कारवार रेल्वे स्टेशन, कोकण रेल्वे, मान्सूनच्या छायेत.
पुणे-भारतीय हवामान विभागाने उद्याआणि परवा राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून त्यानंतर दोन दिवस हलक्या पावसाची शक्यताही वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ तारखेला म्हणजे उद्या 27 आणि 28 जून, IMD द्वारे ऑरेंज/यलो अलर्ट देण्यात आला आहे . महाराष्ट्रात कोकणात, मध्य महाराष्ट्राच्या परिसरात आणि विदर्भातही अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण,रायगड ,रत्नागिरी आणि पुणे मुंबई,ठाणे, पालघर,नाशिक, अमरावती ,नागपूर या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर 29,30 जून रोजी पावसाचा अंदाज आहे परंतु या दिवशी अनेक भागात पावसाची शक्यता का ही प्रमाणात कमी झाली आहे.
पुणे, दि. २६ : लोणीकंद वाहतूक विभागाच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन रुग्णालय दरम्यान दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे त्याचबरोबर हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत हडपसर उड्डाणपुल ते (सह्याद्री रुग्णालय) भोसले गार्डन कमान टपाल कचेरीच्या शेजारी रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे १५० ते २०० मीटर पर्यंत पी-१ पी-२ करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ९ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
पुणे, दि. २६: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल त्यांनी समाज कल्याण विभागाकडे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
संबंधित जमीन मालकांनी विहीत नमुन्यातील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, संबंधित परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची तसेच कृषि पतपुरवठा करणाऱ्या बँकेचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व प्रस्तावित विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
इच्छूक जमीन मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जिल्हा पुणे यांचे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे- ४११००६ दूरध्वनी क्र. ०२० – २९७०६६११ या कार्यालयात अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे. 0000
तेजपाल शहा लिखित श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे केवळ युद्धांचा इतिहास नव्हे तर स्वराज्य घडवताना त्यांनी सामाजिक, आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशा विविध अंगाने जी क्रांती घडवली याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे शिवचरित्र होय. व्यवस्थापन शास्त्राला दूरदृष्टीची जोड देऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
तेजपाल शहा लिखित ‘श्री शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांच्या हस्ते सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात झाले. यावेळी आचार्य शाहीर हेमंत मावळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव प्रसादे आदी उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडू शकते. तेजपाल शहा यांनी यापुढे सखोल अभ्यास करून व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र समजावून सांगण्यासाठी लेखन करावे.
महेश तेंडुलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या गुणांचा उत्सव साजरा करणे, आज समाजासाठी अधिक गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे अनुकरण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाने केले पाहिजे. देव देश आणि धर्म याची सांगड घालून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या या युगपुरुषाला मानवंदना देणे म्हणजे त्यांचे गुण आत्मसात करणे.
तेजपाल शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आदर्श उदाहरण आहे. महाराजांच्या प्रत्येक व्यवहारांमध्ये व्यवस्थापन शास्त्र दिसून येते. संघटन, ध्येय, नेतृत्व, अभ्यास आणि दूरदृष्टीपणा यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य निर्मिती करू शकले. १४ वर्षात ३५० किल्ले जिंकणे हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे यश आहे. महाराजांनी ज्याप्रमाणे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करून शून्यातून स्वराज्य निर्माण केले, त्याचप्रमाणे आपणही ते गुण आत्मसात करून आपले आयुष्य आणि देश अधिक समृद्ध करू शकतो यासाठी मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध गुण पोवाडाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य हा त्यांचा आणखी एक गुण यापुढे आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. या व्यवस्थापन कौशल्याचा विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी निश्चितच उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे सुरुवातीला शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या बाल सेवाव्रतींनी महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले
पुणे -पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्यामोदी@9′ पुस्तिकेच्या वितरणाच्या निमित्ताने माजीखासदार संजय काकडे यांनी आपल्या ज नसंपर्क मोहिमेला गती दिली आहे., भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रतींचे पुणे लोकसभा मतदार संघात वाटप स्वतः काकडे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत फिरून करत आहेत ..
आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.
या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे. कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखकाच्या सोबतीने दाखवलं आहे.
आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची. नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.
कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.
