पुणे : प्यार हुआ इकरार हुआ, अजा सनम मधुर चांदनी में हम, गोरे गोरे ओ बाकी छोरे ,दिल की गिरह मे, बचपन के दिन भूला ना देना, तुझी चाल तुरुतुरु उडते केस भुरुभुरु… अशा हिंदी आणि मराठी संगीताचा सुवर्णकाळ वादकांनी आपल्या अप्रतिम वादनाने जागा केला. तसेच काही पाश्चात्य फोक संगीतील रचनांसह कलाकारांच्या अकॉर्डियन वादनाने एक प्रकारे संगीत रसिकांची सायंकाळ सुरेल झाली.
जागतिक अॅॅकॉर्डियन दिनानिमित्त ‘अॅन इव्हिनिंग वीथ अॅॅकॉर्डियन’ हा अॅॅकॉर्डियन वादनाचा कार्यक्रम पुण्यातील अकॉर्डियन वादक अमित वैद्य यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कोथरुडमधील बालशिक्षण मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. प्रसाद जोशी, अबुझार मॅनेजर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अमित वैद्य यांसह गजानन नवाथे (पुणे), रवी बेन्ने (बंगळुरु), सागर साठे (मुंबई) यांनी देखील अकॉर्डियन वादन करून रसिकांची मने जिंकले. त्यांना पद्माकर गुजर व विनोद सोनावणे यांनी साथसंगत केली. डॉ. केतकी वैद्य यांनी उत्तम निवेदनाची साथ देऊन कार्यक्रमाची लज्जत वाढवली.
ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे ह्यांचा ही सत्कार करण्यात आला.. त्यानंतर कलाकारांनी अकॉर्डियन वादनाची सुरेल मैफल सुरू केली. अमित वैद्य यांनी श्री ४२० या चित्रपटातील राज कपूर यांचे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आणि बन के पंछी गाये प्यार का तराना ही गाणी सादर करून रसिकांना अकॉर्डियन वादनाची अप्रतिम झलक दाखवली व रसिकांची मने जिंकली. त्यानंतर गजानन नवाथे यांनी ‘बडे हे दिल के काले’ आणि ‘मस्ती भरा है समा’ या गाण्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सागर साठे यांनी ‘गोरे गोरे ओ बाकी छोरे’ आणि ‘दिल की गिरह मे’ या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना बॉलीवूडच्या संगीत सुवर्णकाळाची सफर घडवली.
रवी बेन्ने यांनी पोलका या संगीत प्रकारची धून मधून पाश्चात्त्य फोक संगीताची मजा रसिकांना दिली तर त्यांनी ती पिगाल या फ्रेंच धून मधून युरोपियन संगीताची ही झलक रसिकांना आपल्या अकॉर्डियन वादनातून अतिशय तरलपणे दाखवून दिली.
अबिझार मॅनेजर म्हणाले, संगीत ही कोणतीही मर्यादा नसलेली भाषा आहे. या संगीताचा केवळ रसिकांचे मनोरंजन म्हणून उपयोग न होता देशाच्या आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून सर्वांना एकत्र आणण्यासाठी उपयोग होत आहे. त्यामुळेच संगीतकार आणि वादक हे एक प्रकारे दैवी देणगी लाभलेले आहेत.
‘भवरे की गुंजन है मेरा’, ‘बोले रे कठपुतली डोली’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’ अशा विविध प्रकारच्या अॅॅकॉर्डियनचा अंतर्भाव असलेली हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील गाणी, पाश्चात्य लोकसंगीत, अॅॅकॉर्डियन आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रयोग अशा विविध प्रकारांमध्ये कलाकारांनी अतिशय अप्रतिम सादरीकरण केले.