सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सब-ज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या सर्वेश यादवने तिहेरी मुकुट मिळवला. त्याने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर ग्रेटर मुंबईच्या तारिणी सुरीने दुहेरी मुकुट मिळवला. तिने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सर्वेश यादवने नागपूरच्या अमेय नाकतोडेवर २१-११, २१-१६ अशी २८ मिनिटांत सहज मात केली आणि विजेतेपद पटकावले. सर्वेशने सुरुवातीपासूनच खेळात सफाई राखली. त्याने अमेयला फारशी संधीच दिली नाही. पहिली गेम एकतर्फीच झाली. दुसऱ्या गेममध्येही फारसे काही वेगळे घडले नाही. सर्वेशने पहिल्या गेमपासून आक्रमक खेळ कायम राखला. दुसऱ्या गेममध्ये त्याचा झंझावाती खेळ कायम राहिला. दुसऱ्या गेममध्ये त्याच्याकडून टाळत्या येण्यासारख्या चुका झाल्या. मात्र, अमेय पुनरागमन करणार नाही, याची काळजी त्याने घेतली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सर्वेश यादवने पुण्याच्या वेदांत नातूवर २१-११, २१-९ असा, तर अमेयने पालघरच्या देव रुपारेलियावर २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.
यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत सर्वेशने ओम गवंडीच्या साथीने बाजी मारली. सर्वेश-ओम जोडीने अंतिम फेरीत निधीश मोरे (पालघर) – सानिध्य एकाडे (वाशिम) या जोडीवर २१-१४, २१-१४ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. सर्वेशने नंतर अदिती गावडेच्या साथीने १७ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सर्वेश-अदितीने अंतिम फेरीत प्रणय गाडेवार – निशिका गोखे या नागपूरच्या जोडीवर २१-१३, २१-११ अशी मात केली.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तारिणीने नागपूरच्या निशिका गोखेचे आव्हान २१-११, २१-२३, २१-१७ असे परतवून लावले. ही लढत ४६ मिनिटे रंगली. तारिणीने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये निशिकाचा निभाव लागला नाही. मात्र, दुसऱ्या गेममध्ये चुकांमधून धडा घेत निशिकाने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावून बाजी मारली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये चुरस बघायला मिळाली. मात्र, तारिणीने विजयाची संधी गमावली नाही. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत निशिका गोखेने पुण्याच्या युतिका चव्हाणवर २१-१६, १८-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला होता, तर तारिणीने नागपूरच्या क्रिशा सोनीवर २१-१९, २१-७ अशी २४ मिनिटांत मात केली होती.
यानंतर तारिणीने नाशिकच्या श्रावणी वाळेकरच्या साथीने १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तारिणी-श्रावणी जोडीने अंतिम फेरीत निशिका गोखे (नागपूर) – युतिका चव्हाण (पुणे) जोडीला २१-१७, २१-१० असे पराभूत केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना पुण्याचे रेल्वेचे विभागीय अधिकारी डॉ. मिलिंद हिरवे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पीडीएमबीएचे सचिव रणजित नातू, चॅम्पियन स्पोर्ट्सचे मालक अमित मदन, सुधांशू मेडसीकर अकादमीचे संस्थापक सुधांशू मेडसीकर, सह-संस्थापक मेधा मेडसीकर उपस्थित होते.
उपांत्य फेरीचे निकाल : १७ वर्षांखालील मुले दुहेरी : उपांत्य फेरी : ओम गवंडी – सर्वेश यादव वि. वि. कोणार्क इंचेकर – सार्थक पाटणकर २१-९, २१-१२; निधीश मोरे – सानिध्य एकाडे वि. वि. कृष्णा जसूजा – वेदांत नातू २१-१६, १७-२१, २१-१६.
१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी : प्रणय गाडेवार – निशिका गोखे वि. वि. कृष्णा जसूजा – युतिका चव्हाण २२-२०, २१-१९; सर्वेश यादव – अदिती गावडे वि. वि. पार्थ लोहकरे – प्रकृती शर्मा २१-९, २१-१४.
१७ वर्षांखालील मुली दुहेरी : श्रावणी वाळेकर – तारिणी सुरी वि. वि. कुंजळ मंडलिक – विभा पाटील २१-१२, २१-७; निशिका गोखे – युतिका चव्हाण वि. वि. अदिती गावडे – ईशा पाटील २१-१८, २१-१२.