पुणे, दि. २५ जून २०२३: निगडीमधील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी (दि. २५) पहाटे निगडी गावठाण व परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता व सायकांळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला व उलटला. टँकरमध्ये गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील सुमारे ५५० ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सेक्टर २६ मधील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र पोलीस विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला व सायंकाळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.
पुणे- बारामती येथे एका शासकीय कार्यालयासमोर रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी आत्मदहन केलेल्या चर्मकार समाजाच्या रोहिदास माने या कार्यकर्त्याचा रुग्णालयातील २० दिवसांच्या झुंजीनंतर काल मृत्यू झाला .यामुळे संतप्त झालेल्या चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काल पासून ससून शवागारातून रोहिदास माने यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देऊन रस्ता तर कराच पण गुन्हेगारांना तातडीने अटक करा अन्यथा मृतदेह घेणार नाही, अंत्यसंस्कार तोवर करणार नाही अशी भूमिका घेतल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संतोष कृष्णा टोणपे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कावळे,आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल सातपुते यांनी सांगितले कि, आम्ही या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पत्रही दिले आहे . यात असे म्हटले आहे की, गाव रेडा, ता. इंदापूर येथील रहिवासी श्री. रोहिदास माने, वय अंदाजे ४० वर्षे, यांनी चर्मकार वसाहतीमधील २० कुटुंब व पुढे इतर समाज वापरत असलेला जुना शंभर वर्षे वहिवाट असलेला रस्ता खडी, मुरूम टाकून स्वः खर्चाने दुरुस्ती करण्यासाठी गेली ३ ते ४ वर्षे प्रांत, तहसील व इतर अनेक ठिकाणी विनंती अर्ज करत होते. या कामात शेजारील पवार नावाची तोतया पत्रकार असलेली व्यक्ती गावातील काही लोकांची मदत घेऊन अडचणी आणत होती. यासाठी अनेक वेळा पोलीसांत तक्रार सुध्दा झाली होती. मागील महिन्यात आपले काही चर्मकार बांधवांसोबत रोहिदास माने हे सदर रस्ता लवकर व्हावा यासाठी आमरण उपोषणाला प्रांत कार्यालय, बारामती येथे बसले असता प्रांत यांनी पोलीस अधिकारी यांना पोलीस संरक्षण देऊन दोन दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करून सहकार्य करण्याचे आदेश दिले. या आदेशाला संबंधित पोलीस अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे रोहिदास माने यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला व आत्मदहनाचा इशारा देऊन उपोषणाच्या पाचव्या दिवशी महसूल प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या निष्काळजी पणाच्या विरोधात स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये ते ४० त ५०% भाजले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रांत तहसील साहेबांनी स्वतः भेट देऊन त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल असे सांगितले होते. परंतु चार दिवसांनी खर्च बंद केला. यामुळे उपचारात निष्काळजीपणा होत गेला आणि १५ दिवसांनी, काल दि. २४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रोहिदास माने यांचा मृत्यू झाला. पुणे पोलीसांनी पोस्टमार्टम करण्यासाठी रोहिदास माने यांचा मृतदेह ससून शवागारात आणून ठेवला आहे. या मृत्यूस पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन व नेहमी रस्त्यास विरोध करणारा शेजारी पवार व इतर काही सवर्ण लोक कारणीभूत आहेत. सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून घ्यावा व सदरचा रस्ता सरकारी नोंद करुन त्वरीत दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली असून या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रोहिदास यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका माने कुटुंबाच्या वतीने घेण्यात आली आहे.आजही मागसवर्गीय समाजावर अन्याय होत आहेत. पोलीस अधिकारी आरोपी यांना साधी अटकही करू शकत नाहीत, महसूल प्रशासन ठीम्म आहे. कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे सांगलीत भव्य स्वागत व सत्कार सोहळा संपन्न.
