Home Blog Page 1455

गोदरेज एरोस्पेसतर्फे स्वदेशी उत्पादनाच्या आधारे भारताच्या अंतराळ संशोधन आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचे सक्षमीकरण

·         अत्याधुनिक सुविधाकेंद्रात २५० कोटी रुपये गुंतवण्याचे उद्दिष्ट

·         इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेसाठी व्यवसायातर्फे महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा

मुंबई, १० जुलै २०२३ : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने त्यांची व्यवसाय शाखा गोदरेज एरोस्पेस स्वदेशी उत्पादन, नावीन्यपूर्णता आणि तांत्रिक प्रगतीवर आपले लक्ष केंद्रित करत असल्याची घोषणा केली आहे. गोदरेज एरोस्पेस राष्ट्र उभारणी आणि स्वावलंबनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून प्रगत उत्पादन आणि जोडणी तसेच एकात्मिक सुविधांसाठी महाराष्ट्रातील खालापूर येथे नवीन सुविधाकेंद्र उभारण्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. व्यवसायातर्फे इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण घटक देखील पुरवले जात आहेत.

वर्षानुवर्षे, कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल घटकांसह महत्त्वपूर्ण घटकांच्या निर्मितीमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या योगदानांनी चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये अविभाज्य भूमिका बजावली असून या मोहिमांनी अंतराळ संशोधनात अग्रेसर म्हणून भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. अलीकडील NVS-01 उपग्रहाच्या प्रक्षेपणासह इस्रोच्या धोरणात्मक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत ते प्रत्येक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही प्रक्षेपणाचा एक भाग आहेत.

हा व्यवसाय नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या उत्पादनाच्या वाढीसाठी भारतात आणि निर्यातीद्वारे सक्रियपणे योगदान देत आहे. रोल्स रॉईस, बोईंग आणि जीई सारख्या जागतिक महत्वाच्या कंपन्यांशी सहकार्य करून कंपनी महत्वाच्या घटकांच्या विकास आणि निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. हे प्रयत्न नागरी उड्डाणासाठीच्या उत्पादनात भारताच्या क्षमतांनाच केवळ बळकटी देत नाहीत तर देशाच्या निर्यात क्षमतेतही योगदान देतात आणि एरोस्पेस उद्योगात जागतिक दर्जाची कंपनी म्हणून स्थान मिळवतात. डीआरडीओ इंजिन मॉड्युल्ससह, गोदरेज एरोस्पेस ही भारतात प्रथमच या प्रकारच्या इंजिनचे कोअर मॉड्युल तयार करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे.

गोदरेज एरोस्पेसचे एव्हीपी आणि बिझनेस हेड मानेक बेहरामकामदीन म्हणाले, “इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. राष्ट्र उभारणी आणि आत्मनिर्भरता यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे हे उदाहरण आहे. गोदरेज एरोस्पेसमध्ये आम्ही अंतराळ प्रकल्प आणि नागरी उड्डाण क्षेत्रातील देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी योगदान देत स्वदेशी उत्पादन आणि तांत्रिक प्रगती यासाठी वचनबद्ध आहोत. इस्रोचा विश्वासू भागीदार म्हणून आम्ही भविष्यातील प्रक्षेपण, मोहिमा आणि प्रगत एरोस्पेस घटक आणि प्रणालींच्या विकासासाठी योगदान देत राहू. नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आम्ही पुढील तीन वर्षांत १००% वाढीचा अंदाज घेऊन, अमेरिकेसह जागतिक बाजारपेठांमध्ये नावीन्यपूर्ण आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करत आहोत.”

स्वदेशी क्षमतांचा लाभ घेऊन आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करून कंपनी देशाच्या स्वयंपूर्णतेमध्ये योगदान देत आहे आणि देशात तंत्रज्ञान प्रगतीला चालना देत आहे. हे प्रयत्न आर्थिक वाढीला चालना देतात, गुंतवणूक आकर्षित करतात आणि उच्च-कुशल रोजगाराच्या संधी निर्माण करतात. अशा प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या व्यापक उद्दिष्टाला समर्थन देण्यात येत  आहे.

