पुणे-
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले.कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. त्यामुळे कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावेळी झालेल्या सुनावणीनंतर विशेष न्यायधीश एस. आर. नावंदर यांनी कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- रॉ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली माहिती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटाॅप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.