मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी मूर्तीचे अभ्यासपूर्ण परिक्षण
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी दत्तमहाराजांच्या संगमरवरी मूर्तीचे सखोल परीक्षण करण्यात आले. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी हे परीक्षण केले असून १२५ वर्षांनंतरही ही संगमरवरी मूर्ती उत्तम स्थितीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे डॉ.गो.बं.देगलूरकर यांचा मंदिरात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष युवराज गाडवे उप उत्सवप्रमुख म्हणून सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे हे उपस्थित होते.
डॉ.गो.बं.देगलूरकर म्हणाले, संगमरवरी मूर्तीचे पूजन व देखभाल करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दत्तमहाराजांच्या मूर्तीची १२५ वर्षात झीज झालेली नाही. प्रत्यक्षात संगमरवरी मूर्ती ठिसूळ असते. त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये कालांतराने मूर्ती बदलण्यात आल्याचे अनुभव आहेत.
मात्र, अजूनतरी दत्तमहाराजांच्या मूर्तीची झीज झालेली दिसत नाही. मूर्तीची योग्य काळजी घेतल्यास २०० ते ३०० वर्षे संगमरवरी मूर्ती आहे तशीच राहते. मुख्य मूर्तीवर पंचामृत अभिषेक करू नयेत. त्याऐवजी उत्सवमूर्तीवर धार्मिक विधी करावेत. तसेच हार व फुलांचा दैनंदिन वापर ही मर्यादित असावा, असे मत त्यांनी नोंदविले. तसेच दैनंदिन पूजा एकदाच करून दिवसभरात मूर्तीशी फार संपर्क करू नये, अशा सूचना त्यांनी केल्या.