पुणे, २६ जून २०२३ : सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने ,पुणे झोनचा महिला संत समागम संत निरंकारी सत्संग भवन जयजवाननगर,खराडी (फॉरेस्ट पार्क) या ठिकाणी रविवार दि.२५ जून रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या सत्संग कार्यक्रमासाठी पुणे झोनच्या सर्वच शाखांमधून ३५०० पेक्षा अधिक संख्येने महिलांनी पोहोचून सत्संगाचा आनंद प्राप्त केला. मुख्य सत्संगच्या अगोदर ब्रम्हनादाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील प्राचीन संत परंपरेचा इतिहास दाखविण्यात आला. महिलांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवून दिले.मुख्य सत्संग दरम्यान समुह गायन,अभंग,कविता,लघुनाटिका तसेच विचारांच्या माध्यमातून महिलांनी सद्गुरु प्रती आपले भाव व्यक्त केले. ज्या पद्धतीने एक नारी आपला शृंगार करताना कपडे,दागिने अशा एक एक सर्व गोष्टीचे ध्यान ठेऊन शृंगार करते तेव्हा तिचं रूप देखणं बनत त्याप्रमाणे सत्संग, सेवा सुमीरण हे भक्तीचे शृंगार आहेत. आपले जीवन भक्तीने सुंदर बनवायचे असेल तर भक्तीचे हे शृंगार या आपल्या भक्तीत चढविले पाहिजेत तेव्हाच आपली भक्ती देखील पूर्णत्वाला जाणार आहे असे उद्गार दीपा मखिजा यांनी सत्संगला संबोधित करताना काढले. त्यांनी पुढे समजावताना सांगितले की जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीत तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही . संत मीराबाई,संत ज्ञानेश्वर जी,संत मुक्ताबाई,संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी सद्गुरुंकडून ब्रम्हज्ञान प्राप्त करून आपल्या भक्तीला सुरवात केली. केवळ ज्ञान प्राप्त करण्याने नाही तर ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याने जीवनात आनंद प्राप्त होणार आहे. सत्संग,सेवा सिमरणाचे महत्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की नित्यप्रती सत्संग केल्याने आपल्या मनातील विवेक जागृत होऊन योग्य काय अयोग्य काय याचा बोध होतो आणि आपले मन भक्तीमध्ये तल्लीन व्हायला लागते. सेवा केल्याने मनामध्ये असलेला अभिमान नष्ट होऊन भक्ती मजबूत होते आणि सिमरणाने आत्मा परमात्म्याशी एकरूप होऊन मनाला परमानंदाची प्राप्ती होते. जे भक्त नित्यप्रती सत्संग,सेवा,सिमरणाचा आधार जीवनामध्ये घेतात तेच आपल्या जीवनामध्ये भक्तीला कायम करतात. जेव्हा एक नारी आपले जीवन भक्तीच्या या शृंगारानी सजवते तेव्हा त्या घरातील वातावरण स्वर्गमय बनून जाते.आज नारी आध्यात्मिक,सामाजिक,राजकीय,क्रीडा,शैक्षणिक,देशसेवा अशा सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पुष्पा करमचंदानी आणि काबुगडे बहेन यांनी डोंबिवली वरून आलेल्या मुख्य अतिथी दीपा मखिजा तसेच संपूर्ण पुणे झोन मधून आलेल्या महात्मा, बहेंनजींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धन्यवाद व्यक्त केले.
मुंबई, -ज्या बिहारमधून जयप्रकाश नारायण यांनी संपुर्ण क्रांतीचा नारा दिला, जी बिहारची भूमी ही लोकशाहीची जननी आहे, त्याच बिहारमध्ये लोकशाहीच्या विरोधात षडयंत्र जे पक्ष करीत, परिवारवादासाठी जे एकत्र आले आहेत, त्यांचा तर देशातून होईलच पण बिहारमधूनही सुपडा साफ होईल, असे भाकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल येथे केले.
