Home Blog Page 1474

सिंघम स्टाईलने महाराष्ट्रात आलेल्या KCR ला तेलंगणात दिला जोरदार धक्का,१२ आमदार कॉंग्रेसमध्ये दाखल .

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले

हैदराबाद-आषाढीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने अख्ख्या मंत्रिमंडळासह आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी सोमवारी सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे ६०० हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांनी रोड शो केला. राव इकडे शक्तिप्रदर्शन करत असताना भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे तेलंगणातील १२ माजी आमदार व मंत्र्यांनी त्यांना धक्का देत दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले. तेलंगणात विधानसभा निवडणूक ६ महिन्यांनी आहे. या पार्श्वभूमीवर राव यांना हा मोठा झटका आहे.पक्षफुटीमुळे केसीआर दिवसभर अस्वस्थ होते. मीडियाशीही फार बोलले नाहीत. त्यांचे चिरंजीव केटीआर एेनवेळी महाराष्ट्राचा दौरा रद्द करून तेलंगणात तळ ठोकून बसले होते.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते केसीआरचे सर्वेसर्वा, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गळाला लागले. त्यामुळे बीआरएस म्हणजे भाजपची बी टीम आहे, अशी संभावना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू झाली. त्यामुळे अजिबात न डगमगता केसीआर यांनी महाराष्ट्रात शिरकावाचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते सोमवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले.

सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार:मॅनहोलमध्ये उतरून सफाई करत होता कामगार,उपचारादरम्यान झाला मृत्यू

यूपीमध्ये 47 तर दिल्लीत 42 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जीव गमावला

मुंबई- एका व्यक्तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेज लाईन साफ ​​करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकर वाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी काल याबाबत माहिती दिली.37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर कार चालवणाऱ्या चालकाचे नाव विनोद उधवानी असे आहे. अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अपघातानंतर कांदिवली पोलिसांनी कार चालक आणि सफाई कंत्राटदाराला अटक केली. आरोपी चालकाविरुद्ध कलम 279, 196, 336 आणि 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे ड्रेनेज साफसफाई करताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याने ठेकेदार अजय शुक्ला याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी गेल्या वर्षी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये 92, 2018 मध्ये 67, 2019 मध्ये 116, 2020 मध्ये 19, 2021 मध्ये 36 आणि 2022 मध्ये 17 सफाई कामगारांचा मृत्यू झाला.केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यूपी, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये 40% स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यूपीमध्ये सर्वाधिक 47, दिल्लीत 42 आणि तामिळनाडूमध्ये 43 जणांचा मृत्यू झाला.याशिवाय हरियाणामध्ये 36, महाराष्ट्रात 30, गुजरातमध्ये 28, कर्नाटकात 26, पश्चिम बंगालमध्ये 19, पंजाबमध्ये 14 आणि राजस्थानमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई मनपा अधिकाऱ्याला मारहाण: 4 शिवसैनिकांना रात्री उशीरा पोलिसांकडून अटक

बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्यावर शिवसैनिक आक्रमक होतीलचआदित्य ठाकरे 

मुंबई-उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या भाषणानंतर सोमवारी शिवसैनिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंताला मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी चार शिवसैनिकांना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती. या प्रकरणी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मनपावर मोर्चा काढत जाब विचारला होता. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये मुंबईतील माजी नगरसेवक सदा परब, हाजी अलीम शेख, उदय दळवी, संतोष कदम या चौघांचा समावेश आहे. त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर सोमवारी एच-पूर्व महापालिका वॉर्ड कार्यालयामध्येच शिवसेना शाखा तोडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेवेळी शिवसेना नेते परब हे मनपा वॉर्ड कार्यालयात उपस्थित होते. २२ जून रोजी वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती.याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा असताना शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर शिवसैनिक आक्रमक होतीलच.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला होता. मनपा अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार रात्री उशिरा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी ए इनामदार यांनीही केले पी एम मोदींचे कौतुक 

माजी खासदार काकडे यांच्या संपर्क मोहिमेत कॉंग्रेस नेत्याचेही परिवर्तन …?