२१ व्या आंतरराष्ट्रीय जावा- येझ्दी दिनानिमित्त १०,०००+ मोटरसायकलप्रेमींनी साजरा केला या मोटरसायकल्सचा वारसा

·         या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाचे नामवंत सेलिब्रेटीजच्या सहभागासह बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोचीन, पुणे आणि जयपूर येथे आयोजन

·         सहभागींसाठी मोटरसायकल प्रदर्शन, ग्रुप राइड्स, तांत्रिक पैलूंवर वर्कशॉप्स आणि तज्ज्ञांसह चर्चा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

·         सर्व वयोगटातील रायडर्सना एकत्र येऊन मोटरसायकलविषयी त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची तसेच आपल्या लाडक्या बाइकवरून केलेल्या भटकंतीचे किस्से सांगण्याची मिळाली अनोखी संधी

पुणे, १० जुलै २०२३ – रविवारी मोटरसायकल प्रेमी आणि व्हिटेंज बाइकचे चाहते २१ वा आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात गेल्या कित्येक दशकांपासून रायडर्सची मने जिंकणाऱ्या जावा आणि येझ्दी मोटरसायकलच्या वारसा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोचीन, पुणे आणि जयपूर अशा वेगवेगळ्या शहरांतील १०,००० पेक्षा जास्त मोटरसायकलप्रेमी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचे आयोजन मोटरसायकल प्रेमी, विविध मोटरसायकल क्लब आणि कम्युनिटीजतर्फे करण्यात आले होते. जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सचा वारसा जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहाणाऱ्या सहभागींनी मीट-अप्स, ग्रुप राइड्स, प्रदर्शन आणि अशा बऱ्याच उपक्रमांचे आयोजन केले होते.

यावर्षी आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सर्व वयोगटातील रायडर्स त्यांच्या लाडक्या मोटरसायकल्ससह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या लिजंडरी बाइक्सच्या बऱ्याच आठवणी आणि किस्से सांगितले. यावेळी खास मांडण्यात आलेल्या व्हिंटेज जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सचा समृद्ध इतिहास आणि बांधणी पाहायला मिळाली. या वैशिष्ट्यांमुळेच या मोटरसायकल्स गुणवत्तेचे कालातीत प्रतीक मानल्या जातात.

सहभागींनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल जावा येझ्दी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष सिंग जोशी म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचं हे सेलिब्रेशन या मोटरसायकल्सनी भारतीय रायडर्सवर किती सखोल प्रभाव टाकला आहे याची साक्ष देणारं आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणच्या जावा आणि येझ्दी मोटरसायकल प्रेमींचा उत्साह आणि प्रेम पाहायला मिळाला. आम्ही एकत्रितपणे या दोन्ही आयकॉनिक मोटरसायकल्सचा वारसा नव्याने साजरा करण्यासाठी त्यांची बांधणी पुनरूज्जीवित करत आहोत. या कार्यक्रमात केवळ या मोटरसायकल्सची परंपरा जपली गेली, शिवाय, साहस आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला त्यांचा वारसा जतन करण्यात आला.’

दिवसभरात सहभागींनी मुक्त चर्चेत भाग घेतला, एकमेकांबरोबर तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण केली तसेच जावा आणि येझ्दी मोटरसायकलने त्यांना दिलेला आनंद साजरा केला. उपस्थितांना रिस्टोअर्ड क्लासिक्स, दुर्मीळ मॉडेल्स व कस्टमाइज्ड बाइक्स पाहाण्याची संधी यावेळी मिळाली. या क्लासिक मोटरसायकल्सच्या मालकांनी अभिमानाने त्यांच्याजवळ असलेली सर्वात दुर्मीळ आणि मौल्यवान मॉडेल्स उपस्थितांना पाहाण्यासाठी खुली करून दिली. यावेळी कंपनीने रायडर्स कम्युनिटीसाठी नवे अप लाँच केले. या अपच्या माध्यमातून रायडर्सना त्यांचे अनुभव मांडता येतील तसेच त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या सफरींमध्ये सहभागी होता येईल.