मुंबई भाजपातर्फे वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आणिबाणीचा निषेध करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना आमंत्रीत करण्यात आले होते, तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, सुनिल राणे, मनिषा चौधरी, अमित साटम, भारती लव्हेकर, महामंत्री संजय उपाध्याय, माजी खासदार किरिट सोमय्या आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमदार योगेश सागर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार अतुल भातकळकर यांनी हा काळा दिवस का लक्षात ठेवलाय हावा याचे महत्व विषद करुन आणिबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॉंग्रेसने कसे अत्याचार केले, याबाबत सविस्तर विवेचन केले. आज आपआपले परिवार वाचवण्यासाठी आता देशातील परिवारवादी पक्ष बिहारमध्ये एकत्र आले होते, ही एक नाटक कंपनी आहे, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात आणिबाणीची दाहकता मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भाषण करताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आज भाजपच्या सरकारवर जे जे खोटे आरोप केले जात आहेत, पुरस्कार वापसी केली जातेय, ते सगळे कॉंग्रेसने आणिबाणीच्या काळात करुन दाखवले आहे. निवडणुक यंत्रणेचा गैरवापर, न्यायालयांची मुस्कटदाबी, लेखन, भाषण स्वातत्र्यावर बंदी, मिडिया हाऊसवर बंदी हे ज्या कॉंग्रेसने केले तेच आज लोकशाही वाचवण्याची गोष्ट करीत आहेत. तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्या घटनेच्या मुळ गाभ्याला धक्का लावून कॉंग्रेसने या देशावर आणिबाणी लादली, हा या देशाच्या घटनेचा अपमान तर होताच तसाच तो लोकशाहीचा आणि घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान करण्याचे काम कॉग्रेसने केले. एवढेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देतानाही कॉंग्रेसने असेच केले होते.
परिवार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या देशावर आणिबाणी लादली होती, आणि आजही आपआपला परिवार वाचविण्यासाठी बिहारमध्ये एकत्र येत आहेत. जे लालूप्रसाद यादव, नितिश कुमार आणि मुलायम सिंह आणिबाणीच्या विरोधात लढले तेच आज कॉंग्रेसच्या परिवारवादाला साथ देत आहेत. पण बिहारची भूमीही क्रांतीची भूमी आहे, ती यांचा पाखंडीपणा मान्य करणार नाही, बिहारची भूमीही नागरीकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारी, मान, मर्यादांची भूमी आहे, ती यांच्या पाखंडीपणाला साथ देणार नाही. एकिकडे लोकशाहीच्या नावाने हे सगळे पक्ष गळा काढतात तर दुसरीकडे घराणेशाही वाचविण्यासाठी एकत्र येऊन लोकशाहीचाच गळा घोटण्याचे काम करीत आहेत, अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांना देश तर माफ करणार नाहीच पण बिहारमधूनही यांचा येत्या काळात सुपडा साफ हाईल, असा विश्वास भूपेंद्र यादव यांनी यावेळी व्यक्त केला. आज मी विदर्भातील अनेक भागात दौरा करुन कार्यक्रमासाठी आलो आहे, समाजातील विविध घटकांशी आम्ही संवाद साधला आहे, प्रत्येकजण मान्य करतोय की, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपाला धोका दिला होता. त्यामुळे आताच्या शिंदे- फडणवीस सरकारला प्रचंड जनसमर्थन महाराष्ट्रात मिळते आहे. , असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणचा काळ आणि काँग्रेसने केलेले अत्याचार यावर सविस्तर विवेचन केले.
पुणे- २३ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने कार मध्ये बसवून पळवून नेणाऱ्या तिघांना अटक करून या तरुणाची गुजरात मधील वापी येथून सुटका करण्यात पुणे पोलिसांनी कौशाल्यापुर्वक यश मिळविले आहे . या अपहरण झालेल्या तरुणाच्या जुळ्या भावाने पोलिसात तक्रार केल्यावर २४ तासात पुणे पोलिसांनी हि कामगिरी फत्ते केली .
