Home Blog Page 1549

पक्षांच्या अधिवासासाठी ‘फर्ग्युसन’ समृद्ध

शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयातील जैववैविध्याने समृद्ध परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या 88 प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून पुढे आली.

दरवर्षी ‘ग्लोबल ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमातून सभोवतालच्या परिसरातील पक्षी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद केली जाते. फर्ग्युसनमध्ये या उपक्रमाअंतर्गत 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पक्षी निरीक्षण करण्यात आले. ही माहिती www.ebird.org या ॲपवर अपलोड करण्यात आली. महाविद्यालयातील 140 प्रशिक्षीत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फर्ग्युसनच्या आवारात विविध 15 ठिकाणी सकाळी 5.30 ते रात्री 7.30 या वेळेत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि गटा-गटाने निरीक्षण केले. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 मिनिटांची 1400 निरीक्षणे ॲपवर नोंदविली. त्यासाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला.
कावळे, कबुतर, मैना, घारी, बुलबुल, कोकीळ, पोपट, घुबड, पिंगळा, राखी धनेश या स्थानिक पक्षांसह सरडामार गरूड, निळी माशीमार, लाला छातीचा माशीमार, लाल कंठाचा माशीमार, हिरवट वटवट्या, मुकुटधारी पर्णवटवट्या, कृष्ण थिरथिरा, करड्या डोक्याची मैना या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाची गरज असणाऱ्या स्थलांतरीत पक्षांची नोंद करण्यात आली. बहुसंख्य स्थलांतरीत पक्षी दरवर्षी हिवाळ्यात हिमालयातून येत असतात.

वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे
· विविध 88 पक्षांच्या प्रजाती
· निळी माशीमार या जंगलात आढळणाऱ्या पक्षाने शहरात अधिवास केला.
· लाल फुलांच्या काटेसावर झाडावर करड्या डोक्याची मैना आढळली.
· दोन हजार पोपटांचा थवा


पुणे शहरातील टेकड्या हे गवताळ प्रदेश होते. या ठिकाणी बोरबाभूळ अशी वृक्षसंपदा होती. कालांतराने या टेकड्यांवर ग्लिसरिडीया, निलगिरी, सुबाभूळ अशी वृक्ष लागवड करण्यात आली. फर्ग्युसन परिसरातील टेकड्यांवरही हे बदल झाले. या बदलांसह या परिसरातील वृक्षसंपदा, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक वाटते.

प्रा. आविष्कार मुंजे, फर्ग्युसन महाविद्यालय

पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय नेते, भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढण्याची क्षमता असलेले नेते-शरद पवारांना पटोलेंचे उत्तर

कर्नाटकात ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार.

सातारा दि. ९ मे २०२३
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने त्यांनी केरला स्टोरी चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपाच्या अशा कोणत्याच भुलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. काश्मीर फाईल्स चित्रपटाचे भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केले. ते सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले आहेत. मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता आहे पण तेथे दोन जनसमुदायात मोठा संघर्ष पेटला आहे. मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री मात्र कर्नाटकात मताचा जोगवा मागत फिरत आहेत. भाजपाने बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न केला पण भाजपाचा तो मुद्दाही कर्नाटकात चालला नाही. बजरंग बलीचा आशिर्वाद काँग्रेसबरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार आहे, त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपावर येणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार आहे.

भारतीय जनता पक्ष खोटारडा पक्ष असून ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील विधानसभा निवडणुक निकालानंतर कर्नाटमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मध्यप्रदेश मध्येही काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. परंतु जनतेचा कौल भाजपा मान्य करत नाही, त्यांच्याजवळ सीबीआय, ईडी सारख्या सरकारी यंत्रणा आहेत. या सरकारी यंत्रणांचा मोदी सरकार सत्तेसाठी दुरुपयोग करत असते हे देशातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खरेदी करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. कर्नाटकात मात्र यावेळी भाजपाच्या ४० टक्के कमीशनवाल्या सरकारला घरी बसवण्याचा निर्णय कर्नाटकच्या जनतेने घेतल्याचे दिसत आहे.

पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय नेते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. कोणाच्या पक्षात काय चालले आहे हे पहाणे आमचे काम नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

लोकांना त्रास कशाला देता? सरळ सरळ ४० टक्के कपात करून बिले पाठवा …मिळकतकरधारकात संताप

लोकांची कामे वाढवून ठेवण्याचा प्रशासकीय प्रताप

पुणे- मिळकत करात पूर्वी असलेली आणि नंतर काढून घेतलेली ४० टक्के सवलत पुन्हा सुरु करताना प्रशासकीय कुत्तरओढीत नागरिकांना खेचून त्रास देण्याचा धंदा कशाला करता ? सरळ सरळ ४० टक्के कपात करूनच बिले पाठवा असा नागरी सूर असताना महापालिकेने कागदपत्रांची , विनवणी अर्जांची वाकडी तिकडी वाट करत उपकाराची जाणीव करून देण्याचे काम सुरु केल्याने नागरिकात रोष पसरला आहे.

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या चुकीमुळे घरमालक स्वत: वापर करत असलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेत सुमारे लाख मिळकतींना फरकाच्या रकमेची देयके पाठविण्यात आली. मात्र, आता ही सवलत पूर्ववत करण्यासाठी आणि मिळकतधारकांनी भरलेली फरकाची रक्कम पुन्हा मिळविण्यासाठी मिळकतधारकांना पीटी-३ अर्ज भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी २५ रुपयांचे चलन भरावे लागणार असून त्याचा भुर्दंड मिळकतधारकांना सहन करावा लागणार आहे. अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाइन नसल्याने क्षेत्रीय कार्यालयाचे, नागरी सुविधा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.

घरमालक स्वत: वापर करत असलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यापूर्वी वाढीव देयके पाठविलेल्या मिळकतधारकांना सवलत पूर्ववत मिळविण्यासाठी आवश्यक अर्जांचे वितरण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. महापालिकेची संपर्क कार्यालये, क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र तसेच पेठ निरीक्षक आणि विभागीय निरीक्षक कार्यालयातून हा अर्ज मिळकतधारकांना घेता येणार आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या ज्या निवासी मिळकतींना ४० टक्के सवलत देण्यात आली आहे, त्या मिळकतधारकांना अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवासी आणि बिगरनिवासी मिळकतींना १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून दहा टक्के वजावट देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून करण्यात येणार आहे. नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४० टक्के सवलत न देता १ एप्रिल २०१९ पासून पुढे झाली आहे. त्या सर्व मिळकतींना आणि ज्या मिळकतींची ४० टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०१८ पासून काढून घेण्यात आली आहे, अशा मिळकतींना महापालिकेकडून फरकाच्या रकमेची देयके पाठविण्यात आली होती. या सर्व मिळकतींना १ एप्रिल २०२३ पासून सवलतीचा लाभ मिळणार आहे.

१५ नोव्हेंबरपर्यंत पीटी-३ हा अर्ज महापालिकेकडे दाखल न केल्यास मिळकतधारक मिळकतीचा स्वत: वापर करत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतींची सवलत रद्द करण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल केलेल्या मिळकतधारकांना चार समान हप्त्यामध्ये फरकाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या चुकीमुळे शहरातील एक लाख मिळकतधारकांना फरकाच्या रकमेची देयके पाठविण्यात आली होती. यातील बहुतांश मिळकतधारकांनी फरकाची रक्कम एकरकमी भरली होती. चलन भरण्याची रक्कम किरकोळ असली तरी, महापालिकेच्या चुकीची शिक्षा मिळकतधारकांना का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच अर्ज भरण्यासाठीची सुविधा ऑनलाइन नसल्याने क्षेत्रीय कार्यालये, मुख्य भवन, नागरी सुविधा केंद्राचे उंबरठे अर्ज दाखल करण्यासाठी झिजवावे लागणार आहेत.

महापालिकेची संपर्क कार्यालये, क्षेत्रीय कायार्लय, मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र तसेच पेठ निरीक्षक आणि विभागीय निरीक्षक कार्यालयातून हा अर्ज मिळकतधारकांना घेता येणार असून propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्जासमवेत काही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यामध्ये मिळकतीचा वापर स्वत: राहण्यासाठी करत असल्याबाबत सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅसकार्ड, शिधापत्रिका तसेच शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या देयकाची प्रत अर्जासोबत पंचवीस रुपयांचे चलन भरून जोडावी लागणार आहे. पेठ निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांकडून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर प्रकरण अंतिम करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या निर्णयानुसार चलनापोटी २५ रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मोठी नाही. ऑनलाइन सुविधा दिल्यावर कागदपत्रे नीट जोडली न जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळकतधारक प्रत्यक्ष कागदपत्रांसह आल्यास ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.

 – अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी आणि कर संकलन विभाग

डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश

पुणे-

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले.कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. त्यामुळे कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावेळी झालेल्या सुनावणीनंतर विशेष न्यायधीश एस. आर. नावंदर यांनी कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- रॉ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली माहिती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटाॅप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.

१६ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित,आणखी ७१ हजार थकबाकीदारांची होणार बत्ती गुल

तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्यावर कारवाई

पुणे, दि. ९ मे २०२३: पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.

पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ८७ हजार ५११ वीजग्राहकांनी तीन महिन्यांत एकही वीजबिल भरलेले नाही व त्यांच्याकडे ४२ कोटी ६३ लाख रूपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. वारंवार आवाहन किंवा विनंती करूनही ज्या ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम गेल्या एप्रिल महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये १३ कोटी ३७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आतापर्यंत १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २९ कोटी २८ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे.

पुणे शहरात तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक २६ हजार ७९६ ग्राहकांकडे ११ कोटी ८१ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा ४ कोटी ७१ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर उर्वरित २० हजार २६० ग्राहकांनी थकीत ७ कोटी १२ लाख रूपयांचा ताबडतोब भरणा न केल्यास त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १६ हजार ३०० ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यांपासून १० कोटी ९१ लाख थकीत बिलांचा भरणा केलेला नाही. आतापर्यंत तीन हजार २०९ वीजग्राहकांचा ३ कोटी ५० लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर आणखी १३ हजार ९१ ग्राहकांकडे ७ कोटी ४१ लाखांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ४४ हजार ४१५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी १९ कोटी ९१ लाख रूपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला नाही. त्यातील ६ हजार ६६९ ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी १६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर उर्वरित ३७ हजार ७४७ वीजग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाखांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून अटक,पाकिस्तानी रेंजर्सने पहा कसे नेले ओढत ..

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) ने ट्वीट कर कहा, “पाकिस्तान रेंजर्स ने पीटीआई के अध्यक्ष इमरान खान का अपहरण कर लिया।” (वीडियो सोर्स: पीटीआई का ट्विटर हैंडल।)

इस्लामाबाद-पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दलाने अटक केली. इम्रान खान 2 प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते.

एका प्रत्यक्षदर्शीने पाकिस्तानचे वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली. दार चिलखती वाहनांनी अडवण्यात आले आणि काही वेळातच इम्रान यांना पकडून बाहेर आणण्यात आले.

अलीकडेच इम्रान खान यांनी इंटेलिजन्सच्या उच्च अधिकार्‍यांवर आरोप केला होता की त्यांनी वजिराबादमध्ये आपल्याला ठार मारण्याचा कट रचला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर इम्रान यांनी आज एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोपांची पुनरावृत्ती केली. याच्या 4 तासांनंतर त्यांना न्यायालयातून अटक करण्यात आली.

गिरफ्तारी से पहले पाकिस्तान के पूर्व प्रधानमंत्री और पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) प्रमुख इमरान खान ने कहा, “मुझ पर कोई मामला नहीं है। वे मुझे जेल में डालना चाहते हैं, मैं इसके लिए तैयार हूं।” (वीडियो सोर्स: इमरान खान का ट्विटर हैंडल।) पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) ने दावा किया है कि गिरफ्तार किए जाने के दौरान इमरान खान को पाकिस्तानी रेंजर्स ने धक्का दिया था जिससे वे घायल हो गए।

हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी विचारले- त्यांना का आणि कोणत्या प्रकरणात अटक केली?

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांना अटक केल्यानंतर 15 मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले की, पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत, तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की, इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली?

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. ही विद्यापीठाशी संबंधित केस आहे. इम्रान यांनी पंतप्रधान असताना या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी केला आहे.