पुणे- कालपासून पुण्यातील सहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाशित केलेल्या ‘मोदी@9’ या पुस्तिकेच्या वाटपाच्या निमित्ताने काकडे यांनी जोरदार संपर्क मोहीम सुरु केली आहे . या संपर्क मोहिमेत त्यांनी मॉल पासून हातगाडीवाले, हॉटेल्स , विविध दुकानदार तेथील ग्राहक यांना भेटून प्रत्यक्षात पुस्तक वाटपाचे काम सुरु ठेवले आहे. या वेळी त्यांनी कॉंग्रेस मध्ये मोठ मोठी पदे भूषविलेले अल्पसंख्यांकांचे नेते म्हणविले जाणारे पी ए इनामदार यांचीही भेट घेतली यावेळी इनामदार यांनी त्यांचे स्वागत करून पुस्तिकाच केवळ स्वीकारली नाही तर मोदी यांच्या बाबत कौतुकाचे उद्गार देखील काढले , गेल्या ५० वर्षात एवढा कार्यक्षम पंतप्रधान झालेला नाही त्यांच्या समवेतच्या अन्य नेत्यांनी , कार्यकर्त्यांनी देखील मोदींच्या क्षमतेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींनी जेवढे नाव कमविले तेवढे कोणीच कमविले नाही असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या भागात काकडे यांचे स्वागतही झाले अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .पहा आजच्या दुपारनंतर रात्रीपर्यंतच्या या संपर्क मोहिमेची एक झलक ….

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला

0

मुंबई, दि. २६ : राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी बुधवार दि. २८ जून, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली होती. तथापि, बकरी ईद (ईद-उल-झुआ) हा सण गुरुवार, दि.२९ जून, २०२३ रोजी येत असल्याने बुधवार, दि. २८ जून, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता बकरी ईद (ईद-उल- झुआ) ची सार्वजनिक सुट्टी दि.२९ जून रोजी जाहीर करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये केलेल्या उपाययोजनांचा अहवाल त्वरित सादर करावा

विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उच्च व तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाच्या सोबत विधान भवनात घेतली बैठक

मुंबई, ता. 26 : राज्यभरात शाळा – महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींची संख्या, त्यांना राहण्यासाठी सुरक्षित वसतिगृहे आहेत काय, त्यांच्या आवारात असलेल्या विविध सुविधा, कर्मचारी यांची पुरेशी माहिती आहे का या आणि अशा विविध मुद्द्यांवर आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान भवनात बैठक घेतली. यापूर्वी घेतलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी काय झाली याचा अहवाल येत्या 3 जुलैपर्यंत सादर करावा. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठीच राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये समुपदेशन आणि तक्रार निवारण कक्ष स्थापन केले त्यांचे काय स्वरूपाचे काम सुरु आहे याबाबत त्वरित अहवाल सादर करावा. शाळांमध्ये शिक्षकांना गुड टच बॅड टच विषयांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येक शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देखील समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी आठवड्यात किमान दोन तास राखीव ठेवा, असे निर्देश आज त्यांनी शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किती आहेत याची माहिती घेण्यात यावी, त्यांनाही याबाबत सहभागी करून घ्यावे. जिथे अशा संस्थाच नसतील तिथे शासनाच्यावतीने पुढाकार घ्यावा, याकरिता शालेय शिक्षण, सामाजिक न्याय आणि महिला बाल कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा. अनेक शाळांमध्ये समाजकार्याचे शिक्षण घेतलेले शिक्षक आहेत त्यांना सहभागी करून घेण्यात यावे. विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनांची गंभीर दखल घेऊन त्यावर काय कार्यवाही झाली याचा अहवाल सादर करावा. सायबर गुन्हे, समाज माध्यमांवरून होणाऱ्या विविध तक्रारींची दखल घेण्यासाठी काय यंत्रणा आहे याबाबत अहवाल सादर करावा. राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी वसतिगृहांचे अधीक्षक, वार्डन, रेक्टर यांचे या विषयातील प्रशिक्षण लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने या विषयावर एक माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या आधारे सर्व शाळांमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. हे प्रशिक्षण राज्यस्तरावर कशा पद्धतीने सुरू आहे, त्यामध्ये किती शिक्षकांचा सहभाग होता तसेच विद्यार्थ्यांचेही यामध्ये प्रशिक्षण झाले का, याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली. या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नियमावली तयार करण्यात यावी.

