Home Blog Page 1548

पुणे पोलिसांनी कारमध्ये पकडले साडेतीन कोटी

पुणे- हडपसर मांजरी फार्म येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकेबंदी करत असताना वाहतूक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा व नोटा मोजण्याची मशीन कारमधून (एमएच १३ सीके २१११) जप्त केल्या आहेत. सकाळी ७ वाजेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते. गुन्हे शाखा, हडपसर पोलिस तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही कोट्यवधींची रोकड पकडली. या प्रकरणात प्रशांत धनपाल गांधी (४७, रा. लासुर्णे. ता. इंदापूर) यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

शहरात वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांच्या वतीने नाकेबंदी करण्यात येत होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयित वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरीत्या ब्रेझा कारमधून येताना दिसली. त्याने लागलीच कार थांबवून गाडीची तपासणी केली असता त्यात पैसे सापडले.

पाकिस्तानी जनतेचा लष्करावर हल्ला,- सोशल मीडिया मोबाइल इंटरनेटवर बंदी, 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी

इस्लामाबाद-पाक रेंजर्सनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्ट परिसरात अटक करून फरपटत नेले. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरली. सायंकाळपर्यंत इम्रान समर्थकांनी लाहोरपासून ते थेट रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयावर कब्जा करण्यासाठी हल्ला चढवला.माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरूच आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे समर्थक पेशावर, इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करत आहेत. आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. रात्री उशिरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. लाहोरमधील गव्हर्नर हाऊस जाळण्यात आले. कराचीच्या कँट परिसरात हल्ला झाला.

  • पीटीआय समर्थकांनी रात्री उशिरा लाहोरमधील लष्कर कमांडरच्या घराला आग लावली. आणखी अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले झाले.
  • हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील खासगी शाळा बंद राहणार आहेत.
  • राजधानी इस्लामाबाद आणि पंजाब प्रांतात दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. पेशावरमध्ये 30 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
  • इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
  • क्वेट्टा येथे आंदोलनादरम्यान पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पीटीआय नेते कासिम सूरी यांनी केला आहे.
  • इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, 5 अधिकारी जखमी झाले आहेत, तर 43 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्ट परिसरात अटक करून फरपटत नेले यामुळे लोकांत संताप

लष्कराविरुद्ध प्रथमच एवढा संताप दिसून आला आहे. लष्करी वाहनांवर महिलांनी दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत सुमारे डझनभर शहरांमध्ये उग्र निदर्शने करीत इम्रान समर्थकांनी लष्कर आणि सरकारविरुद्ध युद्धच पुकारले. इकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ लंडनमध्ये तर लष्करप्रमुख आसिम मुनीर ओमानमध्ये आहेत.

अल कादिर विद्यापीठ घोटाळा प्रकरणी लष्कराने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान पुढील ४-५ दिवस तपास यंत्रणा एनएबीच्या ताब्यात राहतील.. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. इम्रान दोन प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते, जिथे पाकिस्तान रेंजर्सने त्यांना अटक केली

पाकमध्ये मार्शल लॉची परिस्थिती, लष्कराच्या अस्तित्वाला धोका
इम्रान यांच्या अटकेनंतर लष्कराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे. लष्कराला याची कल्पना नव्हती. त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती पाहता लवकरच मार्शल लॉ लागू झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. आपल्या लोकप्रियतेच्या बळावर लष्कराचा मुकाबला करणारे आणि लष्कराचा अहंकार मोडून काढणारे पहिलेच राजकीय नेते आहेत. यापूर्वी लियाकत अली आणि बेनझीर भुत्तो यांनी लष्कारास अाव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोघांचाही खूपच दु:खद शेवट झाला. भारताविरोधात एकही युद्ध जिंकू न शकलेले पाकिस्तानी लष्कर आपल्याही भल्याचे नाही, हे जनतेला कळून चुकले आहे. लोकशाहीच्या मार्गात सर्वात मोठी अडचण लष्करच आहे. जनतेच्या याच भावनेचा फायदा इम्रान खान करून घेत अाहेत.

