· अत्याधुनिक सुविधाकेंद्रात २५० कोटी रुपये गुंतवण्याचे उद्दिष्ट
· इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेसाठी व्यवसायातर्फे महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा
मुंबई, १० जुलै २०२३ : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने त्यांची व्यवसाय शाखा गोदरेज एरोस्पेस स्वदेशी उत्पादन, नावीन्यपूर्णता आणि तांत्रिक प्रगतीवर आपले लक्ष केंद्रित करत असल्याची घोषणा केली आहे. गोदरेज एरोस्पेस राष्ट्र उभारणी आणि स्वावलंबनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून प्रगत उत्पादन आणि जोडणी तसेच एकात्मिक सुविधांसाठी महाराष्ट्रातील खालापूर येथे नवीन सुविधाकेंद्र उभारण्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. व्यवसायातर्फे इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण घटक देखील पुरवले जात आहेत.
वर्षानुवर्षे, कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल घटकांसह महत्त्वपूर्ण घटकांच्या निर्मितीमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या योगदानांनी चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये अविभाज्य भूमिका बजावली असून या मोहिमांनी अंतराळ संशोधनात अग्रेसर म्हणून भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. अलीकडील NVS-01 उपग्रहाच्या प्रक्षेपणासह इस्रोच्या धोरणात्मक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत ते प्रत्येक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही प्रक्षेपणाचा एक भाग आहेत.
हा व्यवसाय नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या उत्पादनाच्या वाढीसाठी भारतात आणि निर्यातीद्वारे सक्रियपणे योगदान देत आहे. रोल्स रॉईस, बोईंग आणि जीई सारख्या जागतिक महत्वाच्या कंपन्यांशी सहकार्य करून कंपनी महत्वाच्या घटकांच्या विकास आणि निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. हे प्रयत्न नागरी उड्डाणासाठीच्या उत्पादनात भारताच्या क्षमतांनाच केवळ बळकटी देत नाहीत तर देशाच्या निर्यात क्षमतेतही योगदान देतात आणि एरोस्पेस उद्योगात जागतिक दर्जाची कंपनी म्हणून स्थान मिळवतात. डीआरडीओ इंजिन मॉड्युल्ससह, गोदरेज एरोस्पेस ही भारतात प्रथमच या प्रकारच्या इंजिनचे कोअर मॉड्युल तयार करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे.
गोदरेज एरोस्पेसचे एव्हीपी आणि बिझनेस हेड मानेक बेहरामकामदीन म्हणाले, “इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. राष्ट्र उभारणी आणि आत्मनिर्भरता यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे हे उदाहरण आहे. गोदरेज एरोस्पेसमध्ये आम्ही अंतराळ प्रकल्प आणि नागरी उड्डाण क्षेत्रातील देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी योगदान देत स्वदेशी उत्पादन आणि तांत्रिक प्रगती यासाठी वचनबद्ध आहोत. इस्रोचा विश्वासू भागीदार म्हणून आम्ही भविष्यातील प्रक्षेपण, मोहिमा आणि प्रगत एरोस्पेस घटक आणि प्रणालींच्या विकासासाठी योगदान देत राहू. नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आम्ही पुढील तीन वर्षांत १००% वाढीचा अंदाज घेऊन, अमेरिकेसह जागतिक बाजारपेठांमध्ये नावीन्यपूर्ण आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करत आहोत.”
स्वदेशी क्षमतांचा लाभ घेऊन आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करून कंपनी देशाच्या स्वयंपूर्णतेमध्ये योगदान देत आहे आणि देशात तंत्रज्ञान प्रगतीला चालना देत आहे. हे प्रयत्न आर्थिक वाढीला चालना देतात, गुंतवणूक आकर्षित करतात आणि उच्च-कुशल रोजगाराच्या संधी निर्माण करतात. अशा प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या व्यापक उद्दिष्टाला समर्थन देण्यात येत आहे.