या कार्यक्रमात क्लासिक कलेक्टर एडिशनच्या मोटरसायकल्स पाहायला मिळाल्या. त्यामध्ये ओरिजनल सीझेडपासून बेंगळुरूमध्ये मांडण्यात आलेल्या अद्ययावत येझ्दी रोडकिंग्जपर्यंत वेगवेगळ्या मोटरसायकल्सचा समावेश होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून ४०० पेक्षा जास्त व्हिंटेज जावा आणि येझ्दी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय जावा येझ्दी दिनाचे यश या मोटरसायकल्सची लोकप्रियता अजून टिकून असून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रायडर्सची संख्या वाढत असल्याचे सांगणारे आहे. मोटरसायकल्स प्रेमी मोठ्या उत्साहाने या वार्षिक कार्यक्रमाची वाट पाहात असतात, कारण या निमित्ताने जावा व येझ्दी मोटरसायकल्सचा वारसा साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त रायडर्स व चाहत्यांना एकत्र येण्याची संधी मिळते.

ठाण्याच्या सर्वेश यादवला तिहेरी मुकुटमुंबईच्या तारिणी सुरीची दुहेरी मुकुटाची कमाई

सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सब-ज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या सर्वेश यादवने तिहेरी मुकुट मिळवला. त्याने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर ग्रेटर मुंबईच्या तारिणी सुरीने दुहेरी मुकुट मिळवला. तिने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सर्वेश यादवने नागपूरच्या अमेय नाकतोडेवर २१-११, २१-१६ अशी २८ मिनिटांत सहज मात केली आणि विजेतेपद पटकावले. सर्वेशने सुरुवातीपासूनच खेळात सफाई राखली. त्याने अमेयला फारशी संधीच दिली नाही. पहिली गेम एकतर्फीच झाली. दुसऱ्या गेममध्येही फारसे काही वेगळे घडले नाही. सर्वेशने पहिल्या गेमपासून आक्रमक खेळ कायम राखला. दुसऱ्या गेममध्ये त्याचा झंझावाती खेळ कायम राहिला. दुसऱ्या गेममध्ये त्याच्याकडून टाळत्या येण्यासारख्या चुका झाल्या. मात्र, अमेय पुनरागमन करणार नाही, याची काळजी त्याने घेतली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सर्वेश यादवने पुण्याच्या वेदांत नातूवर २१-११, २१-९ असा, तर अमेयने पालघरच्या देव रुपारेलियावर २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.
यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत सर्वेशने ओम गवंडीच्या साथीने बाजी मारली. सर्वेश-ओम जोडीने अंतिम फेरीत निधीश मोरे (पालघर) – सानिध्य एकाडे (वाशिम) या जोडीवर २१-१४, २१-१४ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. सर्वेशने नंतर अदिती गावडेच्या साथीने १७ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सर्वेश-अदितीने अंतिम फेरीत प्रणय गाडेवार – निशिका गोखे या नागपूरच्या जोडीवर २१-१३, २१-११ अशी मात केली.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तारिणीने नागपूरच्या निशिका गोखेचे आव्हान २१-११, २१-२३, २१-१७ असे परतवून लावले. ही लढत ४६ मिनिटे रंगली. तारिणीने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये निशिकाचा निभाव लागला नाही. मात्र, दुसऱ्या गेममध्ये चुकांमधून धडा घेत निशिकाने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावून बाजी मारली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये चुरस बघायला मिळाली. मात्र, तारिणीने विजयाची संधी गमावली नाही. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत निशिका गोखेने पुण्याच्या युतिका चव्हाणवर २१-१६, १८-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला होता, तर तारिणीने नागपूरच्या क्रिशा सोनीवर २१-१९, २१-७ अशी २४ मिनिटांत मात केली होती.
यानंतर तारिणीने नाशिकच्या श्रावणी वाळेकरच्या साथीने १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तारिणी-श्रावणी जोडीने अंतिम फेरीत निशिका गोखे (नागपूर) – युतिका चव्हाण (पुणे) जोडीला २१-१७, २१-१० असे पराभूत केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना पुण्याचे रेल्वेचे विभागीय अधिकारी डॉ. मिलिंद हिरवे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पीडीएमबीएचे सचिव रणजित नातू, चॅम्पियन स्पोर्ट्सचे मालक अमित मदन, सुधांशू मेडसीकर अकादमीचे संस्थापक सुधांशू मेडसीकर, सह-संस्थापक मेधा मेडसीकर उपस्थित होते.