या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव टि. बा. करपाते, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव हे. सु. पाठक, संचालक तंत्र शिक्षण डॉ. विनोद मोहितकर, शिक्षण आयुक्त कार्यालयाचे राजेश कंकाळ, राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या मनीषा पवार, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सोनाली परब आदी उपस्थित होते. उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला गती द्या- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांचे आदेश

पुणे दि. २६: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता (रिंग रोड ) हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून सर्व जमीनधारकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

प्रस्तावित पुणे चक्राकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, अधीक्षक अभियंता राहूल वसईकर, अपर जिल्हाधिकारी हणुमंत अरगुंडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्याच्या सकल राज्य उत्पादनामध्ये (जीएसडीपी) पुणे शहर व जिल्ह्याचे 15 टक्के इतके योगदान असते. प्रस्तावित रिंग रोड मुळे वेगवान मालवाहतुकीला गती मिळून यामध्ये अधिक भर पडेल. त्यामुळे या प्रकल्पासाठी गतीने भूसंपादन प्रक्रिया करुन प्रकल्पाला सुरूवात होणे महत्त्वाचे आहे. या प्रकल्पात मोबदल्याची रक्कमही समाधानकारक निश्चित करण्यात आलेली असल्याने संमती करारनामे व संमती निवाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे. संमती करारनाम्याद्वारे एकूण मोबदल्याच्या 25 टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला प्राप्त होऊ शकतो. या बाबीसह पारदर्शक पद्धतीने, लोकांच्या सर्व शंकांचे शंभर टक्के निराकरण करत व योग्य दस्ताऐवजीकरण करत काम केल्यास सर्व प्रक्रिया गतीने आणि जमीनधारकांच्या सहकार्याने पूर्ण होईल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गेल्या 2 वर्षात पुणे जिल्ह्यातील महसूल, भूसंपादन, भूमी अभिलेख, मूल्यांकन आदी सर्वच विभागांनी अतिशय वेगाने काम करुन मेट्रो मार्ग, पालखी मार्ग, पुणे- मीरज नवीन ब्रॉडगेज लाईन, लोणंद- बारामती नवीन रेल्वेमार्ग, चांदणी चौक एकात्मिक प्रकल्प आदींसाठी भूसंपादन प्रक्रियेत वाखाणण्याजोगे काम केले आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठीही आवश्यक नोटीसा देणे, गावनिहाय शिबीरे आयोजित करणे आदी प्रक्रिया राबवित जास्तीतजास्त संमतीनिवाडे होतील याकडे लक्ष द्यावे. या प्रक्रियेत ग्रामस्तरीय तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, भूकरमापक यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा, राज्य आणि देशाच्या प्रगतीमध्ये भर घालण्याऱ्या या प्रकल्पामध्ये आपला सहभाग असेल या अभिमानाच्या भावनेतून या भूसंपादन प्रक्रियेत काम करा, अशा शब्दात महसूल विभाग व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना डॉ. देशमुख यांनी आवाहन केले.

एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये येणारी 30 ते 40 टक्के वाहतूक बाहेरच्या बाहेरून मार्गस्थ होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, पुणेकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे आता पुणे (पश्चिम) चक्राकार मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यायची असून पूर्व चक्राकार मार्गासाठीच्या भूसंपादनाबाबतही वेळेत नियोजन करण्यात येईल. एमएसआरडीसी ही राज्यातच नव्हे तर देशात जमीनीचा सर्वाधिक मोबदला देणारी यंत्रणा, असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी एमएसआरडीसीचे अपर जिल्हाधिकारी श्री. अरगुंडे यांनी भूसंपादन प्रक्रिया आदीच्या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे, सहायक संचालक नगररचना अभिजीत केतकर, भूसंपादन (समन्वय) उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे आदी उपस्थित होते.

समर्थ रामदासांचे तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून मराठीत प्रकाशित !

साहित्य अकादमीतर्फे समर्थ रामदासांचे चरित्र २० भाषांत प्रकाशित होणार

पुणे :
 संत वाङ्मय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील मोनोग्राफ (लघुप्रबंध/तात्त्विक चरित्र) साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. हे पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत समाविष्ट झाले आहे. अशी पुस्तक-मालिका ही अकादमीतर्फे मूळ लेखन भाषेशिवाय एकूण २० भाषांमध्ये केली जाते. त्यामुळे हे पुस्तकही २० भाषेत जाणार आहे !
पुस्तकाच्या लेखिका मनीषा बाठे यांनी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