अटकेचा धाक दाखवून इम्रान आणि त्यांच्या पत्नीने कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर रियाझ आणि त्याच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाझ यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी त्यांच्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहेत. यावर रियाझ म्हणतात की, तिने जर सर्वकाही केले तर तिला पाच कॅरेटची अंगठी द्या.’

विशेष बाब म्हणजे अल कादिर विद्यापीठात केवळ दोन विश्वस्त आहेत. इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षांत केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 असे आहेत, ज्यात त्यांची अटक निश्चित आहे. यामुळेच खान यापैकी कोणत्याही प्रकरणात कोर्टात हजर राहत नाहीत.

पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉनने वृत्त दिले आहे की, इम्रान यांच्या पक्ष पीटीआयने अटकेला दुजोरा दिला आहे. पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले- इम्रान खान यांच्यावर सध्या अत्याचार होत आहेत. ते खान साहेबांना मारत आहेत. इम्रान यांच्या वकिलाचा व्हिडिओही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. पक्षाने म्हटले आहे की, इम्रान यांना उच्च न्यायालयाबाहेर बेदम मारहाण करण्यात आली.

इम्रान यांना लष्कराशी वैर महागात

2018 मध्ये इम्रान खान यांना लष्करानेच पंतप्रधान बनवले होते. नंतर आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या बदलीवरून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर लष्कराने शाहबाज शरीफ यांची बाजू घेत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान यांचे सरकार पाडले होते.

यानंतर खान यांनी लष्कराविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. त्यांनी बाजवा यांना देशद्रोही म्हटले. रविवारी एका सभेत खान यांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकारी फैसल नसीर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला.

सोमवारी लष्कराच्या मीडिया शाखेने एक व्हिडिओ जारी केला. त्यात म्हटले की- खान चुकीचे आरोप करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यानंतर इम्रान खान यांनी मंगळवारी इस्लामाबाद हायकोर्टातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एक व्हिडिओ जारी केला. म्हणाले- पाकिस्तान फक्त लष्कराचा नाही. मी सत्य सांगितले आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने मला मारण्याचा दोनदा कट रचला आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. यानंतर त्यांनी लगेचच उच्च न्यायालयात धाव घेतली. येथेच पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना अटक केली.

कात्रजच्या पेशवेकालीन धरणातील पाण्यावर डास प्रतिबंधक औषधांची ड्रोनने फवारणी

पुणे- कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या लगत असलेल्या डासांचे उत्पत्ती स्थान झालेल्या पेशवेकालीन धरणातील पाण्यावरील जलपर्णीने व्यापलेल्या भागात महापालिकेने ड्रोनद्वारे डास प्रतिबंधक औषध फवारण्यात आले..हा प्रयोग प्रायोगिक प्रथमच तत्त्वावर करण्यात आला.

या प्राणी संग्रहालय येथेच सुमारे 50 ते 55 एकरात तलाव विस्तारला असून तलावाच्या अर्थात पेशवेकालीन धरणाच्या लगतचे नैसर्गिक जंगल नाहीसे होऊन आता चारही बाजूने नागरी वस्ती,वसली आहे.कात्रज तलावातील पाणी कमी झाल्याने जलपर्णी तळाला गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. याचा त्रास चारही बाजूला असलेल्या लोकवस्तीला सहन करावा लागत आहे. विशेषतः लेक टाऊन सोसायटी, गंगा ओशन पार्क सोसायटी, पद्‌मजा सोसायटी, कात्रज गावठाण व सोसायट्यांना मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

तलावाच्या बाजूने डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली जात होती. मात्र, तलावाच्या मध्यभागी जलपर्णीमुळे पोहचता येत नव्हते. यामुळे शहरात प्रायोगिक तत्वावर प्रथमच ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. या औषध फवारणीनंतर डासांचा प्रादूर्भाव कमी झाल्यास शहरातील इतर ठिकाणीही ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रयोगाची अमंबलबजवणी होऊ शकते, आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले की, या बायोलॉजिकल औषधामुळे तलावातील जीव जंतूंना कोणताही धोका उत्पन्न न होता मात्र डासांच्या आळ्या या पूर्णपणे नष्ट होतील. ड्रोनमध्ये 10 लिटर बायोलॉजिकल औषधाचे मिश्रण असलेली क्षमतेची टाकी बसविण्यात आली आहे, त्याद्वारे तलावाच्या मध्यभागी जाऊन औषध फवारणी करण्यात आली.

कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलावातील जलपर्णी मनपा पर्यावरण विभागाकडून काढली जात आहे. डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी किनाऱ्याच्या भागात औषध फवारणी केली जात होती. तलावच्या मध्यभागी ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली असून पुढील दहा-पंधरा दिवसांत परिणाम तपासून पुढील धोरण ठरविण्यात येईल.
-डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख मनपा

दिवे घाटात टँकर उलटून दोघांचा मृत्यू; चौघे जण जखमी

पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले. कच्च्या अल्कोहोलची वाहतूक करणारा दिवे घाटात उलटला. टँकरने दिवे घाटातून निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. टँकर पलटल्यानंतर त्यात दोघे जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेेतली. केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. अपघातात चौघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईत पुण्यातील एकावर ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

पुणे-ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचालनालयाने (ED) पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी झेड. एस. पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तपास केला . पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

ईडीने फेमा कायद्यातील तरतुदींनुसार, पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊसमधून ४१.६४ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.जवरेह सोली पुनावाला हे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

पनामा पेपर्स काय आहे?

कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेजवळील पनामा या देशात पैशाचा फेरफार करण्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींसह सेलेब्रिटींनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला. जगभरातील शोधपत्रकारांनी एकत्र येत पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे उजेडात आणली. 2016 साली उघड झालेल्या कागदपत्रांत जगातील अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली. ज्यामध्ये 500 भारतीयांचाही समावेश होता.

याबाबतची चौकशी करण्यासाठी भारत सरकाकडून मल्टी एजन्सी गृपची (MSG) स्थापना करण्यात आली. ज्याद्वारे उघड झालेल्या गैरव्यवहारातील 426 व्यक्तींची चौकशी चालू आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्यामुळेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शऱीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केला होता. 

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागला होता.जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.

बेरोजगार पतीला पत्नीकडूनच 50 हजारांची पोटगी:दोघांच्या सहमतीने न्यायालयाची घटस्फोटाला मंजूरी

पुणे:नोकरी नसलेल्या पतीला पत्नीने 50 हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य करत घटस्फोट घेतल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. पती-पत्नीने सहमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा हा दावा न्यायालयाने निकाली काढला आहे.

सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी युक्तिवाद केला.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, उच्चशिक्षित जोडप्याचा 2018 मध्ये विवाह झाला होता. मात्र एकमेकांसोबत पटत नसल्याने दोघेही 2020 पासून विभक्त राहत होते. यापैकी पती हा बीटेक तर पत्नी एमटेक झालेली होती. पत्नी ही एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करते.

पत्नीचे खोटे प्रतिज्ञापत्र निदर्शनास

पत्नीनेच पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर न्यायालयाने पोटगीचा आदेश दिला होता. मात्र पत्नीने पोटगीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे पतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत तक्रार केली. आपल्याला नोकरी नसल्याने पत्नीनेच पोटगी देण्याची मागणी पतीने केली. यानंतर न्यायालयाने तडजोडीने दावा निकाली काढण्याबाबत विचारणा केल्यावर दोघांनी त्याला तयारी दाखवली. तर पत्नीने पोटगी देण्यास सहमती दर्शवली.

मल्लखांब खेळाची लोकप्रियता अमेरिकेत सर्वदूर पोहचवण्याचा मानस

मल्लखांब प्रसाराकरिता मुख्य प्रशिक्षक चिन्मय पाटणकर यांनी दीर्घकालीन योजनेची माहिती

मुंबई, 8 मे: अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे.

इतकंच नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी तिथल्या संस्था तसेच विविध राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि सदिच्छादूत यांच्याकडून पुष्टी आणि शिफारस पत्रे मिळणे अपेक्षित आहे.

चिन्मय पाटणकर आणि नामदेव शिरगावकर (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन) यांच्यासमवेत पत्रकार परिषदेचे व्यासपीठ सामायिक करणारे अभिनेता आणि निर्माता राकेश बापट यांनी 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ बनविण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद घेतले.