उपांत्य फेरीचे निकाल : १७ वर्षांखालील मुले दुहेरी : उपांत्य फेरी : ओम गवंडी – सर्वेश यादव वि. वि. कोणार्क इंचेकर – सार्थक पाटणकर २१-९, २१-१२; निधीश मोरे – सानिध्य एकाडे वि. वि. कृष्णा जसूजा – वेदांत नातू २१-१६, १७-२१, २१-१६.

१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी : प्रणय गाडेवार – निशिका गोखे वि. वि. कृष्णा जसूजा – युतिका चव्हाण २२-२०, २१-१९; सर्वेश यादव – अदिती गावडे वि. वि. पार्थ लोहकरे – प्रकृती शर्मा २१-९, २१-१४.

१७ वर्षांखालील मुली दुहेरी : श्रावणी वाळेकर – तारिणी सुरी वि. वि. कुंजळ मंडलिक – विभा पाटील २१-१२, २१-७; निशिका गोखे – युतिका चव्हाण वि. वि. अदिती गावडे – ईशा पाटील २१-१८, २१-१२.

…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाना

नागपूर-भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घनाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे, असे सांगून श्री बावनकुळे यांनी अमरावती येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपा व नेत्यावर केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, 2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार सोबत कट करून सत्तेवर आले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भावासारखा सांभाळले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.

मीडियातूनच भाजपावर टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीच्या पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यांच्याकडे नेते नाही आणि मानसेही नाहीत त्यामुळे मीडियाच्या माध्यामतून ते भाजपावर टीका करीत आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट करावे
2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत.आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही.काँग्रेस पक्षातून कोणी भाजपमध्ये येणार असेल तर त्यांच्यासाठी भाजपाचे दुपट्टे तयार आहे. मात्र काँग्रेसने आपला पक्ष सांभाळून ठेवावा. कॉंग्रेसमध्ये भूकंप होणार आहे का हे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: स्पष्ट करावे, असाही टोला त्यांनी लगावला.
……….

आम्ही इथले भाई ..पुण्यात कोवळ्या तरुणाईत वाढलीय भाईगिरीची नशा

पुणे- शहर आणि उपनगर तसेच एकूणच परिसरात ‘आम्ही इथले भाई ‘ असे म्हणत दहशत निर्माण करण्याची नशा जणू येथील तरुणाईत पसरली असल्याचे दिसून येते आहे.अशाच आणखी एका प्रकरणात फरासखाना पोलिसांनी सुमारे ८ जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. हे आरोपी अगदी १८ ते २२ वयोगटातील असल्याचे आजवर ठिकठिकाणी निदर्शनास आले आहे.

फरासखाना पोलिसांनी १. ऋतिक राजेश गायकवाड,( वय २२, रा. ४२३, नविन मंगळवार पेठ, पुणे) २. उजेद शाहिद शेख,( वय-२१, रा. सदर)३. अरमान इकबाल शेख,( वय २०, रा. सदर )या तिघांना अटक केली असून त्यांच्या इतर पाच साथीदारांवर देखील गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले कि याप्रकरणी वेदांत सारसेकर वय २६ वर्षे रा. मंगळवार पेठ पुणे याने फिर्याद नोंदविली आहे.
दि.०९/०७/२०२३ रोजी रात्रौ २२/०० रोजी कमला नेहरु चौक येथे असलेल्या सुंदर पान शॉप जवळ यातील फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत सदर ठिकाणी गप्पा मारत थांबले असताना, नमुद इसम व फिर्यादी यांचेत झालेल्या जुन्या भांडणाचे कारणावरुन नमुद इसमानी त्यांचे साथीदारासह फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात घातक हत्यारांच्या सहाय्याने वार करुन, गंभीर जखमी करुन, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांचेकडील हत्यारे हवेत फिरवुन, “आम्ही इथले भाई आहोत, इथुन पुढे आमच्या सोबत कोणी पंगा घेतला, तर त्याला जिवंत सोडणार नाही” असे म्हणुन सदर परिसरात दहशत निर्माण केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी भादविक ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४९, ३२३, ५०६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप (8830552255)याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देणार अन प्रमुख पाहुणे शरद पवार असणार :डॉ. रोहित टिळकांची घोषणा