 समर्थ रामदासांचे विचार, जीवनकार्य, संप्रदाय,भारत-भ्रमण, दासबोध आदी ग्रंथनिर्मिती यांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आल्याने ते महत्त्वाचा दस्तावेज ठरले आहे. 
 साहित्य अकादमीने २०२० मध्ये या विषयाच्या लेखनासाठी मनीषा बाठे यांची निवड केली होती, सदर सैद्धांतिक प्रबंध समीक्षणादी प्रक्रियेनंतर ३ वर्षांनी प्रकाशात येत आहे. याआधी साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत मराठीतील ज्ञानदेव, नामदेव, केशवसुत व दत्तकवी आदींबाबत मोनोग्राफ पूर्वप्रसिद्ध आहेत. आता याच मालिकेत समर्थ रामदासांचे तत्त्वज्ञान प्रथमच प्रकाशित होत आहे. समर्थांचे हे तात्त्विक चरित्र ९६ पानी व अंदाजे २९ हजार शब्दांचे आहे.
‘४०० वर्षे अस्तित्वात असलेल्या संप्रदायाचा १८५२पासून उपलब्ध असलेला प्रकाशित वाङ्मयीन इतिहास आणि एकूण ४०० वर्षांचा संप्रदायाचा मागोवा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदासांच्या जीवनकार्यासोबत मध्ययुगीन हस्तलिखित साधनांचा संदर्भ, रामदासांची तपश्चर्या,लेखनारंभ ते अनुयायांचे शिक्षण, संप्रदाय स्थापनेमागची पूर्वपीठिका,रामभक्त ते रामोपासक हा प्रवास, पंजाबपर्यंतच्या भारत-भ्रमणाचे पुरावे आदी पुस्तकात देण्यात आले आहेत. समकालीन महाराष्ट्र बाह्य रामदासांचे केलेले उल्लेखही यात समाविष्ट आहेत. चरित्रात ज्ञानोपासक व्यवस्था हे स्वतंत्र प्रकरण असून यात रामदासी संप्रदायाची सैद्धांतिक धारणाही सविस्तर दिलेली आहे,’ असे लेखिका मनीषा बाठे यांनी सांगितले. 

‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या लोकप्रिय मालिकेत या लघुप्रबंधाचा समावेश झाल्याने तसेच २० भाषांत हे पुस्तक जाणार असल्याने केलेल्या अध्ययन-संशोधनाची फलश्रुती लाभत आहे’, अशी प्रतिक्रिया मनीषा बाठे यांनी व्यक्त केली. ‘रामदासी संप्रदायाच्या ‘रामोपासना, बलोपासना व ज्ञानोपासनेच्या प्रशिक्षणाचे केंद्र असलेल्या मठांचा विस्तार हा महाराष्ट्रासह अकरा राज्यात व्यापला होता. या मठांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप न देता ‘लोकशिक्षणाची’ प्रेरक श्रद्धास्थाने बनवीत, या ‘रामदासी मठरचना’ समर्थांच्या कारकिर्दीतच नव्हे तर नंतरही तीन शतके अव्याहत विस्तारत आहेत. स्थानिक भाषांमधील हस्तलिखित नोंदी पाहिल्या तर या मठांचे कार्य हे ‘आधुनिक वैचारिक चळवळीप्रमाणे’ होते याची साक्ष मिळते’, असे लेखिका मनीषा बाठे यांनी म्हटले आहे.

 साहित्य अकादमीतर्फे ‘मागील वीस वर्षांत, २० भाषांमध्ये लिहिणाऱ्या व्यक्तींवरील भारतभरातील एकूण १२० तात्त्विक चरित्रे/ प्रबंध (मोनोग्राफ) प्रकाशित झालेली आहेत.

मनीषा बाठे यांच्याविषयी लेखिका मनीषा बाठे या रामदासी वाङ्मयाच्या संशोधनपर वस्तुनिष्ठ लेखन करणाऱ्या अभ्यासक आहेत. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ विविध राज्यांतील शासकीय आणि अन्य हस्तलिखित दफ्तरे तसेच रामदासी मठांतील वाङ्मयावरील संशोधनातून लिहिलेल्या ग्रंथांना विविध सन्मानांसह महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारही लाभलेला आहे.

विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे आवाहन

पुणे, दि. २६ जून २०२३:जीव कोणाचाही असो, तो सर्वांधिक महत्वाचा आहे. एकजण जीवाला मुकला की त्यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच नागरिकांचे देखील सातत्याने प्रबोधन करावे’, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. २६) केले.

महावितरण व विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने दि. २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या रास्तापेठ येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात या सप्ताहाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्री. भागवत थेटे यांची उपस्थिती होती.

श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘पावसाळा सुरू झाला आहे. वीजसेवा देण्याचा खडतर व विद्युत अपघाताचे अधिक धोके असणारा हा कालावधी आहे. वीजक्षेत्राचे ज्ञान असले तरी वीज कोणालाही ओळखत नाही. जाणता-अजाणता झालेली चूक माफ करीत नाही. त्यामुळे कोणताही अतिआत्मविश्वास न बाळगता सुरक्षेच्या नियमानुसार यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करावे. सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेमुळे कोणालाही धोका निर्माण होणार नाही यासाठी कायम दक्ष राहावे. तसेच धोकादायक वीजयंत्रणेबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारी देखील ताबडतोब निकाली काढाव्यात.’

