मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे आवाहन
पुणे, दि. २६ जून २०२३:‘जीव कोणाचाही असो, तो सर्वांधिक महत्वाचा आहे. एकजण जीवाला मुकला की त्यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच नागरिकांचे देखील सातत्याने प्रबोधन करावे’, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. २६) केले.
महावितरण व विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने दि. २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या रास्तापेठ येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात या सप्ताहाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्री. भागवत थेटे यांची उपस्थिती होती.
श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘पावसाळा सुरू झाला आहे. वीजसेवा देण्याचा खडतर व विद्युत अपघाताचे अधिक धोके असणारा हा कालावधी आहे. वीजक्षेत्राचे ज्ञान असले तरी वीज कोणालाही ओळखत नाही. जाणता-अजाणता झालेली चूक माफ करीत नाही. त्यामुळे कोणताही अतिआत्मविश्वास न बाळगता सुरक्षेच्या नियमानुसार यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करावे. सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेमुळे कोणालाही धोका निर्माण होणार नाही यासाठी कायम दक्ष राहावे. तसेच धोकादायक वीजयंत्रणेबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारी देखील ताबडतोब निकाली काढाव्यात.’
यावेळी विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी यांनी सादरीकरणातून विद्युत अपघाताची कारणे व मानवी चुका याबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता श्री. बुलबुले यांनी वीजसुरक्षेसंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली.
पुणे परिमंडलामध्ये येत्या २ जुलैपर्यंत वीजसुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अभियंता व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबतच विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन वर्गांमध्ये माहितीपत्रके वाटप करून माहिती देण्यात येत आहे. वीजसुरक्षेचे माहिती फलक लावण्यात येत आहेत. यासोबतच सिनेमागृहात वीजसुरक्षेबाबत ध्वनीचित्रफित दाखविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी व महावितरणचे २० प्रशिक्षणार्थी व विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.