जगातील सर्व देशांमध्ये ” इंटरनेटचा ” मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर वाढत आहे. गेल्या काही वर्षात भारतानेही त्यात मोठी मजल मारली असून आपण जागतिक पातळीवर इंटरनेट धारकांची ” उप राजधानी” बनत आहोत. मात्र चीन त्यात अद्यापही आघाडीवर असल्याने ते याबाबत जगाची राजधानी बनले आहेत. त्यामुळे भारताबरोबरच जागतिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या क्षमतेचा हा मनोरंजक मागोवा.
भारताची आजची लोकसंख्या 141 कोटींच्या घरात आहे. त्यातील सुमारे 75.9 कोटी लोक किमान एकदा तरी इंटरनेटचा वापर करतात. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ 54 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महिन्यातून एकदा तरी इंटरनेटचा वापर करत आहेत. गेल्या वर्षात म्हणजे २०२२ या वर्षांमध्ये भारतातील इंटरनेट धारकांच्या संख्येत तब्बल दहा टक्के वाढ झाली असून आगामी दोन वर्षात म्हणजे 2025 मध्ये भारतातील 90 कोटी जनता इंटरनेटचा वापर करण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर पाहायला गेले तर भारतात ज्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे ते लक्षात घेता भारत हा इंटरनेट धारकांची “उपराजधानी” बनत आहे.
भारतापेक्षा आज चीनमध्ये सर्वाधिक इंटरनेट धारकांची संख्या असून ती सध्या 105 कोटींच्या घरात आहे. आपण जसे “गुगल” माध्यम इंटरनेट साठी वापरतो तसेच चीनमध्ये जवळजवळ 82 टक्के लोक त्यांचे “वुईचॅट” चा वापर करतात. चिनी इंटरनेट धारक दररोज साधारणपणे सहा तास २५ मिनीटे इंटरनेटचा वापर करतात. त्याखालोखाल अमेरिकेत 32 कोटी तर इंडोनेशियामध्ये 21 कोटी इंटरनेट धारक आहेत.अन्य देशांमध्ये ब्राझील 18 कोटी, रशिया १३ कोटी ,जपान दहा कोटी, इजिप्त एक कोटी, व्हिएतनाम एक कोटी, मेक्सिको एक कोटी, नायजेरिया 12 कोटी अशी विविध देशातील इंटरनेट धारकांची संख्या आहे.
जगात आज 500 कोटींच्या घरात इंटरनेट धारक आहेत. इंटरनेटच्या माध्यमातूनही विविध सोशल मीडिया हाताळला जातो. त्यात सर्वाधिक वापर फेसबुकचा केला जात असून तीस कोटींपेक्षा जास्त लोक दररोज त्याचा वापर करतात. त्यात 53 टक्के अमेरिकन लोकांचा समावेश आहे.त्या खालोखाल ट्विटर चा वापर केला जातो. त्या खालोखाल यूट्यूबचा वापर करणाऱ्यांची संख्या 25 कोटींच्या घरात असून व्हॉट्सअप चा वापर करणारे वीस कोटी ग्राहक आहेत. इन्स्टाग्रामचेही जवळपास तेवढेच ग्राहक असून त्यानंतर चीनमधील” वुई चॅट” चा वापर केला जातो. अमेरिकेत दररोज दहा कोटी अमेरिकन फेसबुकचा दररोज वापर करतात.
जगातील वादग्रस्त “ट्विटर” या सोशल मीडियाचा वापर अमेरिकेत सर्वाधिक केला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यात आघाडीवर असून त्यांचे जवळजवळ साडेतेरा कोटी फॉलोअर्स म्हणजे पाठीराखे आहेत. त्या खालोखाल एलन मस्क यांचे 12.7 कोटी पाठीराखे तर जस्टिन बायबर याचे 11 कोटी; कॅटपेरी दहा कोटी; रिहाना एक कोटी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही जवळपास 86 लाख फॉलोअर्स आहेत.
भारतामध्ये इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) नावाची संस्था असून त्यांनी कंतार (KANTAR ) या जगातील अग्रगण्य बाजारपेठ संशोधन संस्थेच्या नुकतीच भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची पहाणी केली. हा अहवाल “इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022” म्हणून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये खूप महत्वाचे निष्कर्ष हाती आले आहेते. भारतात शहरी भागात इंटरनेटचा जास्त वापर केला जातो असे स्पष्ट झाले असले तरीही ग्रामीण भारतामध्ये इंटरनेटचा प्रसार झालेला तेवढ्याच वेगाने होताना दिसत आहे. शहरी व ग्रामीण भागात इंटरनेट धारकांची संख्येत फार मोठा फरक दिसत नाही. ग्रामीण भारतामध्ये जवळजवळ 71 टक्के लोकसंख्या म्हणजे 40 कोटी जनता इंटरनेटचा वापर करत आहे आणि त्यात 2022 मध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र शहरी भारतामध्ये इंटरनेट धारकांचा वापर तुलनात्मक रित्या कमी असून सध्या 36 कोटी जनता इंटरनेटचा वापर करत आहे. शहरी भागात साधारणपणे गेल्या वर्षी सहा टक्के वाढ झालेली दिसली. विविध राज्यांचा विचार करता गोव्यामध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे 70 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत असून बिहारमध्ये मात्र केवळ 32 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे.
इंटरनेटचा वापर करण्याऱ्यांमध्ये आजही पुरुषांची संख्या जास्त असून एकूण इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येपैकी 54 टक्के पुरुष इंटरनेटचा सातत्याने वापर करत आहेत. तर 46 टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात. मात्र 2022 या वर्षांमध्ये महिला वापरकर्त्यांच्या संख्येत त्यात 57 टक्के वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. दोन वर्षांमध्ये महिलांची संख्या 65 टक्क्यांच्या घरात जाईल असा एक अंदाज आहे. त्यामुळे इंटरनेट धारकांच्या एकूण संख्येमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचाही मोठा वाटा असून २०२५ मध्ये महिला वापरकर्त्याची संख्या वाढेल असे अनुमान काढता येईल. इंटरनेटचा वापर विविध उपकरणांच्या माध्यमातून केला जातो. त्यात मोबाईलच्या माध्यमातून सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जात आहे . याशिवाय गेल्या वर्षभरात टॅबलेट किंवा स्ट्रीमिंग डिव्हाइस, स्मार्टफोन किंवा स्मार्ट डिव्हाइस यांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढताना दिसत आहे. डिजिटल एंटरटेनमेंट ,डिजिटल कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया या सर्व क्षेत्रांमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. किंबहुना सोशल मीडियाच्या क्षेत्रात गेल्या वर्षात त्यात 51 टक्के वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातही गेल्या वर्षभरात 13 टक्के वाढ झाली असून सध्या भारतात 33.8 कोटी लोकसंख्या त्याचा वापर करीत असून यातील 36 टक्के लोक ग्रामीण भारतातील आहेत. डिजीटल पेमेंटमध्ये “यूपीआय ” च्या माध्यमातून जवळजवळ ९९ टक्के धारक डिजिटल पेमेंट करताना दिसत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून ई-कॉमर्स करण्याचे प्रमाणही भारतात चांगल्या प्रमाणावर वाढत आहे.
जागतिक पातळीवरच एकंदरीत इंटरनेटच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाचा वापर सातत्याने वाढत आहे. चीन अमेरिका यांच्या जोडीने आता भारतानेही त्यात मोठ्या प्रमाणावर मजल मारलेली आहे.
लेखक:प्रा.नंदकुमार काकीर्डे
*(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)