स्वरजती वर आधारित नृत्यरचना प्रस्तुत केल्या. प्रेक्षकांनी या रचनांना मोठा प्रतिसाद दिल्या.’ ठुमक चलत रामचंद्र ‘ या भजनावर आधारित नृत्य प्रस्तुतीही लक्षवेधी ठरली. ‘अहल्या ‘ उद्धारावर आधारित नृत्यरचनेने उपस्थितांची वाहवा मिळवली. संत सोयराबाई यांच्या ‘ अवघा रंग एक झाला ‘ या अभंगावरील नृत्य प्रस्तुतीने त्यांनी समारोप केला.

डॉ.परिमल फडके, तमन्ना नायर , अथर्व चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. अश्वीनी चौधरी यांनी आभार मानले.

पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाला स्थगिती:विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना दिले स्पष्ट निर्देश


पुणे महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पातील त्रुटीबाबत (NEERI) सारख्या संस्थेकडून प्रकल्पाचे आघात परीक्षण व इतर पर्यावरण विषयक काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सर्व पक्षीय राजकीय नेते, नागरिक यांची मते विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नगरविकास व पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिवांना, पुणे महापालिका आयुक्तांना निर्देश

पुणे : पुणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पर्यावरण निसर्ग अभ्यासक नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. याबाबत लक्ष घालण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारकडे निवेदन दिले आहे. नगरविकास विभागाच्या सचिव आणि महापालिका आयुक्तांना याबाबत त्यांनी आज पत्र दिले आहे.

यामध्ये महापालिकेच्या नदिसुधार प्रकल्पात अनेक गोष्टींची कमतरता आढळते.
पुणे महापालिकेने साबरमती माँडेल अंगिकारले असल्याने नदी वाहती न रहाता तिचे डोहात रुपांतर होणार आहे. त्यामुळे पाण्यातील प्रदूषण वाढणार आहे. जलपर्णी सारख्या व शैवालांच्या वाढीस वाव मिळून पाण्याचा दर्जा खराब होणार आहे. यातही नदीपात्राची रुंदी कमी झाल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी इतस्ततः पसरुन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, या ठळक मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
आपल्या निवेदनात त्यांनीं पुढील मुद्द्यांवर भर दिला आहे.
१. पुणे शहराच्या विविध भागातून नदीत येणारे मैलापाणी प्रक्रिया करून चांगले पाणी नदीपात्रात सोडा व नंतरच नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घ्या. यामुळे जलप्रदूषण कमी होईल.
२. नदीकाठ सुधार प्रकल्पांअंतर्गत नदी पात्रातील पूल पाडण्यात येणार असून रस्तेही बंद करण्यात येणार असल्याने निर्माण होणार्‍या वाहतुकीच्या गंभीर समस्येवरून नागरिकांचाही रोष आहे. यावर योग्य उपाय काढण्याची आवश्यकता आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी पुण्यातील अंदाजे ६००० किंवा त्यापेक्षाही जास्त झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याचे देखील समजत आहे.

३. नीरी (NEERI) सारख्या संस्थेकडून प्रकल्पाचे संभाव्य पर्यावरण आघात परिक्षण करण्यात यावे.

४. पर्यावरण विषयक काम करणाऱ्या, या विषयात पुढाकार घेणाऱ्या इतर सामाजिक संस्थांची, सामाजिक कार्यकर्ते यांची मते विचारात घेण्यात यावीत.

५. महानगरपालिकेच्या सर्व राजकीय पक्षीय नेत्यांची आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची याविषयी बैठक घेऊन त्यांचे मतही विचारात घेण्यात यावे. त्यामुळे लोकसहभाग वाढू शकेल. यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात यावा.

६. त्यानंतर जनसुनावणी घेऊन नंतरच या प्रकल्पास सुरुवात करावी. तोपर्यंत या प्रकल्पासाठी कोणतीही प्रकारची वृक्षतोड होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.