यावेळी विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी यांनी सादरीकरणातून विद्युत अपघाताची कारणे व मानवी चुका याबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता श्री. बुलबुले यांनी वीजसुरक्षेसंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली.

पुणे परिमंडलामध्ये येत्या २ जुलैपर्यंत वीजसुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अभियंता व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबतच विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन वर्गांमध्ये माहितीपत्रके वाटप करून माहिती देण्यात येत आहे. वीजसुरक्षेचे माहिती फलक लावण्यात येत आहेत. यासोबतच सिनेमागृहात वीजसुरक्षेबाबत ध्वनीचित्रफित दाखविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी व महावितरणचे २० प्रशिक्षणार्थी व विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

पावसात आडोशाला थांबलेल्या तरुणाला वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने मृत्यू

0

पुणे-पाऊस सुरू झाल्याने आडोशाला थांबलेल्या एका तरुणाला तारेच्या कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कोंढवा परिसरात घडली आहे. अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय- 30, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विनोदकुमार फेरारीराम वर्मा (वय- 50) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

विनोदकुमार यांचा मुलगा अजयकुमार हा कामानिमित्त घरातून बाहेर पडला. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने अजयकुमार कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ थांबला होता. त्याचवेळी तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला होता. विनोदकुमार यांच्या हाताचा स्पर्श तारेच्या कुंपणास झाला. कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून तो जागेवर बेशुद्ध पडला.

नागरिकांनी बेशुद्धावस्थेतील अजयकुमारला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, तसेच तारेच्या कुंपणात वीजप्रवाह कसा उतरला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते पुढील तपास करत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईलने एन्ट्री

सोलापूर : तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा बरोबर घेऊन तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर केला गुलाब पुष्पांचा वर्षाव करतं त्यांचं स्वागत केलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते असतील. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

बीआरएसच्या रिंगण सोहळा आणि विठ्ठल मंदिरावरील हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीला अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. बीआरएसतर्फे पंढरपूर येथे एका महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपाचे हेलिपॅड देखील उभारण्यात आलं आहे. मात्र पुष्पवृष्टीसाठी अद्यापही प्रशासनाने दिली परवानगी दिली नाही. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन प्रशासन विविध पद्धतीच्या परवानग्या नाकारत असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीने केला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज सकाळीच तेलंगणावरुन निघाले. सोलापूरकडे रवाना झालेला ताफा जेवण्यासाठी धाराशिवमधील उमरग्यामध्ये थांबला होता. जेवणानंतरज त्यांचा ताफा संध्याकाळी सोलापूरमध्ये दाखल झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या स्वागताचे बॅनर सोलापुरात झळकलेत. प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावर एक अशा पद्धतीने सुमारे 100 हून अधिक स्वागताचे बॅनर लावल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहीजे, एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहीजे, एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही

मुंबई | शनिवारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेसह भाजपवर निशाणा साधला.

‘एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहीजे. नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे’, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आहे. भ्रष्टाचारचा चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. यापूर्वी कोणत्याच नेत्याने मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू:- नाना पटोले

पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये.

देशातील ९ वर्षापासूनच्या अघोषीत आणीबाणीवर भाजपाने आधी बोलावे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे ?

मुंबई, दि. २६ जून २०२३

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असे काहीही केलेले नाही. आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचे सांगितले जात होते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही.

पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही.

आणीबाणीवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही..

दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती याचा भाजपाने निट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिराजी गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिराजी गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली. काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली आहे. पण आता देशात काय चालले आहे? आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषीत आणीबाणी सुरू आहे त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणा-यावर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे ते त्यांनी थांबवावे. भाजपाला आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

पहिल्याच पावसात मुंबईत पाण्यात मग कोट्यवधी रुपये गेले कुठे?

राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहीरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

इंडसइंड बँकेने पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात बसवले सौर पॅनेल्स

पुणे- २६ जून २०२३ – इंडसइंड बँकेने आज त्यांच्या इन्स्टिट्यूटशन ऑन सोलर या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात (रूफटॉप ग्रिड कनेक्टेड) सौर पॅनेल्स बसवण्याचे काम पूर्ण केले. यामध्ये मोठ्या आकाराच्या१०० केडब्ल्यू ग्रिड सोलर फोटोव्होल्टेक सिस्टीमचा समावेश असून त्याद्वारे दरवर्षी १,४०,००० युनिट्स वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे ११३ मेट्रिक टन्स कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय यामुळे हॉस्पिटल्सच्या खर्चात बचत करणे शक्य होणार असून ती रक्कम सामाजिक उपक्रम, उपकरणांची खरेदीकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अशा कामांसाठी वापरता येईल.

या उपक्रमाच्या माध्यमातून बँकेने कमी- कार्बन उत्सर्जन असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाण्याचे आणि विकासाच्या शाश्वत पद्धतींचा वापर करण्याचे ठरवले आहे. बँकेचा इन्स्टिट्यूटशन ऑन सोलर हा सीएसआर उपक्रम शाश्वत बँकिंग आणि पर्यावरणीय जबाबदारीवर लक्ष केंद्रित करणारा आहे. या उपक्रमाअंतर्गत २०२३ पर्यंत २० वेगवेगळ्या ठिकाणी ८२३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्यात आली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलचे विश्वस्त/वरिष्ठ अधिकारी आणि अमलबजावणी भागीदार सीईआरई यांच्या उपस्थितीत सौर पॅनेल्सचे उद्घाटन केले.

या कामगिरीविषयी इंडसइंड बँकेच्या शाश्वत बँकिंग आणि सीएसआर विभागाच्या प्रमुख रूपा सतिश म्हणाल्या, ‘एक बँक या नात्याने आमचा प्रभाव आर्थिक यंत्रणेच्याही पलीकडे जातो याची जाणीव इंडसइंड बँकेला आहे. अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांना समान प्रयत्नांनिशी उंचावर नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात सौर पॅनेल्स बसवून आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्यास प्रयत्नशील असल्याची बांधिलकी पली आहे. बँकेने कायमच समाजहितासाठी हातभार लावण्यास प्राधान्य दिले आहे व यापुढेही अशाप्रकारच्या विधायक कामांसाठी आम्ही योगदान देत राहू.’

केसीआर यांची नियत चांगली नाही, एमआयएम प्रमाणे बीआरएस देखील भाजपची बी टीम – संजय राऊतांची टीका

मुंबई-ज्याप्रमाणे महाराष्ट्रात एमआयएमने प्रवेश करून मतांचे विभाजन केले. अगदी त्याचप्रमाणे बीआरएस यांच्या पक्षाचे काम राज्यात असणार आहे. कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची नियत चांगली नाही. ते भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. तर भाजप-मिंधेगटाला महाविकास आघाडीच्या ताकदीची माहिती असून त्यामुळे त्यांची दाणादाण कशी होईल, याचा अनुभव त्यांना आलेला आहे, असे सूचक वक्तव्य करत राऊतांनी निशाणा साधला.

आत्ताच कशी विठुरायाची आठवण
विठ्ठलभक्ती देशभरात जगभरात आहे. त्यासाठी भाविक सगळीकडून येतात. पण तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा बीआरएस पक्ष केवळ महाराष्ट्रात कसा येत आहे. त्यांना अचानक विठ्ठल भक्तीची कशी आस लागली आहे. त्यांना हा पंढरपुरवारीत कोणते शक्तीप्रदर्शन करायचे आहे.

राष्ट्रीय पक्ष केला अन् कुठे घुसताहेत तर महाराष्ट्रात. हजारो कोटींची बॅनर, प्रसिद्धी केली जात आहे. एवढा पैसा महाराष्ट्रात कसा येत आहे. त्याची चौकशी का होत नाही. हा पैसा हवालामार्गे तर येत नाही ना. कारण यातून अगदी स्पष्ट झाले आहे. केसीआर यांची नियत काही चांगली दिसत नाही. त्यांनी ठरवले पाहिजे आपण कोणाला मदत करत आहोत. एकीकडे केंद्रसरकारला ते हुकुमशाही म्हणतात. मग हुकूमशाहीला मदत करायची की त्यांच्या विरोधात लढाई करायची याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. केवळ मतफुटीचे राजकारण करून काहीही साध्य होणार नाही.

भाजप-मिंधेगटाची दाणादाण
नवीन एमआयएम म्हणजे बीआरएस पक्ष आहे. असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणारे आहे. आमची एकी पक्की आहे. त्यामुळे भाजप-मिंधेगटाची दाणादाण उडेल. भाजपने सोडलेले मोहरे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने काम करत राहील.