शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयातील जैववैविध्याने समृद्ध परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या 88 प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून पुढे आली.
दरवर्षी ‘ग्लोबल ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमातून सभोवतालच्या परिसरातील पक्षी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद केली जाते. फर्ग्युसनमध्ये या उपक्रमाअंतर्गत 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पक्षी निरीक्षण करण्यात आले. ही माहिती www.ebird.org या ॲपवर अपलोड करण्यात आली. महाविद्यालयातील 140 प्रशिक्षीत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फर्ग्युसनच्या आवारात विविध 15 ठिकाणी सकाळी 5.30 ते रात्री 7.30 या वेळेत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि गटा-गटाने निरीक्षण केले. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 मिनिटांची 1400 निरीक्षणे ॲपवर नोंदविली. त्यासाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला.
कावळे, कबुतर, मैना, घारी, बुलबुल, कोकीळ, पोपट, घुबड, पिंगळा, राखी धनेश या स्थानिक पक्षांसह सरडामार गरूड, निळी माशीमार, लाला छातीचा माशीमार, लाल कंठाचा माशीमार, हिरवट वटवट्या, मुकुटधारी पर्णवटवट्या, कृष्ण थिरथिरा, करड्या डोक्याची मैना या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाची गरज असणाऱ्या स्थलांतरीत पक्षांची नोंद करण्यात आली. बहुसंख्य स्थलांतरीत पक्षी दरवर्षी हिवाळ्यात हिमालयातून येत असतात.
वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे
· विविध 88 पक्षांच्या प्रजाती
· निळी माशीमार या जंगलात आढळणाऱ्या पक्षाने शहरात अधिवास केला.
· लाल फुलांच्या काटेसावर झाडावर करड्या डोक्याची मैना आढळली.
· दोन हजार पोपटांचा थवा
पुणे शहरातील टेकड्या हे गवताळ प्रदेश होते. या ठिकाणी बोरबाभूळ अशी वृक्षसंपदा होती. कालांतराने या टेकड्यांवर ग्लिसरिडीया, निलगिरी, सुबाभूळ अशी वृक्ष लागवड करण्यात आली. फर्ग्युसन परिसरातील टेकड्यांवरही हे बदल झाले. या बदलांसह या परिसरातील वृक्षसंपदा, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक वाटते.
–
–प्रा. आविष्कार मुंजे, फर्ग्युसन महाविद्यालय