सुबोध भावे, मधुरा वेलणकर दिसणार ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ मध्ये!!

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.या शॉर्टफिल्म मध्ये अनिरुद्ध देवधर आणि गंगुबाई फेम सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या फिल्मचं लेखन केल आहे आणि ऍड-फिल्म मेकर वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.

कॉटनकिंग नेहमीच दर्जेदार शॉर्ट फिल्मद्वारे संवेदनशील विषय मांडत आला आहे. अत्यंत चमत्कारिक असं नाव असलेल्या या त्यांच्या नव्या शॉर्टफिल्मsaathi सुबोध भावे आणि मधुरा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत

“सासूबाई जोरात’२६ मे पासून

संदीप पाठक, सयाजी शिंदे, मोहन जोशी, विजय पाटकर यांच्या प्रमुख भूमिका

  • सिद्धार्थ प्रभाकर ढगे दिग्दर्शित चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

“सासुबाई जोरात” ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.

संरक्षण राज्य मंत्र्यांनी सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात तांत्रिक संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे केले उद्घाटन

सुरळीत कामकाजासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी एक सॉफ्टवेअर केले लाँच; बीआरओ आणि जीआरएसईने स्वदेशी श्रेणी 70R डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 7 मे 2023

सीमा रस्ते संघटना (BRO) ने 07 मे 2023 रोजी देशभरातील सर्व केंद्रांमध्ये आपला 64 वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पुण्यातील सीमा रस्ते संघटना शाळा आणि केंद्रात मुख्य अभियंते आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमात उपस्थित होते. स्थापना दिवसानिमित्त, संरक्षण राज्य मंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील केंद्राच्या आवारात बीआरओ तांत्रिक प्रशिक्षण संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे उद्घाटन झाले. या सुविधांमुळे सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण दर्जा सुधारेल आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होण्यास मदत होईल.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केलेले बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरही यावेळी लॉन्च करण्यात आले. बीआरओ च्या कामकाजाचे विविध पैलू स्वयंचलित करण्यासाठी तसेच सुरळीत आणि जलद काम व्हावे यासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट बुक आणि वर्क मॅनेजमेंट सिस्टीम हे तीनही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहेत.

याशिवाय, स्वदेशी वर्ग 70R डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी बीआरओ आणि जीआरएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हे पूल सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन तयारीला चालना देण्यासाठी मदत करतील.

एक संस्था म्हणून उत्तरोत्तर विकास साधण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने ‘बीआरओ व्हिजन@2047’ वरील मोनोग्राफसह अनेक दस्तऐवजांची संकल्पना केली आहे. यामध्ये, रस्त्यालगतच्या घोषवाक्यांचे संकलन; वैद्यकीय आस्थापनांची सुधारणा आणि मानकीकरण; बीआरओ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रहांच्या वापरासह संरक्षण उत्कृष्टतेसाठीच्या (iDEX) नवकल्पनांची गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आणि पुलांची रचना तसेच समस्या समाधान यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क संचालनालयाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘सैनिक समाचार’ या पाक्षिकाच्या विशेष बीआरओ आवृत्तीचे देखील संरक्षण राज्यमंत्र्यांनी प्रकाशन केले. या आवृत्तीमध्ये बीआरओच्या आजवरच्या कामगिरींची माहिती, निर्माणाधीन प्रकल्प आणि बीआरओ चा इतिहास प्रकाशित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी 10 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेल्या ‘एकता अवाम श्रद्धांजली अभियान’ या मोहिमेला झेंडा दाखविला. या साहसी-जागरूकता मोहिमेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या सर्व घटकांना एकत्र आणण्यात आले होते. मोटार-सायकल आणि चार-चाकी वाहनांचा समावेश असलेल्या या मोहिमेमध्ये विविध सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील टीमनी मातीचे नमुने, नद्या/तलाव/जलसाठे आणि स्थानिक रोपे यांचे नमुने गोळा केले. भट्ट आणि इतरांनी बीआरओ शाळा आणि केंद्रात रोपांची लागवड केली.