याप्रर्णी पोलिसांनी सांगितले कि ,’ उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्याचा जुळा भाऊ दिलीप गोरख पवार, वय २३ वर्ष यासदि. २२/०६/२०२३ रोजी ठाकुर गॅरेज समोर, कोढवे धावडे, पुणे येथून एक महिला व इतर ०२ अनोळखी इसमांनी संगनमताने एका पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीतुन कोणत्या तरी कारणासाठी पळवुन नेले आहे त्याने तक्रार दिल्याने उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७२ / २०२३ भा. द. वि. कलम ३४१, ३६३, ३६४, ३६५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला . दाखल गुन्हयातील अपहरण झालेला मुलगा दिलीप पवार यास चार चाकी वाहनातुन अपहरण करुन पळुन नेणा-या एका महिला आरोपी चा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे ते हॉटेल यात्री, वापी रेल्वे स्टेशन जवळ, वापी वडसाल, गुजरात येथे असल्याचे समजले. वरिष्ठांच्या आदेशाने गुजरात येथे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार ,पोलीस नाईक हजारे, पोलीस शिपाई हुवाळे,पाडाळे, असे यांना तपास कामी रवाना केले होते. त्यांनी शिताफिने छापा टाकुन हॉटेल यात्री निवास, वापी, गुजरात येथुन अपहरण केलेला मुलगा दिलीप पवार व महिला आरोपी हिस ताब्यात घेतले व दाखल असलेल्या गुन्हयातील अपह्रत मुलगा दिलीप गोरख पवार, याची गुन्हा दाखल झाल्यापासुन २४ तासाच्या आत सुटका केली आहे. तिला उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तिच्याकडे कौशल्यपुर्वक तपास तिला मदत करणारे साथीदार प्रथमेश राजेन्द्र यादव वय २१ रा.बच्छाव वस्ती, पुसेगाव ता. खटाव जिल्हा सातारा व अक्षय मारुती कोळी, वय २६ रा. पुसेगाव गोरेवस्ती, ता.खटाव, जि. सातारा असे असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ नमुद साथिदारांना पुसेगाव येथे तपास पथकाने जावुन शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने दिनाक २८/०६/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मजुंर केली आहे. त्याच्याकडे पुढील तपास सपोनि दादाराजे पवार करीत आहेत..तपासाची हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – ०३, सुहेल शर्मा सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस स्टेशन किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शबनम शेख यांच्या सुचना प्रमाणे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस अंमलदार तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे, हजारे, केंद्रे, किंद्रे गायकवाड, हुवाळे, तोडकर, पवार, पाडाळे, यांनी केली आहे.
पुणे-‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुला’चे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, उद्योजक पुरुषोत्तम लोहिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
येत्या गुरुवारी (29 जून) सायंकाळी 7 वाजता ‘बीएमसीसी’च्या ‘टाटा सभागृहा’त हा कार्यक्रम होणार आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
‘मुकुंद भवन ट्रस्ट’चे कार्यकारी विश्वस्त व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी पुरुषोत्तम लोहिया यांनी त्यांचे वडील मुकुंददास लोहिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे.
संकुलाचे एकूण बांधकाम साठ हजार चौरस फूट इतके आहे. पंधराशे विद्यार्थी वापरू शकतील अशा 20 वर्गखोल्या, 250 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, प्राध्यापक कक्ष, प्रशासकीय कार्यालय, स्वतंत्र वाहनतळ अशा सुविधा पाच मजली संकुलात उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणक प्रयोगशाळेसाठी नारायण राठी यांनी आर्थिक मदत केली आहे.
‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज इन ई कॉमर्स ऑपरेशन्स’ (बीएमएस), ‘बी. व्होक फिल्म मेकिंग ॲण्ड ड्रॉमेटिक्स’, ‘बी. कॉम फिनटेक’, ‘बी. कॉम ऑनर्स’ हे बीएमसीसी स्वायत्त महाविद्यालयाने नव्याने सुरू केलेले अभ्यासक्रम या संकुलात शिकविण्यात येणार आहेत. ‘भरतसृष्टी प्रकल्प’
चित्रपट आणि नाट्यनिर्मितीचे शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक पदवी शिक्षण देण्याच्या उद्देशाने पाचव्या मजल्यावर पंधरा हजार चौरस फूट जागेत ‘भरतसृष्टी’ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘भरतसृष्टी’ची वैशिष्टये
ध्वनिमुद्रण स्टुडिओ : स्वरलता
ध्वनी संस्करण आणि नियंत्रण कक्ष : स्वरांकन
आभासी विश्व निर्मितीसाठी स्टुडिओ : विश्वदर्शन
संगीत रंगभूमीची परंपरा चालविणाऱ्या गंधर्व मंडळी आणि दादासाहेब तोरणे यांचे नात जपण्यासाठी : सरस्वती सिनेटोन
विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीचा वसा देणारी : दादासाहेब फाळके आणि ग. दि. मा. दालन
‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटाशी नाते जपणारे प्रेक्षागृह
गुरूदत्त, राजा परांजपे, राजदत्त आणि राज कपूर अशा दिग्गज दिग्दर्शकांशी नाते जोडणारा : गुरूराज कक्ष
भरतसृष्टीच्या निर्मितीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ध्वनी निर्देशक निखिल लांजेकर, सुजय भडकमकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
मुंबई, दि. २३ : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातील बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून राहावे लागत नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगारांच्या संधी, नवीन संशोधनाचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल, कला, विज्ञान, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊ शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षणसुद्धा घेता येईल. हे या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुणे दि२५-शनिवारपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही पावसाची अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांची पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लोकसहभागातून तीन महिने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. या उपक्रमाचा बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील अनेक सोसायटीतील नागरिकांनी लाभ झाला. त्याबद्दल पाषाण-सूस रोडवरील माऊंट युनिक गृहनिर्माण संस्थेच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, विवेक मेथा यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठीची योजना कार्यान्वित करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेने कठोर परिश्रम घेतले आहेत.
