Home Blog Page 1547

भारती विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन समारंभ संपन्न

कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर

पुणे, दि. १०: भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी काढले.

भारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमीपूजन समारंभात श्री. नार्वेकर बोलत होते. कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

जो वाचायला शिकवतो तो देश घडवतो, असे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले, भारती विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नसून देशात महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखले जाते. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आदी अनेक मान्यवर व्यक्तीमत्त्वे विद्यापीठाने घडवली आहेत. देशाला उंची प्राप्त करुन देण्यात भारती विद्यापीठसारख्या संस्था आणि संघटनांचा खूप मोठा हातभार आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामध्ये अशा संस्थांनी शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाचा वाटा आहे.

श्री. नार्वेकर पुढे म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी गतीमान आणि प्रगतीशील शिक्षणातून समाजपरिवर्तन कसे करावे या संकल्पनेतून लावलेले रोपटे आज विद्यापीठाच्या रुपात विशाल वृक्ष म्हणून देशातील, जगातील अनेक विद्यार्थ्यांना सावली देण्याचे काम करत आहे. विद्यापीठाने आपली ख्याती आणि कार्य केवळ पश्चिम महाराष्र्ट्र, पुण्यात नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यात तसेच दिल्लीसारख्या राज्यात पोहोचवले आहे.

भारती विद्यापीठाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. गेहलोत म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांचे विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या कष्टातून साकार झाले आहे. कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षण आणि आरोग्यातून बनते. स्त्री शिक्षणासाठी पुण्यातून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केले. राजस्थानात पूर्वी केवळ शासकीय शाळा होत्या. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचा शैक्षणिक विकासातील योगदान पाहून राजस्थानात खासगी संस्थांना शिक्षण क्षेत्र खुले केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी एका जिद्दीतून भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज अनेक विद्याशाखा भारती विद्यापीठ संपूर्ण देशात चालवत आहेत. विद्यापीठाने संशोधनावर खूप लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाकडून काम सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्येयानुसार केवळ पदवीधर बनविणे नव्हे तर चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यापीठाकडून चालते. महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणारे विकासात योगदान देऊ शकतील असे युवा घडविण्याचे काम येथे चालते, असेही डॉ. कदम म्हणाले.

यावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांना मानपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला.

प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

‘विचार भारती’ या मुखपत्राच्या विशेषांकाचे आणि ‘विश्वभारती’ या इंग्रजी बुलेटिनचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
0000

‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम

मुंबई, दि. १० : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंगळवार दि. ९ मे रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ मुक्त मुंबई संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

अमली पदार्थ मुक्त मोहिमेबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. मुंबई पोलिस, नार्कोटेक्स् सेल यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईबाबत यावेळी माहिती देण्यात आली. अमली पदार्थ बाळगल्याबद्दल गेल्या दहा दिवसात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये २५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६३ जणांना अटक करण्यात आली आहे तर सुमारे २ कोटी ५९ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत २२ जणांना अटक केली असून २ कोटी ६० लाख ४२ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेमार्फत केलेल्या कारवाईत २ कोटी २४ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण ७ कोटी ४४ लाखांचा माल जप्त झाला आहे.

गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमली पदार्थ विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे १३७१ पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी ७३९१ जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील ६२६३ हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील २८१९ हॉकर्स विरुद्ध देखील या मोहिमेंतर्गत कारवाई झाली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम घेण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उद्धवस्त करावे. मुंबई महानगरातील विद्यालयांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून अमली पदार्थ विरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थांचा पुरवठा रोखला पाहिजे त्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थ मुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का याबाबत दक्ष राहून कारवाई करावी. जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यासंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त श्री. फणसळकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या सुमारे ७ हजार शिक्षकांचे या मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचे श्री. फणसळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १०- सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घर म्हणजे म्हाडा हे नाते सामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. आजच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा. जेणेकरून त्यांचा गृहप्रवेश लवकर होऊ शकेल. आपण लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे दीड लाख, आणि राज्य शासनाचे एक लाख अनुदान त्यासाठी मिळणार आहे.
या माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, दिवस असो किंवा रात्र, चोवीस तास राबणारे सरकार अशी आमची ओळख आहे.
नागरिकांची कामे त्वरीत व्हावीत आणि त्यांना खेटे मारावे लागू नयेत, यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यांत मुख्यमंत्री सचिवालये सुरु केली आहेत. शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. मंत्रालयात त्रास होऊ नये म्हणून अद्ययावत सेन्ट्रल रजिस्ट्री सुरू केली आहे. या माध्यमातून समाजाभिमुख, लोकाभिमुख कारभार आम्ही करत आहोत.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेघरांना मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात रिमोटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डिग्गीकर यांनी केले तर आमदार श्री. कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