अटकेपूर्वी इम्रान आणि लष्करामध्ये झाला वाद
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये माझ्यावर झालेल्या हल्ल्यात आयएसआयचे मेजर-जनरल फैसल नासिर यांचा हात होता, असा आरोप इम्रान यांनी ६ मे रोजी एका रॅलीत केला होता. ८ मे रोजी लष्कराने इम्रान यांनी बिनुडाचे आरोप करू नये, असे बजावले होते. इम्रान यांनी मंगळवारी कोर्टात जात असतानाही लष्कराविरुद्ध वक्तव्ये केली होती.

मियांवालीत लष्कराच्या एअरबेसमध्ये घुसले लोक
– पेशावरमध्ये रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीला आग लावण्यात आली.
– पाकिस्तानात सोशल मीडियावर बंदी. अनेक ठिकाणी मोबाइल इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
– इम्रान समर्थक आंदोलकांनी खैबर पख्तूनख्वा विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराला आग लावली.
– इम्रान यांच्या अटकेविरुद्ध पीटीआयच्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला.
– इम्रान यांना सध्या रावळपिंडीत एनएबी मुख्यालयात ठेवले.
– भारताने अांतरराष्ट्रीय सीमा व एलओसीवर हाय अलर्ट जारी केला.

आर्मी कमांडरच्या घरावर हल्ला

  • इम्रानच्या अटकेनंतर लाहोरमधील लष्करी कमांडरच्या घरावर खान यांच्या पक्षाच्या पीटीआय कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू फोडून काही ऐवज लंपास केला. नंतर त्यांच्या घराला आग लावण्यात आली. इतर अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवरही हल्ले झाले आहेत.
  • पेशावर आणि कराचीसह देशभरातील अनेक शहरांमध्ये पोलिस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. काही लोक मारले गेल्याची नोंद आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही.
  • इम्रानच्या पक्ष पीटीआयचे नेते मुसरत चीमा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले – खान यांचा छळ केला जात आहे. ते खान साहबांना मारत आहेत. इम्रानच्या वकिलाचा व्हिडिओही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

सरन्यायाधीशांनी विचारले – कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली?

  • इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह सचिव आणि इस्लामाबाद पोलीस प्रमुखांना अटक केल्यानंतर १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले- पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावले जाईल. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली? मात्र, रात्री 11 वाजता न्यायमूर्ती फारुख म्हणाले – अटक योग्य आहे, परंतु पद्धत चुकीची आहे.
  • अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रानला अटक करण्यात आली आहे. ही विद्यापीठाशी संबंधित बाब आहे. पंतप्रधान असताना इम्रान यांनी या विद्यापीठासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे संपादित केली. पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मलिक रियाझ यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. इम्रानने ही जमीन मलिक रियाझकडूनच घेतली होती.
  • अटकेचा धाक दाखवून इम्रान आणि त्याची पत्नी बुशरा बीबी यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप रिझे यांनी केला होता. त्यानंतर रियाझ आणि त्याची मुलगी यांच्यातील संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाजच्या मुलीचे म्हणणे आहे की, बुशरा बीबी त्याच्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहे.
  • विशेष बाब म्हणजे अल कादिर विद्यापीठात केवळ तीन विश्वस्त आहेत. इम्रान, बुशरा आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी. या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थी आहेत. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 अशा आहेत, ज्यात त्याची अटक निश्चित आहे. यामुळेच खान यापैकी कोणत्याही प्रकरणात कोर्टात हजर राहत नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प लैंगिक शोषण प्रकरणी दोषी, महिला लेखिकेला 41 कोटी द्यावे लागणार; 9 सदस्यांच्या ज्युरींनी दिला निकाल

न्यूयॉर्क-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मासिकाच्या लेखिका ई जीन कॅरोल यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, ट्रम्प यांना कॅरोलला 41 कोटी रुपये (5 मिलियन डॉलर) भरपाई द्यावी लागेल. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टरूममध्ये हा निकाल सुनावण्यात आला.9 सदस्यीय ज्युरीने ट्रम्प यांना लैंगिक अत्याचार आणि कॅरोलची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र, ज्युरींनी ट्रम्प यांच्यावरील बलात्काराचा आरोप फेटाळून लावला.

ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप होता
मासिकाच्या लेखिका कॅरोल यांनी 2019 मध्ये आरोप केला होता की ट्रम्प यांनी 1996 मध्ये मॅनहॅटन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. ट्रम्प यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. ते म्हणाला की, ते कॅरोलला ओळखत नाहीत आणि तिला स्टोअरमध्ये भेटले नाहीत. कॅरोल आपले पुस्तक विकण्यासाठी खोटी कथा रचत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दोन महिलांनी साक्ष दिली
या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिलपासून सुरू झाली. खटल्यादरम्यान दोन महिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात साक्ष दिली. पीपल मॅगझिनच्या रिपोर्टर नताशा स्टॉयनोफने सांगितले की, ट्रम्प यांनी 2005 मध्ये तिला जबरदस्तीने किस केले होते. जेसिका लीड्स या आणखी एका महिलेने सांगितले की, ट्रंप यांनी 1979 मध्ये तिचे चुंबन घेतले होते.

ज्युरींनी ट्रम्प यांच्या 2005 च्या रेकॉर्डिंगचीही सुनावणी केली. यामध्ये ट्रम्प परवानगीशिवाय महिलांचे चुंबन आणि आलिंगन करण्याबाबत बोलत होते.

ट्रम्प यांच्या भीतीने जगाला सांगितले नाही
कॅरोलच्या दोन मित्रांनी चाचणीत साक्ष दिली की कॅरोलने त्यांना या घटनेबद्दल सांगितले होते. मात्र, ट्रम्प यांच्या भीतीने त्यांना हे कोणालाही न सांगण्यास सांगण्यात आले. कॅरोलला भीती होती की ती पुढे आली तर ट्रम्प आपल्या शक्ती आणि पैशाच्या जोरावर तिचा बदला घेतील.

ट्रम्प त्यांच्याविरुद्धच्या दिवाणी खटल्यात सहभागी झाले नाहीत. तसेच निकालाच्या वेळी ते हजर नव्हते. ही नागरी बाब आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर तुरुंगात जाण्याचा धोका नाही. या प्रकरणात, ज्युरी सदस्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. ट्रम्प यांनी नंतर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर हा निर्णय अपमानजनक असल्याचे म्हटले आणि ते म्हणाले की मी कॅरोलला ओळखत नाही. त्यांच्याविरोधात मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील तीन पोलिसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली: पोलीस सेवेत साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलिसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) सोमय मुंडे, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम यांना नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसाठी ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमात  29 शौर्य पुरस्कार आणि 8 कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.

हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हेचा ‘हल्ला गुल्ला”फकाट’ चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

प्रेमगीत, आयटम सॉंगनंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपटातील एक भन्नाट, उडत्या चालीचे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘जिंदगी आता झाली हल्ला गुल्ला’ असे बोल असलेल्या या गाण्याला कौतुक शिरोडकर, हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर यांचे बोल लाभले असून हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे जबरदस्त संगीत लाभलेले हे गाणे गायलेही त्यांनीच आहे. हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे गाणे ऐकायला जितके स्फूर्तिदायी आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आणि कलरफुल आहे. या गाण्यात हेमंत आणि सुयोगकडे भरपूर पैसा आल्याचे दिसत असून ते भौतिक सुख अनुभवत असल्याचे या गाण्यात दिसतेय. या गाण्यात रॅपही अनुभवायला मिळत आहे. जे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी केले आहे.

या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात, ” या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसतेय. तरुणाईला आवडेल असे या गाण्याचे शब्द आणि संगीत आहे. तरुणाईचा वेस्टर्न सॉंगकडे कल जास्त आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे, संगीतप्रेमींना आवडेल असे आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शकही मराठीतील एक नावाजलेले रॅपर आहेत. त्यामुळे त्यांचाही मदत या गाण्यासाठी झाली आहे. त्यांच्या रॅपने या गाण्यात अधिकच रंगत आणली. हे गाणे करताना मजा आली.”

हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, रसिका सुनील, अनुजा साठे, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.