ते पुढे म्हणाले , समान पाणीपुरवठा योजनेचे टप्पे पूर्ण होत असताना काही अडथळे ही पार करावे लागत आहेत. यंदा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर कोथरूड बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठी लोकसहभागातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पाऊस समाधानकारक झाला, तर भविष्यातील पाणीटंचाईची समस्या संपेल.
वाढते शहरीकरण आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे पाण्याचे स्त्रोत अपूरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी गाड्या धुणे किंवा बांधकामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पाण्याचा हा अपव्यय टाळला पाहिजे. तसेच, सोसायटींनीही पावसाचे पाणी संकलित करून, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प सोसायटी भागात कार्यान्वित करावेत, तसेच कचऱ्याची निर्गत, सौर ऊर्जा प्रकल्प आदींद्वारे स्वावलंबी बनावे असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत. सकल भागातील पाणी पंपिंगद्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर सखल भागातही अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुममधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाणी साचण्याची कारणे जाणून घेतानाच या भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे, दि. 25 – केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे – बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि संजय भोईर, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले.
रस्ते रुंद आणि चांगले असल्यास त्या शहराची वेगाने प्रगती होते. त्यामुळे सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आदी प्रकल्पांना चालना दिली. लवकरच नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे ठाणेपर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. हा मार्ग संपूर्ण पर्यावरण पूरक आहे. या सरकारने लोकहिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री श्री. गावित म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आदिवासी बांधवांसाठी विविध माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. येत्या दोन वर्षात आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यामुळे आदिवासी भागाचा विकास होऊन कुपोषण, मातामृत्यू कमी होण्यास मदत होईल. तसेच आदिवासी कुटुंबांना मागील वर्षी 93 हजार घरे दिली असून यंदा सव्वा लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व पाड्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेला मिळालेल्या सुविधा भूखंडावर आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे काम आज सुरू होत आहे. ३२० मुलींची व्यवस्था तेथे केली जाणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न् केल्याचा उल्लेख श्री. गावित यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचे ठाणे कसे असावे, याचे प्रात्यक्षिक आज आपण या कार्यक्रमात पाहतो आहोत. ठाणेकरांनी न मागता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरून दिले आहे. त्यांना ठाणेकरांच्या मनात काय आहे ते लगेच कळते. त्यामुळे सूर्या धरणातून ठाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नही करत आहात. सूर्यामधून भविष्यात 250 एमएलडी पाणी मिळाले तर या भागाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ठाणे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे होत आहेत. जी कामे सुरू झाली आहेत त्याचे दृश्यमान स्वरुप आता डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले आहे. या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे या कामांची गुणवत्ता ही सर्वोच्च रहावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतः आग्रही आहेत. वारंवार आम्हाला त्याबद्दल सूचना करतात, मार्गदर्शन करतात. केवळ मार्गदर्शन करून थांबत नाहीत तर कामाच्या ठिकाणी येऊन कामाची गुणवत्ता चांगली आहे का नाही हे पाहतात. त्यामुळे सगळी यंत्रणा सतत दक्ष राहते, असेही आयुक्त श्री. बांगर म्हणाले.
कासारवडवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, शिवसेनाप्रमुख हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजिटल अक्वेरियम या दोन वास्तूंचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदय यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी केले. तर, ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर, महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृह यांचे लोकार्पण, आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थिनी वसतिगृह, कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र यांचे भूमिपूजन रिमोटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कार्यक्रमातून केले.
पुणे, दि. २५ जून २०२३: कोथरूडमध्ये उजवी भुसारी कॉलनीत शनिवारी (दि. २४) रात्री ७.२० वाजता एका झाडाची वाळलेली फांदी २२ केव्ही सौदामिनी वीजवाहिनीवर पडली व शॉर्टसर्किट होऊन या फांदीने पेट घेतला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन फांदी हटविली व रात्री ८ वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून महावितरणकडून या ठिकाणच्या वीजवाहिनीचा सुमारे २०० मीटरचा भाग हा प्राधान्याने व त्यानंतर उर्वरित वीजवाहिनी देखील भूमिगत करण्यात येणार आहे.