Home Blog Page 1477

इजिप्तच्या पंतप्रधानांनी केले मोदींचे स्वागत, विमानतळावर दिला गार्ड ऑफ ऑनर

कैरो-

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. राजधानी कैरोमध्ये त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदींचा हा चार दिवसांचा दौरा द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

इजिप्तचे राष्ट्रपती, अब्देल फतेह एल सिसी, या वर्षीच्या आपल्या 74 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. दुसऱ्या शब्दांत, दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये 6 महिन्यांतील ही दुसरी बैठक असेल. मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 1000 वर्षे जुन्या शिया मस्जिद अल-हकीमलाही भेट देणार आहेत.

  • इजिप्त हा एक असा देश आहे ज्याला राजनैतिक जगामध्ये ‘डबल हॅट’ म्हणूनही ओळखले जाते. वास्तविक, इजिप्तचा समावेश अरब तसेच आफ्रिकन देशांमध्ये होतो. म्हणजे भारताने इथे आपला प्रभाव वाढवला तर अरबस्तानसह आफ्रिकेतही तो मजबूत होऊ शकेल.
  • 2021-22 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $7.26 अब्ज इतका होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 60 टक्के अधिक आहे. आता मोदी आणि अध्यक्ष सीसी यांना पाच वर्षांत ते 12 अब्ज डॉलरवर न्यायचे आहे.
  • इजिप्तला सुएझ कालव्याचे आर्थिक क्षेत्रात रूपांतर करायचे आहे. हा सुमारे 460 किलोमीटर लांबीचा व्यापार मार्ग आहे. त्यात आफ्रिका, अरेबिया आणि युरोपमधील 6 महत्त्वाच्या बंदरांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी चीन 1 अब्ज डॉलर खर्च करत आहे. त्याला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा एक भाग बनवायचा आहे. भारताला याची चांगली जाणीव आहे आणि वेळेत येथे अधिक गुंतवणूक करायची आहे.
  • इजिप्त सरकारची इच्छा आहे की भारतानेही येथे लष्करी उपस्थिती वाढवावी. दोन्ही देशांमध्ये गुप्त लष्करी करार झाल्याच्याही बातम्या आहेत. जानेवारीमध्ये दोन्ही सैन्याने राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एकत्रित प्रशिक्षणही केले होते.

रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल, बंडखोर वॅग्नरआर्मीचा दावा, वॅग्नरविरोधात पुतिनआक्रमक दिला इशारा

युक्रेनसोबत वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता रशियातच तख्तपालट होण्याची चिन्हे आहेत. रशियाचे खासगी सैन्य वॅगनर आर्मीने सरकारविरोधात मोर्चा उघडताना रोस्तोव शहरावर कब्जा केला आहे. तर रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल असा दावा वॅगनरने केला आहे. त्यामुळे आता रशियातील पुतिन युग संपेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.वॅगनर ग्रुपने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून ही घोषणा केली आहे. पुतिन यांनी चुकीचा पर्याय निवडला असून रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल अशी घोषणा वॅगनरने केली आहे.यात आपलाच विजय होईल असेही वॅगनरने म्हटले आहे. एक किंवा दोन गद्दारांच्या जीवाला 25000 सैनिकांच्या जीवापेक्षा जास्त महत्व देण्यात आले आहे. रशियात अधिकृतपणे गृहयुद्ध सुरू झाले आहे असे वॅगनरने घोषणेत म्हटले आहे.

पुतिन यांना थेट आव्हान

वॅगनरची ही घोषणा राष्ट्रपती पुतिन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे. या बंडखोरीनंतर राष्ट्रपतींचे निवासस्थान क्रेमलिन अलर्ट मोडवर आले असून संपूर्ण मॉस्को शहर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक महत्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वॅगनरचे बंड आणि घोषणेनंतर रशियासाठी पुढचे काही तास अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.पुतिन यांच्याविरोधातील बंडखोरीचे नेतृत्व वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोगिन करत आहेत. तेच रशियाचे पुढचे राष्ट्रपती असू शकतात असे बोलले जात आहे. वॅगनरने रशियन शहर रोस्तोवचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. असे मानले जाते की येवगेनींना सत्तापालट करायचा आहे.

“येवगिनी ग्रिगोझीनने पाठित खंजीर खुपसला आहे. वॅग्नर लष्कराला याची किंमत मोजावी लागणार,” -पुतिन

रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी निर्माण केलेल्या वॅग्नर या खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर मॉस्कोच्या क्रेमलिन येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर, वॅग्नर लष्कराचे प्रमुख येवगिनी ग्रिगोझीनने दोन शहरं ताब्यात घेतले असल्याचा दावा केला आहे. अशातच शनिवारी ( २४ जून ) पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित केलं. “येवगिनी ग्रिगोझीनने पाठित खंजीर खुपसला आहे. वॅग्नर लष्कराला याची किंमत मोजावी लागणार,” असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

“रशिया भविष्यासाठी संघर्ष करत आहे. आपल्याला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना दूर केलं पाहिजे. तसेच, आपल्यातील मतभेद दूर करण्याचीही आवश्यकता आहे. रशियन सैन्यात एकता हवी आहे. जो कोणी बंडाच्या बाजूने उभा राहिलं, त्याला कठोर शिक्षा ठोठावली जाईल,” असं पुतिन यांनी सांगितलं.“आपल्या पाठित खंजीर खुपसला आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. देशाबरोबर विश्वासघात झाला असून, या बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. आम्ही देशाचे आणि नागरिकांचे रक्षण करू,” असं पुतिन यांनी म्हटलं.

“रशियन नागरिक, सशस्त्र दल, कायदा अंमलबजावणी संस्था आणि लष्कराला एकत्र येण्याचं आवाहन करतो. पश्चिमेकडील संपूर्ण सैन्य आपल्याविरुद्ध काम करत आहेत. पण, आपण आपल्या नागरिकांची सुरक्षा, स्वातंत्र्यता आणि रशियाचे अधिकार वाचवण्यासाठी लढत आहोत,” असं पुतिन म्हणाले.

टेरेन्स चे नवीन ‘धोका’ गाणे प्रदर्शित

रंगरेझा फिल्म्स निर्मित आणि सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक व विविध डान्स रिऍलिटी शोज मध्ये परीक्षक असलेले टेरेन्स लेविस यांच्या वर चित्रित झालेले ‘धोका’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. २२ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. या गाण्याच्या प्रमोशन साठी टेरेन्स आणि अभिनेत्री प्रीत आनंद पुण्यात आले होते.
या गाण्याची निर्मिती केली आहे रोहित कुमार यांनी आणि गायक आहेत नकाश अझीझ. या गाण्याचे गीतकार अभिषेक टी असून त्याला संगीतबद्ध केले आहे अमोल-अभिषेक यांनी. नेहमी आपल्या वेगळ्या लुक साठी प्रसिद्ध असलेले टेरेन्स या गाण्यात देखील एका अनोख्या मावलीच्या भूमिकेत दिसून येतात. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स यांनी केले आहे.
या गाण्याच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना टेरेन्स म्हणाले, “आजपर्यंत मी कॅमेराच्या मागून नृत्य दिग्दर्शन करत आलो आहे यावेळी पहिल्यांदाच मला कॅमेरा समोर येऊन डान्स व अभिनय देखील करावा लागला. हे माझ्यासाठी आव्हान होते परंतु मला अशी आव्हाने स्वीकारणे आवडतात. गाण्याचे बोल व संगीत अतिशय सुंदर असून आजच्या पिढीला ते आवडेल असे आहे त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाले यात शंका नाही.”
यागाण्याला केवळ २४ तासात १ मिलियन पेक्षा ह्यूज मिळाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

चित्रपटसृष्टीत चार दशके पूर्ण केल्याबद्दल हृतिक  रोशनने दिग्गज अभिनेते अनिल कपूरचे यांचे केले अभिनंदन !

अभिनेता अनिल कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हृतिक रोशनने फायटरबद्दल दिली एक खास हिंट ! 
अनिल कपूरने भारतीय चित्रपटसृष्टीत 40 वर्षे पूर्ण केली: हृतिक रोशनने त्यांच्या आगामी चित्रपट फायटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी बद्दल दिली एक खास झलक !
दिग्गज अभिनेता अनिल कपूरने काल त्याच्या गौरवशाली कारकिर्दीतील अविश्वसनीय 40 वर्ष पूर्ण केली या बद्दल त्यांनी सोशल मीडिया वर एक खास पोस्ट देखील शेयर केली.  ” वो सात दिन ” या त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील नॉस्टॅल्जिक क्लिप शेअर करत अष्टपैलू अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृष्टीत 40 उल्लेखनीय वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या पोस्ट  मधली एक ओळ ” मी जिथे आहे तिथे हेच आहे, मला हेच करायचे आहे ” ही तुफान व्हायरल झाली ! 
https://www.instagram.com/p/Ct1LF92x_Bk/
काही तासा मध्ये अनिल कपूरची पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल झाली. या पोस्ट ने त्यांच्या चाहत्यांची आणि इंडस्ट्री मधल्या  दिग्गजांचे लक्ष वेधून घेतलं. बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याने त्यांच्या या पोस्ट वर एक खास कॉमेंट केली. चित्रपटातील अनिल कपूरच्या नेत्रदीपक अभिनयाबद्दल चाहत्यांना संगाताना हृतिकने कॉमेंट मध्ये लिहिलं ” आणि तुझे सर्वोत्तम काम सतत चांगले होत आहे. तू फायटरमध्ये सर्वोत्तम आहेस!! खूप छान!!” आता ही कॉमेंट एक चर्चेचा विषय ठरली असून अनिल कपूर यांच्या आगामी फायटर बद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनिल कपूरचा प्रवास अगदीच विलक्षण ठरला आहे. चार दशकांच्या कारकिर्दीत ते भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे आयकॉन बनले आहेत. द नाईट मॅनेजर पार्ट 2, अॅनिमल आणि फायटर यासह त्याच्या आगामी प्रकल्पांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना अनिल कपूर त्याच्या अतुलनीय कार्याने अनेक अभिनेत्याने प्रेरित करत आहेत.

आषाढी मुळे बकरी ईदला कुर्बानी नको

ऑल इंडिया इंटलेक्च्युअल फोरम, पुणेचे अध्यक्ष डॉ. एस.एन.पठाण यांचे आवाहन

 पुणे, 24 जूनः आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद असल्याने मुस्लीम बांधवांनी महाराष्ट्रातील 20 लाख वारकर्‍यांचा व समग्र महाराष्ट्र जनतेचा सन्मान करण्यासाठी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवार 30 व शनिवार 31 जून रोजी साजरी करावी. तसेच महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम मध्ये सौहार्दाचे वातावरण ठेवावे. असे आवाहन ऑल इंडिया इंटलेक्च्युअल फोरम, पुणे चे अध्यक्ष विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेचे सल्लागार व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम इंटलेक्चुअल फोरम, पुणेचे सचिव माजिद पैठणकर व वहिदा अलम मुलाणी उपस्थित होत्या.
डॉ. पठाण यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर माऊलींनी चौदाशे वर्षापूर्वी आता विश्वात्मके देवे असे म्हणून ईश्वराकडे पसायदान मागितले. संत तुकाराम महाराजांनी विष्णूदास जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असे म्हणून भारतातील जाती पातीवर पहिला आसूड ओढला. म्हणून अनेक मुस्लीम संत वारकरी संप्रदायाकडे आकर्षीत झाले. त्यातूनच श्रीगोंदा येथील महंमद महाराज व जैतूनबी या मुस्लीम संतांच्या वारकरी दिंडी आजही त्यांची परंपरा चालू ठेवतात. असा समृध्द हिंदू मुस्लीमांच्या बंधुभावाचा वारकरी संप्रदायाचा इतिहास असतांना मुस्लीम बांधवानी गुरूवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी दिवशी बकर्‍याची कुर्बानी देणे अत्यंत गैर आहे.
बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी 29 जून रोजी येत आहे. बकरी ईद चे वैशिष्टे म्हणजे ज्या मुस्लीम बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यांनी ईश्वरासाठी त्याग म्हणून एक बकरा यांची कुर्बानी बळी द्यायची असते. हे संपूर्ण अन्न गोर गरीब अथवा नातेवाईकांना वाटून दयायचे असते. थोडक्यात बकरी ईद म्हणजे त्याग, दानधर्म, गरीबा प्रति दया, करूणा व बंधुभाव याचा संस्कार करणारा सण असतो.
त्यामुळेच समग्र महाराष्ट्र जनतेचा सन्मान करण्यासाठी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 30 व 31 जून रोजी साजरी करावी व महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम मध्ये सौहार्दाचे वातावरण ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

अमरावती, दि. २४ : भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात २४९ संशोधकांना आचार्य पदवी, ११९ गुणवंतांना सुवर्णपदके, २३ रौप्यपदके आणि २५ रोख पारितोषिके तसेच ४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी व २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.

नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी ‘दशसूत्री’ दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे  जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

भगवान श्री राम यांनी विश्वशांतीचा आदर्श ठेवला-श्री श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी

एमआयटी डब्ल्यूपीयूत बोध रामकथेचा ग्रंथ प्रकाशित

 पुणे, २३ जूनः  भगवान श्री राम यांनी विश्व शांतीचा आदर्श ठेवलेला आहे. एक व्यक्ती कसा असावा, आदर्श पुत्र, पिता, पती आणि भाऊ कसा असावा हे रामाच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळते. राम केवळ राजा नाही तर ते मर्यादा पुरूषोत्तम व्यक्तीमत्व आहे. असे विचार पूज्य श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयाचे पीठधिपती श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात भागवताचार्य ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांच्या लेखणीतून उतरलेल्या बोध राम कथेच्या या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी बोलत होते.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार व माजी आमदार प्रशांत परिचारक व लेखक शहाजीराव बळवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते. तसेच कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये व अनिरूद्ध बडवे उपस्थित होते.
विश्वशांतीसाठी अहोरात्र कार्य करणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या विशेष सत्कार श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी म्हणाले, रामाचे संपूर्ण व्यक्तीत्व हे शांती स्वरूप आहे. त्यामुळेच रामाला संपूर्ण विश्वामध्ये आदर्श व मर्यादा पुरूषोत्तम व्यक्ती मानले जाते. रामाच्या व्यक्तीत्वामुळेच रामायण देशातील सर्व भाषांमध्ये काळानुसार अनुवादीत झाला आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, बोध रामकथेचा ग्रंथ समाजाला नक्कीच दिशा दर्शक ठरणार आहे. लेखकांनी ज्या पद्धतीने विचार मांडले आहे ते वर्तमानकाळा नुसार आहे. संपूर्ण व्यक्तीमत्व कसे आदर्श असते हे रामाच्या संपूर्ण जीवन चरित्रावरून दिसते.
उल्हास पवार म्हणाले, समाज व्यवस्था बदलली पण मानवी मनाचे गुढ रहस्य आज ही रामायणात सापडते. रामाच्या जीवन शैलीत व तत्वज्ञानत मानवी जीवन समाविष्ठ आहे. मानवी मनाचे विविध पैलू, स्वभाव, गुण दोष, कुटुंब, नाते या सर्व गोष्टी म्हणजेच रामायण आहे.
लेखक बाळासाहेब बडवे यांनी ग्रंथाच्या माध्यमातून रामायणाचे अनेक पैलू सद्यस्थितीतील घटनांच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राम कथेतील अनेक सूक्ष्म निरीक्षण नोंदवत असताना त्यामधून नैतिक आचरण आणि रामभक्तीचा आदर्श नव्याने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
शहाजीराव बळवंत म्हणाले, रामायणातील तत्व जे मांडले गेले त्या तत्वांचे पालन समाज करीत नाही. रामायण हे कुटुंबासाठी आहे. यात भाऊ, पत्नी, वडील यांच्या बरोबर कसे नाते असावे हे दर्शविले आहे. त्यामुळे वर्तमान काळात या ग्रंथांची आवश्यकता आहे.
यावेळी डॉ. संजय उपाध्ये व वारकरी दत्तात्रय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अनिरूद्ध बडवे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी रोहन मोरेची निवड

पुणे– तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारविजेता तसेच राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कारविजेता पुण्याचा सागरी  जलतरणपटू रोहन मोरे याची वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग  असोसिएशनच्या (डब्ल्यूओडब्ल्यूएसए)सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.

वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या वतीने मुख्य  कार्यकारी अधिकारी क्विन फिट्झगेराल्ड यांनी नुकतीच याची घोषणा केली. या संघटनेने आपल्या तीन मंडळांवर रोहनची नियुक्ती केली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असेल.त्याचा  डब्ल्यूओडब्ल्यूएसएच्या नियम समिती,प्रशिक्षण आणि शिक्षण समिती तसेच पर्यावरण समितीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी अशी संधी मिळालेला तो एकमेव भारतीय आहे.

३५ वर्षीय रोहन हा सात महासागर पोहून जाणारा जगातील केवळ नववा तर आशियातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. डब्ल्यूओडब्ल्यूएसएने आपल्या सल्लागार मंडळात त्याचे स्वागत केले. “सुरक्षितता, पर्यावरणीय कारभारीपणा आणि शैक्षणिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे ध्येय आहे.तुमची  अद्वितीय कौशल्ये आणि दृष्टीकोन वर उल्लेख केलेल्या  क्षेत्रातील प्रगती आणि परिवर्तनासाठी सहाय्यक ठरतील,असे डब्ल्यूओडब्ल्यूएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्विन  फिट्झगेराल्ड यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

रोहनला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.२०१६ मध्ये केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. २०१८ मध्ये रोहनचा ‘इंटरनॅशनल मॅरेथॉन  स्विमिंग हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला.’वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन’ने २०१६ मध्ये त्याचा  जगातील ५० साहसी जलतरणपटूंमध्ये समावेश केला आहे. याबरोबरच ‘वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन’च्या  प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग मॅनऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी रोहनला तीनदा नामांकित  करण्यात आले होते.

पावसाळ्यातील वीजसुरक्षा

तापलेल्या उन्हाळ्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असलेल्या पावसाला कमी अधिक प्रमाणात सुरवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे. तसेच महावितरणकडून येत्या २६ जून ते २ जुलै २०२३ पर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच पावसाळ्याच्या सुरवातीला वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ होते त्यामागील कारणे काय याबाबत माहिती देणारा हा लेख.

खबरदारी हीच वीजसुरक्षा! – पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व महावितरणच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. ही उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर ठेवावीत. जेणेकरुन त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणे ओलसर झाले असल्यास ते त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावे. तसेच पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा इतर वीज यंत्रणेला बांधू नये.

मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी- घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. ही फ्यूज तार वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार फ्यूजसाठी वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

विद्युत सुरक्षेसाठी उपाययोजनाही महत्वाच्या! – वीजमीटरपासून घरामध्ये केलेल्या जुनाट वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी. वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व विद्युत उपकरणांचे अर्थींग योग्य असल्याची खबरदारी घ्यावी. वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य ‘अर्थिंग’ हा पाया आहे. तसेच मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज इत्यादी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेटचाच वापर करावा. कारण थ्रीपिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

ओल आलेल्या भिंतीला, लोखंडी पत्र्याला, फ्रीज, टिव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील वायरिंगची तात्काळ तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. ओलसर लोखंडी पाईप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी. जुनाट व खराब झालेली वायरिंग तत्काळ बदलून घ्यावी. आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर विद्युत उपकरणे बंद करून ते स्वीच बोर्डच्या प्लगपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा दाब वाढून विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ शकते.

सर्कीट ब्रेकर, एक सुरक्षा कवच!- घर, दुकान, सोसायट्या व इतर वास्तुमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून विद्युत अपघात होतात. यासाठी प्रामुख्याने वायरिंगमधील करंट लिकेज तसेच योग्य क्षमतेचे सर्कीट ब्रेकर किंवा अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर (‘इएलसीबी’, ‘आरसीसीबी’, ‘एमसीबी’) लावल्यास विद्युत अपघात टाळता येतात.

घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वीजपुरवठा तात्काळ खंडित होणे आवश्यक आहे. त्यामुळे घर, सोसायटी किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर (इएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्कीट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्कीट ब्रेकर (एमसीबी’) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे. विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रीक सर्कीटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारांपासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्कीट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. सर्कीट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे गरजेचे आहे.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहा– अतिवृष्टीमुळे, वादळाने तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. सावध राहावे. वीजप्रवाह सुरु असण्याची शक्यता असल्याने विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. तसेच तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांना किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेला हात लावण्याचा किंवा तुटलेल्या तारा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

विद्युत सुरक्षेसाठी काय करू नये! – विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा. अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर अपघात होऊ शकतो. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा घरातील कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः लोखंडी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

पावसाळ्याच्या सुरवातीला वीजपुरवठा का खंडित होतो

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनीमातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व खाद्यपदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.

अभियंते व जनमित्रांची कसोटी – पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांसाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध – शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. वीजसेवेविषयक सर्व प्रकारची तक्रार दाखल करता येते. सोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती देण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

संगीतकार कै. श्रीकांत ठाकरे ‘संगीत पुरस्कार’ उत्तरा केळकर यांना जाहीर

पुणे-

ज्येष्ठ संगीतकार कै. श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मंगळवार २७ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजता  ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना ‘श्रीकांत ठाकरे संगीत’ पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार आनंद माडगुळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. यावेळी कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित ‘स्वरराज’ हा विशेष गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाईल. त्यामध्ये गप्पागोष्टी आणि आठवणींना उजाळा देखील देण्यात येईल अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि संयोजक योगेश राजापूरकर व निकिता मोघे यांनी दिली.

हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संवाद पुणे आणि स्वयंभू प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला असून याची संकल्पना सुनील महाजन यांची आहे. ‘स्वरराज’ या कार्यक्रमात संगीतकार कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेली गीते पार्श्वगायक रश्मी मोघे, धनश्री गणात्रा, अजित विसपुते आणि सारंग कुलकर्णी सादर करणार असून अमृता ठाकूरदेसाई, केदार परांजपे, नितीन शिंदे, अपूर्व द्रविड आणि अभय इंगळे हे वाद्यसंगत करतील. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर (मुंबई) हे कै. श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत विषयक आठवणींना उजाळा देतील. या सर्व कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ निवेदिका स्नेहल दामले करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर, 1000 वर्षे जुन्या शिया मशिदीला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर रवाना झाले आहेत. चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरून मोदी थेट इजिप्तची राजधानी कैरो गाठतील. द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

इजिप्तचे राष्ट्रपती, अब्देल फतेह एल सिसी, या वर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये 6 महिन्यांतील ही दुसरी बैठक असेल. मोदी येथे भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 1000 वर्षे जुन्या शिया मस्जिद अल-हकीमलाही भेट देणार आहेत.

26 वर्षांनंतरचा महत्त्वाचा दौरा

  • इजिप्तचे भौगोलिक आणि सामरिक स्थान केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अनेक अर्थांनी खूप महत्त्वाचे आहे. 1997 नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान इजिप्तला भेट देत आहेत.
  • सौदी अरेबियाच्या वृत्तपत्र ‘द नॅशनल’शी बोलताना माजी राजनयिक अनिल त्रिगुनायत म्हणाले – मोदींच्या दौऱ्यातून भारत आणि इजिप्तमधील घनिष्ठ संबंध दिसून येतात. आतापर्यंत इजिप्तचे जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर गेले आहेत. अनिल लिबिया आणि जॉर्डनमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत.
  • अनिल म्हणतात- इजिप्त भारताला खूप महत्त्व देत आहे. हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इजिप्त भारतासाठीही महत्त्वाचा आहे. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही देशातील लोकांमध्ये खूप जवळचे नाते निर्माण झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून दोन्ही देश एका ना कोणत्या मार्गाने एकमेकांशी जोडले गेले आहेत. इजिप्त भारतासोबत संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापारावर भर देत आहे.
  • इजिप्त व्यतिरिक्त भारताने ओमान आणि यूएईला सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यावरून भारत या प्रदेशात किती वेगाने आपला प्रभाव वाढवत आहे हे कळते.

बायडेन यांनी मोदींना AI लिहिलेला टी-शर्ट गिफ्ट दिला

वॉशिंग्टन:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना AI लिहिलेला टी-शर्ट भेट दिला. त्यावर लिहिले आहे – The Future is AI म्हणजेच AI हे भविष्य आहे. यासोबतच त्याखाली अमेरिका आणि भारत असे इंग्रजीत लिहिले आहे.एक दिवसापूर्वी अमेरिकन संसदेत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, AI म्हणजे अमेरिका आणि भारत. म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी वाढवण्याची आमची वचनबद्धता आहे. गेल्या काही वर्षांत AI- आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बरीच प्रगती झाली आहे. तसेच, इतर एआय- यूएस आणि भारतात अधिक लक्षणीय घडामोडी घडल्या आहेत.बायडेन यांची ही भेट त्यांच्या भाषणाशी जोडली जात आहे. राष्ट्रपती बायडेन यांनी मोदींना हा टी-शर्ट भेट दिला तेव्हा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. या सर्वांनी शुक्रवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत हाय-टेक हँडशेक कार्यक्रमाला हजेरी लावली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन

पुणे:मान्सून सक्रिय झाला असून आज पुण्यात ,मुंबईत देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.पुण्यात पालखीचे आगमन समयी पावसाने अगदी अत्यल्प मिनिट अलगदच छिडकावा केला होता, त्यानंतर आज सकाळी पावसाने 10 ते 15 मिनिटे हलकासा वर्षाव केला.त्यानंतर दिवसभर अधून मधून पुण्यात पावसाच्या हलक्या सारी कोसळत होत्या .

दीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे आगमन झालं आहे. या पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती.बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी सुखावला आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळं आता कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली या भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे.

पुढच्या आठवड्यात आषाढी वारीचा सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. तसेच ठाणे,नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली.

‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!


सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास “ढ लेकाचा” या चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर येणार आहे.

आज या सिनेमाचं पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेलं हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डे त्याच्या चेहर्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना “ढ लेकाचा” चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. आषाडीच्या अगदी दोन दिवस अगोदर ‘ढ लेकाचा’ हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायासोबतच महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या प्रिय विठूयायचा हा प्रसादच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे दिग्दर्शित ‘ढ लेकाचा’ या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते, भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात बाल कलाकार आयुष उलागड्डे सोबतच अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

“ढ लेकाचा” चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वनी यातून पाहायला मिळणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ फिल्म फेस्टिवल’ने या चित्रपटामधील बालकलाकार आयुष उलागड्डेच्या उत्तम अभिनय कामगिरीची ओळख प्रेक्षकांना पुरस्कारामार्फत करून दिली आहे. दर्जेदार आणि उत्तम कथा यासारख्या वेगवेगळ्या पठडीतले आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ मार्फत “ढ लेकाचा” सारख्या दर्जेदार मराठी चित्रपटाची जादू प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येतील.

औंध कुटी रूग्णालय सुविधायुक्त करणार:आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – महापालिकेचे औंध कुटी रूग्णालय सर्व सोयीसुविधांनी युक्त करण्याचा निर्धार असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पाठपुरावा करेन, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर आढावा अधिकाऱ्यांसमवेत घेतला. या रुग्णालयाचा फायदा औंध परिसरातील गर्भवती महिला भगिनी घेतात. परंतु या रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसुतीची सोय नाही, तसेच रुग्णालयाची इमारत जुनी असून पावसाळ्यामध्ये गळती होते, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे, अशा त्रुटी या भेटीदरम्यान निदर्शनास आल्या, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या समस्यांबाबत लवकरच पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे महापालिका आरोग्य प्रमुखांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच या समस्या सोडवून औंध कुटी रुग्णालय सर्व सोयीसुविधायुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी रूग्णालय भेटीच्या वेळी दिले.

यावेळी बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, सागर मदने, सुप्रीम चोंधे, सुशील लोणकर आदी उपस्थित होते.