000

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. १०: पुण्यातील दूध डेअरी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ‘व्हिटॅमिन ए आणि डी सह दुधाचे दृढीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ, सहायक आयुक्त अनिल गवते, राजेंद्र काकडे, दुग्ध संवर्धन तांत्रिक तज्ज्ञ विवेक अरोरा आदी उपस्थित होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने मुख्य खाद्यपदार्थ गहू, तेल, दूध, दुहेरी फोर्टिफाइट मीठ आणि तांदूळ यांच्या फोर्टिफिकेशनसाठी मानके परिभाषिक केली आहेत. ही मानके भारत सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये राजपत्रित केली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सह आयुक्त श्री. भुजबळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाने राज्यात दूध फोर्टीफिकेशनला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून या संदर्भात विकास एजन्सी ही केएचपीटी आणि जीएआयएन सोबत भागीदारी करत आहे. त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये फूड फोर्टिफिकेशनबद्दल जाणीवजागृती केली आहे. याच अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या ३३ दूध डेअरीनी राज्यातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूध करण्याच्या हेतूने दूध फोर्टीफिकेशनचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवले आहे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

१३०० कोटी रुपयांचे कोलते-पाटील यांचे पुण्यात दोन नवीन निवासी प्रकल्प सुरू

• पुण्यातील वाघोली येथे ५ एकर जमिनीचे संपादन- प्रकल्पाची अंदाजे ७.५ लाख चौ. फूट ची विकसनक्षमता आणि ४०० कोटी रुपयांची महसूल क्षमता.

• एनआयबीएम रोड, पुणे येथे संयुक्त उपक्रम प्रकल्पात प्रवेश – प्रकल्पाची अंदाजे ११.५ लाख चौ. फूट ची विकसनक्षमता आणि ९०० कोटी रुपयांची महसूल क्षमता.

पुणे, १० मे २०२३: एकूण अंदाजे विक्रीयोग्य क्षेत्रफळ १.९ दशलक्ष चौरस फूट आणि १,३०० कोटी रुपयांची अग्रणी क्षमता यांसह मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आपले स्थान वाढवत असलेली पुण्यातील अग्रगण्य बांधकाम व्यवसाय कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL) ने पुण्यात दोन नवीन निवासी विकास प्रकल्पांवर स्वाक्षरी केली आहे. हे प्रकल्प पुण्यातील वाघोली  (नगर रोड) आणि एनआयबीएम रोड (कोंढवा) येथे आहेत. हे पाऊल पुण्याच्या उच्च संभाव्य मायक्रो मार्केटमध्ये आपले नेतृत्व स्थान आणखी मजबूत करण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रयत्नांना सूचित करते.

प्रकल्प तपशील:

अनु क्र.पुणेव्यवहार प्रकारविक्रीयोग्य क्षेत्र (लाख चौ. फूट)अग्रणी क्षमता (कोटी रुपयांत)
१.    वाघोली  (नगर रोड)आऊटराइट~७.५~४००
२.    एनआयबीएम रोड (कोंढवा)संयुक्त प्रकल्प~११.५~९००

Note: Based on current estimates

१.     वाघोली (नगर रोड) प्रकल्प – एमआयजी निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी कोलते-पाटील यांनी पुण्यातील सुनियोजित मायक्रो मार्केट असलेल्या वाघोली (नगर रोड) येथे ५ एकर जमीन संपादित केली आहे. प्रमुख आयटी/आयटीईएस हब आणि औद्योगिक प्रदेशच्या जवळ, पुणे शहराच्या इतर भागांशी अखंड कनेक्टिव्हिटी आणि सुविकसित सामाजिक पायाभूत सुविधांमुळे वाघोली हे पसंतीचे निवासी ठिकाण म्हणून झपाट्याने विकसित झाले आहे. वाघोलीत ५ दशलक्ष चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्र विकसित आणि वितरित केल्याने मायक्रो-मार्केटमधील ग्राहकांच्या गरजांची कंपनीला सखोल माहिती आहे.