पुणे-लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी यासंबंधी घोषणा केली. एक लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे टिळक पुरस्काराचे स्वरूप आहे. एक ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच ट्रस्टचे विश्वस्त आणि कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एका जाहीर सभेत कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवत घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यानंतर शरद पवार यांनी येवला, सातारा जिल्ह्यात सभा घेऊन या फूटीमागे नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा घणाघात केला होता. एकीकडे दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे दोन्ही नेते एका व्यासपिठावर एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन 2021-22 साठीचे वितरण मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास  खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

बुधवार, दि. 12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

00000

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष :

(अ) युवक/युवती पुरस्कार

(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.

(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.

(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.

(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत. वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल – दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या ७५ परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.

परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारोप झाला

‘ती’ ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी‘पॉवरग्रीड’ची नव्हे तर अदानी कंपनीची

पुणे, दि. १० जुलै २०२३: पुणे जिल्हयातील तळेगाव ते शिक्रापूर ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि. ८) सकाळी ७.०७ तांत्रिक बिघाड झाला. मात्र, या अतिउच्चदाब वीजवाहिनीची मालकी तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अदानी कंपनीकडे असल्याचा खुलासा पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून सोमवारी (दि. १०) करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या व शिक्रापूर येथील अतिउच्च्दाब उपकेंद्राला जोडणाऱ्या ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वाहिनीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने भारव्यवस्थापनाद्वारे सकाळी १० ते १२.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मात्र तांत्रिक बिघाड झालेली तळेगाव-शिक्रापूर ४०० केव्ही ही वीजवाहिनी पीजीसीआयएलची नाही, तर या वाहिनीची मालकी तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अदानी कंपनीकडे असल्याचा खुलासा पीजीसीआयएलकडून करण्यात आला आहे.

एच.पी. सॅमसंग, कॅनन व इफसन व डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट बनविणारे रॅकेट पुण्यात उघड,२८ लाखाचे पार्ट जप्त


कात्रजच्या २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

पुणे – एच.पी. सॅमसंग, कॅनन व इफसन व डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट बनविणारे रॅकेट पुण्यात उघड झाले असून पोलिसांनी २८ लाखाचे पार्ट जप्त करत या रॅकेटचा पर्दाफाश केला .
याप्रकरणी तक्रार आल्यावर तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सैय्यद, गुन्हे शाखा युनिट-०१ व स्टाफ यांनी मिळुन दि.०६/०७/२०२३ रोजी आण्णासाहेब खैरेपथ, शुक्रवार पेठ येथील प्रविण खोड,( वय-२८ वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे )याचे दुकानात छापा टाकला.
तेव्हा त्याचे दुकानात सॅमसंग, कॅनन व इफसन कंपनीचे बनावट १ ) टोनर २ ) कार्टेज ३) आउटर बॉक्स ४) पॅक इंक बॉटल ५) होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले पार्ट व साहित्य मिळुन आले आहे. गुन्हे शाखा युनिट ०१ च्या पथकाने त्याच्या कडुन एकुण २५ लाख २४ हजार ८२५/- रुपय किचा मुद्देमाल जप्त करुन,खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस उप-निरीक्षक,कुलकर्णी हे करीत आहेत.
तसेच दि.०६/०७/२०२३ रोजी फिर्यादीकडुन प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक,शब्बीर सैय्यद व युनिट – ०१ कडील स्टाफ यांनी मिळुन १ ) तृप्ती ट्रेडर्स २) प्रेम टॉईज ३) गणेश ट्रेडर्स, रविवार पेठ, पुणे येथील दुकानांवर छापा टाकला असता, तिन्ही दुकानांतून बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शाळेय साहित्य असा एकुण किंमत २,९३,९०० /- रुपये किचा बनावट मुद्देमाल जप्त केलेला असुन,त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पो. निरी. आशिष कवठेकर, युनिट – ०१, गुन्हे शाखा हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त,रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त,.संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्ह, अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सैय्यद, युनिट ०१, सहा. पो निरी. आशीष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, विठ्ठल पाटील, अमोल पवार, निलेश साबळे, अभिनव लडकत, शशीकात दरेकर यांनी केली आहे.