रिक्षा चालकांसाठी सरकारने स्वतः मोबाईल ॲप निर्माण करावा :- बाबा कांबळे,

पुणे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

ओला उबेर रॅपिडो या भांडवलदार कंपन्यांना रिक्षा चालकांचा विरोध कायम

पुणे-अग्रिकेटर पॉलिसी मोबाईल ॲप बाबत हरकती व सूचना नोंदविनयचे आव्हान महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे, याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने हरकत नोंदविण्यात आली असून ओला उबेर रॅपिडो या कंपन्यांना बंदी घालून सरकारने स्वतःचा मोबाईल ॲप विकसित करावा अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली,

पुणे येथे महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रमुख पदाधिकाऱ्यांची व रिक्षा स्टॅन्ड प्रमुखांची प बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होतेयावेळी बाबा कांबळे म्हणाले

अनेक वर्षापासून आम्ही ओला उबेर रॅपिडो सारख्या भांडवलदार कंपन्यांचे विरोधामध्ये लढा देत असून पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या वतीने मोठा लढा उभा करून कंपनी वरती बंदी आणण्यास भाग पाडले तसेच ओला उबेर या भांडवलदार कंपन्यावरती बंद आणावी अशी वेळोवेळी मागणी केली आहे,

याचाच एक भाग म्हणून पुणे आरटीओ कार्यालयाने ओला उबेर रॅपिडो बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला असून यामुळे रिक्षाचालकांचा फायदा होईल असे आम्हाला वाटते, मोबाईल ॲप टेक्नॉलॉजी द्वारे गेल्या अनेक वर्षापासून पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील व देशातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो तसेच चार चाकी वाहनांना प्रवासी सेवा दिली जाते, ऑटो रिक्षाला मीटर व तसेच सर्व प्रकारचे नियम बंधन असल्यामुळे ऑटो रिक्षांमधून मोबाईल ॲप सेवा देण्यास कोणत्याच प्रकारचे हरकत नाही , परंतु ओला उबर व इतर भांडवलदार कंपन्या मात्र 30 ते 40 टक्के कमिशन घेऊन रिक्षा चालकांची लूट करत आहेत व त्यांच्याकडून जादा कमिशन घेतात व या कंपन्या मालामाल गब्बर होत असून रिक्षा चालकांची मात्र नुकसान होत आहे, यामुळे भांडवलदार कंपन्यांनी सुरू केलेल्या मोबाईल ॲप ला परमिशन नाकारणे या निर्णयाच्या आम्ही स्वागत करत आहोत
या मुळे सरकारच्या लक्षात एक गोष्ट आम्ही अनुच्छितो मोबाईल ॲप सेवा बंद झाल्यामुळे, व रिक्षा चालक व प्रवाशांना मोबाईलला तंत्रज्ञानाची सवय झाल्यामुळे व या तंत्रज्ञानामुळे अनेक रिक्षा चालकांचा रोजगार अवलंबून असल्यामुळे, रिक्षा चालकांचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वखर्चाने मोबाईल ॲप तयार करावे व या ॲपच्या माध्यमातून रिक्षा चालकांना व नागरिकांना आवाहन करून या सेवेचा उपयोगात आणावा, अशी आपली आग्रही मागणी आहे,
सरकारच्या वतीने मोबाईल ॲप सुरू केल्यास रिक्षा चालकांचे प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक टळेल व तसेच रिक्षा चालकांना चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी व सुविधा मिळेल, एन आय या संस्थेने आरटीओचे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे त्यांच्याकडे अप सुविधा डेव्हलप करण्याची देखील तंत्रज्ञान व माहिती असल्यामुळे यांना तातडीने रिक्षा चालक मालकांसाठी
मोबाईल ॲप टेक्नॉलॉजी बनवण्याचे काम सोपवावे व ते जनतेसाठी रिक्षा चालकांसाठी खुले करावे अशी आमची आग्रहाची मागणी आहे, असे यावेळी बाबा कांबळे म्हणावे

यावेळी बैठकीमध्ये मोबाईल ॲप टेक्नॉलॉजी बाबत सरकारकडे सूचना व हरकती पाठवण्यासाठी एकूण 16 मागण्या मंजूर करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे

१) महाराष्ट्र सरकारच्या वतीने रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोबाईल ॲप टेक्नॉलॉजी विकसित करून ती तातडीने सुरू करण्यात यावी,
२) ओला उबेर रॅपिडो या भांडवलदार कंपन्यांनी सुरू केलेले ॲप व टेक्नॉलॉजी वरती तातडीने बंदी घालून या कंपन्यांना बेकायदेशीर प्रवासी व्यवसाय केल्याप्रकरणी त्वरित बंदी घालण्यात यावी,
३) ओला उबेर रीपिडो सारख्या भांडवलदार कंपन्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत शासनाकडे मोबाईल टेक्नॉलॉजी ॲप साठी आपलिकेशन साठी परवानगीची मागणी करत दुसऱ्या बाजूला रिक्षा संघटना च्या नावाखाली रिक्षा चालकांना गुमराहा करून जनतेची रिक्षा चालकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या रिक्षा संघटना वरती बंदी घालून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
४) टू व्हीलर रॅपिडो व इतर कोणत्याही कंपनीत टू व्हीलर वाहनासाठी प्रवासी वाहतूक करण्यास कुठल्याही नियमाच्या आधारे परवानगी देऊ नये,
५) पुणे आर टी ओ विभागाने मोबाईल टेक्नॉलॉजी ॲप बाबत घेतलेला निर्णय महाराष्ट्र मध्ये सर्व आरटीओ कार्यालय मध्ये लागू करण्यात यावा,
या मागण्यांचे एकूण सोळा ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे उपाध्यक्ष हर्षद अन्सारी, मुराद काजी,रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष गुंड, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, अडवोकेट काजल कांबळे, आधी उपस्थित होते.

‘द केरला स्टोरी’ बनवणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी ; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

भाजपाचे नेते का करत आहेत प्रचार …

‘द केरला स्टोरी’ यावरून राजकारण तापले आहे. बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून सिनेमा असोसिएशनने तामिळनाडूमध्ये तो दाखवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, यूपी आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाशी संबंधित वाद आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या चित्रपटात असत्य दाखवण्यात आले आहे. तीन मुलींची कहाणी 32 हजारांची सांगितली आहे. पुढे वादग्रस्त विधान करत त्यांनी हा चित्रपट बनवणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे असे म्हटले.

यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून द केरला स्टोरीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी लिहिले की,

“केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे.

त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या.

म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे.

असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.”

जितेंद्र आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेनंतर नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, केरला स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यासाठीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली असून कोर्ट त्यावर सुनावणी करणार आहे.

‘आरएसएस’वर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही; ‘कुरुलकर’प्रकरणी छगन भुजबळांचे रोखठोक मत

मुंबई-‘आरएसएस’ संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी पुण्याच्या ‘डीआरडीओ’चे संचालक व तत्कालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाॅब्लिस्ट (इंजिनिअर्स आर अँड डीई) प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी आपले परखड मत व्यक्त केले.प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याची चर्चाय. त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन झाले. अनेक राजकीय नेते सुद्धा त्यामुळे ‘आरएसएस’वर आरोप करत आहेत. मात्र, यावर छगन भुजबळ यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला गोपनीय माहिती पुरवली. या प्रकरणी त्यांना एटीएसने अटक केली आहे. या कुरुलकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यावरून अनेकांनी ‘आरएसएस’वर आरोप करायला सुरुवात केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, ‘आरएसएस’ संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये. मात्र, ‘आरएसएस’मध्ये आहे, असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर ‘आरएसएस’ने नजर ठेवली पाहिजे. पोलिस, गुप्तहेर शाखांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोण कधी, अशा काही हनी ट्रॅपमध्ये सापडेल सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकू नयेत. तसेच एकनाथ शिंदे सरकारने अवकाळी पावसाची नुसती पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात ठोस रक्कम पडली पाहिजे. याच्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

‘वर्क-लाईफ बॅलन्स’ साधण्यासाठी ८१ टक्के कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण

मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सकारात्मक व धोरणात्मक बदल, कृतीची गरज

– ‘एम्पॉवर’च्या सर्वेक्षणातून ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य व निरोगीपणाचे प्रमाण’ यावर प्रकाश

– देशातील आठ शहरात ३००० कर्मचाऱ्यांचा अभ्यास; वर्क-लाईफ बॅलन्स, प्रेरणेचा अभाव आणि वेतन कपातीचा संघर्ष