मुंबई, दि. २५ जून २०२३ भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दिनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोलवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २२४ पैकी १३६ जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजपा जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहचवला व भाजपामुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या ५ आश्वासनांवर २४ तासात निर्णय घेतला. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा आपल्या देवीदेवतांचाव वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका. छत्तिसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. सांगलीतील मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष बस्वराज पाटील, आ, प्रणिती शिंदे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार मोहनदादा कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल ८० हजार भाविकांना महाप्रसाद
पुणे : हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प.पू.लोकनाथ स्वामी महाराज, प.पू.प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, प.पू.श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, रथयात्रेचे मार्गदर्शक व इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती दास, रथयात्रा समन्वयक अनंत गोप दास, मंदिराचे उपाध्यक्ष श्वेतदीप दास उर्फ संजय भोसले, माध्यम व संपर्कप्रमुख जर्नादन चितोडे आदींच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. तसेच इस्कॉनचे वरिष्ठ ब्रह्मचारी, भक्तगण व ५ ते ६ हजार पुणेकरांनी सहभाग घेतला.
भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.
रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ७० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि १० हजार भक्तांना भोजन देण्यात आले. विविध प्रकारचे वाद्यवादन व वेशभूषा केलेले कलाकार देखील रथयात्रेत सहभाग झाले.
स.प.महाविद्यालय येथून निघालेली यात्रा अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यात्रेत अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले.
सातारा-रशियाचे हुकुमशहा व्हलादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे भाडोत्री सैन्य ठेवले होते. मात्र, आज तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट बाळगला आहे. हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत आत मंत्री शंभुराज देसाई यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, पुतीन हा हुकुमशहा आहे. त्याने भाडोत्री सैन्य नेमले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. भाजपने हे सैन्य ठेवले आहे. हे असे भाडोत्री कुणाचेही नसतात. हे बाजार बुणगे आहेत. एक दिवस ते भाजपलाच खतम केल्याशिवाय राहणार नाही.
नुकत्याच झालेल्या पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे. देशबचावसाठी नव्हे तर कुटुंब बचावसाठी हे नेते एकत्र आले, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, बैठकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसल्यानेही उद्धव ठाकरे कुणाशीही तडजोड करू शकता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलो. तर भाजप आणि शिंदे गट काय अध्यात्म, परमार्थासाठी एकत्र आला आहे. बाजारबुणग्यांसोबत सत्ता स्थापून भाजप कोणता परमार्थ साधत आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, सातारा जिल्ह्यात मी म्हणजे सर्वस्व. मी म्हणजे मालक अशी शंभुराज देसाई यांची भाषा आहे. मात्र, मी म्हणजे मालक हे दिल्लीत चालत नाही, तर महाराष्ट्रात काय चालणार? शंभुराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांना जनेतेनेच लोकनेते ही पदवी दिली होती. जनता त्यांना लोकनेता का म्हणायचे, याचा अभ्यास शंभुराज देसाई यांनी केला पाहीजे. या देशात लोकशाही आहे. जनताच आपले सत्ताधारी ठरवत असतात आणि पुढील निवडणुकीत तुम्ही पराभूत होणार आहात, असा टोला संजय राऊतांनी शंभुराज देसाईंना लगावला.
संजय राऊत म्हणाले, मी म्हणजे मालक, असे तुम्ही म्हणत असाल तर आमचे तुम्हाला आव्हान आहे की, राज्यात किमान महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. तेव्हा लोकांच्या भावना काय आहे, हे तुम्हाला कळेल. तुम्ही निवडणुकांना एवढे का घाबरत आहात?
पुणे- वॉर कुठलेही असो,त्यात सारे भरडले जातात , ज्यांचा संबध नाही अशा निष्पापांना देखील त्याच्या झळा सोसाव्या लागतात , अगदी याच तत्वावर आता सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपा आणि भाजपा विरुध्द चे राजकीय पक्ष यांच्यात सुरु असलेल्या वॉर मध्ये आमची होरपळ होऊ नये अशी भावना आता IAS अधिकारी व्यक्त करू लागले आहेत . या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चिंता व्यक्त केली आहे.