सध्या महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघाच्या सहकार्याने काम करत आहे, निश्चितपणे अमेरिकन मल्लखांब महासंघाकडे भविष्यात चढाई करण्यासाठी एक ध्येय आहे. या संदर्भात, महाराष्ट्र ऑलम्पिक महासंघाने आपला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे, असा विश्वास महाराष्ट्र ऑलम्पिक महासंघाचे अध्यक्ष अजित पवार दिला आहे.

“महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघ मल्लखांबसारख्या मूळ भारतीय खेळांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला ऑलिम्पिक चळवळीचा एक भाग बनविण्यासाठी वचनबद्ध आहे. मल्लखांब हा आपल्या राष्ट्रीय खेळांचा अविभाज्य भाग आहे आणि भारतीयांसाठी सुदृढ जीवनशैलीचा भाग आहे. आम्हाला आमच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जागतिकीकरण करताना खूप आनंद आणि अभिमान वाटेल. जेणेकरून, जगाला त्याचे फायदे मिळू शकतील आणि त्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.

मल्लखांबला केवळ एक प्रदर्शनात्मक खेळ म्हणून ओळखण्याचा नाही तर तो ऑलिम्पिकमध्ये कायमस्वरूपी स्थान बनवण्याचा आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघाचा प्रयत्न आहे. आम्हाला आशा आहे की, हा उपक्रम फलदायी ठरेल आणि आम्हाला आमच्या गंतव्यस्थानापर्यंत नेईल,” असे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार म्हणाले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर म्हणाले की, “महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना मल्लखांबला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी कटिबद्ध आहे. हा आपला पारंपारिक खेळ आहे आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी त्याचा सराव करून तो लोकप्रिय केला पाहिजे. ऑलिम्पिकच्या मार्गावर आशियाई क्रीडा स्पर्धा , राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांसारख्या सर्व स्पर्धांमध्ये मल्लखांबला प्रदर्शित करण्याचे आमचे ध्येय असले पाहिजे.”

चिन्मय पाटणकर (मुख्य प्रशिक्षक, अमेरिका) यांनी म्हटल्याप्रमाणे, महासंघाला मल्लखांब खेळाचा प्रसार करण्यासाठी प्रशिक्षकांची गरज आहे.

2013 मध्ये चिन्मय पाटणकर यांनी आपल्या घरच्या अंगणात मल्लखांबाच्या प्रसाराला सुरुवात केली. अवघ्या 3000 अमेरिकन डॉलर्सच्या सहाय्याने मल्लखांबाला सुरुवात केली. अमेरिकन मल्लखांब महासंघ अमेरिकेतील सर्व 52 राज्यांमध्ये पसरविण्याचे उद्दिष्ट ठेवते. त्या हेतूसाठी, पाटणकर यांनी आधीच लहान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ज्यासाठी त्यांनी तयारी केली आहे.

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मल्लखांब संदेश प्रसारित करण्यासाठी मराठीला सर्वोच्च स्थान दिले आहे, अर्थातच, इंग्रजी भाषेतही त्याचा प्रसार होईल, जे अमेरिकेच्या प्रेक्षकांशी सुसंगत आहे. संपूर्ण खेळांच्या लोकप्रियतेसाठी जबाबदार असलेली अमेरिकन पद्धत देखील वापरली जात आहे, एक वेगळा अभ्यासक्रम आणि प्रसार करण्यासाठी एक अॅप देखील वापरला जात आहे, जो वापरकर्त्यांना मल्लखांब अनुयायी बनण्यास मदत करतो.

चिन्मय पाटणकर यांनी म्हटल्याप्रमाणे, आसाममध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकन संघ आणि भारतीय संघ कशी कामगिरी करतात हे पाहण्याजोगे असेल, भारतात दीर्घकाळापासून खेळ असल्याने अमेरिकन संघासाठी या स्पर्धेत नक्की आव्हान असेल. तसेच, निर्माते राकेश बापट यांच्याकडून मल्लखांबच्या प्रगतीची माहिती देणाऱ्या माहितीपटाचे अनावरण करण्यात आले.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले 21031 सिम कार्डस दूरसंचार विभागाने केले रद्द

पुणे, 8 मे 2023

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले फोनचे सीमकार्डस सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जातात, हे तर उघड सत्य आहे. असे बनावट सीमकार्डस तयार करणारे लोक आता या गैरव्यवहारात इतके सरावले आहेत, की त्यांनी अशा प्रकारची बनावट ओळखपत्रे/ बनावट पत्ते दाखवणारी कागदपत्रे तयार केली आहेत, जी एकेक  प्रकरणापुरता तपास करताना , मानवी तपास पद्धतीत कधीही पकडली जाणार नाहीत. हे लक्षात घेऊन, दूरसंचार विभागाने, अशा कागदपत्रांच्या आधारे होणारे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान हाती घेतले असून त्यासाठी अभिनव आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, ह्या संकल्पनेचा वापर करत त्या आधारावर, चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या फेशियल रेक्गनिशन पॉवर्ड सोल्यूशन (ASTR) ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने  बनावट सिम कार्डस शोधून काढली आहेत.

ASTR प्रकल्पामागचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांचे एकत्रित विश्लेषण करणे, आणि विश्वासार्ह नसलेले मोबाईल क्रमांक ओळखून त्यातून ते वजा करण्याचे काम केले गेले. या सिस्टिममध्ये दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला दिलेल्या ग्राहकांचा डेटाबेस वापरुन, एकच चेहरा आणि त्याचे वेगवेगळे क्रमांक ओळखले जातात.

याच प्रणालीचा वापर करत, महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21031 सिम ओळखून ती  रद्द केली गेली .

अशा फसव्या/बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोषी लोकांवर आणि सिम विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा PoS/सिम विक्रेत्यांना सेवा प्रदात्यांद्वारे आणि संपूर्णपणे काळ्या यादीत टाकले जात आहे. पुढील तपास करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात येत आहे.

लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा : नाना पटोले

सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल.

विठ्ठला, राज्यातील बळीराजाचे अवकाळी पावसापासून रक्षण कर.

पंढरपूर दि. ८ मे २३
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा व विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा रहात आहे, जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंधपणे काम करत आहेत. तरुणही मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात सहभागी होत असून जनतेच्या आशिर्वादाने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल.

विठ्ठला, राज्यातील बळीराजाचे अवकाळी पावसापासून रक्षण कर.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. चतुर्थीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन म्हणजे दुग्ध-शर्करा योग आहे. विठ्ठल-रुक्मिणी हे गरीब, सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे दैवत आहे तसेच वारकरी संप्रदायाचे माहेर आहे. बळीराजा आज अस्मानी संकटाने घेरला असून असंवेदनशील खोके सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता विठ्ठलानेच बळीराजाचे अस्मानी, अवकाळी पावसापासून रक्षण करावे, अशी प्रार्थना केल्याचे पटोले म्हणाले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सुधीर महाराज घोडके यांनी नाना पटोले यांचा तुळशीहार, उपरने आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.

स्वयंपुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 :- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या व्यवहारांसाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक व्यवस्था उभारावी, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार्याची भूमिका ठेवून यासंदर्भातील सर्व कामे कालबद्ध पद्धतीने करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास- पुनर्विकास यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय एस चहल, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने द्यावयाच्या सवलतीबाबत शासन निर्णय 2019 मध्ये जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या विषयाला चालना देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या सर्व व्यवहारांसाठी ‘इज ऑफ डुईंग’ अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना तीन महिन्यांत परवानगी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘एक खिडकी’ योजना चालू करावी. स्वयंपुनर्विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांसाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य सहकारी बँकेसह पात्र अन्य सहकारी बँकांनाही अनुमतीचा प्रस्ताव द्यावा. गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्र देणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे, स्टॅम्प अॅडज्युडीकेशन देण्याची प्रक्रिया गतिमान आणि कालबध्द करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी अभय योजना

मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा एक वर्षाच्या कालावधीकरिता महसूल विभागाने अभय योजना (amnistey scheme) लागू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच मानीव अभिहस्तांरणामध्ये व्यवसायातील सुलभता (ईज ऑफ डुईंग बिझनेस – ease of doing business) चा वापर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