२.     एनआयबीएम रोड (कोंढवा) प्रकल्प – कोलते-पाटील यांनी एनआयबीएम रोड, कोंढवा येथे प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी संयुक्त उपक्रमात प्रवेश केला आहे. हे मायक्रो-मार्केट निसर्गरम्यता, मजबूत पायाभूत सुविधा आणि सुलभ कनेक्टिव्हिटी यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. त्यामुळे ते ग्राहक विभागांमध्ये लोकप्रिय स्थान बनले आहे. ५ दशलक्ष चौ.फूट पेक्षा जास्त प्रकल्प विकसित आणि वितरित केल्यामुळे, कोलते-पाटील यांचा या मायक्रो-मार्केटमध्ये मजबूत ठसा आहे.

या नवीन घडामोडींवर भाष्य करताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे ग्रुप सीईओ श्री. राहुल तळेले म्हणाले, “पुणे ही आमची सुरुवातीपासूनच प्रमुख बाजारपेठ आहे आणि आम्ही शहराच्या क्षमतेबद्दल आशावादी आहोत. मजबूत शहरी पायाभूत सुविधा, जीवनमानाच्या गुणवत्तेची उच्च क्षमता, राहणीमानाचा वाजवी खर्च आणि वाढत्या दरडोई उत्पन्नाला विविध क्षेत्रातील मजबूत रोजगाराच्या संधींचे पाठबळ यांनी पुण्याच्या वाढत्या निवासी बांधकाम व्यवसाय बाजारपेठेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये आम्ही आकर्षक ठिकाणच्या दोन नवीन प्रकल्पांवर स्वाक्षरी केली असून त्यामुळे पुण्याच्या उच्च संभाव्य सूक्ष्म बाजारपेठांमध्ये खोलवर स्थान निर्माण करण्यास अनुमती मिळाली आहे. शहरातील कामकाजाच्या बाबतीत तीन दशकांहून अधिक काळ तयार केलेल्या आमच्या मजबूत ब्रँड इक्विटीचा लाभ घेत आम्ही हे व्यवहार कमी आगाऊ गुंतवणुकीसह संरचित केले आहेत. भांडवलावरील परताव्याच्या अनुकूलतेच्या दृष्टीकोनातून कमी भांडवलाची तीव्रता राखून बाजारपेठांमध्ये वाढ घडवून आणण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे. आम्ही पुण्यातील आमचे अग्रणी स्थान मजबूत करण्यासाठी उत्सुक असून आमच्या सर्व भागधारकांसाठी हे शाश्वत मूल्यात परावर्तित करताना बघत आहोत.”

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई-एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होईल. आमचे सरकार स्थिर आहे, असा दावा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आताच अंदाज वर्तवणे शक्य नाही. मात्र, आपण आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या साऱ्या कृतीला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आता या प्रकरणाचा निकाल उद्या सुनावला जाणार आहे. तसे संकेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिवाय साऱ्या देशाचे या निकालाकडे लक्ष आहे.

देवेंद्र फडणवीस याबद्दल म्हणाले की, आम्ही आशावादी आहोत. कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपण थांबले पाहिजे. त्याकरिता खूप त्याच्यावर स्पेक्युलिकेशन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्ट हे अॅपेक्स कोर्ट आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. त्याच्यावर कुठलाही अंदाज व्यक्त करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील, अशी चर्चा असल्याचे फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, माफ करा, पण शब्द वापरतो. हा मुर्खांचा बाजार आहे. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे कशाकरिता राजीनामा देतील, काय कारण आहे, काय चूक केलीय त्यांनी. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि मी दाव्याने सांगतो की, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होणार. सरकार एकदम स्थिर असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

भविष्य निर्वाह निधीची थकवलेली रक्कम बेस्ट व्यवस्थापनाने महिन्याभरात जमा करावी – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. 10 : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त  झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे कॉन्ट्रक्टर मे. एम.पी. इंटरप्रायजेस व सब कॉन्ट्रॅक्टर किश कॉर्पोरेट व इतर यांनी एक हजार कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, इएसआयसीची रक्कम भरली नसल्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी संबंधितांना निर्देशित केले.

यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त संतोष देशमुख, बेस्टचे उपमुख्य व्यवस्थापक सुनील जाधव, सल्लागार पी.बी.खवरे, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या क्षेत्रीय आयुक्त पूजा सिंह, अमित वशिष्ठ, व्यवसाय कर उपायुक्त बालाजी जंगले, यांच्यासह  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.खाडे म्हणाले की, कामगारांना वेळेवर वेतन आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तरतुदी संबंधितांनी कटाक्षाने केल्या पाहिजेत. कंत्राटदार नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करत आहे का याची खातरजमा बेस्टने केली पाहिजे होती,  मात्र बेस्ट व्यवस्थापनाने ही खबरदारी घेतली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची मुख्य आस्थापना म्हणून भविष्य निर्वाह निधीची तसेच राज्य कामगार विमा (इएसआयसी) ची कंत्राटदारांनी जमा न केलेली  रक्कम  संबंधित कार्यालयात महिन्याभरात भरावी तसेच नियमांचे पालन केले नसल्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशित केले. तसेच बेस्टने जर एका महिन्याच्या आत पैसे दिले नाही तर  नियमानुसार पीएफ विभागाने बेस्ट वर कारवाई करावी. यात दिरंगाई होत असल्यास कामगार विभागांने संबंधितांवर उचित कारवाई करावी. तसेच कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचे वेतन वेळेत मिळाले पाहिजे, याची  खबरदारी सर्व आस्थापनांनी घ्यावी. तसेच राज्यात इतर ठिकाणी कंपनी, कार्यालय आस्थापना नियमितपणे कामगारांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने नियमाप्रमाणे आवश्यक निधी भरत असल्याची खातरजमा भविष्य निर्वाह निधी विभागाने करावी, असे मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी सूचित केले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या देशाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा

नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उद्या जर या प्रकरणी फैसला झाला तर कुणाच्या पारड्यात निकाल जाईल हे लवकरच समजणार आहे.

दोन महत्वाचे निकाल उद्या लागणार आहे असे सांगण्यात आले आहे तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे लिस्टींग होईल. त्यातून उद्या नेमके कोणते प्रकरण कोर्ट हाताळेल हे आज सायंकाळी स्पष्ट होईल.

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदर राहुल शेवाळे हे दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे व शिंदे गटाचे नेते दक्ष झाले असून दिल्लीकडे ते प्रयाण करीत आहेत.

या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

  • एकनाथ शिंदे
  • संदीपान भुमरे
  • अब्दुल सत्तार
  • तानाजी सावंत
  • संजय शिरसाट
  • यामिनी जाधव
  • चिमणराव पाटील
  • भरत गोगावले
  • लता सोनावणे
  • रमेश बोरणारे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • महेश शिंदे
  • अनिल बाबर
  • संजय रायमुलकर
  • बालाजी कल्याणकर​

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरातील दत्तमहाराजांची मूर्ती १२५ वर्षांनंतरही उत्तम स्थितीत 

मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी मूर्तीचे अभ्यासपूर्ण परिक्षण
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी दत्तमहाराजांच्या संगमरवरी मूर्तीचे सखोल परीक्षण करण्यात आले. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी हे परीक्षण केले असून १२५ वर्षांनंतरही ही संगमरवरी मूर्ती उत्तम स्थितीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे डॉ.गो.बं.देगलूरकर यांचा मंदिरात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष युवराज गाडवे उप उत्सवप्रमुख म्हणून सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे हे उपस्थित होते. 
डॉ.गो.बं.देगलूरकर म्हणाले, संगमरवरी मूर्तीचे पूजन व देखभाल करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दत्तमहाराजांच्या मूर्तीची १२५ वर्षात झीज झालेली नाही. प्रत्यक्षात संगमरवरी मूर्ती ठिसूळ असते. त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये कालांतराने मूर्ती बदलण्यात आल्याचे अनुभव आहेत. 
मात्र, अजूनतरी दत्तमहाराजांच्या मूर्तीची झीज झालेली दिसत नाही. मूर्तीची योग्य काळजी घेतल्यास २०० ते ३०० वर्षे संगमरवरी मूर्ती आहे तशीच राहते. मुख्य मूर्तीवर पंचामृत अभिषेक करू नयेत. त्याऐवजी उत्सवमूर्तीवर धार्मिक विधी करावेत. तसेच हार व फुलांचा दैनंदिन वापर ही मर्यादित असावा, असे मत त्यांनी नोंदविले. तसेच दैनंदिन पूजा एकदाच करून दिवसभरात मूर्तीशी फार संपर्क करू नये, अशा सूचना त्यांनी केल्या.

नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई : नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याची मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज 909 तक्रारी दाखल झाल्या असून 132 तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचेदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

अंधेरी गुंदवली येथील  के ईस्ट वॉर्ड येथे  दिनांक 10 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  31 मे 2023 पर्यंत  दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

“त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ” आव्हाडांना फडणवीसांचा टोला

नागपूर- धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून ‘द केरला स्टोरी’  चित्रपट तयार करण्यात आला आहे.असे सांगत जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी चित्रपट पाहिल्यावर म्हणेन,” असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला.

द केरला स्टोरी’ चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. भाजपाकडून या चित्रपटाचं जोरदार समर्थन होत आहे, तर विरोधकांकडून हा राजकीय स्वार्थासाठी द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका होत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांबरोबर जाऊन हा चित्रपट पाहिला. ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यावर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.”जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी चित्रपट पाहिल्यावर म्हणेन,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला.

“कायदा आहे आणि तो कडक करावा लागेल. मात्र, त्याबरोबर समाजाचं एक जाळं तयार करावं लागेल. कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकेल असं नाही. म्हणून जागरुकता आणणंही महत्त्वाचं आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रस्तावित चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३ भुयारी मार्गाच्या स्थानकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा

मुंबई, दि. १० :  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो ३ चा हा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनद्वारे तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो-३ च्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला  प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे.  या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास  व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

  • कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे
  • या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
  • या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.
  • २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.
  • इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.
  • सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल.
  • या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी

  • एकूण स्थानके या मार्गावर १० स्थानके असून त्यापैकी ९ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
  • अंतर १२.४४ किमी
  • दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे
  • पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या ९ गाड्या
  • मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२% काम पूर्ण
  • एकूण ९७.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण
  • एकूण ९३% स्थानक बांधकाम पूर्ण
  • एकूण ६५.१% प्रणालीची कामे पूर्ण
  • रेल्वे रुळाचे एकूण ८६.३% बांधकाम पूर्ण
  • सेवेची चाचणी ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.

दुसरा टप्पा :  बीकेसी ते कफ परेड

  • एकूण स्थानके १७ .
  • अंतर २१.३५ कि.मी.
  • दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे
  • दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या
  • मेट्रो ३ मार्गाचे (दुसऱ्या टप्प्यातील) एकूण ७६.९% काम पूर्ण
  • एकूण ९५.३% प्रकल्प बांधकाम पूर्ण
  • एकूण ८८.३% स्थानक बांधकाम पूर्ण
  • एकूण ४२.४% प्रणालीची कामे पूर्ण
  • रेल्वे रुळाचे एकूण ४६.६% बांधकाम पूर्ण
  • हा मार्ग अंदाजे जून २०२४ मध्ये सुरू होणार
  • मेट्रो ३ मार्गाचे एकूण ८१.५% काम पूर्ण
  • एकूण ९२.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण
  • ८९.८% स्थानकांचे बांधकाम पूर्ण
  • ५०.९% प्रणालीची कामे पूर्ण
  • रेल्वे रुळाचे ६१.१% बांधकाम पूर्ण
  • भुयारी मार्गाचे १००% काम पूर्ण
  • ४२ ब्रेकथ्रू संपन्न
  • डेपोचे ६३% बांधकाम पूर्ण
  • सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज
  • आरे डेपोमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहेत. डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामे, ऑपरेशन कंट्रोल सेंटर,ओव्हरहेड इक्विपमेंट सिस्टम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंगची.कामे, स्टॅबलिंग लाइन, ऑक्झिलरी सबस्टेशन, वॉश प्लांट, रेल्वे रुळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

मेट्रो-३ च्या गाड्या

  • आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल; अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून दि. १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.

मेट्रो मार्ग-३ चा दक्षिण मुंबईतील विस्तार, कफ परेड ते नेव्ही नगर

  • एकूण लांबी – २.५ किमी
  • स्थानकाची संख्या १ (नेव्ही नगर स्थानक)
  • स्थानकाचे ठिकाण- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च (टीआयएफआर) जवळील डॉ. होमी भाभा रोड
  • अंदाजे खर्च साधारण २४०० कोटी
  • या भागातील पुनर्विकासाचा विचार करता नेव्ही नगरमधील अंदाजे ५० हजार लोकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होईल.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सन २०२१ आणि २०२२ चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी महासंचालक हेमराज बागुल यांच्यासह विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव यांची उपस्थिती होती.

शासकीय योजनांच्या प्रगतीची, राज्याच्या विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विकास योजना, त्यांची अंमलबजावणी, या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही भूमिका जबाबदारीने पार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन मान्यता देणे आवश्यक आहे.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे पुनर्गठन तसेच अधिस्वीकृती समितीचा लवकरात लवकर शासन निर्णय काढला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. मुद्रित माध्यमांचे महत्त्व कमी झाले नसल्याचे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचेही महत्त्व आहे. आता समाजमाध्यम दुधारी तलवारीसारखे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते विविध विषयाला वाचा फोडत आहे. पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी  सरकारची आहे. त्यासाठी जे शक्य आहे ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांना जाहीर झालेला सन २०२१ चा कृ.पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार श्री. केतकर यांच्या अनुपस्थितीत अनिकेत जोशी यांनी स्वीकारला. सन २०२२ चा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यामध्ये सन २०२१ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै. बीड रिपोर्टर, बीडचे शेख रिजवान शेख खलील, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) न्युज १८ लोकमत, मुंबईचे विलास बडे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.भास्कर, मुंबईचे विनोद यादव यांना प्रदान  करून गौरविण्यात आले. तर सन २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) , गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम ) साम टिव्ही मुंबईच्या ब्युरो चिफ रश्मी पुराणिक, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) मुंबईचे किशोर आपटे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पुरो यांनी केले. सूत्रसंचालन रिताली तपासे आणि राजेंद्र हुंजे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष महेश पवार यांनी मानले.

फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद साडेसहा हजार हरकतीवर सोमवारपासून सुनावणी

पुणे: फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर तब्बल साडेसहा हजार हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (१५ मे) सुनावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर येथे महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे वगळण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना चालू वर्षी ३१ मार्च रोजी प्रसृत केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. महिनाभरात जिल्हा प्रशासनाकडे साडेसहा हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून त्या नोंदविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याकडून सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेकडून सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या हरकतींवर नियुक्त अधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे आणि डॉ. देशमुख यांच्याकडून तो शासनाला सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी साधारण एक ते सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून या अहवालावर विचार करून फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्याबाबची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रकियेनंतर फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पुण्यात पाणी कपातीचा निर्णय जाहीर:दर गुरुवारी पाणी बंद

कपातीतून १५ दिवसांचे पाणी बचतीचा दावा

पुणे : यंदाच्या वर्षी सर्वसाधारण पाऊस होण्याचा तसेच पावसाळ्यात एल निनो सक्रिय असण्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्यानुसार येत्या १८ मेपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे एका महिन्यात पाव अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची बचत होऊ शकेल. हे पाणी पुण्याची साधारणपणे पाच दिवसांची तहान भागवू शकेल.महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. यंदाचा पावसाळी हंगाम सर्वसाधारण पावसाचा राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाळ्यात एल निनो सक्रिय असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. परिणामी, महापालिकेने १५ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे.पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला दररोज १४७० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी लागते. मात्र, पुण्यापुढील गावांसाठी सोडले जाणारे पाणी, कडक उन्हामुळे होणारे बाष्पीभवन विचारात घेता पाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक बनले असून, १८ मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. पुढील निर्णयापर्यंत ही कपात लागू राहील. महिन्यातील चार दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास महिन्याला पाव टीएमसी पाण्याची बचत होईल. हे पाणी पुणेकरांना पिण्यासाठी चार ते पाच दिवस पुरेल, असे पावसकर यांनी स्पष्ट केले.

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

धरण            पाणीसाठा (टीएमसी)    टक्के

टेमघर           ०.२४                   ६.४६

वरसगाव         ५.८२                 ४५.३६ टक्के

पानशेत          २.६०                 २४.४० टक्के

खडकवासला    १.१२                ५६.८२ टक्के

एकूण पाणीसाठा ९.७८                 ३३.५३ टक्के

यंत्रणा सज्ज

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपात केल्यास दुसऱ्या दिवशाची पाणीपुरवठाही विस्कळित होतो, असा दावा काही लोकप्रतिनिधींनी केला होता. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा बंद राहिल्याने जिथे हवा अडकून अडथळे निर्माण होतात, अशा २० ठिकाणी नवे एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. तर पाणीकपातीच्या दुसऱ्या दिवशी टँककसह पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवल्या जातील, असे अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

आपत्कालीन आराखडा

सर्वसाधारण पावसाच्या व एल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, केंद्र सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन आपत्कालीन आराखडा तयार करत आहे, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.