राज्य आणि केंद्रात किंवा राज्यातील विरोधकांत आणि केंद्रात ,राज्यांतर्गत असा सत्ता संघर्ष गेली ५ वर्षे सुरु आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत ‘आयएएस’ आणि भारतीय पोलिस प्रशासन (आयपीएस) सेवेतील चार ते पाच अधिकारी गजाआड झाले असून सत्तासंघर्षात ते कुठल्या न कुठल्या कारणाने वादग्रस्त ठरले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षात वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकारी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्यावरील गुन्हेप्रकरण गाजले होते. त्यानंतर ‘टीईटी’ घोटाळ्यात ‘आयएएस’ अधिकारी सुशील खोडवेकर यांचे नाव आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान खंडणी प्रकरणात ‘आयपीएस’ अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हे सर्व प्रकार फौजदारी गुन्ह्यांशी निगडित असल्याने त्याला फारसा पाठीशी घालण्याचा प्रकार सनदी अधिकाऱ्यांकडून झाला नाही. मात्र, मुंबई महापालिकेतील कथीत घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची कसून चौकशी केली. त्यानंतर जयस्वाल यांच्यावर झालेल्या छापासत्राने ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकारी धास्तावले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या सर्व प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे.‘ईडी’कडून सुरू असलेल्या चौकशीसत्रात निवृत्त उच्चपदस्थ सनदी अधिकारी रडारवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय कोविड केअर सेंटर घोटाळ्यात पुण्यातील एका अधिकाऱ्याकडे चौकशी केल्याचे समजते. पुण्यात वादग्रस्त सुजित पाटकर यांच्या कंपनीला कोविड केअर सेंटरचे मिळालेले कंत्राटाची चौकशी करण्यात येत आहे. या कंपनीने शिवाजीनगर येथील कोविड केअर सेंटर केवळ आठ दिवस चालविले त्यानंतर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. तसेच, या कंपनीची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईचा उल्लेख ‘ईडी’च्या मुंबई येथील तक्रारीत नमूद आहे. याशिवाय औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजनेतर्गंत प्रकल्पाची चौकशी सुरू आहे. यामध्येही एका ‘आयएएस’ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व प्रकार सुरू असताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुण्यात ‘आयएएस’ अधिकारी डॉ. अनिल रामोड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना गजाआड केले.महापालिका तसेच, इतर विभागांमध्ये दक्षता विभागाकडून वेगवेगळ्या निविदांची तसेच मोठ्या प्रकरणांची तपासणी करून ती प्रकरणे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येतात. त्याचप्रमाणे आता ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी नियुक्त करून त्यांच्याकडूनही या फाइल तपासून घ्या आणि त्यानंतरच त्यावर सही करावी, असा उपरोधिक टोला ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी लगावला आहे. एकीकडून राजकीय व्यक्तींकडून वेगवेगळ्या कामांसाठी दबाव येत असताना दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कोण मागे लावून घेणार, अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केली.
संजय काकडे यांच्या वतीने पुणे लोकसभा मतदार संघात 60 हजार प्रती वितरित होणार
पुणे-पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रती पुणे लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते आज झाला.
या पुस्तिकेचे पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार पुस्तिकांचे वाटप स्वतः संजय काकडे करणार आहेत. त्या त्या विधानसभा मतदार संघातील 25 ते 30 कार्यकर्ते सोबत घेऊन ही पुस्तिका नागरिकांना देण्यात येणार आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपाचे नेते व माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, बापू कर्णे गुरुजी, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, राजेंद्र शिळीमकर, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, मुकारी आलगुडे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश गलांडे, संतोष आरडे, पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्वाती शिंदे, लहू बालवडकर, तुषार पाटील, ओंकार कदम, समाधान शिंदे, आनंद छाजेड, योगेश हुलावळे, अनुप मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मोदींच्या कामांना प्रत्येकापर्यंत पोहचवणार-संजय काकडे (माजी खासदार) पुणे लोकसभा मतदार संघातील भाजी विक्रेत्या पासून ते मॉलपर्यंत, छोटा व्यावसायिक ते उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, डॉक्टरसह सर्व क्षेत्रातील मान्यवर, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही पुस्तिका प्रत्यक्ष भेटून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आणि देशातील प्रत्येकासाठी काम केले आहे. मोदींच्या दूरदृष्टीकोनातून राबविण्यात आलेल्या योजनांमुळे आपल्या देशाची प्रगती वेगाने होत आहेत. मोदींची ही कामे, त्यांच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम मी करणार आहे.
गोरगरीब जनतेसाठी सेवा व वंचितांचा विकास, शेतकरी कल्याणासाठी योजना, महिला व बालकल्याण विकास, मध्यम वर्गासाठी विकासाच्या योजना, आरोग्य सेवा, आर्थिक सशक्तीकरण, व्यापार व उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी ठोस योजना, भारत एक महाशक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी मोदी सरकारकडून आखण्यात आलेल्या योजनांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री सावंतांना पुस्तिकेची भेट मोदी@9 पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर ही पुस्तिका माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेट देण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात या पुस्तिकेच्या प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार प्रती वितरित करण्यात येणार आहेत.
पुणे, दि.२५: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून सामाजिक न्याय दिनी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथे सामाजिक न्याय दिनाचे समाजकल्याण आयुक्त समाज कल्याण डॉ. प्रशांत नारनवरे अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्याप्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. राजीव गांधी ॲकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार असून श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा येथे समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. 0000
स्वातंत्र्यपूर्व काळात उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार भाई जगताप, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख,संजय राणे,शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या, स्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे. मराठा मंदिर च्या अमृत महोत्सवी वाटचालीस, आणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.
मराठा मंदिरच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्याविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणार : मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार
मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, संस्थेत निःस्वार्थी काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्यामुळेच संस्था ही मोठी होते. मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांचे कार्य मोलाचे आहे. रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात येणारे सागरी संशोधन महाविद्यालय यासाठी लागणारी परवानगी तसेच संस्थेच्या इतर काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. मराठा मंदिर या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी परदेश शिष्यवृत्ती सुरू करणार असून यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेत आहे. या संस्थेची वाटचाल अशा प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असेही श्री.पवार म्हणाले.
समाजाच्या विविध पैलूना स्पर्श करणारी मराठा मंदिर संस्था : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,कोणतीही संस्था अनेक विषय घेवून काम करत असूनही या संस्थेचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे शालेय शिक्षण या संस्थेतून घेता आले याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६३ हजार जणांना उद्योगासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असेही ते याप्रसंगी म्हणाले.
मराठा मंदिरने मला घडवले : उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,या संस्थेच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण घेतले. राजकीय विद्यापीठ देखील याच व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळाले. वयाच्या २८ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून गेलो. मराठा मंदिरच्या माध्यमांतून अनेक विद्यार्थी घडले. मराठा मंदिर मुळे आज मी या क्षेत्रात आहे आणि याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मराठा मंदिर अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवत आहे खरोखरच खूपच अभिमनाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर रत्नागिरी हायस्कूल च्या “राखेतून उडाला मोर” या राज्यस्तरीय बालनाट्य पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संतोष गारडी, लेखक डॉक्टर संतोष साळुंखे आणि विद्यार्थी व कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.शशीकांत पवार यांनी केलेल्या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा शशिकांत पवार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने यांची कामगिरी
पुणे-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाच्या ३६७ कोटींचा अपहर करणाऱ्या २६ आरोपींपैकी २५ पकडल्यावर देखील २६वा आरोपी जो गेली ८ वर्षे फरार होता ,त्यास सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने आणि त्यांच्या पथकाने काल अखेरीस जेरबंद केले . वेगवेगळ्या शहरात तो नाव बदलून राहत होता .
या प्रकरणाची हकीकत अशी कि,’सन २०१२ ते २०१५ या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळास महाराष्ट्र व केंद्र शासन यांच्याकडून रुपये ४८४.८६ कोटी प्राप्त झाले होते. हे अनुदान महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील पात्र लाभार्थ्याना त्यांच्या विकासासाठी वितरीत करण्यासाठी शासनाने मंजुर केले होते. महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हयातील जिल्हा अधिकारी यांच्या अधिपत्याखाली समाजकल्याण अधिकारी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळातील जिल्हा व्यवस्थापक व इतर महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांची समिती गठित करुन शासनाच्या कार्यप्रणालीप्रमाणे वार्षिक निधी कर्ज स्वरुपात वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सन २०१२ ते २०१५ या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन आमदार रमेश नागनाथ कदम व महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) श्रावण किसन बावणे आणि इतर महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून एकुण ३६७कोटी रुपये रकमेचा शासनाचा विश्वासघात करुन अपहार केला होता. सदर प्रकरणात गु. अ. वि. कडे एकूण ७ गुन्हे तपासावर आहेत. सदर प्रकरणात प्रथम दहिसर पो. स्टे. गु.र.नं. ३३६/२०१५ भा. द. वि. कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३८४, २०१, २०९, १२०(ब), ३४सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कल १९९८ चे कलम ७, ८, १३ (१) (सी), १३ (डी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील २६ आरोपींविरुध्द यापूर्वी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी व महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम हा गेल्या ८ वर्षापासून कारागृहात आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपी कमलाकर रामा ताकवाले वय ४० रा. सराफनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद हा सदरचा गुन्हा घडलेपासून मिळून येत नव्हता. सदरच्या आरोपीस न्यायालयाने फरार घोषीत केलेले होते. सदरचा आरोपी हा गेले ०८ वर्षापासून फरार होता. सदरचा आरोपी हा स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्ह्यात राहात असलेची माहिती भरारी पथक, गुन्हे अन्वेषण विभागास प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे भरारी पथक, गुन्हे अन्वेषण विभागाकडील तपास पथक गेले ४ महिन्यापासून सदर आरोपीचा तपास औरंगाबाद, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात करत होते. दरम्यानचे काळात आरोपी हा ता. अकोले, व ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर परिसरात आपले नाव बदलून रहात असलेची व एम चारचाकी वाहन वापरत असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाली होती. सदर वाहनाच्या फास्ट टॅगचे माहितीव्दारे आरोपीचा शोध घेणेकरीता भरारी पथकाकडील तपास पथक दिनांक १९/०६/२०२३ रोजी ता. अकोले, ता. संगमनेर परिसरात रवाना करण्यात आले होते. सदर तपास पथकाने आरोपी संदर्भात प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, दिनांक २१/०६/ २०२३ रोजी आरोपी नामे कमलाकर रामा ताकवाले वय ४० रा. सराफनगर, पैठण, जिल्हा औरंगाबाद यास हॉटेल अहमद, संगमनेर येथून ताब्यात घेतले आहे. सदरची कार्यवाही प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, सारंग आव्हाड, पोलीस उप महानिरीक्षक, (आ.गु.शा ) गु.अ.वि. व डॉ. दिनेश गि. बारी पोलीस अधीक्षक, भरारी पथक यांचे मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारीअनुजा देशमाने, अपर पोलीस अधीक्षक, भरारी पथक यांचे अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक, श्री दिनेश पाटील, पो.हवालदार कृष्णकांत देसाई, पो.हवालदार राजेंद्र दोरगे सर्व नेमणूक भरारी पथक, व पो.शि. अशोक गाडे, राजूर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ प्रारंभ ‘ या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मधुरा कापशीकर आणि वेदश्री पुणतांबेकर या प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्यांनी बहारदार सादरीकरण केले. हा कार्यक्रम शनीवार, २४ जून २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६८ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.ईशान परांजपे, कृष्णा साळुंखे, यशवंत थिटे,शुभम खंडाळकर, कल्याणी गोखले यांनी साथसंगत केली. वेदश्री पुणतांबेकर यांनी वंदने नंतर सुरुवातीला तीन ताल सादर केला. त्यात उठान, थाट, बंदिशी , तिहाई, ठुमरी ,तराणा यांचा समावेश होता. रसिकांनी चांगली दाद दिली. मधुरा कापशीकर यांनी विष्णू वंदनेने सुरवात केली.ताल झपताल दहा मात्रात सादर केला. त्यात उठान,तोडे,तिहाई, बंदिश तराणा यांचा समावेश होता. याही सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली. तृषा श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज पुण्यात मान्सूनच्या सरी बरसल्या दिवसाआड पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांसाठी या मान्सूनच्या सरी आनंदवार्ता घेऊन आल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीच्या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाला सुरूवात झाली आहे.पावसाचे प्रमाण कमी असले तरी 25 ते 27 जून या कालावधीत पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी 5 पर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 32 मिमी, पानशेत 10 मिमी, वरसगाव 14 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.सकाळी सुरु झालेला पाऊस १५ मिनटात गायब झाला पुहा ऊन पडले ,पण नंतर हुलकावणी देऊन तो दिवसभर अधून मधून बरसत राहिला .
दरम्यान, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक 32 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.शनिवारी सकाळपासून शहरात हजेरी लावलेल्या मान्सूनने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असून अधून मधून पावसाच्या मोठया सरी येत आहेत.
पुणे- ज्या बीआरटी वरून सुरेश कलमाडी यांची महापालिकेतील सत्ता गेली,त्यानंतरही हि बीआरटी वर्षानुवर्षे पुण्यात खाजगी वाहनांची गळचेपी करत रस्ता पीएमपी च्याच XXX चा असे समजून आक्रमण करत गेली आणि वाहतुकीचा बट्ट्या बोळ पुणेकरांच्या माथी मारला.या बीआरटी च्या मार्गाची हकालपट्टी करण्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना आज अखेरीस उशिरा का होईना यश आले आहे.त्यांनी दीर्घ काल या बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची भूमिका सातत्याने मांडत ते काढून टाकण्याची मागणी सुरु ठेवली होती.हडपसर च्या रस्त्यावरील बीआरटी मार्ग नागरिकांनी स्वतः हून उखडून टाकण्याचे प्रकार हि अनेकदा घडले आहेत.तसेच हडपसर मार्गावरील बीआरटी मार्ग झुगारून लावण्याचे प्रकार हि सातत्याने होत असतात.
दरम्यान याप्रकरणी सुनिल टिंगरे म्हणाले,’नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्गिका काढावी अशी मागणी मी सातत्याने करत होतो. विधीमंडळ अधिवेधनातही हा प्रश्न उपस्थित केला होता.अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन बंद अवस्थेत असलेला गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा बीआरटीमार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो.
अडीच हजार कैद्यांची क्षमता प्रत्यक्षात सात हजार कैदी,आणि बंदोबस्ताला अवघे १८७ पोलीस
पुणे-येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये आपसात मारामारी,गटागटात मारामारी होण्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत,या कारागृहाची अडीच हजार कैद्यांची क्षमता असताना येथे सात हजार कैदी बंदिस्त आहे.त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरती झाल्याने कैद्यात वारंवार धुसफूस हाेण्याचे प्रकारे वाढू लागले आहे.नुकतेच दाेन गटात कारागृहात वादविवाद झाल्यानंतर चार कैदी जखमी झाल्याचा प्रकार घडल्यावर एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला हाेता.आता पुन्हा एकदा येरवडा कारागृहात कैद्यात हाैदावर पाणी भरण्यावरुन राडा झाल्याचा प्रकार घडलेला आहे.
याप्रकरणी न्यायालयीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे,वैभव थिटे व तेजस बाळासाहेब बच्चाव या कैद्यावर येरवडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 324,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत येरवडा कारागृहाचे शिपाई कृष्णा जयवंता वानाेळे (वय-29) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असताना कारागृहातील सीजे विभागातील पाण्याचे हाैदा जवळ सदर चार अराेपी कैदी यांची न्यायालयीन बंदी सुजित प्रकाश टाक याचे साेबत वाद झाले. त्यावेळी आराेपींनी त्यास हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन चाैघांनी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बादल्यांनी त्याच्या डाेक्यात,कपाळावर,उजव्या डाेळयावर, पाठीत मारल्याने त्यास जखमी केल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एस काटे पुढील तपास करत आहे.
पुणे: लोणी काळभोर भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने ३६ वर्षीय प्राध्यापिकेची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत, तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच हजार डाॅलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयीन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयंक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार प्राध्यापक महिला लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आहे. मयंक सिंगने प्राध्यापिकेला समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती. त्यानंतर त्याने समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केली. मी सांगितले तसे नाही केले तर समाजमाध्यमात तुमची छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेला धमकावून त्यांची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत तयार केली.त्यानंतर राॅबिन नावाच्या खातेधारकाने महिलेस धमकावले. महिलेची ध्वनिचित्रफीत त्याने पतीस पाठविले, तसेच त्यांच्याकडे पाच हजार अमेरिकन डाॅलरची मागणी केली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या प्राध्यापक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गंधाले तपास करत आहेत.