‘महारेरा’ कायदापूर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना सरसकट मानीव अभिहस्तांतरण देण्याबाबत तपासणी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास – पुनर्विकास यासंदर्भात

स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रकल्पांची वाटचाल सुरळीत होण्यासाठी गृहनिर्माण विभागामार्फत जारी शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी,        स्वयंपुनर्विकासासाठी जुनी इमारत संदर्भातील अट बदलावी, स्वयंपुनर्विकासासाठी ‘एफएसआय’मध्ये बदल करावा, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना पतपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, मुंबईत स्वतंत्र, सुसज्ज सहकार भवन मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,या मागण्या मांडण्यात आल्या.

सांस्कृतिक संवादाची समाजाला गरज: डॉ. श्रीपाल सबनीस

वल्लरी प्रकाशनतर्फे पारिजात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे :  कवीला जात धर्म असतो. परंतु त्या कवीने आपल्या कवितेमध्ये मांडलेल्या वेदना आणि भावनेला जात धर्म नसतो. आजच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी समाजामध्ये  सांस्कृतिक संवादाची अतिशय गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनातर्फे व्यंकटेश कल्याणकर यांनी संपादित केलेल्या “पारिजात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर, कवयित्री आश्लेषा महाजन, यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, प्रकाश तांबे, मानसी चिटणीस, ज्योती इनामदार, अपूर्वा देव, महेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आज माणसा-माणसांमध्ये संवाद कमी होत चालला आहे. जर माणसांमध्ये संवाद राहिला नाही तर संस्कृतीमध्ये संवाद आणि त्याचा विकास कसा होणार. त्यामुळेच कवी आणि साहित्यिकांची समाजाला अत्यंत गरज आहे. साहित्याच्या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आज होत आहे. कविता ही केवळ साहित्य नव्हे तर एकात्मतेची भावना निर्माण करण्याचे साधन आहे.

डॉ. बबन जोगदंड म्हणाले, समाजामध्ये प्रबोधन होण्यामध्ये कवींचे मोठे योगदान आहे. कविता हे केवळ साहित्य नव्हे तर तो एक इतिहास आहे. ज्याप्रमाणे पुस्तके माणसं घडवतात, त्याचप्रमाणे कवितांमधून समृद्ध समाजाची निर्मिती होत असते.

अशोक इंदलकर म्हणाले, सर्वांना प्रसन्न करणारे संगीत आपण नेहमी ऐकतो त्या संगीताचे मूळ हे कवितेमध्येच असते. पोलीस खात्यामध्येही हळव्या आणि कलात्मक मनाची अनेक माणसे आहेत. पोलिसांचेही समाजाच्या रक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही  योगदान आहे.

आश्लेषा महाजन यांनी पारिजातमधील कवितांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “कविंनी मोठ्या प्रमाणात लिहिणे ही अभिव्यक्तीची लोकशाही आहे. लिहिताना स्वतः:साठी लिहिण्याबरोबरच समाजासाठी लिहावे.”

सुनील वेदपाठक म्हणाले, कविता हा अत्यंत अवघड साहित्यप्रकार आहे. कविता कोणालाही शिकविता येत नाही किंवा त्या संबंधात कोणालाही मार्गदर्शन करता येत नाही. कवितेचा आनंद केवळ कवीलाच नव्हे तर ती कविता वाचणाऱ्यालाही घेता आला पाहिजे .कविता हे एक प्रतिभा संपन्नतेचे लक्षण आहे.

मानसी चौगुले, शुभांगी जाधव, मुकुंद काजरेकर, सुरेश काळे,  प्रशांत लिंगाडे, वैशाली मराठे, चंचल मुळे, छाया नागर्थवार, निशिगंधा निकस, मंजुषा पागे, रसिका पनके , श्रीपाद पसारकर, प्राजक्ता राजोपाध्ये, अनघा सांगरुळकर, मीनाक्षी शीलवंत, जयश्री श्रीखंडे आदी कवींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या.

व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कल्याणकर यांनी निवेदन केले आरती परळकर यांनी स्वागत गीत तर कीर्ती देसाई यांनी पसायदान म्हटले. मानसी चिटणीस यांनी आभार प्रदर्शन केले.