पिंपरी, दि. ९ मे २०२३ : कामाचा वाढता ताण, बहु-कार्य पद्धती आणि क्रॉस-फंक्शनल कौशल्य, दूरस्थ कार्यपद्धतीचा अवलंब, अल्प वेतन व वेतन कपातीची, नोकरी टिकवण्याची टांगती तलवार यामुळे ८१ टक्के लोकांना ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ साधण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील ८१ टक्के कर्मचाऱ्यांची ओढाताण होत असून, त्यातही महिलांचे प्रमाण ५६ टक्के असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या ‘एम्पॉवर’ आणि ‘आयपीसोस’, ग्लोबल मार्केट रिसर्च अँड पब्लिक ओपिनियन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य व निरोगीपणाचे प्रमाण’ याचे सर्वेक्षण करण्यात आले. भारतात प्रमुख शहरातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कराव्या लागणाऱ्या आव्हाने व समस्यांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. जवळपास पाच महिने चाललेल्या या सर्वेक्षणात ३००० पेक्षा अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचे परीक्षण व अभ्यास करण्यात आला आहे. पुण्यासह भारतातील महत्वाच्या शहरातील दहा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. 

या सर्वेक्षणाविषयी ‘एम्पॉवर’ पुणे सेंटरच्या प्रमुख व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्नेहा आर्या आणि मानसोपचारतज्ज्ञ आणि ‘एम्पॉवर’च्या क्लिनिकल ऑपरेशन्स अँड रूरल इनिशिएटिव्हचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. अंबरीश धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

डॉ. स्नेहा आर्या म्हणाल्या, “समुपदेशनासाठी येणाऱ्या २४ ते ४० वयोगटातील तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यातील व्यक्तींसाठी कामाशी संबंधित तणाव आणि वर्क-लाईफ समतोलाचा अभाव ही चिंताजनक बाब बनली आहे. सततचा कामाचा ताण, कामाचे दीर्घ तास आणि नेहमी चालू असलेली कार्यसंस्कृती यामुळे बर्नआउट, चिंता आणि नैराश्य यांसारखाय मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कामाच्या ठिकाणासह त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन, नातेसंबंध यावर परिणाम होत आहे. महिला कर्मचाऱ्यांना यामध्ये अधिक त्रास होत आहे.”

डॉ. अंबरीश धर्माधिकारी म्हणाले, “नोकरी, व्यवसायाच्या संधींचे भांडार असलेल्या पुण्यात सतत, बहु-कार्य पद्धती आणि क्रॉस-फंक्शनल कार्यपद्धती रूढ होत आहे. परिणामी, तणावाचे सर्वाधिक प्रमाण इथे आहे. कोरोनाने मानसिक आरोग्य चर्चेत आले. कॉर्पोरेट जगताचे स्पर्धात्मक स्वरूप कर्मचाऱ्यांच्या तणावाच्या पातळीत भर घालत आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन, मानसिक आरोग्य सेवा, वर्क लाईफ बॅलन्सला पूरक धोरणे, संवादी व सर्वसमावेशक भावना रुजवणे गरजेचे आहे. संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य द्यावे.”

असे झाले सर्वेक्षण

पुण्यासह मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, अहमदाबाद या शहरांतील बँकिंग, आटोमोबाइल, आयटी, हॉस्पिटॅलिटी, ई कॉमर्स, हेल्थकेअर, एज्युकेशन, एफएमसीजी, बीपीओ, ड्युरेबल्स या क्षेत्रात ३००० कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, अकाउंट मॅनेजर, डायरेक्टर, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे पाच महिने चाललेल्या या सर्वेक्षणात नोकरी, कामाचा समतोल, कौटुंबिक आणि नातेसंबंधांत तणाव, आर्थिक अस्थैर्यता याचा अभ्यास करण्यात आला. १६२७ पुरुष, तर १३७३ महिलांचा यात समावेश आहे.

शारीरिक आरोग्यावर परिणाम

पुण्यातील कर्मचार्‍यांमध्ये प्रेरणेचा अभाव आणि तणाव याही प्रमुख समस्या आहेत. वेतन कपातीमुळे शहरातील कर्मचार्‍यांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. वेतन कपातीचा परिणाम ४८ टक्के कर्मचार्‍यांवर झाला असून, ४६ टक्के कर्मचार्‍यांना अपुऱ्या पगाराचा फटका बसला आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत, पुण्यातील व्यक्तींसाठी पाठदुखी ही एक महत्त्वाची चिंता आहे. ४६ टक्के प्रतिसादकर्त्यांनी ही समस्या म्हणून नोंदवली आहे. याव्यतिरिक्त, पुण्यातील ३४ टक्के लोक गुडघेदुखीची तक्रार करतात.

