सेमीकंडक्टरची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबतचा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉनने याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमध्ये 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. आधी हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र नंतर गुजरातला गेल्याने यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.’रॉयटर्स’ने याविषयीचे वृत्त दिले आहे. फॉक्सकॉनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. वेदांतासोबत संयुक्त प्रकल्प न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे.
मागील आठवड्यात शेअर बाजार नियामक सेबीने वेदांताला दंड ठोठावणार असल्याचे जाहीर केले होते. वेदांताने फॉक्सकॉनसोबत भागिदारी केली असल्याचे भासवले. ही कृती नियामकांच्या विरोधात असल्याचे सेबीने म्हटले.शुक्रवारी, वेदांताने ज्वाइंट व्हेंचर असलेल्या होल्डिंग कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याचे जाहीर केले होते. या कंपनीने फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर तयार करण्यासाठीचा करार केला होता. कंपनीने सांगितले होते की, ते डिस्प्ले ग्रास मॅन्यूफॅक्चरिंग व्हेंचरचे वॉलकॅन इन्व्हेस्टमेंटकडून अधिग्रहण करणार आहे.
गेल्या वर्षी गुजरातेत हलवला प्रकल्प,महाराष्ट्रात होणार होता प्रकल्प,1 लाख रोजगारांची निर्मिती होणार होती
मागील वर्षी, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने फॉक्सकॉनसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वेदांता समूहाला सेमीकंडक्टर प्लांट लावण्यासाठी गुजरात सरकारकडून आर्थिक आणि बिगर-वित्तीय अनुदान देण्यात आले होते. यामध्ये स्वस्त दरात वीज आणि इतर बाबींचा समावेश होता.
वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात येणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला अचानकपणे गेल्याने मोठं राजकारण गाजलं. मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्याने केंद्राच्या मदतीने हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. तर, मविआ सरकार सत्तेवर असताना परवानगी आणि इतर बाबी रखडल्यानेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे शिवसेना शिंदे गट-भाजपने म्हटले होते.हा प्रकल्प हा पुण्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती.