बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्यावर शिवसैनिक आक्रमक होतीलच–आदित्य ठाकरे
मुंबई-उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या भाषणानंतर सोमवारी शिवसैनिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंताला मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी चार शिवसैनिकांना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती. या प्रकरणी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मनपावर मोर्चा काढत जाब विचारला होता. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये मुंबईतील माजी नगरसेवक सदा परब, हाजी अलीम शेख, उदय दळवी, संतोष कदम या चौघांचा समावेश आहे. त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर सोमवारी एच-पूर्व महापालिका वॉर्ड कार्यालयामध्येच शिवसेना शाखा तोडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेवेळी शिवसेना नेते परब हे मनपा वॉर्ड कार्यालयात उपस्थित होते. २२ जून रोजी वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती.याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा असताना शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर शिवसैनिक आक्रमक होतीलच.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला होता. मनपा अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार रात्री उशिरा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.