कॉर्पोरेट बर्नआउट, कर्मचार्‍यांमधील मानसिक आरोग्य, तणाव चिंताजनक पातळीवर आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी ठोस कृतीची आवश्यकता आहे. ‘एम्पॉवर’च्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी समुदेशन, संवाद सत्रे चालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी, तसेच मानसिक आरोग्य विषयक जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार आणि कॉर्पोरेट दोन्ही स्तरांवर धोरणात्मक बदल करून मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन आपल्या देशाच्या भल्यासाठी एक निरोगी, अधिक उत्पादक कार्यबल तयार करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत.

– डॉ. नीरजा बिर्ला, संस्थापक अध्यक्षा, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट आणि ‘एम्पॉवर’

जगातील सर्वात मोठ्या मूल्यशिक्षण प्रतियोगीतेचे ‘इस्कॉन’ तर्फे आयोजन

पुण्यातील २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : इस्कॉनतर्फे गीताजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या मूल्यशिक्षण प्रतियोगीतेचा भव्य बक्षिस वितरण समारंभ कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मध्ये कमलनयन बजाज अतिथी भवनात साजरा झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून पुणे जिल्हा सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, व्हिआयटी काॅलेजचे संचालक राजेश जालनेकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.

इस्कॉन ही एक जगप्रसिद्ध संस्था आहे. जी समाजात आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जिवनात गीतेवर आधारीत मूल्य शिक्षण प्रतियोगीता इस्कॉन दरवर्षी आयोजित करत असते. 
विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करुन मूल्य शिक्षणावर आधारित उत्तरे द्यावयाची असतात. संगणकाद्वारे उत्तर पत्रिकांची तपासणी होते. मुलाखतीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक दिले जाते. या प्रतियोगितेने आता एक भव्य रूप धारण केले आहे. मागच्या दहा वर्षात ४०० जिल्ह्यात ७ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी मूल्यशिक्षण स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पुणे जिल्ह्यातील २१० पेक्षा जास्त शाळांतून २० हजार विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.

नारायण शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त करीत “मूल्यशिक्षण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि याशिवाय समाजात सुख शांती समाधान अनुभवास येणार नाही. शालेय जीवनातच यांचे शिक्षण मिळाले पाहीजे” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

भारतभरात २५ जिल्ह्यात ७ मल्टीनॅशनल कंपनींनी यात पुरस्कार प्रायोजीत केले आहेत. मोटो व्हॉल्ट तर्फे प्रत्येक जिल्ह्यात १  इलेक्ट्रिक सायकल, हरक्युलीस बिसए तर्फे प्रत्येक जिल्ह्यात ४ सायकल, पोट्रोनिक्सतर्फे स्मार्ट वॉच, सँडीस्क तर्फे पेनड्राईव, क्विक हिल तर्फे बॅग, अनफोल्डयू तर्फे एक वर्षाचा फ्री शालेय अभ्यासक्रम, फिनोलिक्स पाईप्स तर्फे विद्यार्थ्याना कॅलेंडर देऊन अभिनंदन करण्यात आले. वरद राजदास यांनी आभार प्रदर्शन केले.

‘फडणवीस यांचे दोन गुन्हे प्रतिज्ञापत्रात नोंदविण्याचे राहून गेले’ ! फडणवीस यांचे वकील ऍड. डबले यांची न्यायालयात कबुली

पुणे/ नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या वरील गुन्ह्यांची माहिती नोंदवीत असताना दोन गुन्हे नोंदविण्याचे नजरचुकीने राहून गेल्याची कबुली फडणवीस यांचे वकील ऍड. उदय प्रभाकर डबले यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ( नागपूर ) यांच्यासमोर न्यायालयात दिली.
 फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याने कारवाई करावी यासाठीचा खटला ऍड सतीश उके यांनी फडणवीस यांच्यावर दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी ६ मे रोजी झाली. या न्यायालयीन कामकाजाची प्रत नुकतीच प्राप्त झाली . त्यामध्ये साक्षीदार ऍड. डबले यांनी चूक मान्य केली. या प्रकरणाचा पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.   फिर्यादी एड.सतीश उके यांच्यावतीने अॅड. तरुण परमार यांनी काम [पाहिले.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते याची उत्कंठा राज्यात  आहे.  

खटल्याचा इतिहास:
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दिलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर दाखल असलेले गुन्हे लपवून ,खोटी माहिती दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या समरी क्रिमिनल केस २७०३६/२०१९ मध्ये सुनावणी  सुरू आहे.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (नागपूर ) यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.
लोकप्रतिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूर च्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे यासंबंधी खटला दाखल केला होता. पुढे सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळाला नाही.त्यांना याप्रकरणी नागपूर न्यायालयाने जामीन दिलेला आहे. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षाना सामोरे जावे  लागू शकते. 
देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६आणि १९९६ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल झाला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके २०१४  पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.

शस्त्र प्रदर्शनातून महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा 

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त समस्त राजपूत समाजातर्फे आयोजन


पुणे : गवा, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली, तलवारी, चिलखत, वाघनखे, कट्यार, दांडपट्टा, ठासणीच्या बंदुका अशी २५० ते ३०० वर्षांपूर्वीची ३०० हून अधिक शस्त्रे पुणेकरांना पाहायला मिळाली.  वीरशिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसह वीर पुरुषांनी त्याकाळी वापरलेल्या शस्त्रांचे महत्व समजून घेत, भारताच्या शौर्याच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. 
समस्त राजपूत समाजाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८३ व्या जयंतीनिमित्त बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानात शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात  आले होते. प्रदर्शनाचे उदघाट्न खडक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  ॲड.प्रताप परदेशी, स्वप्नील नाईक, किशोर रजपूत, प्रमोद  परदेशी, गोपी पवार, विजय परिहार, प्रेम राठोड हे उपस्थित होते. 
वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला. यद्मदत रणजित हजारे, राहूल राठोड, नितीन राठोड यांच्या रॉयल लेगसी ट्रस्ट यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाला माजी महापौर प्रशांत जगताप, अजय खेडेकर, विजय कुंभार यांसह अनेक समाजिक संस्थाचे प्रतिनिधी हजर होते.

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रकल्पांबाबत बैठक

मुंबई, दि. 9 : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपुलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे.

जे प्रकल्प जमीन संपादनाअभावी रखडलेले आहेत, त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. या कामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होते त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

१५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी, यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याची सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी केली. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसित जिल्ह्यांत दोन अशी किमान १५० ते २०० युनिट सुरू करण्याची सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावी, असे श्री. गडकरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणेशोत्सवापूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ कि.मी. लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ कि.मी. लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ कि.मी. लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये ब्लॅकस्पॉट दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पूल यांची ६८ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.

यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात कि.मी.च्या जमीन संपादनाविषयीदेखील चर्चा झाली.

डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने

पुणे-देशाची गुपिते पाकीस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासाठी आज निदर्शने करण्यात आली. डॉ कुरुलकर ISI साठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला ,याने आजपर्यंत ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला.
डॉ कुरूलकर हा माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे अभिमानाने सांगतानाच्या व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यत अटक होते त्या संघटनेने अजूनही त्या व्यक्तीचे निलंबन केलेले नाही यावरूनच या संघटनेचे देशप्रेम लोकांना समजून येत आहे , जर सदरील व्यक्ती ही इतर कोणत्याही समाजातील असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारत आज नंगानाच केला असता संबंधित यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता सदर व्यक्तीची कठोर चौकशी करून त्याच्याबाबत सर्व पुरावे गोळा करून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली
सदर प्रसंगी,भारत माता की जय ,पाकिस्तान मुर्दाबाद,पाकिस्तान चा ऐंजट कोण , आर एस एस चा स्वयंसेवक ..स्वयंसेवक
जबाव दो जबाब दो नरेंद्र मोदी जबाब दो…या घोषणा देण्यात आल्या.
शहराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , विनोद पवार , सुवर्णा माने , प्रदीप हुमे , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

कुकडी डाव्या कालव्याचे २२ मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. ९: अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कुकडी डाव्या कालव्यातून २२ मे पासून चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे; पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे.

धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होते. त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील १५ कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर सुरुवात करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेला. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया ही सुरु आहे. तूर्तास क आणि ड संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही पालककमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व उन्हाळी हंगाम २ च्या नियोजनाबाबत सादरीकरण केले.

बैठकीस कार्यकारी अभियंता स. ज. माने, उ. द. धायगुडे, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.
0000