टाटा पॉवर कडून ‘टाटा अमृतवन’ची निर्मिती ..

पुणे/लोणावळाभारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने हरित व पर्यावरणपूरक भविष्य निर्मितीसाठी योगदान देण्याचे प्रयत्न सुरु ठेवत, आपल्या वालवन धरणाच्या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वृक्षारोपण मोहिमेची सुविधा उपलब्ध करवून दिली. महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे प्रधान सचिव श्री बी वेणुगोपाल रेड्डी, पीसीसीएफ आणि वन दलाचे प्रमुख श्री. वायएलपी राव यांच्या नेतृत्वाखाली, टाटा पॉवरचे हायड्रोजचे चीफ श्री. प्रभाकर काळे, डब्ल्यूआरईएलचे सीईओ श्री. ए जी पाटील आणि इतर वरिष्ठांच्या उपस्थितीत टाटा अमृतवनमध्ये ४०० पेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.

निसर्ग संवर्धनाप्रती आपल्या जबाबदारीचे पालन करत टाटा पॉवरने स्वातंत्र्याच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून, कर्तव्य काळच्या निमित्ताने या उपक्रमात सहयोग प्रदान केला आहे. (नुकतेच अमृत काळचे नाव कर्तव्य काळ असे ठेवण्यात आले आहे)

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून टाटा पॉवरने वालवनमध्ये एक व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम चालवत आहे. १९७० च्या दशकात सुरु करण्यात आलेल्या माहसीर संवर्धन प्रकल्पाबरोबरीनेच हिरवाईमध्ये वाढ करण्यासाठी व स्थानिक वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी टाटा पॉवरने हा उपक्रम सुरु केला. जमिनीची धूप होण्यापासून रोखणे, जवळपासच्या समुदायांसाठी रोजगार निर्मिती करणे तसेच शैक्षणिक व बौद्धिक उद्देशांसाठी माहिती जमा करणे, डॉक्युमेंटेशन करणे ही या उपक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी वनीकरणावर भर देत संपूर्ण पश्चिम घाट भागात दहा लाखांपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली.    

अल्ट्रा झकास लवकरच

मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवंनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपट कलाकृती  तयार करण्याचा चस्का अल्ट्राला लागला असून महाराष्ट्रातील ग्रामीण – शहरी प्रेक्षकांच्या पसंतीचे खुमासदार विषय आणि त्याला मनोरंजनाचा झकास गावरान तडका असं भलंमोठ्ठ पॅकेज प्रेक्षकांना फक्त याच ओटीटीवर पहायला मिळत असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. ‘बोल हरी बोल’ या सुपरहिट चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला घेऊन दिग्दर्शक अमोल बिडकर ‘हिरा फेरी’ करण्याच्या तयारीत आहेत.

‘हिरा फेरी’ या चित्रपटात कॉमेडी क्वीन अर्थात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि ‘बॉईज २’ फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार असून त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडी स्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले असून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.’चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठी मनोरंजना वसा जपणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ची ‘हिरा फेरी’ ही मराठी प्रेक्षकांसाठी ‘श्रावण भेट’ असून कुटुंबातील सगळ्यांना एकत्र बसून ओटीटीवर पाहता येईल असे निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकृतींच्या निर्मितीवर ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.’ भर देत असून ‘हिरा फेरी’ सर्वांचे निखळ मनोरंजन करण्यात नक्की यशस्वी होईल असा विश्वास या ओटीटीचे सर्वेसर्वा सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

तेजस्विनीचा ‘अफलातून’ डॅशिंग अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला  मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून  प्रेक्षकांचे मनोरंजन  केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘अ डिफेक्टीव्ह कॅामेडी’ असं म्हणत लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, ‘माझं यातलं व्यक्तिमत्व गोवन आहे. शांत, संयमी पण वेळप्रसंगी आपला खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारी पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे.  विशेष म्हणजे गोव्याची भाषा, त्याचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली.  प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘अफलातून’ हा चित्रपट आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन  सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब यांचे आहे.  मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन  रंजू वर्गीस, वेशभूषा  मीनल डबराल गज्जर, कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन  पद्मनाभन,  सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे.

‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

ओमप्रकाश बकोरीया यांची बेकायदेशीर बदली तात्काळ स्थगित करा-आम आदमी पार्टीकडून आंदोलनाचा इशारा

पुणे-शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतर अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची बदल करत त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ति करण्यात आली आहे. ही बदली बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी तरी बकोरीया यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, आम आदमी पार्टी पुणेच्या रस्ते व सार्वजनिक वाहतुकचे सेनथील अय्यर, आम आदमी पार्टीचे कामगार आघाडीचे संजय कोणे, सोशल मीडियाचे अक्षय धावडिकर, मिडियाचे अमित म्हस्के, कार्यकर्ते इम्रान खान, राजू परदेशी, साहिल परदेशी उपस्थित होते.

बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पीएमपीएलने चांगला वेग घेतला होता. पुण्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता डबल डेकर बस आणण्याच्या प्रयत्नात बकोरिया अतिशय नियोजनबद्ध काम ते करत होते. बकोरिया जवळपास नऊ महिन्यापूर्वी या संस्थेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या कामाची छाप ही पुण्यामध्ये दाखवली होती. अनेक निर्णय त्यांनी अतिशय वेगाने घेत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली होती त्यामुळे पीएमपीएलचे उत्पन्न देखील वाढले होते. सर्व काम सुरुळीत सुरू असताना त्यांचा कार्यकाल संपण्याआधीच त्यांची अन्यायकारक बदली करण्यात आली आहे.

बकोरीया यांची बदली पूर्णतः बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आणि राज्य माहिती आयोगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दिलेला आदेशाचे अवमान करणारी आणि दप्तर दिरंगाईच्या कायद्याचेही अवमान करणारी आहे.वास्तविक पाहता कोणत्याही शासकीय करणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांची बदली ही त्याचा पूर्ण कालावधी म्हणजे तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कर्ण कायद्यान कार्य कायदे करणे कायद्याने चुकीची आहे. परंतु अशा सर्रास बदल्याची प्रथा सध्या मंत्रालयामध्ये चालू आहे. बदल्या कशा आणि कधी कराव्यात या संदर्भामध्ये अनेक तरतुदी कायद्यात करण्यात आलेले आहेत.

परंतु त्या तरतुदींचं पालन करता येत नाही करण्यात येत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये कराव्यात. आणि बदल्यांची तयारी जानेवारी महिन्यामध्ये करावी असा नियम आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करून आपल्या सरकारने जून जुलै या महिन्यांमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे दिसून येते.यामध्ये कोणत्याही नियमाचे पालन न करता केवळ काही लोकांना खुश करण्यासाठी या बदल्या केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ज्यांनी या बदल्या केल्या त्यांच्या लक्षात कधी आपण सर्वोच्च न्यायालयाचा आणि कायद्याचा अवमान करत आहोत.

परंतु या पत्राद्वारे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण केलेले कृत्य पूर्णतः बेकायदा आहे त्यामुळे या सर्व प्रकारचे आपण तू कशी करावी आणि ओमप्रकाश बकोरिया यांची बदली तातडीने रद्द करावी अन्यथा आम आदमी पक्षाबरोबरच पुण्यातल्या स्वयंसेवी संस्था व पुण्यातील जनता आंदोलन तर करेलच वेळप्रसंगी यासंदर्भात न्यायालयात देखील दाद मागेल.तरी ओमप्रकाश बकोरियाना पुन्हा पदभार द्यावी ही विनंती तसे न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा यावेळी देण्यात आला