नवी दिल्ली: पोलीस सेवेत साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलिसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) सोमय मुंडे, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम यांना नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसाठी ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
आज झालेल्या कार्यक्रमात 29 शौर्य पुरस्कार आणि 8 कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.