बीआरओच्या सर्व श्रेणींतील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कठोर परिश्रमाची अजय भट्ट यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली. बीआरओच्या जवानांनी बांधलेले रस्ते, पूल आणि बोगद्यांमुळे केवळ सशस्त्र दलांची सज्जता वाढली नाही तर सीमावर्ती भागांचा सामाजिक-आर्थिक विकास व्हायलाही मदत झाली आहे, असे ते म्हणाले. सेला बोगदा आणि नेचिफू बोगदा प्रकल्पातील लक्षणीय प्रगतीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारत अभूतपूर्व वेगाने प्रगती करत आहे, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले. “आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि अनेक देशांना आपण लष्करी उपकरणे निर्यात करत आहोत. हा नवभारत मजबूत आहे आणि स्वतःचे हित जपण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणापुढे झुकत नाही आणि झुकणार नाही”, असे ते म्हणाले.

सर्व पदांवर जोमाने आणि समर्पणाने काम सुरू ठेवण्याचे आवाहन बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी केले. ‘आम्ही एक तर मार्ग शोधू किंवा एक नवीन मार्ग तयार करू’ या मंत्राच्या अनुषंगाने बीआरओ उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीआरओ 60 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून या संघटनेने भारताच्या सीमेवर तसेच भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानसह परदेशी मित्र देशांमध्ये 61,000 किलोमीटरहून अधिक रस्ते, 900 हून अधिक पूल, चार बोगदे आणि 19 हवाई क्षेत्रे बांधली आहेत.

2022-23 मध्ये बीआरओने 103 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले. एका वर्षात या संस्थेने बांधलेले हे  सर्वात जास्त प्रकल्प आहेत. यामध्ये पूर्व लडाखमधील श्योक ब्रिज आणि अरुणाचल प्रदेशमधील अलोंग-यिंकिओंग रोडवरील लोड क्लास 70 च्या स्टील आर्क सियोम ब्रिजच्या बांधकामाचा समावेश आहे. हे आणि यासारखे इतर धोरणात्मक महत्त्वाचे प्रकल्प संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्राला समर्पित केले आहेत.

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३.२० लाख रुपयंपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मंजुरीपत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरीपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरीपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरुन स्थळपाहणी करण्याच्या सूचना कर्जवितरण अधिकारी व कर्जवसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. दस्तऐवजांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्दतीने कर्ज परतफेडीसंदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.

योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मे २०२३ पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेअंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 हजार 553 प्रस्ताव जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहे. यामध्ये मुंबईतून 4 अर्ज, ठाणे 1, रायगड 2, पुणे 84, सोलापूर 44, सातारा 12, सांगली 10, कोल्हापूर 102, नाशिक 7, नंदुरबार 15, धुळे 29, जळगाव 101, अहमदनगर 42, औरंगाबाद 96, परभणी 173, बीड 215, लातूर 53, जालना 82, हिंगोली 43, नांदेड 9, उस्मानाबाद 61, अमरावती 18, वाशिम 54, बुलढाणा 157, यवतमाळ 97, अकोला 27, नागपूर १३ तर वर्धा जिल्ह्यातून 2 अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत

मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे,तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ..म्हणाले मुरलीधर मोहोळ

आदित्य ठाकरे यांच्या बालभारती-पौडफाटा रस्त्याबाबतच्या भूमिकेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका…

पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही !

पुणे – टेकड्या ,नद्या ,नाले आणि एकूणच निसर्गाबद्दल काळजी घ्या,विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस करू नका असे सांगत पुण्यात वेताळ टेकडी ला शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी भेट दिल्यावर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरेंना टीकेचे लक्ष्य करत म्हटले आहे कि,’आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला.पर्यावरणाचं रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे.

मोहोळ यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’आदित्यजी, मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ.पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय? केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत.